Feb 24, 2024
अष्टपैलू लेखक महासंग्राम

पती-पत्नी....एक नातं विश्वासाच भाग दोन

Read Later
पती-पत्नी....एक नातं विश्वासाच भाग दोन


अजय -"मला नोकरी करणारी बायको नको आहे. माझ्या होणाऱ्या बायकोने केवळ माझे घर सांभाळावे हीच माझी इच्छा आहे. हवं तर लग्नाची अट समजा."

अजयच्या या विचित्र अटीमुळे सगळ्यांनाच जरा टेन्शन आले, पण हो-नाही करता, करता चित्राचे लग्न अगदी साधेपणाने निर्विघ्नपणे पार पडले.

लग्नानंतर सुरुवातीला अजयचे चित्राकडे अगदी बारीक लक्ष असे. एकदा स्वयंपाक घरात कांदे कापताना चित्राच्या डोळ्यातून पाणी येत होते, अजय काही कारणाने स्वयंपाक घरात आला आणि त्याला चित्राच्या डोळ्यात पाणी दिसले आणि तो चिडला.


अजय -"काय झालं? कोणी काही बोललं का तुला?"

चित्रा -"नs नs नाही कांदे कापते आहे म्हणून डोळ्यातून पाणी गळते आहे."

अजय -"अच्छा मला वाटलं….."

स्वाती वहिनी -"तुम्हाला वाटलं तुमच्या बायकोला कोणीतरी, काहीतरी बोलल असच ना?"

वहिनी मुरक्या, मुरक्या गालात हसत होती, अजय ओशाळून तिथून लगेच सटकला.


तेवढ्यात चित्राची मोठी जाऊ स्वाती, चित्राच्या खोलीत आली…

स्वाती -"चित्रा येऊ का ग आत?"

चित्रा -"कोण? वहिनी? या ना!"


स्वाती -"चित्रा ओठाला काय झालं आणि डोळे का सुजले तुझे इतके?"

चित्राच्या ओठातून शब्द फुटेना! चित्रा हुंदके देऊन रडू लागली.

स्वातीने चित्राला जवळ घेतले. तिच्या पाठीवरून ती मायने हात फिरवत होती. चित्राच्या अश्रूंचा बांध फुटला होता. चित्रा हमसून हमसून रडत होती.

स्वाती -"पुरे आता. नको रडूस. अग तब्येत खराब होईल अशाने! शांत हो! सावर स्वतःला. पुस ते डोळे. सांग बर आता काय झालं?"

चित्रा -"वहिनी सकाळी मितला शाळेची व्हॅन आली म्हणून, मी सोडवायला खाली गेले होते. वर खोलीत आले आणि ह्यांच्या हातात माझा मोबाईल होता आणि त्यांनी एकदम…..

स्वाती -"बर बर! नको रडू. चल दोन घास खाऊन घे. मितची पण घरी यायची वेळ झालीच आहे."

चित्रा -"नको वहिनी माझी काही खाण्याची इच्छा नाही. जगण्याची इच्छा नाही. त्यांनी माझ्या चारित्र्यावर संशय……"

चित्रा परत रडायला लागली पण, तरीही तिची समजूत काढून स्वातीने तिला जेवू घातले. एक पेन किलर दिली.

स्वाती -"चित्रा तू आता थोडा वेळ झोप. मीत आला की मी जेवू घालीन त्याला. तू आराम कर."


चित्राला झोप तर येतच नव्हती, पण डोळ्यासमोर जुने प्रेमाचे दिवस डोळ्यासमोर परत फेर धरून नाचत होते.

एकदा भाजी कापताना चित्राच बोट कापलं सासूने हळद लावायला सांगितलं. चित्राने जखमेवर हळद तर दाबली पण तरीही रक्त काही केला थांबेना! स्वयंपाक घरात स्वाती वहिनींची गडबड सुरू होती. जखमेवर लावायचं मलम, बँडेड काहीच सापडत नव्हतं.

काय झालं. कशाची गडबड सुरू आहे म्हणून अजय तिथे आला. चित्राच्या बोटातून घळा घळा वाहणारा रक्त बघून तो चिडला.

अजय -"काय झालं बोटाला?"

स्वाती -"भेंडी चिरताना बोट कापल चित्राच."

अजय -"काम करताना लक्ष कुठे असतं तुझं?चल डॉक्टर कडे!"

चित्रा -"अहो पण त्याची काहीच गरज नाहीये, अर्ध्या तासात होईल सर्व ठीक." चित्रा अश्रु आवरत कसं बस बोलली.


अजय -"अर्धा तास म्हणे! चल लवकर डॉक्टर कडे, माझ्या ऑफिसची वेळ झाली आहे."

चित्राने सासू-जावे कडे बघितले, त्यांनी डोळ्यांनी संमती दिली. अजय चित्राला डॉक्टरकडे घेऊन गेला. अर्धा तासाने परत आल्यावर..

अजय आई वहिनींना सांगत होता.

अजय -"आई अगं चित्राची जखम खरच खूप खोल होती. डॉक्टरांनी ड्रेसिंग केले आहे. पेन किलर देऊन चार-पाच दिवस पाण्यात हात टाकायचं नाही असं सांगितलं आहे, स्वाती वहिनी दोन चार दिवस तुम्हाला जरा कामाचा ताण पडेल, पण चित्राची जखम बरी होणं जास्त महत्त्वाचं आहे. त्यामुळे….."


स्वाती -"ठीक आहे अजय भाऊजी, मी करेन सगळं आणि चित्राकडे पण लक्ष देईन."


विचार करता करता चित्राचा डोळा कधी लागला ते तिला कळले सुद्धा नाही.

©® राखी भावसार भांडेकर.


ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
//