Mar 03, 2024
प्रेम

हवास मज तू! भाग -४२

Read Later
हवास मज तू! भाग -४२
हवास मज तू!
भाग -४२
मागील भागात :-

यश शौर्याला त्याच्याबद्दल सांगतो आणि तिला त्याच्या बंगल्यात राहण्यासाठी भाग पाडतो.
आता पुढे.

"तू जेव्हा कॉलेजला कारने यायचीस तेव्हा आपण तुझा ड्राइव्हर बनून तुला फिरवावे असे खूपदा मनात यायचे. ती इच्छा आज अशाप्रकारे पूर्ण होईल असे मला वाटले नव्हते. आज मात्र ते स्वप्न जगताना मी खूप खूष आहे."

तो हसून म्हणाला, तसे त्याच्याकडे रागीटपणे बघत तिने नजर बाहेर वळवली. कुणास ठाऊक का पण तिच्या ओठावर देखील अवचितपणे एक हलके स्मित फुलले होते.


रश्मी.. तिची मैत्रिण. गांधी कॉलेजला असताना तिच्या बऱ्याच मैत्रिणी होत्या त्यातलीच रश्मीसुद्धा. थोडी जास्तच जवळची ती होती. पण त्यांची मैत्री वर्षभरच टिकू शकली कारण अकरावीची परीक्षा आटोपली आणि त्याच काळात रश्मीची आई एका आजाराने तिला सोडून गेली. त्यानंतर दुसऱ्या शहरात राहणाऱ्या तिच्या मामाने तिला आपल्याकडे ठेवून घेतले. रश्मी गेली आणि मग पुन्हा कधी तिच्याशी शौर्याचा संबंध आला नाही.

असे असल्यावर यशला ती कशी ओळखणार होती? उलट अशा नावाचा रश्मीचा कोणी चुलत भाऊ आहे हेही तिला ठाऊक नव्हते.

तिने नजर आत घेत एकवार यशकडे पाहिले. कार चालवताना कित्येकदा त्याची नजर तिच्या चेहऱ्यावर खिळत होती हे तिला जाणवत होते.

'हा मुलगा खरंच वेडा आहे.' मनात विचार करून तिला हसायला आले.

'शौर्या, तुझा मार्ग वेगळा आहे. सध्या ज्या कामासाठी तू इथे आहेस त्यावर फोकस कर. हे यश प्रकरणात उगाच लक्ष घालू नकोस.' त्याच्या विचारत असताना मनाने तिला तंबी दिली आणि ती खडबडून जागी झाली.

'या मुलामुळे मी काकाच्या तब्येतीची चौकशी करायला विसरले.' त्याला दोष देत तिने मोबाईल बाहेर काढला आणि डॉक्टर अमितचा नंबर डायल केला.

"अंकल, काका आता बरा आहे ना?"

"हो. रात्रभर त्याला निरीक्षणाखाली ठेवले होते. आज दुपारी घरी सोडतोय. तू भेटायला येणार आहेस का?"

"नाही. आता पुन्हा तिथे कसला सीन क्रिएट करायचा नाहीये. त्यामुळे मी नाही येणार." ती हळवी होत म्हणाली.

"शौर्या, तुझ्या मनात काय चाललेय त्याची मला कल्पना नाहीये. पण बाळा, तू शशीची ताकद आहेस हे विसरू नकोस. जे काही करशील ते विचारपूर्वक कर, एवढेच सांगेन." अमित तिला म्हणाला.

"येस अंकल. मी फोन ठेवते. काकाला काळजी घ्यायला सांगा." डोळ्यात जमा होणाऱ्या अश्रुंना रूमलाने टिपत तिने चेहरा नीट केला.

"पाणी." यशने मागे वळून न बघता बाटली घेऊन तिच्या दिशेने हात वर केला.

"थँक यू." यावेळी तिला पाण्याची खरंच गरज होती.

"काही प्रॉब्लेम नाहीय ना?" त्याचा काळजीयुक्त प्रश्न.

"नाही." तिने मान हलवून परत बाहेर नजर टाकली.
त्याने बोलायला सुरुवात केली पण तिने ते लगेच थांबवले.


"मी तुला गेटवर सोडले तर चालेल ना? की आत येऊ?" ऑफिसची इमारत दृष्टीक्षेपात येताच यशने प्रश्न केला.

"नाही, नको. बाहेरच सोड." ऑफिसमध्ये काय वाढून ठेवलंय याची तिला काहीच कल्पना नव्हती आणि अशा अनोळखी व्यक्तीला तिला सोबत घेऊन जायचे नव्हते. त्यामुळे तिने ते टाळले.


"गुडमॉर्निंग मॅम." ती आत गेली तेव्हा सर्व स्टॉफ मेम्बर्स शशांकच्या केबिनभोवती गोळा झालेला तिला दिसला.


"गुडमॉर्निंग. तुम्ही सगळे इथे काय करताय? डू युअर वर्क." सर्वावर एक नजर फिरवून ती म्हणाली.


"मॅम, आम्हाला काही बोलायचे आहे." एकजण समोर येत म्हणाला.

"जे बोलायचं आहे, ते केबिनमध्ये येऊन बोला." केबिनचे दार आत ढकलण्याचा प्रयत्न करत म्हणली.

दार उघडत नव्हते म्हणून तिने पाहिले तर ते लॉक होते.

"व्हॉट नॉन्सेन्स? केबिन अजून का उघडली नाही?" तिचा आवाज चढला.

"कारण ती शशांक सरांची केबिन आहे आणि ते नसताना त्यांच्या केबिनमध्ये जायला कोणालाही परवानगी नाहीये." विहान समोर येत म्हणाला.

"तू अजून इथे काय करतो आहेस? तुला मी कालच फायर केले होते ना?" ती.

"ॲज अ स्टॉफमेंबर म्हणून विहान आम्हाला हवा आहे. जर तो कंपनीत नसेल तर आम्हीही आपला राजीनामा देऊ." सर्वांच्या वतीने समोर येत नव्या म्हणाली.

"दिवाकरऽऽ" नव्याकडे दुर्लक्ष करत शौर्याने जोरात प्यूनला हाक दिली.

"तुला जो पगार मिळतोय तो माझ्या कंपनीतून मिळतोय हे तू विसरला आहेस का? चल केबिन उघड."

तिचा वाढलेला स्वर ऐकून त्याला नाही म्हणायची हिंमत झाली नाही. त्याने लगेच दार उघडून तिला आत जायला जागा करून दिली.

"आता ज्याला जे बोलायचे आहे त्यांनी आत येऊन बोला. इथे कसला बालिशपणाचा खेळ सुरु नाहीय." नव्याकडे रागाने बघत ती आत निघून गेली.

"आम्हाला विहान इथे हवा आहे." आत येऊन नव्या.

"का?"

"कारण कंपनीच्या चढणाऱ्या आलेखात त्याची महत्त्वाची भूमिका आहे." नव्या ठामपणे म्हणाली.

"महिन्याभारत असा किती आलेख त्याने चढवलाय? मेहतासोबतच्या डीलबद्दल बोलत असणार तर काही लोकांनी मध्ये पाय अडकवला नसता तर तशीही ती होणारच होती. मी बरोबर बोलतेय ना मिस्टर विहान?" तिने त्याच्याकडे एक नजर टाकली तसा तो दुसरीकडे बघू लागला.

"ही कंपनी कोणा एकामुळे तग धरून नाहीये हे सर्वांनी लक्षात घ्या. आज आपण ज्या पोजिशनवर आहोत त्यासाठी सर्वांचाच हातभार लागलाय. तेव्हा अमुक व्यक्ती सॊबत नाहीय म्हणून मी काम करणार नाही, असले बालिश कारणं इथे चलणार नाहीत.

आपल्या कंपनीचे काही नियम आहेत ज्यावर इथे जॉईन होताना तुम्ही सह्या केल्या आहेत. त्यानुसार मूळ मालकाने कामावरून काढल्याशिवाय किमान तीन वर्ष कुणीही कंपनी सोडू शकत नाही हा करार इथल्या प्रत्येक एम्प्लॉयीला लागू पडतो.

त्या नियमाला धरूनच मी मिस्टर विहान इनामदार यांना कामावरून कमी केलेय. का केलेय? हे त्यांना आणि मला खूप चांगल्याप्रकारे माहिती आहे. या उपरही कोणाला इथून जायचे असेल तर जाऊ शकता. फक्त एक ध्यानात ठेवा की एकदा एसके कंपनीशी नाते तुटल्यानतंर तुमची मार्केट वॅलू अगदी शून्यावर येईल. बाकी तुमची मर्जी."

"विनीत, वेडेपणा सोडा आणि तुम्ही सर्व आपापल्या कामाला लागा. शौर्या मॅमचा निर्णय मला मान्य आहे. कदाचित माझा इथला प्रवास इथपर्यंतच असेल. तुम्ही सर्व जुनी माणसं आहात. माझ्यामुळे आपले भविष्य खराब करू नका." डोळ्यात पाणी आणत विहान म्हणाला.

"विहान यार.."

"मला मित्र म्हणतोस ना? मग माझं ऐक. कधीकधी पैशांपेक्षा माणसं महत्त्वाची असतात. मला तुम्ही सर्व महत्त्वाची आहात म्हणून मी हे बोलतोय. जोशमध्ये येऊन चुकीचा निर्णय घेऊ नका. तुम्हा सगळ्यांना आपल्या मैत्रीची शपथ." तो इतका भावनिक होऊन बोलत होता की कुणीही त्याची शपथ मोडू शकले नाही.


"विनीत आणि कीर्ती काल मी तुम्हाला एका मिटिंग साठी पाठवले होते. तिथे काय झाले ते मला पंधरा मिनिटांनी रिपोर्ट करा."

"मॅम, आम्ही तुम्हाला मेल केले होते." कीर्ती.

"हम्म. पण आता मला तुमच्याकडून परत एकदा ऐकायचे आहे. तेव्हा पंधरा मिनिटांनी आत या. बाकी सर्वांनी पण आपल्या कामाला लागा.

मिस नव्या, मला तुमच्याशी दोन मिनिटे बोलायचे आहे तेव्हा तुम्ही इथे थांबा आणि सर्वांनी बाहेर जा." नव्याला थांबवत ती म्हणाली तसे सगळी मंडळी बाहेर गेली.


"सो तुला ही कंपनी सोडून विहानच्या मागे जायचे आहे, राईट?" सर्वजण गेल्यावर शौर्याने नव्याला प्रश्न केला.

"तुला काय फरक पडतो? हे हवे ते तुला मिळालेय ना?" नव्या खोचकपणे म्हणाली.


"हम्म. ते आहेच." शौर्याने ओठ रुंदावले.

"पण काय आहे ना तुझे हे रेजिग्नेशन लेटर मी एक्सेप्ट करू शकणार नाही." राजीनामा लिहिलेल्या कागदाचे तुकडे करत शौर्या म्हणाली.

"दी.." नव्या चिडली होती.

"दी म्हणालीस म्हणून एक ॲडव्हॉइस देतेय. ही कंपनी माझी आहे. तू ज्या घरात राहतेस ते घर सुद्धा माझ्या मालकीचे आहे. तिथून कायदेशीरपणे मी तुम्हाला केव्हाही बाहेर काढू शकते पण तसे मी करणार नाही. कारण तेवढी माणुसकी माझ्यात शिल्लक आहे.

काकांचे हॉस्पिटल, तुम्ही राहता त्या बंगल्याचे मेंटनन्स या सर्वांचा खर्च कुठून करणार? कारण पैशाचा दुसरा सोर्स तुमच्याकडे नाहीय. तुमचे बँक बॅलन्स कंपनीकडे ट्रान्सफर झालेय आणि काका आणि तुझे बँकेचे खाते गोठवण्यात आले आहे.

सो, थिंक ऑन इट अँड को -ऑपरेट विथ मी. कारण कितीही सोंगे घेतली तरी पैशाचे सोंग नाही वठवता येत. हे तुला ठाऊकच असेल.

"आता तू जाऊ शकतेस आणि कामाला लागू शकतेस. ऑल द बेस्ट."

शौर्याने तिला हलकेच डोळा मारला आणि ओठावर हास्याची चादर ओढून घेतली.

नव्याचा काय निर्णय असेल? वाचा पुढील भागात.
:
क्रमशः
©®Dr. Vrunda F. (वसुंधरा..)
*साहित्यचोरी गुन्हा आहे. *
फोटो गुगल साभार
******

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
//