मी पुरेशी मजसाठी भाग 12

अंबिका गेली सासरी बैठकीला तोंड द्यायला. काय होईल तिचं आता?
मी पुरेशी मजसाठी भाग 12

ललित आणि अंबिका ला गावी बोलावलं गेलं. अंबिका ला तिथे काय होईल याची पूर्ण जाणीव होती. तरीही ती गेली कारण एकदा कधीतरी या सर्वांचा सामना तिला करावाच लागणार होता. मग जितक्या लवकर हे सगळं निपटेल तितकं चांगलं असं तिच्या मनात आलं.

अगदी तशीच बैठक बसली जशी पहिल्यांदा त्या दोघांनी एकमेकांना बघितलं होतं तेव्हा बसली होती. फरक फक्त इतकाच होता, तेव्हा नातं जुळण्याच्या वळणावर होतं आणि आता तुटण्याच्या मार्गावर.

गावातले ते शेणा मातीने लिपलेलं विटांचे घर बघून अंबिका ची एक एक आठवण ताजी होऊ लागली. लग्न झालं तेव्हा गावी पंधरा दिवस साडीच घालायची असा फर्मान सासूबाई नी सोडला होता. तेव्हा साडी घालायला किती वेळ लागतो हिला? अशी तक्रार नको यायला म्हणून तिने घरीच चक्क स्वतः हाताने साडी च्या निऱ्या आणि पदर शिवून तयार केल्या आणि घातल्या होत्या. चुली समोर फक्त अंग शेकायला बसलेल्या मुलीने सासरी गॅस संपला म्हणून पुरणी ने ठसका लागून जीव नकोसा झाला तरीही चुलीवर स्वयंपाक केला होता.

पाळी आली म्हणून स्वयंपाक करणं चालत नाही. पण रिकामी बसलेली सून सासूबाई ला चांगली कशी दिसणार. घरची सगळी भांडी अंबिका कडून घासून घेतल्या गेली.
हातात आशीर्वाद म्हणून मिळालेले सर्व पैसे, याचं त्याचं उसनं फेडायला घेऊन घेण्यात आले. ना काही हौस ना काही मौज. पुण्याला राहायला गेल्यावरही तेच. तरीही अंबिका त्यांना काहीच बोलली नव्हती. इतकं सांभाळूनही हाती काय लागलं? सवत ! म्हणून आता ती आहे त्या अवतारातच आली.
"पाणी हवं?" जाऊने अंबिका ला विचारलं तशी ती वर्तमानात परतली.
"असू द्या." अंबिका उत्तरली.
"मी बोलली होती तसंच निघालं ना बघ." जाऊ तिच्या कानाशी फुसफुसली.
"झालं असिन दिरानीच्या कानात फूसफूस करून त बाकीच्याइले चहा पाणी दे." सासूबाईने कपाळावर आठ्या पाडून फर्मान सोडला.

अंबिकाचे आई बाबा एका बाजूने बसून होते तर ललितचे दुसऱ्या बाजूने. काही नातेवाईक आणि गावातील मंडळीही उपस्थित होती.

ना गळ्यात मंगळसूत्र ना पायात जोडवी ना हातात बांगडी, साडी ऐवजी सलवार कमीज घातलेली म्हणून ना डोक्यावर पदर. असं अंबिकाच ध्यान बघून बायकांत खुसपुस सुरु झाली.

"काय माय अवदसा दिसतीया!" एक बोलली.
"कोणाला आवडन हो असल्या बाई सोबत संसार कराया?" दुसरीनं त्यावर आपलं मत मांडलं.
"हा ना पण टाळी एका हातानं थोडीच वाजते." तिसरीनं शंका बोलून दाखवली.
"हा नायतं मस्त लक्षमी सारखी नटून थटून व्हती दहा दिस गावात लगीन झाल्यावर." चौथी जुने दिवस आठवून म्हणाली. अंबिका ची जाऊ साऱ्यांना चहा पाणी द्यायला आली.
"पण का झालं आसन वं?" पहिलीनं अंबिकाच्या जाऊ ला प्रश्न विचारला.
"मलेच का माईत?" तिने तो झटकून दिला.
"पोरगं लय ग्वाड हाय वं. काय होणार बिचाऱ्याच या दोघांच्यात?" दुसरीनं विचारलं.
"देवाले ठाऊक बाई !" जाऊ उत्तरली.

"खो खॉ खॉ खो !" मध्यस्थ वयस्कर काका बायकांना ऐकु जाईल इतक्या मोठ्या आवाजात खोकलले. सर्वत्र शांतता पसरली. मग ते ललित कडे वळले.

"बोल ललित काय झालं? का घटस्फोट घ्यायचं ठरवलं तु? का नोटीस पाठवली अंबिका ला." मध्यस्थी काकांनी ललितला विचारलं.

"मी अंबिका ला घटस्फोट देतो असं म्हटलंच नाही हो. अंबिकानेच तशी मागणी केली. म्हणून नाईलाजाने पाठवली होती मी नोटीस. मला कुठे माहित होतं कि ती असं सगळं माझ्यावरच पलटवणार आहे." ललित म्हणाला तसं अंबिकाने चमकून त्याला बघितलं. तिच्या रागानं लाल झालेल्या डोळ्यातून आग बाहेर पडून त्यात तो जळेल कि काय असा भास झाला त्याला.

तो ती नजर चुकवून खाली बघून बोलू लागला, "हो म्हणजे चूक झाली माझी. मला लग्न झालेलं असतांना पर स्त्रीत गुंतायला नको होतं. पण ती आता आई होणार आहे माझ्या बाळाची. मी नाही सोडू शकत तिला. पण मी अंबिकाचीही पूर्ण जबाबदारी घ्यायला तयार आहे."

"तयार का नाही होणार?" अंबिकाचे बाबा बोलू लागले, "माहितेय ना ऑफिस मधे माहित झालं, अंबिकाने कारवाई केली तर सरकारी नौकरी जाईल. मग खायचे वांदे होतील. महिन्याला येणारा गलेलठ्ठ पगार बंद होईल."

"तुम्ही जास्त बोलताय भाऊ. आमचा पोरगा शिकला सावरला स्वतः च्या पायावर उभा, म्हणून पोरगी दिलती तुम्ही." ललितची आई म्हणाली.

"हो ना पण माझ्या पोरीनीच सरकारी अधिकारी बनवलं ना त्याला. गरोदर असूनही त्याची सर्व जबाबदारी घेतली अन बदल्यात काय मिळतंय तिला?" अंबिका च्या बाबाचा राग आटोक्यात नव्हता.

"भाऊ.. ताई... शांत व्हा. व्हायचं ते झालं आता. तुम्ही सांगा तुम्हाला काय हवं आहे? ललित सर्व मान्य करेल." मध्यस्थी ललितकडे त्यानं हो ला हो लावावं या अंदाजात बघून बोलले.

"हो हो बाबा माझ्या हातून झालेली चूक दुरुस्त होणार नाही पण तिचं प्रायश्चित घ्यायला मी तयार आहे. तुम्ही फक्त सांगा मी सगळं करेल." ललित लगेच बोलला.

"दर महिन्याला अर्धा पगार अंबिकाच्या खात्यात जमा झाला पाहिजे. पेन्शन, पी एफ सगळ्यातच अंबिका 50% ची नॉमिनी हवी. महिन्यातून दोनदा पुण्याला जाऊन अंबिकाला भेटायचंच. लग्न समारंभ, कोणतंही सामाजिक कार्य असो अंबिकाच तूझ्या सोबत दिसायला हवी." अंबिकाचे बाबा बोलले.

"हो हो चालेल. मला सर्व मान्य आहे. फक्त अंबिकाने तिची माझ्या आणि मयुरी च्या संबंधावर हरकत नाही असं लिहून द्यावं. इतकं च मागणं आहे माझं." ललित भीत भीतच बोलला.

"बोल अंबिका तुला आणखी काही हवं?" अंबिकाच्या बाबाने तिला विचारलं.
अंबिका शांतच. तिच्या मनाची वेगळीच घालमेल. ती काहीतरी बोलणार तोच तिचे सासरे खेकसले,
"आणखी काय हवं हो बाई ला? सगळंच तर मिळतंय ना. बस !"
"अरे ती नवरा वाटून घेतेय तिचा एका दुसऱ्या स्त्री सोबत. तिचं मन विचारायला नको?" अंबिका चा मामा गरम झाला.

"अंबे ही संधी परत मिळणार नाही. आज तुझा दिवस आहे. बोल !" चहाचा कप बाजूला ठेऊन मध्यस्थ तिला म्हणाले.

"मला... मला काहीच नकोय." अंबिका बोलली.

"हा म्हणा इतकं मिळाल्यावर कशाला आणखी काही हवं?" चुलत सासरा म्हणाला.

"तसं नाही." अंबिका खाली घातलेली मान वर करून म्हणाली, "मला हे लग्नही नको आहे. ललित किंवा त्याचं काहीच नको आहे."

"काय?" एका सुरात जमलेल्या सर्व मुखातून प्रश्न बाहेर
"मला फक्त आणि फक्त घटस्फोट हवा आहे." अंबिका म्हणाली, "मी असं अर्ध अधुरं आयुष्य नाही जगू शकत."

"अर्ध अधुरं म्हणजे काय. आधीच्या काळात तीन तीन बायका करायची माणसं." ललितचे आजोबा सासरे ठणकावून म्हणाले, "म्हणून म्हटलं होतं जास्त शिकेल सून करू नका. पण म्हाताऱ्याच ऐकते कोण?"

"आपल्याला तर वाटतं तिनेही शोधून ठेवला कोणीतरी पुण्यात. म्हणून मोकळं व्हायचं आहे बाईला." बिडी फुकत खुर्चीत बसलेले सरपंच बोलले.

"हा एकटीच राहतेय ना तिथे एक वरीस झालं. टाळी काय एका हातान वाजत नाही राव. हिनेच दुर्लक्ष केलंय आमच्या पोराकडे म्हणून भरकटला तो." अंबिका चा सासरा म्हणाला.

"काय अंबिका, खरं आहे का हे?" अंबिकाच्या बाबाने तिला विचारलं.

अंबिका भांबावून गेली, "असं काहीच नाही बाबा." ती कळवळून म्हणाली, "वयात येत नाही तेव्हापासून लग्न करायचं आहे तुझं, अशी वाग, मुलगी आहेस, दुसऱ्या च्या घरी नांदायला गेल्यावर आई बापाचा उद्धार होईल असं काही करू नको. सासरी कोणी काहीही म्हटलं बोललं तरीही उलट उत्तर द्यायचे नाही. सहन कर, सहन कर... असंच शिकवलं ना तुम्ही मला.

मी मुकाट्याने तुम्ही निवडलं त्या मुलाला होकार दिला. त्याला, त्याच्या वागण्याला समजून घ्यायचा प्रयत्न केला. पण त्यानं मला नेहमीच अंधारात ठेवलं. कदाचित मी दिल्लीला त्याला भेटायला गेली नसती तर अजूनही आपण अंधारातच असतो." अंबिका गळ्याशी आलेला आवंढा गिळून म्हणाली,

"ललित ला पाहताच माझं मानसिक संतुलन बिघडते. असं मानसिक खच्चीकरन करणारं नातं मला नको आहे. प्लीज तुम्ही सर्व समजून घ्या आणि मला मुक्ती द्या." अंबिका हात जोडून म्हणाली.

"मी अंबिका च्या निर्णयाच समर्थन करतो." अंबिका चा भाऊ म्हणाला.

तसे अंबिकाचे बाबा उभे झाले आणि त्याला म्हणाले, "तुम्ही भावा बहिणीनं शेण तोंडात घालायचं ठरवलं का माझ्या? अरे आपण ज्या समाजात राहतो त्याला तर हेच दिसेल ना की अंबिकाने घटस्फोट मागितला आणि मग लोकं नको नको त्या चर्चा करतील. ते काही नाही." ते अंबिका कडे वळून म्हणाले, "अंबिका एक तर ललितची बायको म्हणून रहा नाहीतर त्याच्यावर अडलट्री चा दावा टाक."

"काय दावा टाक म्हणताय भाऊ?" ललित च्या आईने विचारलं, " "काय गं अंबिका माझ्या पोरानं मारलं का तुला? कि दारू पिऊन आला घरी अन त्रास दिला तुला?"

"नाही, असं काहीच झालं नाही." अंबिका उत्तरली.

"मग का बदनामी करतेय माझ्या पोराची? काऊन घटस्फोट घ्यायच्या मागे लागली तु? मानतो आम्ही तुला काही दिलं नाही.

"मी असं काहीच करणार नाही." अंबिका आसू पुसून म्हणाली.

"कारण कोर्टाने दिलेली सहा महिन्याची मुदत पूर्ण झाली नव्हती. त्यामुळे ते पती पत्नी आहेत च.
ला एका सकाळी सकाळी अंबिका च्या सासूबाई चा तिला फोन आला, "काय गं अंबिका माझ्या पोरानं मारलं का तुला? कि दारू पिऊन आला घरी अन त्रास दिला तुला?"

"नाही, असं काहीच झालं नाही." अंबिका उत्तरली.

"मग का बदनामी करतेय माझ्या पोराची? काऊन घटस्फोट घ्यायच्या मागे लागली तु? फालतू आमच्या घराची नाचक्की करू पाहतेय चार लोकात." सासूबाई पदर तोंडाला लावून बडबडली.

"मी म्हणतो तिला पाहिजे तर घेऊ द्या घटस्फोट. आपलं काही जात नाही. उलट त्यांचीच बदनामी व्हायची." ललितचा मोठा भाऊ आणि अंबिका चा जेठ म्हणाला.

"हो हो तांदळानं धुतलेले ना तुम्ही." अंबिका चा मामा ओरडला. तशी त्यांच्यात बाचा बाची सुरु झाली. माणसांना बघून बायकाही आपापसात भांडू लागल्या.

अंबिका ला असलं काहीच नको होतं. ती सर्वांना उभी होऊन म्हणाली,
"प्लीज सर्व शांत व्हा बघू. माझ्या मुळे कोणीच वाद करायची गरज नाही."
पण कोणीच जुमानले नाही. त्यांचं आपलं एकमेकांच्या विरोधात ताशेरे ओढणं सुरूच होतं. अंबिकाला समजलं यांना समजावण्यात काहीच अर्थ नाही. ती तडक आतल्या घरात गेली. स्वतःची छोटी सॅक घेतली, अंकुर ला काखेत धरलं आणि ऑटो स्टॅन्ड च्या रस्त्यावर लागली. जशी मनोमन म्हणत होती,

"आता परत या वळणावर येणं नाही,
परत या गावी दाणा पाणी घेणं नाही,
परत या लोकात आपलं बसणं उठणं नाही.

सोडून सगळी आस,
मोडून सर्व भास,
तोडून सर्व पाश,

एकटीच चालतेय ही वाट,
अंतःकरण म्हणतेय लवकरच होईल,
नवं जीवनाची सुरवात !

अंबिका चे बाबा तिने ललित वर अडलट्री ची केस करावी म्हणून अडून बसले. तिने नकार दिला असता त्यांनी तिच्यामुळे समाजात त्यांची नामुष्की झाली म्हणून तिच्याशी सर्व प्रकारचे संबंध तोडले. घरात अंबिका चं नाव घेण्यावरही बंदी आली.

क्रमश :
धन्यवाद !

तळटीप : या कथेचा लेखिकेच्या परस्पर आयुष्याशी किंवा इतर कोणाशी काहीही संबंध नाही. ही निव्वळ काल्पनिक आणि आजूबाजूच्या सामाजिक वातावरणाला बघून सुचलेली मनोरंजनपर, स्त्रियांना प्रेरित करण्यासाठी लिहिलेली कथा आहे.

लेखिका : अर्चना सोनाग्रे वसतकार
फोटो : साभार गुगल वरून

🎭 Series Post

View all