हवास मज तू!
भाग -एक.
'शौर्या व्हिला'. भल्यामोठ्या आवारात विसावलेला एक भव्यदिव्य बंगला. बाहेरून बघूनच कोणाच्याही डोळ्याचे पारणे फिटावे इतक्या सुंदर कलाकृतीने पूर्ण.
ही कथा याच बंगल्यातील व्यक्तींची. सध्याच्या घडीला घरात केवळ तीनच व्यक्ती हजर होत्या. त्या तिघीही स्त्रियाच. तीन पिढ्या जोडणाऱ्या. चला तर मग भेटूया त्यांना.
"..जयदेव जयदेव जय मंगलमूर्ति
दर्शनमात्रे मनकामना पुरती
जयदेव जयदेव.."
देवघरातून मंजुळ आवाज बाहेर हॉलपर्यंत येत होता.
"मम्माऽऽ, बाय. मला निघायला हवे." त्याच वेळी जराशी ओरडतच एक तरुणी तिच्या खोलीतून बाहेर आली.
ही नव्या. वय वर्ष बावीस. सुंदर, सालस. थोडीशी लवकर गोंधळणारी पण तितकीच हुशार.
"निवीऽऽ, अगं थांब जरा. आधी पोटात तर काही टाक, मग जा बघू." सुनंदा, नव्याची मम्मा स्वयंपाकघरातून हातात ज्युस भरलेला ग्लास घेऊन येत म्हणाली.
सुनंदा.. म्हणजे या घरची सून. कर्तबगार. नव्याचा जन्म झाला आणि तिने ऑफिसचे काम सोडून मुलीमध्ये स्वतःला झोकून दिले. पुन्हा काही कारणं होती. ती हळूहळू पुढे येतीलच.
"नो मम्मा, आय एम ऑलरेडी टू लेट. आणखी उशीर झाला ना तर तिकडे ऑफिसमध्ये मिस्टर केळकर मला खाऊन टाकतील." ती बॅग आवरत म्हणाली.
"निवी बेटा, मम्माचे ऐक बरं. आधी स्वतःच उशिरा उठायचे आणि खापर दुसऱ्यावर फोडायचे ही वृत्ती बंद कर. सुनंदा तिला ज्युस दे."
मायलेकीचा संवाद सुरू असतानाच ललिता म्हणजे आपल्या निवीची आजी देवघरातून बाहेर येत म्हणाली. बोलता बोलता तिने नव्याचा गळ्याला हातातील अंगारा लावला.
"आज्जी, अगं काय हे?"
"श्श! देवाचं आहे. गुमान लावू दे. आत जाऊन बाप्पाला नमस्कार कर आणि मग ज्युस पिऊन निघ." ललिता डोळे मोठे करून म्हणाली.
ललिता आजी केवळ नावापूरती ललिता पवार बाकी स्वभावाने मात्र एकदम गोड आणि प्रेमळ. आपल्या सून-मुलाबरोबरच नातीवर देखील खूप जीव. पण कधी कधी तिचा करडा आवाज बाहेर पडला की समोरचा घाबरणार हे ठरलेले.
"अगं आज्जी, तुला आमच्या एसके सरांबद्दल ना काहीच माहित नाहीये म्हणून अशी बोलते आहेस. लवकर नाही ना पोहचले, तर.." देवाला नमस्कार करून बाहेर येत नव्या बोलत होती की ललिताने तिच्याकडे पुन्हा एक कटाक्ष टाकला.
निवी, नो अर्ग्युमेन्ट्स. ड्रिंक इट. " आजीचा आवाज करडा झाला आणि मग त्यावर ज्युस पिण्याशिवाय तिच्याकडे दुसरा पर्यायच उरला नाही.
"गर्ल्स, आता खूश झालात ना?" एका झटक्यात ग्लास रिकामा करून टेबलवर ठेवत ती म्हणाली.
"तुमच्याशी हुज्जत घालण्यापेक्षा ना एका शब्दात ऐकलेलं परवडतं. चला बाय. अँड प्लीज, प्रे फॉर मी की ते खडूस एसके माझ्यावर ओरडणार तरी नाही." ती बाहेर पडत म्हणाली.
"निवीऽऽ" तिचा चेहरा वळताच सुनंदाने हाक दिली.
"मॉम, आता काय?" तिच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह.
"ऑल द बेस्ट डिअर." तिला अंगठा दाखवत सुनंदा.
"गुणाची गं माझी बाळ. यशस्वी हो. खूप प्रगती कर." सुनंदाबरोबर ललितानेही तिला शुभेच्छा दिल्या.
"ओके. थॅंक यू, थॅंक यू, थॅंक यू. आता फायनली बाय हं." धावतच ती बाहेर पडली.
कारचा दरवाजा उघडून ती आत बसली. कारमधील आरशात तिने एकवार स्वतःला न्याहाळले. तिच्या गव्हाळ वर्णावर उमटलेले टेन्शन वगळले तर बाकी मात्र अगदी परफेक्ट होते. अंगावर ऑफिसचा ड्रेस असला तरी त्यातही ती सुंदरच दिसत होती.
"मिस्टर एसके, आय एम कमिंग." आरशात बघून तिने एक स्मित केले आणि कार सुरू करून ती धूम पळाली.
"सुनंदा, हिचा ड्राइव्हर नाहीये तर दुसऱ्याला अपॉइंट का केले नाही? बघितलेस ना कशी भरधाव कार पळवत गेली?" चहाचा कप ओठांना लावत ललिता म्हणाली.
"आई, अहो तिने माझे ऐकले तर पाहिजे ना? पंख फुटलेत लेकीला. उडायला बघतेय तर उडू देऊया. काही लागलं तर सावरायला आपण आहोतच की. आणि तशीही निवी थोडी वेंधळी असली तरी समजदार आहे. तेव्हा टेन्शन घेऊ नका." नाश्त्याची प्लेट तिच्यासमोर ठेवत सुनंदा.
"टेन्शन नाही गं. काळजी वाटते. एक पोर तिकडे परदेशात आणि इथे ही. त्या एसकेच्या नाकात दम नाही आणला म्हणजे मिळवलं."
"आई, त्यांचं ते बघत बसतील. चला आपण आपला ब्रेकफास्ट एंजॉय करू." सुनंदा म्हणली तसे हसून ललिताने मान हलवली आणि चमचाभर पोहे तोंडात टाकले.
*****
नव्या भरधाव वेगात निघाली होती. अर्ध्या तासात कसेही करून तिला ऑफिसला पोहचायचे होते.
'या ड्राइव्हरच्या मावशीच्या मुलीला आजच लग्न करायचं होतं. इकडे माझी सगळी वाट लागते आहे.' मनातल्या मनात त्याला शिव्या घालत तिने स्पीड वाढवला आणि तेवढ्यात अचानक समोर एक गाय आली.
"'अरे देवा, हे प्राणी असे कसे मधूनच उगवतात? त्यांना काही रुल्स नाहीत का? सगळे नियम काय माणसांनीच पाळायचे का?" स्वतःशी बडबडत तिने कार नियंत्रित करण्याचा प्रयत्न केला. हॉर्न वाजवूनही ती गाय मात्र बरोबर मध्ये येऊन उभी राहिली. साधे हलायचे नावही घेईना.
"बाई गं, तुझ्यामुळे मला उशीर झाला हे डोकं फोडून सांगेन ना तरीही माझा बॉस ते मान्य करणार नाही. देवा, आता तूच वाचव रे मला." देवाचा धावा करत तिने कारचा ब्रेक करकचून दाबला.
झटक्यात कार थांबली आणि पुढच्या क्षणात गाय तेथून पसार झाली. 'धडामऽऽ' दुसऱ्याच क्षणात तिच्या कानावर आवाज आला तशी कारमधून ती बाहेर आली.
"ओए मिस्टर, असं कुणी कार चालवतं का? चालवता येत नसेल तर चालवावीच का? आता माझ्या कारचे झालेले नुकसान भरून देणार आहात का?" एकवार आपल्या कारकडे आणि नंतर तिच्या कारला मागून धडक दिलेल्या कारचालकाकडे बघत ती काहीशी चिडून म्हणाली.
"ओ मॅडम, तुम्ही मला कार कशी चालवायची ते शिकवू नका. असे मध्येच कोण ब्रेक लावतो हो? तुमचा ॲटिट्युड ना दुसऱ्याला दाखवा. आणि नुकसान म्हणत असाल तर माझ्या कारचे जे नुकसान झाले ते तुम्ही देणार आहात का?" तो तरुण बाहेर येत म्हणाला.
"ए, हॅलो.."
"लिसन, मला सध्या वाद घालण्यात काहीएक इंटरेस्ट नाहीये कारण नऊ वाजता मला इम्पॉर्टन्ट मिटिंग अटेंड करायची आहे. सो बाय." तिचे बोलणे अर्धवट तोडत तो आपल्या कारमध्ये बसून निघून गेला.
त्याचे वागणे बघून तिला राग आला होता, पण खरं तर त्याची चूक नव्हतीच. तिने अचानक ब्रेक लावला आणि त्यामुळे त्याची कार आदळली.
"पण माझी तरी काय चूक होती? ती गाय मध्ये आली म्हणून झालं ना हे? स्टुपिड मलाच ओरडला. मिस नव्या तुमचा दिवसच खराब आहे. त्याला तेवढी मिटिंग म्हणे मग मी काय ऑफिसमध्ये चकाट्या पिटायला जाते का?" जोरात बडबडत, काहीशी चरफडतच ती कारमध्ये जाऊन बसली. चावी लावूनसुद्धा कार काही सुरू होईना. आता मात्र चेहऱ्यावर नुसता वैताग जमा झाला.
"असं सगळं आजच व्हायला हवं होतं. बॉससमोर इंप्रेशन डाऊन व्हायला पुन्हा काय हवं? देवा असा रे कसा तू निष्ठुर?" बाहेर निघत कारला एक लाथ मारत ती पुन्हा बडबडायला लागली.
"हॅलो मॅडम, इफ यू वॉन्ट लिफ्ट, देन यू कॅन कम विथ मी. माझ्या वाटेवर जायचं असेल तर सोडतो की तुम्हाला." मघाशी समोर गेलेला तरुण परत मागे येऊन तिला म्हणाला.
"नो, थँक यू. आय विल मॅनेज मायसेल्फ." त्याला भाव न देत नव्या उत्तरली.
"राहिलं तर. मी माझं काम केलं. शेवटी तुमची मर्जी. बाय." एक स्मित करून तो पुढे निघून गेला.
तिने मनगटावरच्या घड्याळात पाहिले. नऊ वाजायला केवळ दहा मिनिटं बाकी होते. आता काय करावे तिला कळेना. उगाच त्याची ऑफर नाकारली असेही क्षणभर वाटून गेले.
'डॅड? डॅडला कॉल करावा का?' मनात डोकावलेल्या विचारावर तिने नकारार्थी मान हलवली.
तेवढ्यात मागून येणाऱ्या एक रिक्षाने तिचे लक्ष वेधले. हात दाखवून तिने रिक्षा थांबवला आणि त्याने म्हटलेले भाडे कबूल करून काही घासाघीस न करता ती निघाली.
*****
'एसके' कंपनीच्या नवीन ऑफिसमधील कॉन्फरन्स हॉलमध्ये सर्व जमले होते.
"व्हेअर इज मिस नव्या?" मिस्टर केळकरांचा पारा चढला होता.
"सर, मी कॉल करतेय पण ती उचलत नाहीये." कीर्ती, नव्याची मैत्रीण म्हणाली. "परत एकदा ट्राय करते." हातातील मोबाईल कानाला लावत ती.
"नो, डोन्ट कॉल हर अगेन. आपण मिटिंग सुरू करूयात. विनीत, नव्या ऐवजी तू प्रेजेंटेशन केलेस तर चालेल मला." नव्याचा कलीग असलेल्या विनीतकडे बघून मिस्टर केळकर म्हणाले.
"पण सर नव्याने खूप मेहनतीने तिचे प्रेजेंटेशन तयार केले आहे. सो ते तिलाच प्रेजेंट करू दिलेले योग्य राहिल." काहीसा चाचरत विनीत म्हणाला.
"तीच मेहनत तिने वेळेवर येण्यासाठी पण घ्यायला हवी होती. सोड ते. यू प्रोसिड ऑन." मिस्टर केळकर.
"एक्सक्युज मी.. " तेवढ्यात नव्या पळतच आत आली. "मी आलेय. दोन मिनिटं उशीर झालाय, सॉरी. पण मी लगेच प्रेजेंटेशन सुरू करते." बोलताना तिला धाप लागली होती.
कशीबशी धडपडत नव्या ऑफिसला तर पोहचली. पण मिस्टर केळकर तिला संधी देतील का? वाचा पुढील भागात.
:
क्रमशः
©®Dr. Vrunda F. (वसुंधरा..)
*साहित्यचोरी गुन्हा आहे.*
*******
आजच्या भागात काही पात्रांना तुम्ही भेटलात. मुख्य म्हणजे नव्या म्हणजेच निवीला भेटलात. गोड आहे बरं ती. नाजूकशी, जराशी लवकर गोंधळणारी अशी आहे. पण हुशार आहे हं. भावेल तुम्हाला.
पुढच्या भागात भेटा पुन्हा अशाच काही पात्रांना. तोपर्यंत स्टे ट्यून्ड!
नवीन कथेची ही सुरुवात. कशी वाटली ते कमेंट मध्ये नक्की सांगा. माझ्या इतर कथांप्रमाणे ही कथादेखील तुम्हाला आवडेल अशी आशा करते.