मी पुरेशी मजसाठी भाग 21

मिस्टर आनंद जाईचा जीव धोक्यात. अंबिकाच्या डोकयावर फुटेल का खापर?
मी पुरेशी मजसाठी भाग 21

"चंदन भाऊ ऐसी कई लौंडीया ठिकाणे लगाई है मैने | ये तो कुछ भी नहीं. तुम जाओ और गेट पर पहारा दो. तबतक मंगू और मै अपनी रासलीला निपटाकर, इन दोनोंको लटकाकर आते है |" बबन डोळा मारून म्हणाला, "क्या मंगू बरोबर ना?"

"हाँ हाँ एकदम बरोबर !" मंगूही दिलखुश होऊन म्हणाला.
मंगू, बबन आणि चंदन, तिघांना बोलण्यात गूंग बघून अंबिकाने तिच्या पर्स मधून मिर्ची पावडर ची पुडी काढून विधीच्या हातात दिली. बबनने विधीच्या गळ्यात बांधलेल्या बेल्ट ला झटका देऊन जवळ ओढलं तशी विधी त्याच्या कडे ओढली गेली. तिने पटकन स्वतःच्या नाका तोंडाला डाव्या हाताने झाकून उजव्या हाताने मिर्ची पावडर त्याच्या तोंडावर उडवली. ते तिघेही भांबावले. तसं अंबिकाने स्वतः च्या तोंडावर ओढणी घेत उठून सेल्फ डिफेंस मिर्ची स्प्रे (स्व रक्षणा साठी ती नेहमी एक स्प्रे तिच्या सोबत, पर्स मधे बाळगायची ) त्यांच्या चेहऱ्यावर मारला. त्यांच्या नाका, तोंडाची आग आग होऊ लागली. डोळे तर उघडणंच अशक्य ! मंगू आणि चंदन पाणी शोधत बाथरूम जवळ गेले याचा फायदा घेऊन अंबिकाने त्यांना बाथरूम मधे लोटून दार बाहेरून लावून घेतलं. पण बबन धिप्पाड होता. डोळे बंद असले तरीही त्यानं विधीच्या गळ्यातला बेल्ट पकडूनच ठेवला होता. विधी तडफडत होती.

"तेरे जैसी उन्नीस कुत्तीयोको मारा है मैने | तु बिसवी है | किस घाट कि है?" असं म्हणत तो तिला पकडायचा प्रयत्न करू लागला.

अंबिकाने खूप प्रयत्न केला त्याची पकड सैल करायचा पण काही उपयोग झाला नाही. उलट त्याच्या धक्क्याने अंबिका खिडक्यांना लावायला ठेवलेल्या काळ्या ऑइल पेंटवर जाऊन पडली. विधी जिवाच्या आकांताने त्याच्या तावडीतून सुटायला बघत होती. तिच्या मानेला बेल्टच्या बक्कलचा लोखंडी कोपरा लागल्याने जखम झाली आणि त्यातून रक्त येऊ लागलं.

"तु मेल्या शिवाय ऐकणार नाहीस ना. ठीक आहे. देवाला हेच मंजूर असेल तर हेच सही. अंकुर बाळा तुझ्या आईचे हात रक्षणा खातर रक्तात माखले जाणार आहेत. तुला मोठं होतांना तूझ्या जवळ राहणार नाही म्हणून माझा राग करू नकोस." स्वतःशीच बोलून अंबिकाने काळ्या ऑइल पेंट मधे हात बुडवून तो चेहऱ्यावर माखला. बाजूलाच पाण्याचे नळ लावायचे पाईप लाईनचे लोखंडी पाईप होते. एक पाईप उचलून, \"हर हर महादेव ! जय भवानी!\" नामाचा गजर करत बबनच्या दिशेने धाव घेतली.

"नराधमा सोड विधीला." अंबिका जोरात किंचाळली. विधीने तिच्या कडे बघितलं. मोकळे विस्कळीत केस, काळा पेंट चेहऱ्यावर. विधीला ती अगदी चंडिका भासली. अंबिकाने तो लोखंडी पाईप त्याच्या डोक्यात हाणला. तसं त्याने विधीच्या गळ्यातील बेल्ट सोडून दिला. त्याच्या डोक्यातून रक्त वाहू लागलं. पण त्याच्यावर जणू काही असरच झाला नाही. तो अंबिकाच्या दिशेने धावला तसं तिने सपासप त्याच्यावर दोन तिन वार केले. तो खाली पडला तरीही चवताळलेली अंबिका थांबली नाही.

"अंबिका बस, अंबिका थांब... " विधी अंबिकाला आवाज देऊन सांगू लागली, "मरेल तो. थांब प्लिज अंकुर साठी."

पण अंबिका आता स्वतःच्या ताब्यात नव्हती. बबन रक्त बंबाळ होऊन खाली पडला. विधीला वाटलं आता काही खरं नाही. बबनच्या एका डोक्याची दोन डोकी होणारच. अंबिका परत पाईप त्याच्या डोक्यात मारणार तोच कोणीतरी तिचा हात पकडला. तिच्या हातातील लोखंडी पाईप खाली पडला. विधीच्या चेहऱ्यावर स्मित पसरलं. ती भिंतीला टेकून खाली बसली.

"अंबिका बस झालं. बाकी पोलीस बघतील त्याला." मिस्टर जाई अंबिकाचा हात पकडून तिला समजावत बोलले. पण अंबिका काही आटोक्यात येत नव्हती. तिच्यावर विधीच्या गळ्यात बेल्ट टाकून तिला मरण यातना देणाऱ्या बबनला ठार करायचं भूत सवार झालं होतं. तिच्यातील चंडिका तिच्या सौम्य स्त्रीच्या वृत्तीवर भारी झाली. तिला कशाचंच भान उरलं नव्हतं. फक्त बबन नावाच्या राक्षसाच्या नरड्याचा घोट घेणं हेच तिचं लक्ष होतं. ती ऐकतच नाही हे बघून मिस्टर जाईने तिला मिठीत घेऊन घट्ट पकडलं. ती त्यांना हात मारू लागली. त्यांच्या मिठीतुन सुटण्याचा प्रयत्न करू लागली. मिस्टर आनंद जाई मात्र शांतपणे तिच्या कानात बोलू लागले.

"अंबिका संध्यकाळ झाली आहे. तुला अंकुरला घ्यायला जायचं आहे. पाळणा घरात तुझी आठवण काढतोय तो. वाट बघतोय तुझी कि आई येईल आणि त्याला घरी नेईल. मऊसूत उपमा बनवून खाऊ घालीन. तुझा बाळ या जगात एकटा पडेल असं काहीच करू नकोस. आई नसण्याचे दुःख मी अनुभवले आहे. आई नावाचे छत हरवने म्हणजे आयुष्यातून हक्काचं प्रेम निघून जाणे. लेकराच्या रुसव्या फुगव्यांना कोणीच विचारणारं उरत नाही, त्याच्या आसवांना किंमत राहत नाही बघ. तुझ्या निष्पाप हातांना या राक्षस वृत्तीच्या माणसाच्या गलिच्छ रक्ताने माखू नकोस. तुला तुझ्या मुला जवळ, अंकुर जवळ परत जायचं आहे. तो वाट बघतोय."

हे शब्द तिच्या कानाद्वारे हृदयाला भिडले. ती शांत झाली आणि त्यांच्या छातीवर डोकं टेकवून रडू लागली. तिचं बदललेलं स्वरूप बघताच मिस्टर आनंद जाईने आपल्या हातांची पकड सैल केली. खिशातून रुमाल काढून तिचे गालावर ओघळणारे अश्रू ते टिपू लागले. त्यांच्या नजरेत अंबिकाच्या मागून तिच्यावर चाकू घेऊन वार करायला येणारा बबन पडला. तसं त्यांनी अंबिकाला फिरवलं आणि बबनचा वार स्वतःवर झेलला. अंबिका जोरात किंचाळली,
"सर !"

बबन, मिस्टर जाईला मारलेला चाकू काढून अंबिकाला मारायला पुढे झाला. जवळच भिंतीला टेकून बसलेली विधी भानावर आली होती. तिने खाली पडलेला लोखंडी पाईप हातात घेतला आणि त्याच्या मस्तकात हाणला. नेहाही पोलीस सोबत तिथे पोहचली. बबनचा खात्मा झाला होता. पोलिसांनी विधीच्या हातातील पाईप घेतला. तिच्या गळ्यातील बेल्ट काढला. नेहाने तिला एका जागी बसवून पाणी प्यायला दिलं. पोलिसांच्या सोबतचा फोटोग्राफर सगळ्यांचे फोटो काढू लागला. विधीने मंगू आणि चंदन बाथरूम मधे असल्याचं सांगितलं. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं.

दुर्घटना घडेल हे लक्षात ठेऊन पोलीस ऍम्ब्युलन्स सोबत घेऊनच आली. मिस्टर आनंद जाईला फर्स्ट एड देऊन, लगेच ऍम्ब्युलन्स मधे चढवून ऍम्ब्युलन्स हॉस्पिटलच्या दिशेने निघाली.

"सर का सर? असं का केलं?" अंबिका मिस्टर आनंद जाईचे डोकं मांडीवर घेऊन त्यांचा हात पकडून त्यांना विचारू लागली.

"कारण तु आई आहेस अंबिका आणि आईने नेहमी मुलाच्या सोबतच राहावं. माझी आई लहानपणीच गेली. तु अंकुरसाठी करत असलेली धावपळ बघून तुझ्यात मला नेहमीच ती दिसून आली. मी जे अनुभवू नाही शकलो ते आईचं प्रेम मला अंकुर पासुन हिरावू द्यायचं नव्हतं. माझं काय माझ्या पाठीमागे आहेच कोण?" बोलायला त्रास होत होता तरीही मिस्टर आनंद जाई बोलले. हे ऐकून अंबिका आणखीनच रडू लागली.

"तुम्ही प्लीज बोलू नका बरं." नर्सने मिस्टर आनंद जाईला रागावलं. मग अंबिकाला म्हणाली.
"मॅडम तुम्हीही शांत बसा. रडू नका."

पण अंबिकाला शांत बसून चालणार नव्हतं. सात वाजायला आले होते. अंकुर वाट पाहत असेल. तिला वेळ लागेल हे पाळणाघरी कळवणे गरजेचे होते. तिचा मोबाईल पर्स काय कुठे? तिला कशाचाच पत्ता नव्हता. नेहा सोबत आलेल्या जिग्नेशने अंबिका आणि विधी दोघींच्या वस्तू घेतल्या होत्या. अंबिकाने कधी कुठे मोबाईल, पर्स विसरलो तर कसं करायचं म्हणून पाळणाघरचा फोन नंबर पाठांतर केला होता. तिने नर्सला मोबाईल मागून पाळणाघरच्या मॅडमला तिला यायला वेळ होईल किंवा तिच्या तर्फे कोणीतरी त्याला घ्यायला येईल असं कळवलं.

ऍम्ब्युलन्स हॉस्पिटल मधे पोहोचली. मिस्टर आनंद जाई बेशुद्ध झाले. त्यांना ICU मधे दाखल केलं गेलं. चाकूच्या जोरदार वाराने कितीतरी आतडी चिरल्या गेली होती. त्यांची सर्जरी सुरु झाली. रक्त स्त्रावही बराच झालेला.

नेहाने पोलिसांची फॉर्मॅलिटी पूर्ण केली. बाकीची कारवाई मिस्टर आनंद जाई ठीक झाल्यावर करा अशी विनंती केली. तिने हॉस्पिटल मधेच विधीच्या आई बाबाला बोलावलं. विधीने त्यांच्या गळ्यात पडून घडलेलं सांगितलं. ते विधीला घरी घेऊन जात होते तेव्हा विधीच्या आईचे लक्ष एका खुर्चीत विचारमग्न बसलेल्या अंबिकावर गेली. त्यांनी तिच्या पायावर डोकं ठेवलं.

"काकू काय करताय तुम्ही?" अंबिका त्यांचे हात पकडून म्हणाली.
"ज्या चंडीने माझ्या मुलीला वाचवलं तिला प्रणाम करतेय. तुझे उपकार कसे फेडू गं?" विधीची आई म्हणाली.

"एक स्त्री दुसऱ्या स्त्री ला मदत नाही करणार तर कोण करेल आई. आणि विधी तर बहीण आहे माझी." अंबिका म्हणाली, "तुम्ही एका मुली सारखं प्रेम दिलं मला. अंकुरला परत आजी आजोबा मिळाले. माझं खोटंही पचवलं."

"अगं हो, अंकुर कुठे आहे? कोणाकडे आहे?" विधीच्या बाबानी विचारलं.

"तो अजून पाळणा घरीच आहे. सरांना परत डोळे उघडलेलं बघितल्या शिवाय मला चैन नाही पडणार म्हणून घ्यायला नाही गेले." अंबिकाने त्यांना सांगितलं.

"मग आम्ही कशासाठी आहोत? तु पाळणाघरच्या मॅडम ला फोन करून सांग मी अंकुरला घेऊन जाईल म्हणून. वाटलं तर फोटोही पाठवून दे माझा. म्हणजे तु इथे निश्चिन्त थांबू शकणार." विधीचे बाबा म्हणाले.

अंबिकाचे डोळे पाणावले, "मला खरंच यावेळी कोणीतरी असंच बोलणारे हवे होते."

"तु काळजी करू नकोस. आम्ही घरी जातांनाच घेऊन जातो त्याला सोबतच." विधी तिला मिठी मारून म्हणाली, "मला तर वाटलं होतं मी संपले आता. माझा खूप अंत अतिशय दुःख दायक होईल. एका क्षणाला वाटलं आपणच आपला गळा कापून घ्यावा. पण तु धावून आलीस मदतीला. मी तुझी सदा ऋणी राहणार बघ."

"हो ते ऋण नंतर चुकतं कर. आता जा. अंकुर वाट बघत असेल. त्याला सांग आई कामात आहे. काम झालं कि येतेच." अंबिका विधी पासून दूर होत म्हणाली. तिची नजर विधीच्या मानेवर बेल्ट मुळे झालेल्या जखमेवर थांबली.

"तिचं वाईट नको वाटू देऊ अंबिका. ती जखम म्हणजे मला मिळालेली शिकवण आहे कधीही भान ठेऊन वागण्याची. त्या दुपारी जर मी नको म्हटलं असतं तर तोही थांबला असता. मंगूने आमचा व्हिडीओ बनवला नसता आणि जे घडलं ते घडलं नसतं. ना मी मरण इतकं जवळून बघितलं असतं ना सरांना इतका मोठा घाव मिळाला नसता. मला आनंद सरांची काळजी वाटतेय? त्यांना काही झालं तर मी कधीच स्वतःच्या नजरेला नजर नाही देऊ शकणार." विधीचे डोळे पाणावले.

थोडावेळ एकदम शांतता पसरली. मग नेहाच बोलली, "तुम्ही जा आता. अंकुरही वाट बघत असेल. आजोबा आजीला बघून त्याला बरं वाटेल."

"हो. तुही काळजी घे. काही लागलं तर सांग." विधीची आई म्हणाली. अंबिकाने मान हलवूनच होकार दिला. तिच्या मनातही धुकधुक सुरु झालेली. \"मिस्टर आनंद जाईला खरंच काही झालं तर? नको नको आपण असला विचारच नको करायला. सर्जरी सक्सेसफुल्ल होईल आणि लवकरच ते शुद्धीवर येतील.\"

अंबिका ऑपरेशन थियेटर समोर ऑपरेशन संपायची वाट बघत फेऱ्या मारू लागली. तिचा जीव तिला एका जागी बसू देईना.

तीन चार तास उलटले. सर्जरी संपली. डॉक्टरांनी मिस्टर आनंद जाई चोवीस तासाच्या आत शुद्धीवर यायला हवेत नाही तर ते कोमात जाण्याची शक्यता आहे असं सांगितलं.

आपल्यामुळे मिस्टर आनंद जाई हॉस्पिटलमधे मरणाशी झुंज देत आहेत या विचाराने अंबिकाला सारखं भरून येत होतं. मिसेस जाई एव्हाना हॉस्पिटलमधे पोहोचल्या. सारिका कडून त्यांना काय कसं घडलं सर्व माहित झालं. अर्थातच त्यात थोडंफार तिने तिखट मीठ लावूनही सांगितलं. डॉक्टर कडून मिस्टर आनंद जाई बद्दल सर्व माहिती घेतल्यावर त्या अंबिकाकडे वळल्या.

क्रमश :
तळटीप :
या कथेचा लेखिकेच्या परस्पर आयुष्याशी किंवा इतर कोणाशी काहीही संबंध नाही. ही निव्वळ काल्पनिक आणि आजूबाजूच्या सामाजिक वातावरणाला बघून सुचलेली मनोरंजनपर, स्त्रियांना प्रेरित करण्यासाठी लिहिलेली कथा आहे.

लेखिका : अर्चना सोनाग्रे वसतकार
फोटो : साभार गुगल वरून


🎭 Series Post

View all