मी पुरेशी मजसाठी भाग 17

अंबिकाचा राग करेल का तिचा घात?
मी पुरेशी मजसाठी भाग 17

गोरा वर्ण, कुरळे हलके पिंगट केस, कानात भिकबाळी, नुकतीच शेव्हिंग केल्याने गुळगुळीत असलेला चेहरा, सरळ नाक नक्ष, गुलाबी ओठ, उंच बांधा, अंगावर पांढरा शुभ्र टक्सिडो सूट, प्रत्येक तरुणी च्या स्वप्नात येणार असं राजबिंड रूप !

अंबिकाचे मन तिला म्हणाले, "किती टाळलं यांना. पण ही वेळ आलीच. आता काय करणार तु? त्यांच्या हातात हात देण्या खेरीज दुसरा पर्याय आहे का तूझ्याजवळ?"

ती हात देत नाहीये हे बघून तिला खांद्याला पकडून उभं करण्यासाठी मिस्टर आनंद जाई पुढे होणार तोच दुरून सर्व बघत असलेली नेहा पुढे झाली. तिने अंबिकाला उभं व्हायला मदत केली.

"सर पाहुणे मंडळी आणि मॅम तुम्हाला शोधत आहेत. मी येते अंबिकाला घेऊन." नेहा मिस्टर जाईला म्हणाली. तसें ते काहीच न बोलता स्टेज कडे निघून गेले. त्यांनाही आश्चर्य वाटलं त्यांच्या वागण्यात. आज जर त्यांना अंबिका सोबत एकटं कोणी बघितलं असतं तर तिची वाट नक्कीच लागली असती आणि हीच भीती नेहाला ही होती. म्हणून सर्व मंडळी स्टेज कडे गेली तरीही ती तिथेच थांबली होती.

नेहा तिच्या पंचविशीत असेल तेव्हा पासुन जाई कन्स्ट्रक्शन मधे रुजू झालेली. मोठया सरांचा म्हणजे मिस्टर आनंद जाई च्या बाबाचा तिच्यावर खूप विश्वास. ते तिला आपल्या मुली सारखं बघत. काही वर्षां पूर्वी त्यांना कर्करोग झालेला. आपल्या देशात पुढील उपचार हवे तसे डेव्हलप झालेले नसल्याने त्यांना अमेरिकेत जावं लागलं. येणं जाणं करणे तब्येतीला परवडणार नाही म्हणून ते लहान मुला सोबत म्हणजेच मिस्टर आनंद जाईच्या लहान भावा सोबत तिथेच कायम झाले आणि तिकडेही काही प्रमाणात व्यवसाय फोफावला.

मिस्टर जाई अंतर्मुख पण भावूक स्वभावाचे. त्यात मिसेस जाई शी सतत होणारे वाद. म्हणून त्यांना सांभाळून घ्यायची जबाबदारी मोठ्या साहेबांनी नेहाला दिली. तसेच मिस्टर आनंद जाई नंतर नेहा पॉवर मधे आली. त्यामुळे तिला असं काहीच होऊ द्यायचं नव्हतं ज्याने ती गैर जबाबदार ठरेल.

साडी, केस नीट करून अंबिका नेहा सोबत स्टेज जवळ गेली. कार्यक्रम छान रंगला होता.

"प्रत्येक माणसात एक कला दडलेली असते. मला विश्वास आहे कि इथेही कोणी छान गाणारे असेल. चला तर मग या माझ्या सोबत गायला." अभिजित सावंत म्हणाला तसं शिव जोरात ओरडला,

"अंबिका, अंबिका !"
त्याचं बघून इतरही तिचे नाव घेऊ लागले.

अंबिकाने लपायचा खूप प्रयत्न केला. पण तिला स्टेजवर जावंच लागलं.

"मी नियमित गात नाही. माझा असा काही संगीताचा रियाज नाही हो. त्यामुळे मला नाही वाटत मी गाऊ शकेल." अंबिका नम्रपने म्हणाली.

"त्यात काय इतकं? बस डोळे मिट आणि गायला सुरवात कर." अभिजित म्हणाला, "विचार कर काहीतरी जादू असेलच तूझ्या आवाजात म्हणून तर इतक्या लोकांनी तुझं नाव घेतलं ना !"

"हो पण मी इन्स्ट्रुमेंट सोबत ताळमेळ नाही बसवू शकेल." अंबिका म्हणाली.

"चालेल ! तुम्ही फक्त गाणं म्हणा. मला विश्वास आहे सर्वांना आवडेल." अभिजित तिला हसून म्हणाला. मग अंबिका समोर गाणं म्हटल्या खेरीज दुसरा पर्याय उरला नाही.

तिने मराठी सिनेमा \"आई शप्पथ\" चं
\"दिस चार झाले मन हो पाखरू होऊन,
पान पान आर्त आणि झाड बावरून !\"
गायला सुरु केलं तशी मिस्टर आनंद जाईची नजर तिच्या वर जाऊन खिळली.

\"सांज वेळी जेव्हा येई आठव आठव
दूर कुठे मंदिरात होई घंटारव,
उभा अंगावर राही काटा सरसरून !\"

तिची आणि मिस्टर आनंद जाई ची नजर परत परत एकमेकांवर जाऊन थांबत होती. मिसेस जाई च्या चुलत भावानं, प्रकाशने हे हेरलं.

\"झाला जरी शिडकावा धुंद पावसाचा,
आता जरी आला इथे ऋतू वसंताचा,
ऋतू हा सुखाचा इथला गेला ओसरून !\"

हे कडवं म्हणतांना अंबिकाचे डोळे भरून आले. तिला वाटलं कोणाच्या तरी खांद्यावर डोकं ठेऊन मनसोक्त रडावं. पण आपण स्टेजवर आहोत याचं भान ठेऊन गळ्याशी आलेला आवंढा गिळून तिने गाणं पूर्ण केलं,

\"दिस चार झाले मन हो पाखरू होऊन,
पान पान आर्त आणि झाड बावरून\"

टाळ्यांचा गडगडाट झाला. सर्वच उपस्थित आणि पाहुणे मंडळी अंबिका ची प्रशंसा करत होते. प्रकाश बाजूलाच एका बिजनेस पार्टनर सोबत ड्रिंक घेत असलेल्या मिस्टर आनंद जाईला हळूच म्हणाला,

"आता मला कळलं कि तुमचं ऑफिस मधे इतकं मन कसं लागतं ते !"

"म्हणजे?" मिस्टर आनंद जाईने त्याला विचारलं.

"अहो जावई इतकी सुंदर पर्सनल असिस्टंट असल्यावर कोणाचं मन नाही लागणार ऑफिस मधे." प्रकाश.

"झालं !" मिस्टर आनंद जाई त्याच्या कडे न बघताच म्हणाले.

"नाही." तो त्यांच्या खांद्यावर हात ठेऊन म्हणाला, "मी काय म्हणतो, थोडं सेवा घ्यायचा चान्स आम्हालाही द्या.. पाठवा अंबिकाला एखाद्या रात्री आमच्या वाड्यावर."

मिस्टर आनंद जाईच्या तळपायाची आग मस्तकात गेली. त्यांनी घट्ट डोळे मिटले आणि प्रकाश चा त्यांच्या खांद्यावर असलेला हात त्याच्या पाठी मागे करून कोणालाही समजणार नाही अशा प्रकारे पिळून त्याच्या कानात कुजबुजले,

"आपल्या हद्दीत राहायला शिका. आज बडबडलात. परत माझ्या कोणत्याही एम्प्लॉयी बद्दल असं काही अभद्र बोलायचं नाही. ते ऑफिस मधे काम करायला येतात कोणाचं मनोरंजन करायला नाही."

"जावई सॉरी, मला माफ करा. मी फक्त तुम्ही माझ्या बहिणीशी किती इमानदार आहात ते चेक करत होतो. सॉरी !" प्रकाश कळवळून म्हणाला.

"तुम्ही नशीबवान कि आपण पार्टीत आहोत. इतर जागी असतो तर तोंड फुटलं असतं." मिस्टर आनंद जाईने त्याचा हात सोडून दिला.

कार्यक्रम छान पार पडला. त्या रात्री अंबिका चा मुक्काम विधी च्या घरीच झाला. अंबिका विधी कडे गेली तेव्हा अंकुर झोपला होता. विधी हातपाय न धुताच बिछाण्यावर dhardhur झोपली. अंबिकाचा मात्र डोळा काही लागेना. तिचा भूतकाळ ललित आणि मिस्टर आनंद जाई चे विचार तिला ताप देत होते.

ती हॉल मधे सोफ्यावर डोक्याला हात लावून बसली होती.
"असं डोक्याला हात लावून बसत नसतात गं." विधीची आई म्हणाली.

"सॉरी काकू, मी जागी केलं का तुम्हाला?" अंबिका उभी होऊन म्हणाली, "मी झोपते जाऊन. परत नाही उठून येईल इकडे."

"बस गं ! मलाही खूप वेळा झोप नाही येत रात्रीची. पण माझं वय झालंय. तुला का नाही येत?"

"असंच, नवीन जागा आहे म्हणून नसेल येत."

"अच्छा, मला वाटलं अंकुर च्या बाबाचा विचार करतेस. अंकुर सांगत होता बाबा सोबत राहत नाहीत, भेटायला येत नाहीत कि तुम्हीही जात नाहीत आणि त्यानं त्यांना बघितलंही नाही म्हणून."

"घटस्फोट झाला आमचा तो दोन वर्षाचा होता तेव्हाच आणि तो एक वर्षाचा असेल तेव्हा शेवटचे बघितलं त्यांनी अंकुरला. पण उघड उघड त्याला काही बोलायची भीती वाटते म्हणून सांगते कि त्याचे बाबा दूर देशी कामाला आहेत." अंबिका मान खाली करून म्हणाली. तिचं मन परत भरून आलं. विधीच्या आईने तिच्या डोक्यावर हात ठेवला तशी अंबिका ढसा ढसा रडू लागली. आपली पूर्ण कर्म कहाणी त्यांना सांगितली.

"जाऊ दे गं ! तु तरी काय करणार. त्याला खायचीच होती माती. त्यानं खाल्ली." विधीची आई विचार करून म्हणाली, "खूप वाटतं विधीचे लग्न करून दयावे आता. समाजही म्हणतोच. पण असं काही ऐकलं कि आणखी काही दिवस विधीला तिचं स्वातंत्र्य तिच्या मनाने उपभोगु द्यावंही वाटतं. पण किती दिवस? पण आता तुला असं बघून वाटतं, लग्न झाल्यावरही असं एकटं राहावं लागणार असेल तर ते विधी म्हणते तसं लिव्ह इन रिलेशनशिप मधे राहून आपलं आपलं जगलेल बरं, पण मग लगेच वाटतं त्यातही नुकसान तिचंच, त्याला वाटलं तेव्हा त्यानं इतर कोणा मुलीशी लग्न केलं तर ही तोंडातून ब्र ही काढू शकणार नाही आणि ती इतर कोणाशी लग्न करेल का? तिला हक्काचा माणूस कधीच नाही मिळणार आणि मुलबाळ झालं तर त्याचं काय? बघ ना तुझा मुलगा, अंकुर विचारतोच ना बाबा बद्दल. पुढे आणखी जास्त विचारेल. किती कठीण बाई तूझ्यासाठी. तुझी काहीच चूक नसूनही काय काय भोगावं लागतंय. विधी... काय करू मी विधीचे?"

दोघीही खूप वेळ शांत बसून होत्या.

अंबिका सकाळी ऑफिसला गेली. तिला बघताच काही मंडळी आपापसात खुसफूस करू लागली. तर काही तिला गाणं छान म्हटलं म्हणून कॉम्प्लिमेंट देऊ लागली.

अंबिका ला मात्र वाटत होतं सगळं विसरून जावं. कारण तिला त्या रात्रीत मिस्टर जाई बद्दल वाटलेलं आकर्षण नको होतं तिच्या आयुष्यात.
ती विचारात होतीच तो सारिका तिला म्हणाली,
"हॅल्लो मिस गायिका!"

"यस मॅम ! सर आले नाहीत ऑफिसला. मी कळवते तुम्हाला आल्यावर." अंबिका ती काही बोलणार विचारणार त्या आधीच म्हणाली.

"अरेरे किती घाई मला इथून पळवून लावायची." सारिका बोलली.
"नाही मॅम तसं काही नाही. सॉरी !" अंबिका ला आता ही काय बोलणार या विचाराने धडधड होऊ लागलं.

"इट्स ओके गं ! मला ना फक्त काही टिप्स दे लोकांना आपल्या मुठीत कसं करायचं ते. मला जमतच नाही बाई. त्यात तूझ्या सारखं गाता ही येत नाही. ना नटता येत." सारिका म्हणाली.

"मॅम ते विधीने तयारी करून दिलेली. मला तर काहीच येत नाही आणि ब्युटी पार्लर मधे जायची सोय नाही." अंबिकाने सांगितलं

"हा मग तेच म्हणतेय ना मी. बघ ना त्या विधीने किती कष्ट घेतले तूझ्या वर तेही काही दिवसांच्या ओळखीतच. म्हणजे काहीतरी जादू असायलाच हवी तुझ्या पदरी." सारिका म्हणाली, "मी दहा वर्ष झाले काम करतेय इथे पण कधी इतकं नाव नाही करू शकली स्वतःचे !"

"मॅम तुम्ही लाजवताय मला."

"लाजवत नाहीये वॉर्निंग देतेय. जास्त हवेत उडू नकोस. तोंडावर खाली पडशील. त्या नेहाने कितीही सपोर्ट केला तरीही मला माहित्येय तुझी नजर मिस्टर आनंद जाई वर आहे. काल बघितलं मी गातांना कशी बघत होतीस त्यांच्या कडे ते. पण ते तुझ्या हाताबाहेर आहेत. जास्त उडलीस तर हाकलून देईल ऑफिस मधून. समजलं !" सारिका तिच्या कडे बोट रोखून म्हणाली आणि निघून गेली.

दुपारी मिस्टर आनंद जाई ऑफिस ला आले पण ना अंबिकाला त्यांनी आत बोलावलं ना ती स्वतः कामा निमित्त आत गेली. जे काही असेल ते जिग्नेश कडून करवून घेतलं.

संध्याकाळी अंबिका अंकुर ला घ्यायला पाळणा घरी गेली. पाळणा घरच्या बाहेर निघताच अंकुर परत सुरु झाला.

"आई बाबा ला बोलाव ना. मला माझ्या मित्रांना दाखवायचं आहे त्यांना." अंकुर म्हणाला.

"हो हो बाळा येतील ते लवकरच." अंबिका ला त्याच्या या प्रश्नाने खूप राग आला. सगळं जग जणू तिच्या विरुद्ध जातेय असं तिला वाटलं. पण स्वतः ला कंट्रोल मधे ठेवत ती उत्तरली.

"आई ते फोन का नाही करत आपल्याला? माझ्या फ्रेंड्स चे बाबा तर पाळणा घर च्या मॅडम च्या मोबाईल वर फोन करून बोलतात. माझा बाबा का नाही करत फोन? कुठे आहे तो सांग ना?" अंकुर जिद्दीला पेटला.

अंबिकाचा राग अनावर झाला. तिने जोरात त्याच्या गालात हाणली. तो तिथेच रस्त्यावर बसून रडू लागला,
"बाबा आला कि मी त्याला सांगेल तु मला मारलं म्हणून. मग तो तुला मारेल."

"हो बाळा सांगशील. नक्कीच सांगशील." अंकुर ला जवळ घेऊन अंबिकाही रडू लागली. इतक्यात ती रोजच रडू लागली. तिचा तिच्या भावनांवर ताबा उरला नाही.

क्रमश :

तळटीप :
लेखिका एक आई आणि नोकरदार स्त्री असल्यामुळे लवकर भाग टाकणे जमत नाहीये. तरीही आपण वाचक वर्ग दाखवत असलेला संयम खरंच वाखाणण्याजोगा आहे.

या कथेचा लेखिकेच्या परस्पर आयुष्याशी किंवा इतर कोणाशी काहीही संबंध नाही. ही निव्वळ काल्पनिक आणि आजूबाजूच्या सामाजिक वातावरणाला बघून सुचलेली मनोरंजनपर, स्त्रियांना प्रेरित करण्यासाठी लिहिलेली कथा आहे.

लेखिका : अर्चना सोनाग्रे वसतकार
फोटो : साभार गुगल वरून

🎭 Series Post

View all