पती-पत्नी....एक नातं विश्वासाच भाग पाच (अंतीम)

Story Of Housewife


संध्याकाळी संजय चित्राशी बोलला.

संजय -"हे बघ चित्रा, मी अजयशी बोललो, फक्त मला एक सांग, तुला कोणाचा असा कोणता मेसेज आला? ज्यामुळे अजय एवढा चिडला. म्हणजे तुला काही अंदाज?"

चित्रा-"मला वाटतं मी राजूच नाव मित्र म्हणून सेव केलं त्यामुळे कदाचित….."

संजय -"म्हणजे? सविस्तर सांग. हे बघ तु ह्या घरची सून आहेस. मला माझ्या लहान बहिणीसारखी, पण तरीही मला सगळं खर,खर काहीही न लपवता सांग."

चित्रा - "मागल्या वर्षी उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये मी आईकडे गेली होती, तेव्हा राजू मला भेटला. तो आमच्या शेजारीच राहतो. माझा बालमित्र आहे तो. असेच एकदा बोलता बोलता त्याने मला विचारलं…


राजू -"आता काय करते आहेस? एम. ए. झालं तर नेट सेट ची परिक्षा का नाही देत?"

चित्रा -"अजून तरी तसा काही विचार नाही. बघते यांना (अजयला) विचारून."

राजू -"ठीक आहे."

चित्रा -"हे मला घ्यायला आले तेव्हा मी राजू ची आणि यांची ओळख करून दिली. हेही छान बोलले त्याच्याशी. नेट सेट साठी पण हो म्हणाले. मग तो मोबाईलवर फक्त गुड मॉर्निंग आणि गुड नाईटचे मेसेजेस आणी शेरोशायरीचे मेसेजेस पाठवत होता. पण त्याने कधी काही विचित्र किंवा आक्षेपार्ह असं काही पाठवलं नाही. शाळा कॉलेजमध्ये असताना भाषण वादविवाद स्पर्धांमध्ये तो मला मुद्दे काढायला मदत करायचा बस एवढंच."


संजय -"बर ठीक आहे. पण तू आता राजूला फोन वगैरे करू नको. तुला खरंच नेट सेट करायच आहे का?"

चित्रा -"त्यापेक्षा मी एम.पी.एस.सी.ची परीक्षा देईन."


संजय -"बर ठीक आहे."


चित्राने एम. पी. एस. सी.चा फॉर्म भरला आणि अभ्यास सुरू केला. घरचं, मुलाचं, कुटुंबाच करून दुपारी मिळणाऱ्या फावल्या वेळेत ती मन लावून अभ्यास करे. प्रिलिम्स मध्ये चित्रा पहिल्याच प्रयत्नात पास झाली. रात्री अजयला खोलीत लाईट लावलेला आवडत नसे, म्हणून चित्रा पहाटे चार वाजता उठून हॉलमध्ये अभ्यास करत होती. मुख्य परीक्षाही चित्रा पहिल्याच प्रयत्नात पास झाली. आता ती मुलाखतीची तयारी करत होती.

अजयच्या स्वभावात फारसा बदल झाला नव्हताच, पण एका संध्याकाळी अचानक अजय मिठाई घेऊन घरी आला होता.

अजय -"आई ही मिठाई देवाजवळ ठेव आणि मग सगळ्यांना दे. चित्रा कुठे आहे?"

सासू -"स्वयंपाक करते आहे."

अजय -"ठीक आहे."

चित्रा पोळ्या करत होती. अजयने तिला मागून एकदम कमरेतून पकडले. चित्रा घाबरून ओरडणार होती पण त्याने तिचं तोंड हाताने हलकेच दाबले आणि कानात पुट पूटला.


अजय -"आय एम सॉरी. लवकर आवर. पटकन खोलीत ये."

रात्री सगळ्यांची जेवण झाली स्वाती-चित्रांन नेहमीप्रमाणे आवरा-आवर केली. अजय मात्र चित्राची आतुरतेने खोलीत वाट पाहत होता. चित्रा खोलीत आली. खरंतर तिला फार दडपण आलं होतं. गेले  आठ-दहा महिने अजयच वागणं, त्यांच्या नात्यात आलेला दुरावा आणि अजयचं ते विकृत रुप चित्राला आठवलं आणि ती एकदम शहारली. अजयने मितला केव्हाच झोपवलं होतं. चित्रा बिछान्यावर आल्या आल्या तो तिला कुरवाळत होता, जवळ घेत होता आणि अधीर होऊन…….... अजयचा भर ओसरल्यावर चित्राने स्वतःला सावरले.


अजय -"आज एक अक्षरही बोलणार नाही का? आज इतक्या महिन्यानंतर……. तुला त्रास नाही ना झाला? आय एम सॉरी."


चित्रा -"एक बोलू?"

अजय चित्राच्या गालावर येणारी बट मागे करत, तीच्या हाताची बोट स्वतःच्या हाताच्या बोटात गुंफत होता.

अजय-"बोल ना."

चित्रा -"माझं काय चुकलं? तुम्ही मला एवढी मोठी शिक्षा आणि चारित्र्यावर……. "

चित्रा अजयच्या कुशीत हमसून हमसून रडत होती. अजय हलकेच तिच्या डोक्यावरून हात फिरवत होता.



अजय -"गैरसमज झाला. माफी मागतोय ना मी! पण तू रडू नकोस, तू रडली की, तुझे अश्रू पाहिले की माझा जीव गुदमरतो!"

चित्रा -"विश्वास का नाही दाखवला माझ्यावर? तुम्ही तुमची मामे  बहीण आली की, तिला तिच्या प्रत्येक कामात मदत करता, प्रत्येक वेळी गाडीवर घेऊन जाता, मीतच्या बारशाच्या वेळी तुम्ही ऑफिसमधल्या सहकारी मैत्रिणीला घेऊन सगळी खरेदी केली, इतर अनेक मैत्रिणींचे फोन तुम्हाला येतात, तुम्ही त्यांच्याशी अगदी मनमोकळे बोलता, काही अडचणी असतील तर समजूनही सांगता, पण माझा एक बालमित्र तुम्हाला सहन झाला नाही?

पैसा-अडका, गाडी-घोडा देऊनही तुम्हाला तुमची चित्रा समजलीच नाही."


अजय -" हो तुझं म्हणणं अगदी खरं आहे. आज ऑफिसमधले हेड क्लार्क सबनीस त्यांचा मुलगा एम.पी.एस.सी.ची मुख्य परीक्षा पास झाला म्हणून ऑफिसमध्ये पेढे घेऊन आले होते ते आणि सांगत होते की, त्या यादीत तुझे नाव आहे, म्हणून मला समजलं की तू पण मुख्य परीक्षा उत्तीर्ण झालीस. आता मुलाखतीची छान तयारी कर. मी आहे तुझ्या बरोबर."

चित्रा खरच हुशार होती. तिची मुलाखतही अगदी यशस्वी झाली. चित्राची उपशिक्षणाधिकारी म्हणून निवड झाली.


सदर कथा एका सत्य घटनेवर आधारित आहे परंतु या कथेच्या माध्यमातून लेखिका कुठल्याही कौटुंबिक हिंसाचाराचे समर्थन करत नाही.

वाचक हो आज-काल मोबाईल मुळे अनेक कुटुंबांमध्ये विनाकारण भांडणे होत आहेत. अनेक संसार  उध्वस्त झाले आहेत, कारण पुरुषाला मैत्रिणी असल्या तर चालतात परंतु बायकोला मात्र मित्र असलेला अजिबात चालत नाही.




©® राखी भावसार भांडेकर.



🎭 Series Post

View all