मी पुरेशी मजसाठी भाग 18

हे काय नवीन संकट आलं अंबिका च्या पदरी
मी पुरेशी मजसाठी भाग 18

अंबिका सकाळी ऑफिस ला जायच्या तयारीत होती. तिचा मोबाईल वाजला. मिसेस जाई तिला फोन करत होत्या. तिने पटकन फोन उचलला.

"गुड मॉर्निंग मॅम !" अंबिका म्हणाली.

"ऑफिस च्या बाजूला असलेल्या कॅफे मधे ये. मी पोहोचतेय दहा मिनिटात." इतकं बोलून मिसेस जाईने फोन कट केला.

अंबिका ला त्यांचं तिला असं कॅफेत भेटायला बोलावणं विचित्र वाटलं. कारण भेट तर ऑफिस मधेही घडलीच असती. मग ऑफिसच्या बाहेर का बोलावलं? नक्कीच काहीतरी घोटाळा आहे. तिचं मन म्हणालं. आता काय घडायचं उरलं आयुष्यात?

अंकुरला पाळणा घरी ठेऊन अंबिका पंधरा विस मिनिटात कॅफेत पोहोचली. कॅफे तसा चांगलाच महागडा. सामान्य माणसाला न परवडणारा. म्हणजे जी कॉफी बाहेर दहा विस रुपयात मिळून जाईल तिच्या साठीच शंभर दीडशे कोण मोजणार? म्हणून ऑफिस च्या अगदी बाजूला असूनही अंबिका यापूर्वी कधीच तिथे फिरकलीही नव्हती. तिथलं स्टयलिश फर्निचर, भिंतीवरच्या सुंदर पेंटिंग, टिपटॉप स्टाफ, मोठ्या घरच्या, गलेलठ्ठ पगार असलेल्या, मॉडर्न कपडे घातलेल्या तरुण तरुणींची वर्दळ. अंबिका च्या मनात आलं, तिच्या सारखी सलवार सूट घातलेली गबाळ बाई काय करतेय यांच्यात. तिची नजर भिरभिर मिसेस जाईला शोधू लागली.

सकाळी साडे नऊ च्या सुमारासही डोळ्यांवर गॉगल चढवलेल्या, पिंगट कथ्था रंगाच्या लांब स्ट्रेट केसांना पाठीवर मोकळं सोडलेल्या, अंगावर पांढरा शुभ्र शॉर्ट टॉप फिकट गुलाबी पॅन्ट मधे इन करून त्यावर फिकट गुलाबीच ब्लेझर असा फॉर्मल पेहराव केलेल्या, गोऱ्या तुकतुकीत कांतीच्या धनी असलेल्या, मिसेस जाई एका खुर्चीत तिचीच वाट बघत बसलेल्या अंबिका च्या नजरेस पडल्या.

"Good morning mam !" अंबिका म्हणाली.

"किती वेळा म्हणशील?" त्यांचा प्रश्न !

"सॉरी मॅम !" अंबिका म्हणाली तशा त्या हसायला लागल्या. बिचारी अंबिका त्यांना काय झालं म्हणून बुचकळ्यात पडली.

"हे दोन शब्द आज तु खूप वेळा म्हणणार आहेस." त्या म्हणाल्या आणि हिरे जडीत अंगठी घातलेल्या बोटानेच त्यांनी अंबिका ला खुर्चीत बसायचा इशारा केला. ती भीत भीतच बसली. मिसेस जाई वेगळ्याच मूड मधे दिसत होत्या. त्यांनी पर्स मधून एक सिगार केस काढली. त्यातून एक सिगार घेऊन पेटवली. सिगार केस अंबिका समोर करून त्या म्हणाल्या, "You want one?"

अंबिका चा चेहरा बघण्या जोगा झाला.

"असुदे !" त्या सिगार केस बंद करून म्हणाल्या. अंबिका ला ऑफिस मधे दिसणाऱ्या मिसेस जाईत आणि या कॅफेत ल्या बाईत बरंच अंतर जाणवलं.

"कधी पासून सुरु आहे गं हे?" मिसेस जाईने सिगरेट ओढत प्रश्न विचारला.
"काय मॅम?" अंबिकाचे उत्तर
"अरे देवा हेही मलाच सांगावं लागेल." त्या डोक्यावर हात मारून म्हणाल्या. सिगारचे दोन तिन कश लावून झाल्यावर त्यांनी ती सिगार ऍश ट्रे मधे टाकली आणि वेटर ला दोन कॉफी आणायला सांगितलं. अंबिका ला वाटत होतं यांचं काय काम आहे ते लवकरात लवकर संपून जावं. तिला त्या प्रशस्त कॅफेतही विचित्र घुसमट होऊ लागली. त्यांचा अवतार, बोलायची तऱ्हा बघून त्यांना तिच्या आणि ललितच्या घटस्फोट बद्दल माहित झालं कि काय? या विचाराने अंबिकाचे मन शंकाकुल झालं.

"तु कुठे राहतेस गं सध्या?" मिसेस जाईने परत अंबिकाला विचारलं.

"मी करिष्मा सोसायटीत राहते." अंबिकाने खरं खरं सांगितलं.

"अच्छा ! इतक्या मोठया सोसायटीत राहतेस तु ! भाडं तर खूप जास्त असेल तिथलं. पण तुझा पगार तर फक्त विसच हजार आहे. मग तु विस हजार भाडं भरलं तर खात काय असशील? मुलाच्या पाळणा घराची फी कशी देत असशील?" मिसेस जाई स्वतःच्या हनुवटी वर बोट टिक टिक करत विचारात पडल्याचं नाटक करून म्हणाल्या.

अंबिकाला खात्री झाली तिचं भांडं फुटल्याची. ती शांतच होती. तिला असं पाहून त्याच गांभीर्याने म्हणाल्या,

"अरे देवा नवरा आहे तुला. विसरलेच मी. तो भाडं भरत असेल नाही का फ्लॅटचं? म्हणजे दोघातून कोणा एकानेही भरलं तर चालेल आणि एकाच्या पगारात इतर खर्च भागतील. हो ना !"

अंबिका ला खूप टेंशन आलं. ती खाली बघून हात चोळू लागली.

"तु अशी तुझी एखादी चोरी पकडल्या सारखी खाली बघून हात का चोळतेय?" त्या मिश्किलपने तिला म्हणाल्या.

"मॅम I am sorry !" अंबिका दोन्ही हातानं तोंडाला झाकून म्हणाली, "मला लपवायला नको होतं तुमच्या कडून पण मी खूप भिली होती. म्हणून नाही सांगू शकली. माझा घटस्फोट झालाय तीन वर्षा पूर्वीच आणि मी एकटीच मुलाला घेऊन राहतेय ."

"बस इतकंच कि आणखी काही सांगायचं आहे?" त्यांनी आरामात कॉफी संपवत अंबिकाला विचारलं.

"अं हो, तो फ्लॅट नेहा मॅम च्या मित्राचा आहे. त्याला फक्त फ्लॅट ची देखरेख ठेवणारं कोणी तरी हवं होतं म्हणून त्यांनी मला फक्त 5000 भाडं घेऊन फ्लॅट दिला राहायला." अंबिकाने स्पष्टीकरण दिलं.

"तु खरंच जास्त शहाणी आहेस कि जास्त मूर्ख आहेस? या स्वार्थी आणि व्यवहारी जगात कोण आपला पंधरा हजार चा तोटा करून घेईल अंबिका?\"\" मिसेस जाईने तिच्यावर नजर रोखून तिला विचारलं.

"मॅम मी खरंच सांगतेय नेहा मॅम ने मला हेच सांगितलं आणि तेव्हा मला खूप गरज होती फ्लॅट ची म्हणून मी जास्त विचार केला नाही." अंबिका कळवळून म्हणाली.

"अच्छा मग तु जर खरं बोलत असशील तर तुला हेही माहित नसेल कि तो फ्लॅट जाई कन्स्ट्रक्शनचे करता धरता मिस्टर आनंद जाई, म्हणजे माझ्या नवऱ्याच्या मित्रा चा आहे ते आणि मिस्टर जाईनेच नेहा ला तुझी गरज बघून तुला तो फ्लॅट तुला द्यायला सांगितलं."

"काय? तो फ्लॅट सरांच्या मित्राचा आहे. मॅम मला खरंच याची अजिबात कल्पना नव्हती." अंबिका मिसेस जाईच्या नजरेला नजर देऊन म्हणाली, "मी आता जाऊन नेहा मॅम ला विचारते त्या माझ्याशी का खोट्या बोलल्या म्हणून?" अंबिका उठून जायला सज्ज झाली.

"बस अंबिका आणखी किती नाटक करणार?" मिसेस जाईने अंबिकाला थांबवत म्हणाल्या, "सरळ सरळ सांग कि तुझं आणि आनंदचं लफडं किती दिवसांपासून सुरु आहे आणि किती दूर पर्यंत गेलं आहे?"

अंबिका ला कळत नव्हतं या बाईला कसं पटवून द्यावं कि तिचं मिस्टर जाई सोबत काहीच सुरु नाही. खरं तर मिसेस जाईच्या या प्रवृत्ती मुळेच तिने घटस्फोट झाल्याचं लपवलं होतं.

"कितवा महिना सुरु आहे तुला?" काहीतरी आठवून मिसेस जाईने अंबिकाला विचारलं. हे ऐकून अंबिका ला शॉक बसला. तिच्या पाया खालची जमीन सरकली.

"मॅम काही तरीच काय? मागील तीन चार वर्षांपासुन एकटीच राहतेय मी. मला..... " अंबिका स्वतः चा राग आवरत म्हणाली, "तुम्ही प्लीज ही घाण काढा तुमच्या डोक्यातून."

"अच्छा मी डोक्यातून घाण काढू? मग आनंदने तुला तो फ्लॅट राहायला का दिला? काहीही स्वार्थ नसतांना त्याने तुला तीन वर्ष प्रोटेक्ट केलं. अशक्य !" मिसेस जाई अंबिका ला एकदम शांततेत म्हणाल्या. ही एक गोष्ट त्यांच्यात आणि मिस्टर जाईत एकदम सारखी होती. काहीही झालं तरीही सौम्यतेत घ्यायचं.

"मॅम मला नाही माहित सरांच्या मनात काय आहे? पण माझ्या मनात त्यांच्या विषयी काहीच नाही." अंबिका तितक्याच शांततेत बोलली.

मिसेस जाई परत डोक्यावर हात ठेऊन हसली, "बापरे किती निरागस माणसं ही. एकमेकांसाठी इतका त्याग. सलाम तुमच्या प्रेमाला." मिसेस जाईने अंबिका ला सॅल्यूट मारला.

"मॅम तुम्ही प्लीज जास्त टेंशन नका घेऊ. मी आजच ही नौकरी सोडून देते. तो फ्लॅटही खाली करते. परत इकडे कधीच भटकणार नाही मी. प्रॉमिस !" अंबिका त्यांना विश्वास देत म्हणाली.

"काही गरज नाही त्याची. मला फक्त एक बाळ दे, आनंद कडून झालेलं बाळ !" मिसेस जाई तिच्या हातावर थापटत म्हणाल्या, "तुला हवं ते सगळं तूझ्या पायाशी आणून देईल."

अंबिका ला त्यांची खूपच चिड आली. तिचा ताबा सुटला. ती ओरडली, "मॅम प्लीज स्टॉप इट !"

मिसेस जाई शांतच होत्या. एक मंद स्मित करून त्या म्हणाल्या, "ओरडता मलाही येतं अंबिका. पण ओरडल्याने उगाच हृदयावर ताण पडतो आणि सत्य ही सत्यच राहतं बदलत तर नाही ना ओरडून !"

अंबिकाने डोळे मिटून हळू आवाजात त्यांना सांगितलं, "मॅम सरांसोबत खरंच माझं तुम्हाला वाटतं तसलं काहीच रिलेशन नाही हो."

"हा तुमच्या ओठांवर नसेल पण मनात नक्कीच आहे आणि हे वर्धापन दिनाच्या रात्री बऱ्याच नजरांनी हेरलं बरं का !" मिसेस जाई अंबिका ला म्हणाल्या तेव्हा तिच्या लक्षात आलं कि सारिकाने त्यांचे कान भरलेत. पण तिला माहित नव्हतं मिसेस जाईला हे त्यांच्या चुलत भावानं सांगितलं होतं. मिस्टर आनंद जाईनी त्याचा हात पिळल याचा भयानक राग आलेला त्याला म्हणून त्याने मिस्टर आनंद जाई ला त्रस्त करण्यासाठी हा सापळा रचला होता.

"अंबिका काय मिळवशील तु या नोकरीतून सांग मला. त्यापेक्षा माझी ऑफर स्वीकार. मी खुश, तुही खुश आणि तुझा बॉसही खुश ! बाळ झालं कि पैसे घेऊन उटी मसुरी किंवा तुला वाटेल तिथे निघून जा नेहमी साठी." मिसेस जाई दुसरी सिगार पेटवून म्हणाल्या.

"मॅम मला हे शक्य नाही !" इतकं म्हणून अंबिका कॅफे बाहेर जायला पलटली तो समोर मिस्टर आनंद जाई तिला दिसले. अंबिकाचं ब्लड प्रेशर लो झालं. तिला चक्कर येऊ लागली. तिने डोक्याला हात लावला. मिस्टर जाईने तिच्या खांद्यावर हात ठेऊन विचारलं,

"तु ठीक आहेस?"

अंबिकाने काहीच न बोलता त्यांचा हात झटकला. तिने त्यांच्याकडे दुर्लक्ष करून पुढे चालण्याचा प्रयत्न केला. पण ती खाली कोसळणार तो मिस्टर आनंद जाईनी तिच्या हाताला धरून तिला खुर्चीत बसवलं. मिसेस जाईच्या ओठांवर परत स्मित उमटलं.

"हे काय आहे? तुम्हाला काही त्रास होता तर आमच्याशी बोलायचं. अंबिका ला का ताप देताय ?" मिस्टर आनंद जाईने मिसेस जाईला विचारलं.

"मग मला इतका सुंदर, रोमँटिक सीन कसा पाहायला मिळाला असता?" आपलं काम फत्ते झाल्याच्या अविर्भावात मिसेस जाई म्हणाल्या, "मी तर तुमचं काम सोपं करून दिलं साहेब आणि तुम्ही मलाच रागवताय."

"म्हणजे आम्हाला इथे बोलावणं ही चाल होती तुमची. तसं शंका आली होती मनात. पण तुम्ही असं काही करणार असं वाटलं नव्हतं." मिस्टर आनंद जाई त्यांना म्हणाले, "इथे झालेला तमाशा पुरे बाकी घरी जाऊन बोलू."

"चालेल मला. मी तर म्हणते अंबिकालाही घ्या घरी." मिसेस जाई हसुन म्हणाल्या.

मिस्टर आनंद जाईने त्यांच्या कडे दुर्लक्ष करून अंबिकाला विचारलं, "नाशिककर ठीक आहात?"

"हो मी अगदी ठीक आहे. तुम्ही जा प्लीज इथून." अंबिका स्वतःच्या रागावर ताबा ठेऊन म्हणाली.

"असं कसं तुला सोडून जाऊ अंबिका? तु आमच्या होणाऱ्या बाळाची आई आहेस." मिसेस जाई तिच्या डोकयावर हात ठेऊन म्हणाल्या.

"जिभेला ताब्यात ठेवा आपल्या." मिस्टर आनंद जाईने मिसेस जाईला रागात बघितलं आणि त्यांचा हात घट्ट पकडून त्यांना ओढतच कॅफे बाहेर घेऊन गेले.

अंबिका बऱ्याच वेळ तिथेच बसून होती. तिने एक ज्यूस मागवला. ज्यूस घेतल्यावर तिला जरा बरं वाटलं. तिने वेटरला बिल मागितलं. वेटर म्हणाला मिसेस जाईनी ऑफिस ला पाठवायला सांगितलं. त्यांचं नाव ऐकताच अंबिकाचं डोकं सरकलं. कुठे जाऊन डोकं फोडू या विचारात अंबिका 200 रुपये टेबल वर ठेऊन बाहेर पडली.

क्रमश :
तळटीप :
या कथेचा लेखिकेच्या परस्पर आयुष्याशी किंवा इतर कोणाशी काहीही संबंध नाही. ही निव्वळ काल्पनिक आणि आजूबाजूच्या सामाजिक वातावरणाला बघून सुचलेली मनोरंजनपर, स्त्रियांना प्रेरित करण्यासाठी लिहिलेली कथा आहे.

लेखिका : अर्चना सोनाग्रे वसतकार
फोटो : साभार गुगल वरून

🎭 Series Post

View all