समोर एका मिनिटांच्या अंतरावर तिला मुख्य रस्त्याचा लाईट दिसत होता. ती पळतच त्या दिशेने गेली. मुख्य रस्त्यावर गेल्यावर तिने परत मागे वळून बघतले. मागे कोणीच नव्हते. पण त्या रस्त्यावर देखील कोणीच नव्हते. ती घाबरून रस्त्याच्या कडेला असलेल्या टपरीच्या आडोश्याला उभी राहिली. घामाने चिंब भिजलेली ती जोर जोरात श्वास घेत होती.
आता पुढे…
अर्धा तास होत आला होता. पण प्रज्ञाला रिक्षा काही दिसत नव्हती.
"बरोबर बोलत होती अर्पिता. उगाच निघाले मी एकटी. थांबली असती ऑफिसमध्ये तर काही बिघडलं नसतं. आता परत जाते म्हटलं तर! नको त्यापेक्षा इथेच थांबते आडोशाला कोणाला दिसणार नाही मी तर सुरक्षित राहील." थोड्यावेळ आधी आलेल्या पावलांचा आवाज आठवून प्रज्ञाच्या अंगावरून भीतीची एक लहर सर्रकन गेली आणि तिने परत जाण्याचा विचार मागे घेतला.
काही मिनिटांनी तिला मुख्य रस्त्यावर हलचाल दिसली. तिने हळूच डोकावून बघितले, \"कोणी ओळखीचे असेल, तर चांगलेच आहे,\" ह्या आशेने. पण बघताच ती लगेच मागे झाली. तिथे कोणीतरी पुरुष उभा होता, त्याच्या हातात काही तरी होते. अंधारात स्पष्ट दिसत नसले तरी, एकंदरीत त्याचा पेहेराव ऑफिस मधील सभ्या पुरुषा सारखा नव्हता. तो खूप अधिरतेने काहीतरी शोधत होता. जणू तो प्रज्ञालाच शोधत होता. प्रज्ञाच्या काळजाचे ठोके वाढत होते. घामाने ती चिंब भिजली होती. तितक्यात तिला दूरवर एक लाईट दिसला. काही क्षणात बुलेट बाईक म्हणजे रॉयल एन्फिल्डचा आवाज आला आणि तिला हायसे वाटले. त्या आवाजाने तो माणूस तिथून पळून गेला. बाईक जवळ येतच प्रज्ञा त्या टपरी मागून धावत येऊन रस्त्याच्या मधोमध हात अडवून उभी राहिली. तोच ती बाईक तिच्या जवळ येऊन थांबली.
घाबरलेल्या प्रज्ञाला बघून त्याने घाईत बाईक स्टँडवर उभी केली आणि तिच्याकडे गेला. ती सुद्धा त्याच्याकडे धावत गेली.
"कबिर. तुझ्या बाईकच्या आवाजाने समजलं की, तूच आहेस." म्हणत प्रज्ञाने त्याच्या मिठीत शिरली.
"परी तू ठिक आहेस ना?" कबिर प्रज्ञाच्या डोक्यावर हात फिरवत म्हणाल. तो तिला प्रेमाने परी म्हणत असे.
"हो. पण बरं तू वेळेत आलास नाहीतर, त्याने माझे काही बरे वाईट केले असते." प्रज्ञा खूप घाबरलेली त्याच्या मिठीत होती.
"तो? कोण तो? कुठे आहे?" कबिर आजूबाजूला नजर फिरवत म्हणाला.
"त्या दिशेने गेला. त्याच्या हातात काहीतरी होते, जसा की चाकू. मला नीट दिसले नाही पण तो खूप विक्षिप्त वाटतं होता." प्रज्ञा कबिरच्या मिठीतूनच त्या दिशेला बोट दाखवत म्हणाली ज्या दिशेने तो माणूस गेला होतं.
"परी तिथे कोणीच नाहीये. मोकळी जागा आहे. झाड नाही की, त्याच्या आड तो लपला असेल. तुला भास झाला असेल." कबिर त्या दिशेने बघत बोलला.
"नाही कबिर, तो खरंच होता. भास नव्हता रे माझा." आता प्रज्ञा कबिरकडे बघून बोलली. तिच्या डोळ्यात भीती दिसत होती. घामाने भिजलेली ती कबिरला पटवून देण्याचा प्रयत्न करत होती.
"ठिक आहे. चल आता घरी जाऊ. अर्पिता वाट बघत असेल." म्हणत कबिरने परत एक नजर त्या दिशेने टाकली.
"ठिक आहे." म्हणत तिने हातानेच तिचा घाम पुसला आणि दोघे बाईकवर बसून निघून गेले.
ते जाताच मोकळ्या जागेत असलेल्या एका खड्यात लपलेला तो माणूस मुख्य रस्त्यावर आला. त्याच्या हातात खरंच धारधार चाकू होता. पाठमोऱ्या बसलेल्या प्रज्ञाला बघून त्याने त्या चाकूनेच हवेत एक फुली मारली.
"कबिर तू कसा काय आलास इथे?" प्रज्ञा बाईकच्या मागच्या सीटवर बसून बोलली.
"अगं तुझा फोन बंद झाला त्यामुळे अर्पिताने मला फोन करून सांगितलं की, तू एकटीच निघाली आहेस ऑफिस मधून. त्यात तुझा फोन पण बंद पडला आहे. म्हणून मग निघालो पटकन बाईक घेऊन."
"पण तुला कसं कळलं की, मी तिथेच आहे अजून?" प्रज्ञाने त्याला मागून घट्ट पकडले होते.
"तुझ्या ऑफिसकडून येण्याजाण्याचा हा एकच रस्ता आहे. येताना मी रस्त्याने बघत होतो तर, एकही रिक्षा ह्या दिशेने येताना दिसली नाही. त्यामुळे लक्षात आलं की, तू अजून तिथेच असशील." कबिरने एका हाताने प्रज्ञाचा हात पकडला.
सूमसान रस्त्यावर त्या बाईकचा आणि दोघांचा आवाज घुमत होता. थोड्यावेळात दोघे प्रज्ञाच्या फ्लॅट वर पोहोचले.
प्रज्ञाने घराची बेल वाजवली. अर्पिता दार उघडायला म्हणून बेडरूम अधून येणार, तोच कसला तरी जोरदार आवाज आला आणि अर्पिता एकदम किंचाळली. तिच्या अशा किंचाळण्या मुळे प्रज्ञाने घाईत बॅगेतून तिच्याकडील चवी काढली, दार उघडून धावत आत गेले, तर अर्पिताला बघून दोघेएकदम स्तब्ध झाले.
काय झालं असेल? अर्पिता बरी असेल ना? प्रज्ञाच्या मागे कोण लागला असेल? बघूया पुढील भागात.