मी पुरेशी मजसाठी भाग 13

घटस्फोटीत अंबिका चं विस्कळीत होत चाललेलं आयुष्य सावरणारा मिळेल का तिला?

मी पुरेशी मजसाठी

अंबिकाच्या रोजच्या दिन चर्येत काही फरक पडला नाही. आधी सारखं तेच पहाटे लवकर उठून स्वयंपाक पाणी, अंकुर ची तयारी, त्याला पाळणा घरात ठेऊन मग ऑफिस. असं सर्व सुरु होतं. पण तिच्या ओठांवरचे स्मित लोप पावलं होतं. हिचं काय बिनसलं म्हणून ऑफिस मधे कुजबुज सुरु झाली. ती ऐकून नेहा अंबिकाला वेळोवेळी \"ओठावर हसु ठेव, स्माईल कर.\" असे इशारे करायची. तेवढ्या पुरतं अंबिकाही स्मित करायची. पण असं नाटकी हसू सतत घेऊन फिरणं तिला काही जमेना. ती फक्त एखाद्या रिमोट वर चालणाऱ्या वस्तू सारखी काम करतेय. हा बदल मिस्टर आंनद जाईच्याही लक्षात आला.

"सर ही आपल्या माऊली प्रोजेक्ट च्या लेबर कॉन्ट्रॅक्टर्स ची फाईल." नेहा फाईल टेबल वर ठेऊन म्हणाली, "मी अंबिका ला बोलवून देते वाचायला."

"राहु द्या. मी वाचून घेईल." मिस्टर जाई म्हणाले. त्यांचे हे शब्द ऐकून नेहा ला आश्चर्य वाटलं. अंबिका त्यांची असिस्टंट म्हणून जॉईन झाली तेव्हापासून मिस्टर आंनद जाई नी फाईल्स, पेपर्स स्वतः वाचने सोडून दिले होते. मग आज काय झालं? या शंकेने नेहाने त्यांना विचारले,

"सर अंबिका चं काही चुकलं का?"

"चुकलं म्हणजे आजकाल मला नाशिककर खूप त्रस्त आणि स्वतःतच मग्न वाटत आहेत. काल घरी जायच्या अगोदर मला एक मेल चा रिप्लाय बनवून दे म्हटलं. पण मॅडम विसरल्या कदाचित. आता दोन वेळ आत येऊन गेल्या पण लक्ष दुसरीकडेच दिसतेय."

"हो, may be घरी काही अडचण असेल. मी बोलते तिच्याशी." नेहा म्हणाली.

"हो आणि समजावूनही सांगा की अडचणी प्रत्येकाला असतात. पण माणसाने जितक्या लवकर सावरलं त्यातून तितकं बरं." मिस्टर आनंद जाई म्हणाले.

"ओके सर!"

नेहा केबिन च्या बाहेर पडली आणि अंबिका ला घेऊन कॅन्टीन मध्ये गेली.

"अंबिका घटस्फोट घेण्याची, एकटं राहायची चॉईस तुझी होती. तसं झालं. तु मोकळी झालीस. आता आनंदात जग. अशी टेंशन घेऊन का फिरतेस?" दोन चहा मागवून नेहाने अंबिका ला विचारले.

"तुम्ही असं का विचारत आहे? काही झालं का मॅम?" अंबिकाने प्रति प्रश्न केला.

"काही झालं का? अगं काल बनवायला सांगितलेला रिप्लाय तु अजूनही सरांना दिला नाहीस." नेहाने तिला आठवण करून दिली.

"अरे देवा. असं कसं झालं? माझ्या डोक्यातून निघूनच गेलं हे. सर खूप रागात असतील. आता काय करू?" अंबिका डोक्याला हात लावून म्हणाली.

"काहीच नाही. फक्त स्वतः चं डोकं जागेवर ठेव. झालं त्याचा परिणाम स्वतः वर होऊ देऊ नको. आयुष्य खूप मोठं आहे." चहा घेऊन नेहा तिला बोलली, "मी साईट वर जातेय. काळजी घे !"

अंबिका सरळ मिस्टर आनंद जाई कडे गेली. पण ती केबिन चं दार lotnar तोच जिग्नेश तिला थांबवत म्हणाला, "सरांनी तुम्हाला घरी जाऊन आराम करायला सांगितलं आहे."

"काय? पण का?" अंबिकाने विचारलं.

"आता ते मी कसं सांगू?" जिग्नेश उत्तरला.

"मी एकदा जाऊन बोलते सरांसोबत." अंबिका म्हणाली पण लगेच या विचारानं तिथेच थबकली की आता हा बालिशपणा सोडून द्यायला हवा आणि एका प्रौढ सारखं विचार विनिमय करून वागायला हवं. सरांनी योग्य विचार करूनच आराम करायला सांगितलं आहे तेव्हा आपण घरी गेलेलंच बरं.

अंबिका घरी गेली. फ्लॅट कडे जातांना तिच्या लक्षात आलं की खाली गार्डन मधे बसलेल्या बायका तिला बघून काहीतरी बोलल्या आणि हसल्या. तिला वाटलं जाऊन विचारावं त्यांना की काही लागलं आहे का तिच्या तोंडाला किंवा जोकर आहे ती, की त्या बाया तिला बघून हसत आहेत?

पण अंकुर समोर असं वागणं बरं नव्हे आणि राहायचं तर याच सोसायटीत या विचारानं कसंबसं तिने स्वतःला कंट्रोल केलं. ती फ्लॅट चं कुलूप उघडून आत गेली नाही तो सोसायटीच्या अध्यक्ष श्रीमती टिपरे मॅडम ची सेक्रेटरी शिखा आली मॅडम चा निरोप घेऊन भेटायला बोलावलं म्हणून. अंबिकाने हातपाय धुवून येतो म्हणून सांगितलं.

संध्याकाळी सहा ला अंबिका त्यांच्या कडे गेली.
"ही काय वेळ आहे का अंबिका कोणाच्या घरी जायची?" पन्नाशीतल्या श्रीमती टिपरे म्हणाल्या.

"सॉरी, अंकुर ला भूक लागली होती म्हणून वेळ लागला." अंबिका उत्तरली.

"बहाणा छान मारला हो. पण तुला समजायला हवं, यावेळी पुरुष मंडळी घरी येतात. तेव्हा प्रायव्हसी हवी असते." श्रीमती टिपरे बोलल्या.

"मॅडम तिला कसं समजणार ते? तिचा नवरा कुठे सोबत राहतो तिच्या." सेक्रेटरी खट्याळ हसून मधेच बोलली.

अंबिका ला कसं तरीच झालं. तिचा पडलेला चेहरा बघून श्रीमती टिपरे सेक्रेटरी ला म्हणाल्या, "खूप वाईट हे शिखा. तिचा नवरा फक्त परगावी राहतो. सोडून नाही दिलं त्यानं हिला." मग वळून अंबिकाला विचारलं, "हो ना गं?"

अंबिकाने काहीच उत्तर दिलं नाही. तिला शांतच बघून श्रीमती टिपरे ने परत विचारलं, "सगळं ठीक आहे ना तुमच्यात? बरेच दिवस, महिने झालेत मिस्टर ललित इकडे आले नाहीत आणि वार्षिक मेंटेनन्स संदर्भात आम्ही कॉल केला तर आधी फोन उचलला नाही. चार पाच वेळा लावल्यावर उचलला तर म्हणाले की माझा त्या फ्लॅटशी आणि तिथे राहणाऱ्यांशी काहीच संबंध नाही. तेव्हा त्यांच्या बद्दल मला परत कॉल करू नका."

अंबिका ला आत मधून खूप भीती वाटली. हृदय जोरात धडधड करू लागलं. आपण घटस्फोटित बाई झालोय हे स्वीकारून आपल्याला येणाऱ्या सर्व संकटांना तोंड द्यावंच लागेल. तेही डोकयावर बर्फ आणि जिभेवर साखर ठेऊन. असं तिचं मन तिला म्हणालं.

"आमचा नुकताच घटस्फोट झाला आहे. मी ऑफिस मधे व्यस्त असल्यामुळे तुम्हाला कळवणे झालं नाही. सॉरी !" अंबिका श्रीमती टिपरे ला म्हणाली.

"अरे देवा ! हे तर खूपच वाईट झालं हो." श्रीमती टिपरे आश्चर्य झाल्याचं दाखवून म्हणाल्या, "म्हणजे आता तुला खूप माणसं भेटतील, जी म्हणतील,

"काहीही काम असलं तर सांगा. अगदी अर्ध्या रात्रीही असलं तरी चालेल."

पण म्हणून तु त्यांना अर्ध्या रात्री बोलवू नकोस हा. सकाळ पर्यंत वाट बघ हो. नाहीतर मग काय नाव खराब होतं सोसायटीचं." श्रीमती टिपरे खट्याळ हसल्या.

"मी तशी वेळ कधीच येऊ देणार नाही. तुम्ही निश्चिन्त राहा." अंबिका गांभीर्याने त्यांना म्हणाली.

"हो हो मला विश्वास आहे तुझ्यावर पण आपण समाजात राहतो आणि समाज अशा घटस्फोट झालेल्या स्त्रियांना नीट पाहत नाही. त्यात तु तर अजूनही तरुण आहेस, सुंदर आहे." श्रीमती टिपरे बडबडत होत्या. अंबिकाला मात्र गालात कोणी चापट मारतंय असं वाटत होतं.

"बाबा बाबा.... " हॉल मधे आलेल्या श्रीमान टिपरेला बघून अंकुर बोबड्या भाषेत हात पुढे करून म्हणाला. श्रीयुत टिपरेही त्याला घ्यायला पुढे झाले. तसं श्रीमती टिपरे ने डोळे वटारले.

"माझे बाबा अगदी भाऊ सारखेच दिसतात." अंबिका पटकन बोलली.

"अगं मग आजोबा म्हणायला हवं. बाबा कसा म्हणतोय तो?" सेक्रेटरी शिखाने अंबिकाला ठणकावून विचारलं.

"तेच ना मी माझ्या बाबाला बाबा म्हणते. म्हणून तो ही बाबाच म्हणतो." अंबिका उत्तरली.

"ठीक आहे. ते 12 हजार मेंटेनन्स लवकर जमा कर आणि परत असं संध्याकाळी यायचं नाही." श्रीमती टिपरे तिला ताकीद देऊन म्हणाल्या, "जा आता. जेवण्यासाठी नाही बोलावलं तुला इथे."
त्यांचं असं रागावून बोलनं ऐकून अंकुर रडू लागला.

अंबिका त्याला शांत न करताच उचलून भरलेल्या डोळ्यांनी श्रीमती टिपरेच्या फ्लॅट बाहेर पडली. मागुन तिच्या कानावर आवाज आले.

"अहो श्रीमती मॅडम काय बिचारीच्या मागे पडल्या?" श्रीयुत टिपरे म्हणाले.

तशा अध्यक्ष मॅडम चांगल्या कडाडल्या त्यांच्यावर, "श्रीयुत टिपरे, खबरदार परत हिच्या समोर आले तर ! माझ्या पेक्षा वाईट कोणी नाही."

"मॅडम सरांना बोलू नका. त्यांचा काय दोष? ते तर त्या बाईने विचार करायला हवं ना. अशी मटकून, चमकून दिसेल तर कोणीही माणूस लाळ टपकवणारच." शिखा काळजीनं म्हणाली, "साहेब तरी पन्नाशी ओलांडलेत. आमच्या ह्यांचं काय करायचं? येता जाता बोलतात तिच्याशी."

"तु काळजी नको करू. जास्तच झालं तर खाली करायची नोटीस देऊ तिला. कारण मला नाही वाटत तिच्याकडे मेंटेनन्स भरायला पैसे आहेत म्हणून." श्रीमती टिपरे दात खाऊन म्हणाल्या.

अंबिकाला रात्रभर झोप लागली नाही. झोप तर खूप येत होती पण डोळे लावताच तिला चारित्र्यहीन ठरवण्यात कसलीच कसर न सोडणारी एक एक मंडळी तिच्या डोळयांसमोर येई आणि ती उठून बसली होई. निवांत झोपलेल्या अंकुर ला बघून,
\"याला घेऊन तर आलो पण याचं आपल्याला नीट पालन पोषण करता नाही आलं तर? मोठा झाला की गुन्हेगार म्हणेल का हा आपल्याला? आपली परिस्थिती समजून घेईल का हा? शेवटी रक्त तर ललितचंही धावतेच याच्या शरीरात ! पण ललितने तरी एकदाही म्हटलं का कि अंकुर माझं रक्त आहे. मला तो हवा आहे. काहीच नाही!\"

या विचाराने तिला खूपच रडू आलं. मनभर रडून घेतलं तरीही झोप येईना. म्हणून सकाळी भाजी साठी लसूण खुळुन ठेवला. अंकुर चा स्नॅक्स च्या टिफिन मधे बिस्कीट ठेवले.

पण झोपेचा डोळ्यांना लवलेश नाही. मग तिने बँकेचे पासबुक काढलं. खात्यात बरोबर सहाच हजार शिल्लक. पगार व्हायला आणखी पंधरा दिवस बाकी.

सर्व दागिने आणि त्याच्या पावत्या काढल्या. आईने दिलेलं सोन्याचं मोठं मंगळसूत्र, कानातले आणि बांगडया पकडून तिन तोळे म्हणजे जवळपास दीड लाखाचं सोनं तिच्याकडे होतं. पण भविष्यात अंकुर साठी शिक्षणाची सोय म्हणून ती त्या सोन्याला बघत होती. त्यामुळे सोनं मोडणं अशक्य.

आता मेंटेनन्स कसा भरायचा? तिला खूप टेंशन आलं. आई दादा मदत करेल. पण बाबा ला कळलं तर ते खूप चिडतील. ललित ला मागू पैसे? या विचारातच ती पहाटे पहाटे झोपली. सहा च्या अलार्मने तिची झोप उघडली. ती खाड्कन उठून बसली झाली.

मशिनी सारखी कामं करू लागली. अंघोळ झाल्यावर आरशात बघितलं तोच अंबिकाला श्रीमती टिपरे बोललेल्या एक एक गोष्ट आठवली. तिने पचपच केसांना तेल लावून घट्ट वेणी घातली. कपाळावर टिकली लावली. क्रीम, पावडर, काजळ, लिपस्टिक यांना तिने आजपासून सुट्टी दिली.

आधीच रडून रडून सुजलेले डोळे. त्यात तेल लावून चापून चोपून घातलेली वेणी आणि तेलकट चेहरा. असं तिचं ध्यान बघून मिस्टर आनंद जाईच्या कपाळावर नेहमी पेक्षा जास्तच आठ्या पडल्या.

"नाशिककर!"

"यस सर !" मेल ला रिप्लाय टाईप करत असलेली अंबिका त्यांच्याकडे न वळताच म्हणाली.
"तुमची नवी फॅशन छान आहे. पण मला वाटतं जुनी फॅशनच तुम्हाला जास्त सूट होत होती." मिस्टर आनंद जाई अतिशय गांभीर्याने तिच्या कडे न बघता साईट प्लॅनचे निरीक्षण करत म्हणाले, "तेव्हा परत असल्या अवतारात ऑफिसला यायचं नाही."

अंबिका ला हार्ट अटॅक तेवढं यायचं बाकी होतं. तिच्या मनात आलं, "हा खडूस टीचर एक नजर भरून तर कधी आपल्या कडे बघत नाही. मग याला मी कशीही ऑफिसला आली तरी काय करायचं?" ती रागातच की बोर्ड च्या की जोरात दाबून टाईप करू लागली.

"नाशिककर, की बोर्ड कंपनीचा आहे. घरचा नाही हे लक्षात ठेऊन टाईप करा. नाहीतर बाहेर जा." मिस्टर जाई म्हणाले.

"सॉरी सर. मी आरामात टाईप करते." अंबिका स्वतःला मनातल्या मनात रागावत म्हणाली. आज तिला तिचं काहीच खरं नाही असं वाटलं. काम झाल्या बरोबर तिने वॉशरुम मध्ये जाऊन चेहऱ्यावर थोडं पावडर लावलं आणि ओठांवर हलकी लिपस्टिक लावली. तिचा लूक क्षणात चेंज झाला. तिने ऑफिसला आल्यावरच वेणी फणी करायचं ठरवलं. घरी जातांना परत आपलं घट्ट वेणी आणि चेहरा धुवून जायचं. म्हणजे पुरुष मंडळी तिच्या कडे आकर्षित होणार नाही आणि सोसायटीतल्या बायकांना तिच्यामुळे असुरक्षित वाटणार नाही. बिचारीचा गोड गैरसमज अजून काय?

क्रमश :
धन्यवाद !

तळटीप : या कथेचा लेखिकेच्या परस्पर आयुष्याशी किंवा इतर कोणाशी काहीही संबंध नाही. ही निव्वळ काल्पनिक आणि आजूबाजूच्या सामाजिक वातावरणाला बघून सुचलेली मनोरंजनपर, स्त्रियांना प्रेरित करण्यासाठी लिहिलेली कथा आहे.

लेखिका : अर्चना सोनाग्रे वसतकार
फोटो : साभार गुगल वरून

🎭 Series Post

View all