पती-पत्नी.... एक नातं विश्वासाच

Story Of A Housewife


अजय -"सालीss हरामखोरsss…

सन्नन्नननन

चित्राला क्षण दोन क्षण कळलच नाही, काय झालं फक्त कानात गूss नss असा आवाज आला. पण त्यानंतरच्या पुढच्याच क्षणाला तिचा कान ठणकू लागला.

अजय अजूनही तावातवाने तिला अर्वाच्य शिव्या देतच होता.

अजय -"गाडी-घोडी दिली, पैसा-अडका दिला, तरी गेली शेवटी आपल्या जातीवरच. बेशरम! सांग कुठे, कुठे फिरली त्याच्यासोबत? कोण आहे तो? किती वेळा झोपली त्याच्यासोबत?

शेवटचं वाक्य चित्राच्या कानावर पडलं आणि त्याबरोबर ती चिडून ओरडली…


चित्रा -"खबरदार! तोंड सांभाळून बोला!! माझ्या चारित्र्यावर…. "


सन्नन्नननन

यावेळी अजयची थापड, चित्राच्या अर्ध्या गालावर आणि अर्ध्या ओठावर पडली आणि तिचा खालचा ओठ फुटून रक्त वाहू लागलं.

अजय -"लाज नाही वाटत? नवरा असताना दुसऱ्या माणसासोबत तोंड काळ केलस! वरून पतीव्रतेचा आव आणते. आत्ताच्या आत्ता चालती हो माझ्या घरातून. तुझी लायकी नाही या घरात राहायची"

तावातवाने अजयने खोलीचा दरवाजा जोराने बंद केला आणि तो ऑफिसमध्ये निघून गेला.

झाल्या प्रकाराने चित्रा पूर्णपणे हादरून गेली होती. आपला नवरा एकदम एवढा का बिथरला आणि त्याने आपल्यावर हात का उगारला याचा चित्राला काही केल्या अर्थबोध होत नव्हता. रक्ताळलेल्या ओठाला तिने अँटीसेप्टिक लोशन लावले.

अजयच्या त्या एका थापडेने चित्राचा कान आणि डोकं दोन्हीही वेदनेने फारच ठणकत होते. चित्राने डोक्याला बाम लावले, पण वेदना काही केल्या कमी होत नव्हत्या. खरं तर अजयच्या अशा अमानुष वागण्याने चित्राला शारीरिक वेदनांपेक्षा मानसिक वेदनाच जास्त होत होत्या.

विचार करता करता चित्रा काळाच्या मागे मागे अगदी तिच्या लग्न ठरण्याच्या दिवसापर्यंत जाऊन पोहोचली.

चित्रा दिसायला छानच होती. अगदी सुंदर म्हणता येण्यासारखी. एम. ए. इंग्रजी वाङमय प्रथम श्रेणीत पास झालेली. त्यामुळे चित्रा लग्नाच्या व्यवहारातील परफेक्ट मॅरेज मटेरियल अस म्हणायला हरकत नव्हती. शिवाय चित्रा घरकाम आणि स्वयंपाकातही हुशार होती. त्याला कारणही तसेच होतं. चित्रा बी.ए.च्या दुसऱ्या वर्षाला असताना तिच्या आईला दम्याचा विकार जडला त्यामुळे, चित्राची आई सतत दिवस रात्र खोकलत असे. धूळ, धूर, गरम तेलाच्या वासाने तिची खोकल्याची उबळ जीवघेणी ठरेल म्हणूनच मग चित्राने आईच्या हाताखाली सगळा स्वयंपाक शिकून घेतला.

बी.ए.ला विद्यापीठात चित्रा प्रथम आली होती तिला इंग्रजी वाङमयचं सुवर्णपदक (गोल्ड मेडल) मिळालं होतं. चित्राचे वडील सहकारी बँकेत कनिष्ठ लिपिक होते. चित्राच्या आईच्या आजाराच्या औषध पाण्यातच त्यांचा अर्धा अधिक पगार संपून जाई, म्हणूनच मग बी.ए. झाल्यावर चित्रा घरी लहान मुलांच्या शिकवण्या घेऊ लागली. बघता बघता चित्रा एम. ए. पण झाली.

चित्राला लहान मुलांना शिकवायला फार आवडे, म्हणून तिने बी.एड.चा फॉर्मही भरला आणि प्रवेश परीक्षेची तयारी करू लागली, पण चित्राच्या आईला चित्राच्या लग्नाची घाई झाली होती. ती चित्राच्या बाबांकडे एकसारखी चित्राच्या लग्नाच्या तगादा लावी..


आई -"अहो चित्रा आता 23 ची झाली. पोरीच्या लग्नाचं बघायला हवं."


बाबा -"इतकी काय घाई आहे? तिला बी.एड. करायचं आहे. शिकू दे मुलीला."

आई -"हो तुम्हाला काय जातंय शिकू दे मुलीला म्हणायला? अहो हेच वय असतं लग्नाचं! ह्याच वयात मुली सुंदर दिसतात, शिवाय माझी तब्येत ही अशी तोळा-मासा आज आहे, उद्या नाही!! ते काही नाही तुम्ही चित्रासाठी स्थळ बघायला सुरुवात करा. मी डोळे मिटायच्या आधी माझी लेक सासरी गेलेली बरी."

बाबा -"अग असं काय निर्वाणीचं बोलते!"

आई -"ते काही नाही, येत्या सहा महिन्यात चित्राचं लग्न झालं पाहिजे! बाकी मला काही माहित नाही. हवं तर ही माझी शेवटची इच्छा समजा!"


बाबा -"बर बाई होईल तुझ्या मनासारखं."

चित्राच्या आईच्या या निर्वाणीच्या बोलण्याला चित्राच्या बाबांनी मान झुकवली आणि अगदी महिन्याभरात, अजय-चित्राचं लग्न जुळलं.


अगदी पाहून समोरून चहा-पोह्यांचा कार्यक्रम करून,

अजय इलेक्ट्रिकल इंजिनियर होता, त्यामुळे चित्राच्या आई-वडिलांनी लग्नाला लगेच होकार दिला.


पण पाहण्याच्या वेळीच अजयने एक कट घातली.




पुढच्या भागात पाहूया काय असेल अजयची ती अट


©® राखी भावसार भांडेकर.


🎭 Series Post

View all