पती-पत्नी...एक नातं विश्वासाच भाग तीन

Story Of A Housewife


आधीच्या भागात आपण पाहिलं की स्वातीने चित्राला पेन किलर दिली आणि चित्राचा डोळा लागला आता पुढे…

आणि एकदम चित्राच्या कानावर तोच रागीट आवाज आला.

अजय -"उठ! तिन्ही सांजेला मस्त झोपल्या आहेत बाईसाहेब! तिकडे स्वयंपाक घरात माझी आई-वहिनी काम करत आहे आणि इथे महाराणी मस्त झोपा काढत आहे. चल उठ! स्वयंपाक कर सगळ्यांचा! खूप झालीत ही तुझी नाटकं!"

चित्रा उठली. चेहरा धुऊन, स्वयंपाक खोलीकडे गेली. मागोमाग अजयही तिथे आला.

अजय -"वहिनी आज पासून दोन्ही वेळचा स्वयंपाक हीच करेल आणि घरातली सगळी काम पण! तुम्ही आणि आईने एकाही कामाला हात लावायचा नाही!! खूप लाड केले हीचे. जास्त प्रेम केलं तर डोक्यावर बसली."

आणि मग चित्राकडे वळून अजय परत गरजला अजय-"अशी बघत काय उभी आहेस? चल स्वयंपाकाला सुरुवात कर!"

अजय चा रागावलेला मूड बघून स्वाती तिच्या खोलीत निघून गेली. सासूने दिवे लावण्याचा बहाणा करून देवघर गाठले. अजय खोलीत गेला. स्वाती तिच्या नवऱ्याशी-अजयच्या मोठ्या भावाशी बोलत होती.


स्वाती -"सकाळी तुम्ही मिटींगला गेल्यावर अजय भाऊजींनी चित्राच्या अंगावर हात घातला. चित्रा सांगत होती, त्यांनी तिला खूप घाण, अर्वाच्या शिव्या पण दिल्या. तुम्ही एकदा अजय भाऊजींशी बोला ना!"


संजय -"मला वाटतं मी अजयशी बोलण्यापेक्षा, चित्राशी बोलावे. रात्री जेवण झाली की, तिला आपल्या रूममध्ये घेऊन ये."

स्वाती -"बर ठीक आहे."

रात्री सगळ्यांची जेवण सुरू होती. ताट वाढताना अजय चित्रावर विनाकारणच एकसारखा ओरडत होता.

अजय -"ही भाजी अशी करतात का? तिखट मिठाचा पत्ता नाही! स्वयंपाक करत होती की टाईमपास? मीठ का वाढल नाही ताटात?"


मीठ वाढताना चित्राचा हात थरथरला आणि थोडे जास्त मीठ ताटात पडलं. अजय परत चिडला.

अजय -"मीठाची पूर्ण बरणीच आडवीकर आता ताटात."

आता मात्र संजय मध्ये बोलला.

संजय -"अजय काय सुरू आहे? निदान जेवताना तरी रागाला आवर घाल. मीत आणि सोनू घाबरले तुझ्या मोठ्या आवाजाने."

अजयने तोंडा समोरचे ताट समोर ढकलले आणि हात धुवून तो रूम मध्ये निघून गेला.

बाकीच्यांनी पण जेवणं आटोपती घेतली. स्वाती आणि चित्राने मागची आवरा-आवरी केली. पण स्वतःच्याच खोलीत जायचा धीर मात्र चित्राला होत नव्हता.

स्वाती -"चित्रा थोडा भात खाऊन घे. अग सोनूच्या बाबांनी तुला बोलावले आहे."


चित्राने दोन घास भात पोटात टाकले पण तिला परत हुंदका फुटला. स्वातीने मायेने तिच्या पाठीवरून हात फिरवला. चित्रा आणि स्वाती स्वातीच्या खोलीत गेल्या.


संजय -"चित्रा जेवलीस?"

चित्रा ने केवळ मानेनेच होकार दिला.

संजय -"स्वाती तू सोनू आणि मीतला घेऊन आईच्या खोलीत जा."

स्वाती -"बर."

संजय -"हे बघ चित्रा, मी अजयला पुरेपूर ओळखून आहे. मान्य आहे की तो तापट स्वभावाचा आहे पण, काहीतरी खूप चुकीचं, त्याच्या मनाविरुद्ध झाल्याशिवाय तो अस वागणार नाही! मला खरं खरं सांग नक्की काय झालं?"

चित्राने सकाळी काय घडलं ते सर्व सांगितलं. संजयच्या लक्षात यायला वेळ लागला नाही की, सगळं रामायण मोबाईल मुळे घडलं आहे. पण नक्की काय झालं असावं याचा अंदाज मात्र त्याला काही केल्या येईना.

संजय -"चित्रा आजचा दिवस तू आईच्या खोलीत झोप. मी उद्या सकाळी बोलतो अजयशी."

चित्राने नुसतीच होकारार्थी मान हलवली आणि निमूटपणे ती सासूच्या खोलीत गेली.

सासू -"चित्रा मी अजयला बालपणापासून ओळखते. त्याचं तुझ्यावर खूप प्रेम आहे. पण तो कधीच ते व्यक्त करू शकला नाही. खरंतर तुझ्या सासऱ्यांच्या अकाली निधनाने मला त्यांची नोकरी करणं भाग पडलं. त्यावेळी अजय अगदी तीन-चार वर्षांचा होता, त्यामुळे मी ऑफिसला जायला निघाली की तो भोकाड पसरे. त्याच्या बाल मनाला वडील गेले हे कळत नव्हतं. आईचा विरह सहन होत नव्हता. म्हणूनच त्याने लग्न जुळताना तुला नोकरी न करू देण्याची अट घातली."


©® राखी भावसार भांडेकर.



🎭 Series Post

View all