मी पुरेशी मजसाठी भाग 24

अंबिका खरंच आयुष्यभर मिस्टर आनंद जाईचं तोंड नाही बघणार का? असं कसं प्रेम यांचं?
मी पुरेशी मजसाठी भाग 24

एका तरुण पत्रकाराने विचारलं, "साईटवर सर्रास ब्ल्यू फिल्म शूट केल्या जात होत्या. बबनने याला आळा घालायचा प्रयत्न केला म्हणून कट रचून त्याला मारल्या गेलं. असं ऐकलं त्याबद्दल काय म्हणणं आहे आपलं?"

"मंगूने त्याच्या कबुली नाम्यात स्पष्ट लिहिलं आहे कि साईटवर ब्ल्यू फिल्म वगैरे असं काहीच होत नव्हतं. त्याला एका नामांकित बिल्डर कडून पैसे मिळाले होते जाई कन्स्ट्रक्शनचे नाव खराब करायचं. म्हणून त्याने संधी बघून विधी आणि तिच्या बॉयफ्रेंडचा व्हिडीओ शूट केला." नेहा उत्तरली.

"असं आहे तर बिल्डरचे नाव सांगा." पत्रकार.

"पुरावा गोळा झाल्यावर नक्की सांगू." नेहा.

"गोळा करणार की बनवणार?" एक पत्रकार डोळा मिचकावत म्हणाला.

"प्रश्न संपले असतील तर आपण जाऊ शकता. उगाच वायफळ चर्चा नको. पुरावा नसतांना कोणाचं नाव घेतलं तर तो आमच्यावर मानहानीचा दावा ठोकू शकतो. इतकी अक्कल असायला हवी एक पत्रकार म्हणून तुम्हाला." मिसेस जाई खडसावून म्हणाल्या.

"सॉरी मॅम!" एका ज्येष्ठ पत्रकाराने कटाक्ष टाकताच आधीचा तरुण पत्रकार गंभीर होऊन म्हणाला.

"पण साईटवर विधीचे असं वागणं योग्य नाही. अशा कृत्यामुळेच आम्ही मुली बदनाम होतो आणि बघणाऱ्यांचा दृष्टीकोन बदलतो. मग असले ब्लॅकमेलिंगचे प्रकार होतात." एक तरुणी म्हणाली.

"हो खरंच आहे हे. पण कोणी चुकलं तर त्याला कायद्याच्या हातात द्या. स्वतः कायदा बनून वाट्टेल तसं कृत्य करणं कितपत योग्य?" नेहा म्हणाली.

"बबनला जर खरंच जाई कन्स्ट्रक्शनचं काही पितळ वगैरे उघडं पाडायचं असतं तर त्याने पोलिसात तक्रार केली असती. एकट्या मुलीला कोणी ऑफिसर मंडळी साईटवर नसतांना बोलावणं आणि तिच्या गळ्यात बेल्ट टाकणं हे गैर नाही का?" वकील बोलले.

"चुका होतात सगळ्यांकडूनच. विधी कडूनही झाली. त्याबद्दल तिच्यावर आम्ही कारवाई करूच. बाकी 2-3 दिवसात विधी आणि अंबिकाचा मोबाईल रिपेअर होऊन आल्यावर रिकॉर्डिंग ऐकायला मिळेलच सर्वांना. तेव्हा प्लीज आताच जाई कन्स्ट्रक्शनला आरोपी सिद्ध करू नका. काही दिवस वाट बघा. अशी मी आपण सर्वांना कळकळीची विनंती करते. धन्यवाद !" मिसेस जाई बोलल्या आणि तिथून बाहेर पडल्या.

प्रेस कॉन्फरन्स संपली. सोमवार उजाडला. नेहा कोर्टातून ऑर्डर घेऊन दुपारी पोलीस स्टेशनला हजर झाली. अंबिका आणि विधी दोघीही जामीनवर सुटल्या.

संध्याकाळी अंबिका अंकुरला भरवतच होती कि मिसेस जाई तिला घ्यायला विधीच्या घरी आल्या. अंकुरला पूर्ण भरवून खेळण्यात गुंग करून अंबिका त्यांच्या गाडीत बसली. गाडी हॉस्पिटलमधे गेली. डॉक्टरने अंबिकाच्या काही टेस्ट केल्या. अर्ध्या तासात रिझल्ट मिळाले. सर्व रिपोर्ट नॉर्मल निघाले. हिमोग्लोबिन तेवढं कमी निघालं. डॉक्टरने तिला काही औषधं दिली आणि मिस्टर आनंद जाईचे स्पर्म तिच्या गर्भाशयात inject करायला आठ दिवसा नंतरची तारीख दिली. कारण मिस्टर आनंद जाई अजूनही पूर्णपने ठीक झाले नव्हते.

"मला वाटतं तु आता आमच्या सोबत जाई निवास मधेच राहायला आलेलं बरं होईल. म्हणजे तुझ्या खाण्यापिण्याकडे लक्ष देता येईल. तब्येतीची चांगली काळजी घेता येईल." पोर्श गाडीत बसत मिसेस जाई अंबिकाला म्हणाल्या.

अंबिकाने चमकून ड्रॉयव्हर सीटच्या शेजारील सीटवर बसलेल्या नेहाकडे मिरर मधून बघितलं. अंबिकाची सटकली, ती काहीतरी बोलणार त्या आधीच नेहा बोलू लागली,

‘’मॅम मला वाटते आपण अंबिकाला हवे तसे, ती सध्या राहते त्याच फ्लॅटवर राहू दिलेले बरे. जाई निवास मधे एखाद्या गोष्टीला धरून तिने ताण घेतला तर बाळावरही ताण येईल. ’’ नेहा मिसेस जाईला अंबिकाची बाजू समजावत म्हणाली, "डॉक्टर बोलले आहेत जितकी अंबिका शांत, आनंदी आणि हसत खेळत राहणार तितकी प्रेग्नेंसी सुलभ होईल."

"तुला म्हणायचं काय आहे नेहा? आम्ही आमच्याच बाळाला जन्म देणाऱ्या हिला ताण देणार?" मिसेस जाई बोलल्या.

"तसं नाही हो !" नेहा मिरर मधून तिच्याकडेच बघणाऱ्या अंबिकाला नजरेनंच शांत राहायचा इशारा करत म्हणाली.
पण ती कशाची शांत बसते. सध्या तिचं ब्लड प्रेशर चांगलं वाढलं होतं.

"मला माहित आहे तुम्हाला का मी तुमच्या नजरे समोर हवी आहे? कारण सर माझ्याकडे आकर्षित होतील अशी भीती वाटतेय ना तुम्हाला?" अंबिका सरळ बोलली, "पण तुम्ही कितीही आळा घातला, कितीही नजर ठेवली माझ्यावर तरीही ते होणारच आहे."

"अंबिका?" मिसेस जाई तिच्यावर भडकल्या.

"सॉरी मॅम. पण एक गोष्ट ही पन लक्षात घ्या कि आपण जितकं एखादी गोष्ट होऊ नये म्हणून ताणून धरतो, तितक्या तीव्रतेने ती गोष्ट घडतेच. पण हेही तितकंच खरं की मला मिस्टर जाई मधेच काय, कोणत्याही माणसात आता तसला काही इंटरेस्ट उरला नाहीये. मला फक्त एक साधं, हसत खेळत आयुष्य माझ्या मुलासोबत घालवायचं आहे. तुम्ही निश्चिन्त राहा आणि मलाही राहू द्या."

एक लांब श्वास घेऊन ती परत बोलू लागली, "मी प्रेग्नेंसी मधेही ऑफिसला येणार. तुम्ही मला जाई कन्स्ट्रक्शन मधे जॉब नाही करू दिला तर मी दुसरीकडे शोधणार. तेव्हा तुम्हाला काय हवं ते ठरवा आणि तसं वागा."

मिसेस जाई काहीच बोलल्या नाही. थोडावेळ सर्व शांत झालं.

अंबिकाचा स्वभाव लक्षात घेता त्यांनी तिचे स्वताच्या फ्लॅट वर राहणे आणि ऑफिसला येणे मान्य केले पण एका अटीवर की अंबिका यापुढे कुठेही येणे जाणे फक्त त्या देतील त्या कारनेच करेल. अर्थातच अंबिकाला हे सुध्दा मान्य नव्हते.

‘’मॅम तुम्हाला दुखवायचा इरादा नाही माझा म्हणून आधीच माफी मागते आहे. पण ऑलरेडी मी एका मुलाला जन्म देऊन त्याचे पालन पोषण, सर्व एकट्यानेच करते आहे. तेव्हा येणारया बाळाची चिंता करू नका. त्याला सुखरूप तुमच्या पदरात देणे हाच माझा उद्देश पूर्ण करायला मी सक्षम आहे. तुम्ही प्लीज मला आणि अंकुरला नको त्या सवयीत गुंतवु नका.’’

‘’तु खूप जिद्दी आहेस अंबिका. आता मी तुझे म्हणणे ऐकून घेतेय पण असे नेहमीच चालणार नाही.’’ मिसेस जाई म्हणाल्या. कार विधीच्या घरासमोर आली. अंबिका खाली उतरली.
"काळजी घे." मिसेस जाई म्हणाल्या.

"तुम्हीही !" अंबिका त्यांच्याकडे न बघताच बोलली आणि समोर चालू लागली. क्षणभर तिच्या पाठमोऱ्या आकृतीला बघून किंचित, ओठांच्या कोपऱ्यात स्मित करून मिसेस जाईने ड्रॉयव्हरला कार चालवायला सांगितलं.

अंकुर अंबिकाची वाटच बघत होता. अंबिकाने त्याला जवळ घेऊन एक छानशी परीकथा ऐकवली. कथा ऐकतच तो निद्रा देवीला जाऊन भेटला. अंबिकाला एखाद्या राजकुमार सारखं तिला वाचवण्यासाठी स्वतःवर घाव झेलणाऱ्या मिस्टर आनंद जाईची आठवण झाली.

त्यांना शुद्धीवर येऊन दोन दिवस उलटून गेले पण ती त्यांना बघायला सुद्धा गेली नाही. त्यांनी सरोगेसी कॉन्ट्रॅक्ट पेपर्सवर सही केली म्हणून अंबिका नाराज होती त्यांच्यावर. त्यातल्या त्यात त्यांना भेटून काय करायचं? काय बोलायचं? शेवटी त्यांच्यात नातं तरी काय होतं? ती फक्त एक एम्प्लॉयी आणि मनात एकमेकांविषयी कितीही काही असलं तरीही ते जगासमोर आणणं तिला काही योग्य वाटत नव्हतं. जगा समोर आणून कशाला एखाद्याचा भरला संसार खराब करायचा?\" तिचं आपलं विचार चक्र सुरु होतं.

"झोपली नाहीस?" विधीने अंबिकाच्या खोलीचा लाईट सुरु बघून तिला विचारलं.

"अगं याला गोष्ट ऐकवत होती बघ आणि हाच कधी झोपला काही कळले नाही." अंबिका डोळयांच्या कडा टिपत म्हणाली.

"माझ्यामुळे अडकली ना या सगळ्यात? माफ कर मला." विधी अपराधी भावाने म्हणाली.

"असुदे गं ! लग्न व्हायच्या आधी मी कधीच नशीब वगैरे गोष्टीवर विश्वास ठेवला नाही. पण लग्न झालं, मूल राहले, नवऱ्याला नोकरी वर त्रास म्हणून अभ्यास करायला लावला, आपल्या इच्छांना तिलांजली दिली, तो अधिकारी झाला, मूल झालं, नवऱ्याने अंधारात ठेऊन दुसरा संसार थाटला. तेव्हा त्रागा त्रागा झाला जीवाचा. म्हणून एक शांत, आनंदी आयुष्य जगता यावं इतकी इच्छा ठेऊन घटस्फोट घेतला. पण शांतता अजूनही पदरी पडली नाही बघ. आता जे आहे, जसं आहे त्यातच आनंदी राहायला शिकावं लागेल असं दिसतेय. आणि वाटतेय नशिबात असलेलं कितीही टाळायचं म्हटलं तरीही टाळता येत नाही हेच खरं."

विधीने तिला जवळ घेतलं. ती खूपवेळ विधीच्या खांद्यावर डोकं टेकवून, डोळे मिटून बसली.

तिकडे मिस्टर आनंद जाईला हॉस्पिटल मधून डिस्चार्ज मिळाला. शिव आणि जिग्नेश सर्व फॉर्मॅलिटीज पूर्ण करत होते. बोलण्यातच जिग्नेश बोलून गेला,

"अंबिका अशी कशी वागू शकते. भेटायचं तर सोडच, साधं दुरून बघायला सुद्धा आली नाही सरांना."

"मला सुद्धा आश्यर्य वाटलं की ती इतकी कृतघ्न कशी... " शिव त्याचं वाक्य पूर्ण करणार तोच नर्स व्हिल चेयरवर मिस्टर आनंद जाईला घेऊन आली.

शिव चाचपडला.
त्याला वाटलं त्याचं आता काही खरं नाही. पण मिस्टर आनंद जाई काहीच बोलले नाही. त्यांना या वादात पडायचं नव्हतं ना कोणासमोर अंबिकाची पैरवी करणं त्यांना गरजेचं वाटलं. बाकी त्यांना माहित होतं ती का नाही आली ते. तिला नक्कीच त्यांनी सरोगेसी च्या पेपर वर सही केली म्हणून राग आला असेल. असं त्यांच्या मनात आलं. पण ज्यामुळे ती सुरक्षित राहणार ते सगळंच, ते करतील असं मिस्टर आनंद जाईनी मनोमन ठरवलं. मग अंबिकाने जन्मभर त्यांचं तोंड नाही बघितलं तरीही चालेल.

त्यांना हेही नव्हतं कळत की त्यांचं तिच्याशी असं काय नातं जडलं आहे? की ते तिच्या विचारातून बाहेर निघूच शकत नव्हते आणि आता तर एक मोठी जबाबदारी तिला पार पडायची होती. मिसेस जाईला बाळ देणं. वरवर जरी सोपं वाटत असलं तरी खरंच इतकं सहज असतं का एका नवीन जिवाला या दुनियेत आणणं? अंबिका मागील तीन चार वर्षांपासून ज्या काही घटनांना फेस करत आली तिला शक्य होईल सुखरूप बाळाला जन्म देणं?

मिस्टर आनंद जाईचा शांत मेंदू आता खूपच डिस्टरब झाला. पण त्यांनी स्वतःला शांतच दाखवून सगळं निभावून न्यायचं ठरवलं.

क्रमश :
तळटीप :
या कथेचा लेखिकेच्या परस्पर आयुष्याशी किंवा इतर कोणाशी काहीही संबंध नाही. ही निव्वळ काल्पनिक आणि आजूबाजूच्या सामाजिक वातावरणाला बघून सुचलेली मनोरंजनपर, स्त्रियांना प्रेरित करण्यासाठी लिहिलेली कथा आहे.

लेखिका : अर्चना सोनाग्रे वसतकार
फोटो : साभार गुगल वरून

🎭 Series Post

View all