मी पुरेशी मजसाठी भाग 14

काय करेल अंबिका? बसेल का परत त्या पॉश पोर्श गाडीत?


पैसे कसे वाचवायचे म्हणजे अर्धा मेंटेनन्स भरता येईल. या विचारातच अंबिका घरी जात होती. रस्त्यात फळ भाज्यांचे दुकान दिसलं आणि तिला घरी काहीच नसल्याचं आठवलं. तो दुकानदार 200 रुपयाच्या वर भाजीपाला आणि फळ विकत घेतल्यास थोडीशी कोथिंबीर आणि मिरची त्यावर फुकट द्यायचा. म्हणून अंबिकाने थोडा जास्तच भाजीपाला आणि फळ घेतली.

अंकुर ची, स्वतःची टिफिन बॅग, फळ आणि भाजीपाल्याची पिशवी, हे सर्व सामान आणि अंकुरला सांभाळत अंबिका सोसायटीत शिरली. तिला असं बघून शिखाचा नवरा तिच्या मदतीला समोर आला,

"द्या या पिशव्या मला. तुम्ही अंकुर ला सांभाळा."

"नको नको. प्लिज.... " अंबिका दचकून त्याला म्हणाली. पण तो कशाचा ऐकतो. त्याने आपणहून सर्व सामान स्वतःच्या हातात घेतलं.

"वहिनी मला माहितेय माझ्या बायकोला घाबरता तुम्ही. पण ती बाहेर गेली आहे." तो हसून म्हणाला, "या तुम्ही आरामात मी फ्लॅट समोर नेऊन ठेवतो सर्व सामान."

"दादा प्लिज ऐका हो." अंबिका काळजीने म्हणाली. पण तो केव्हाच पुढे निघून गेला. अंबिका ला ज्याची भीती वाटत होती तेच झालं. संध्याकाळी शतपावली च्या बहाण्याने आवारात फिरत असलेल्या गॉसिप गुरु बायकांनी झालेलं सगळं बघितलं आणि शिखा येताच तिला तिखट मीठ लावून सांगितलं. ती सरळ रडत बोंबलतच अध्यक्ष मॅडम श्रीमती टिपरे कडे गेली. तिचं बोलणं ऐकून श्रीयुत टिपरे न राहवून बोलले,

"अगं तूझ्या नवऱ्याच्या जागी मी असतो तर मीही तेच केलं असतं. ही सोसायटी म्हणजे एक गाव आहे. आपण सर्व एकमेकांचे शेजारी. एकमेकांना मदत करणे शेजारधर्म आहे. त्याचा इतका काय इशू करतेस?"

हे ऐकून श्रीमती टिपरे भडकल्या,

"तुम्हाला काय समजते. आज पिशव्या उचलल्या, उद्या मुलाला उचलायला सांगेल अन परवा पाय मुरगळल्याचं नाटक करून स्वतःला उचल म्हणेल."

"शिव शिव शिव, अगं जिभेला काही हाड तूझ्या?" श्रीयुत टिपरे म्हणाले.

"नाहीच आहे हाड. म्हणून म्हणते आमच्या फंदात पडू नका आणि या शिखा च्या नवऱ्यालाही समजावून सांगा तसं." श्रीमती टिपरे हातात पेन पेपर घेऊन शिखा कडे वळून म्हणाल्या, "शिखा रडू नको. मी तिला नोटीसच देते फ्लॅट खाली करायला." श्रीमती टिपरे निश्चय करून म्हणाल्या.

अंबिकाने सकाळी ऑफिस ला जाण्यासाठी दार उघडलं तेव्हा तिला दाराच्या कडेला अडकवलेलं नोटीस पत्र दिसलं. ज्याची भीती वाटत होती तेच घडलं. दहा दिवसात फ्लॅट खाली करून जायचं कुठे? पुण्यात तशी ओळखी पाळखीची, नाशिक ची खूप माणसं. पण त्यांना मदत मागणार कसं आणि कोणी मदतीला आलं तरीही त्याचा उद्देश काय हे कसं ओळखायचं. त्यापेक्षा स्वतः च ऑफिसच्या जवळपास एखादी वन रूम किचन मिळते का पाहायचं तिने ठरवलं. एकच रूम मिळाली तरीही चालेल. तितकंच भाडं कमी द्यावं लागेल. तिच्या मनात आलं नाहीतरी अंकुर आणि तीच राहणार. मग कशाला हवा इतका मोठा फ्लॅट. या विचारातच ती ऑफिसला गेली. प्युन ला तिच्यासाठी कर्वे नगर आणि कोथरूड आसपास परिसरात रूम शोधायला सांगितलं.

मिस्टर आनंद जाई आले तशी त्यांच्या पाठोपाठ केबिन मधे जाऊन लॅपटॉप सुरु करून दिला.

"May I come in sir?" नेहा ने मिस्टर आनंद जाई ला विचारलं.

"Come in Neha. साईट वरील कामगारांच्या मुलांसाठी अभ्यास वर्ग घेण्यासाठी NGO फायनल झाले का?" मिस्टर जाईने विचारलं.

"सर या चार NGO ने टेंडर दिले आहे. यापैकी हे दोन NGO मला योग्य वाटले." नेहा टेंडर फाईल बघून म्हणाली आणि तिथेच उभ्या असलेल्या अंबिका ला तिच्याकडून फाईल घेऊन मिस्टर जाईला दाखवायचा इशारा केला. पण विचारात गुंग असलेल्या अंबिकाला ते काही समजलं नाही.

"नाशिककर झोपल्यात वाटतं उभ्या उभ्याच !" अंबिका ला ऐकु जाईल अशा मोठ्या आवाजात पण शांतपने मिस्टर आनंद जाई बोलले, "सुट्टी घेऊन झोप पूर्ण करा. जा घरी."

"अ... आय एम सॉरी सर, व्हेरी मच सॉरी." अंबिका तिच्या विचार चक्रातून बाहेर येऊन म्हणाली.

"घरी जा." मिस्टर आनंद जाईने परत रिपीट केलं.

"सर मी परत अशी चूक नाही करणार प्लीज... " अंबिका म्हणाली.

मिस्टर आनंद जाई उठून नेहाच्या हातातील फाईल घेऊन सोफ्यावर बसून तिला म्हणाले, "तिला घरी जायला सांगा."

"अंबिका जा." नेहाने अंबिका ला जायला सांगितलं.

"मॅम !" ती दबक्या आवाजात डोळ्यात पाणी आणुन म्हणाली.

नेहाने काहीच न बोलता नजरेनंच तिला जायचा इशारा केला. अंबिका डोळयांच्या कडा पुसत केबिन बाहेर पडली.

"काय झालं? सर बोलले का? बॉस लोकं असतातच अशी तुम्ही पाणी प्या." जिग्नेश अंबिका ला पाण्याची बॉटल देऊन म्हणाला. त्याला बघताच अंबिकाला आणखी खराब वाटलं. तिच्या मनात आलं, हा सगळंच शिकलाय आता आपल्याला नक्कीच सर कमी करतील. ती वॉशरुममधे जाऊन आणखी रडली.

"तुम्हाला तर माहितच असेल काय बिनसलंय नाशिककरचं?" हातातली फाईल बाजूला ठेऊन मिस्टर आनंद जाईने नेहा ला विचारलं.

"काही खास नाही. तेच फॅमिली मॅटर. बाकी खोलात मलाही माहित नाही." नेहा उत्तरली.

"खरंच माहित नाही की सांगायचं नाही मला?" मिस्टर आनंद जाईने नेहा ला विचारलं.

नेहा काहीच उत्तरली नाही. म्हणून मिस्टर आनंद जाई नेहा ला म्हणाले,
"माझ्या पासून लपवून ठेवण्या सारखं म्हणजे काहीतरी गंभीरच गुन्हा असेल तिचा. तर मग ती नकोच मला माझ्या ऑफिस मधे. आधीच खूप टेंशन्स आहेत आयुष्यात. तिच्या कडून राजीनामा पत्र लिहून घ्या."

राजीनामा लिहून घ्यायचं ऐकताच नेहा चमकली. तिने अंबिकाच्या घटस्फोट बद्दल सगळं मिस्टर आनंद जाईला सांगितलं.

"काय?" मिस्टर जाई आश्चर्यानं म्हणाले. मग स्वतः शीच पुटपुटले, "तरीच दिल्लीत मला ती त्या अवस्थेत भेटली."

"ती दुसरी नोकरी शोधतेय. तेव्हा पर्यंत आम्हाला हे गुपित ठेवायचं आहे. म्हणून तुम्हाला नाही सांगितलं." नेहा म्हणाली.

"ठीक आहे. मी समजू शकतो तुम्ही असं का केलं ते. पण ती जशी वागतेय त्या वरून ऑफिस मधे 99% लोकांना नवऱ्या सोबत बिनसल्याची शंका आली आहे नेहा. परवाच सारिका मॅडम (मिसेस जाई) ला सांगत होती अंबिका बद्दल आणि तिने बोलूनही दाखवलं हे सगळं. त्यात मागच्या वर्षी तिने केलेलं अबॉर्शन."

"सर डॉक्टरने सांगितलं म्हणून... " नेहा बोलली. तिचं वाक्य मधेच तोडून मिस्टर आनंद जाई बोलले,

"निदान माझ्या समोर तरी खरं बोला."

"सॉरी सर !"

"तिला समजवा. झालं त्याचा परिणाम तर जन्मभर दिसून येईल प्रत्येक गोष्टीत. तिला त्याच्याशी कोपअप करायला सांगा. नाहीतर सारिका ला अंदाज येईलच आणि मग अंबिका ला हा जॉब सोडावाच लागेल आणि माझीही इच्छा नाही या परिस्थितीत तिला आणखी त्रास द्यायची."

"मी बोलते सर तिच्याशी." नेहा म्हणाली.

"छान !" मिस्टर आनंद जाई नेहा ला म्हणाले, "ती फाईल घेऊन जा. मी टिक केलेल्या NGO ला टिचिंग कॉन्ट्रॅक्ट द्या."

"हो सर !"

नेहा बाहेर पडली. थेट अंबिकाला भेटली.

"अंबिका या ऑफिस चा असो किंवा साईटचा एम्प्लॉयी असो. या कंपनीच्या प्रत्येक माणसाने नीट नेटकं राहायला हवं. कारण आजचा जमाना दिखाव्याचा आहे. सरांची पर्सनल असिस्टंट अशी दिसली कोणाला तर काय इम्प्रेशन पडेल समोरच्या वर आपलं?"

अंबिका काहीच न बोलता खाली बसून रडू लागली.

"किती आणि केव्हा पर्यंत रडत बसणार आहेस? स्वतःला सावर. नीट सांग काय झालं?"

अंबिकाने झालेलं सगळं सांगितलं.
"दहा दिवस खूप आहेत. मी शोधते तूझ्यासाठी घर. पण तु प्लिज स्थिर राहा." नेहा तिला म्हणाली.

संध्यकाळचे सहा वाजले. सर्व घरी जाऊ लागले. आज जिग्नेश सुरत ला त्याच्या मित्राच्या लग्नाला जाण्यासाठी सुट्टीवर होता. अंबिकाने सर्व आवरलं. पण मिस्टर आनंद जाई बसूनच होते. सहसा पाच वाजता ते निघून जायचे. नेहा ला विचारून घरी जायचं म्हटलं तर तीही साईटवर गेलेली. घड्याळचा काटा जसजसा समोर जाऊ लागला तिला अंकुर आपली वाट बघतोय, आपल्याला उशीर होतोय, ट्राफिक वाढलं असेल, तो रडत असेल का? या विचारांनी अंबिकाला धडधड होऊ लागली. तिने एक दोन वेळा आत जाऊन मिस्टर आनंद जाईला विचारून घरी जायचं ठरवलं पण तिच्याकडून इतक्यात झालेल्या चुकांमुळे ते रागावतील याची भीतीही वाटली. 6:20 ला मिस्टर आनंद जाईनी बेल वाजवली. प्युन आत गेला आणि बॅग वगैरे घेऊन बाहेर आला. मिस्टर आनंद जाई ही केबिन मधून बाहेर पडले आणि सरळ गाडीत जाऊन बसले. अंबिकाही त्यांच्या पाठोपाठ ऑफिसच्या बाहेर पडली. तिचा फोन वाजला तशी पार्किंग मधेच थांबली. ललितचा कॉल होता. तिला वाटलं तेच तो बोलला,

"तुला सोसायटी कडून नोटीस मिळाल्याचं ऐकलं मी. तसं मिसेस टिपरे चा अटीट्युड पाहता असं कधीतरी होईल हे माहित होतं मला. पण इतक्या लवकर होईल याची कल्पना नव्हती."

"मुद्द्याचं बोला." अंबिका त्याला म्हणाली.

"अजूनही हेकड बरीच आहे तुझ्यात. पण मला पोराची काळजी आहे माझ्या. त्याच्यासाठी मी तु म्हणशील तर तिकडे येऊन काही दिवस सोसायटीत तुमच्या सोबत राहायला तयार आहे. म्हणजे सगळं ठीक होईल." ललित गर्वाने तिला म्हणाला.

"मी सोडत आहे तो फ्लॅट आणि घटस्फोट झाला आहे आपला. तेव्हा लग्न करून सुखी राहा मयुरी सोबत." अंबिका चालता चालता म्हणाली. तिचे डोळे भरून आले. समोरून येणाऱ्या कार वरही तिचं लक्ष नव्हतं.

"ठीक आहे पण विसरू नकोस अंकुर माझाही मुलगा आहे आणि मी त्याला कधीही माझ्या कस्टडीत घेऊ शकतो." ललित हसून म्हणाला. घरच्यां समोर गावात बदनामी झाली म्हणून तो अंबिका वर खूप रागावला होता आणि काहीही झालं तरीही तिला शांततेत जगू द्यायचं नाही असं त्यानं मनोमन ठरवलं होतं.

"ललित प्लिज एकटं सोड आम्हाला." अंबिका फोन कट करून म्हणाली आणि पलटली तोच गाडीची हलकी धडक तिला बसली.
"वेडी आहेस का तु?" मिस्टर आनंद जाईनी कार मधून उतरून रागातच तिला उभं करत विचारलं, "कि डोळे फुटलेत. पार्किंग गाडी साठी असते. उभं राहून फोन वर गप्पा मारायला नाही. मूर्ख मुलगी."

"सॉरी सर !" अश्रू लपवत अंबिका खाली मान घालून म्हणाली आणि होईल तसं लंगडत चालू लागली.

आधीच त्यांचं फोनवर बायको सोबत वाजलं. म्हणून ते ऑफिस मधून उशिरा निघाले. ड्रायव्हर ला सोडून स्वतःच ड्रायविंग करत गाडी काढली आणि त्यात अचानक अंबिका अशी समोर आली. त्यांचा पारा आणखी चढला. त्यांनी सरळ हात पकडून तिला गाडीत बसवलं. अंबिका भांबावली. कोथरूड, कर्वे नगर, वारजे, शिवणे गेलं.

गाडी फुल्ल स्पीड मधे खडकवासला डॅम जवळ येऊन थांबली. मिस्टर जाईने गाडी बाहेर पडून सिगरेट जाळली. अंबिकाने घड्याळात बघितलं. पावणे सात. तसं पुण्यात सॉफ्टवेअर कंपनीत काम करणाऱ्या पालकांच्या रात्रीही शिफ्ट असल्यामुळे पाळणाघर 24 तास सुरु असणारं. पण तरीही अंबिकाला आता अंकुरची खूप काळजी वाटत होती.

गाडीतून खाली उतरून अंबिका भीत भीतच मिस्टर आनंद जाई ला म्हणाली, "सर माझा मुलगा..... "

तिचं वाक्य पूर्ण व्हायच्या आधीच ते परत गाडीत बसले. तिलाही बसायचा इशारा केला. गाडी भर वेगात कर्वे नगर च्या दिशेने धावली. अंबिका ला काहीच सांगायची गरज पडली नाही. जणू त्यांना सगळंच माहित होतं. पाळणाघर आलं.

"थँक्यू सर !" अंबिका म्हणाली आणि अंकुर ला घ्यायला गेली. तो आपला खेळण्यात गुंग होता. अंबिका ला बघताच धावत तिच्याकडे गेला. मग म्हणाला,
"तु बस मी खेलतो." अडीच तीन वर्षाच्या त्याच्या तोंडून बोबडे बोल खूपच गोड वाटत होते. त्याला आता खेळण्यांची गोडी लागली होती. अंबिका चॉकलेट खेळणी, उद्या येऊ परत खेळायला असं आमिष दाखवून त्याला घेऊन बाहेर आली. मिस्टर आनंद जाईची पोर्श कार अजूनही पाळणाघर च्या समोर तिची वाट बघत उभी होती.

काय करेल अंबिका? बसेल का परत त्या पॉश पोर्श गाडीत?

क्रमश :
धन्यवाद !

तळटीप : या कथेचा लेखिकेच्या परस्पर आयुष्याशी किंवा इतर कोणाशी काहीही संबंध नाही. ही निव्वळ काल्पनिक आणि आजूबाजूच्या सामाजिक वातावरणाला बघून सुचलेली मनोरंजनपर, स्त्रियांना प्रेरित करण्यासाठी लिहिलेली कथा आहे.

लेखिका : अर्चना सोनाग्रे वसतकार
फोटो : साभार गुगल वरून


🎭 Series Post

View all