मागील भागात आपण बघितले…
तशी इतक्यावेळ बाहेर पदराने चेहेरा झाकून बसलेली एक स्त्री टाळ्या वाजवत आत आली. तिने आत येताच खोलीचा दरवाजा बंद केला आणि पदर बाजूला केला. तिला बघून कबिर चक्रावला. काय सत्य आणि काय असत्य, हे त्याला कळत नव्हते. तो नुसता तिच्याकडे बघत होता.
डोळ्यात अनेक प्रश्न होते. ती मात्र हसत होती. डोळ्यात कसलीच भावना नव्हती. ना भीती, ना प्रेम, ना अजून काही. काहीच नव्हते. होते ते फक्त शिकारी हास्य. कबिर ला विश्वास बसत नव्हता की तिचं आहे की, तिच्या सारखी दिसणारी अजून कोणी तरी.
आता पुढे…
"तुला म्हणत होते ना विशाल मी, कबिर एक सच्चा आशिक आहे. बघ प्रज्ञा नाहीं तर जगण्यात काय अर्थ आहे असे बोलला तो आत्ताच." ती विशालच्या खांद्यावर हात ठेऊन उभी राहिली.
"तू? तू जिवंत आहेस? की तू तिच्या सारखी दिसणारी कोणी वेगळी मुलगी आहेस?" असंख्य प्रश्न पडलेल्या कबिरने विचारले.
"अरे, नाहीरे तू मला कसा काय ओळखू शकत नाहीये? मी तिचं आहे. तुझी प्रज्ञा आणि ह्या सगळ्या मागची मास्टर माईंड." प्रज्ञा हसून बोलली.
"नाही. माझा विश्वास नाही ह्यावर. माझी प्रज्ञा असं काही वागूच शकत नाही."
"तुझा विश्वास असो वा नसो हे सगळं मीच घडवून आणले आहे."
"पण का? कशासाठी? तुझाच जीव धोक्यात होता आणि आता आता तू हे काय बोलते आहेस?" कबिरला अजून देखील काही समजत नव्हते.
"सांगते. तुला तर सगळं सांगावे लागेलच. तर कबिर
तुला प्रीती आठवते?" प्रज्ञाच्या डोळ्यात राग दाटून येत होता.
"हो खूप चांगली होती. माझी कॉलेजची मैत्रीण होती." कबिर बोलला.
"तू तिचे प्रेम नाकारले आणि तिने आत्महत्या केली. म्हणून मला बदला घ्यायचा होता. त्यासाठी हे सगळ नाटक केले.
"ती फक्त मैत्रीण होती. त्या व्यतिरिक्त मी तिला त्या नजरेने
बघितले नाही. मी खूप वेळा तिला समजावले होते." कबिर
"पण तरी तुझ्याचमुळे तिचा जीव गेला. म्हणून त्याची शिक्षा तुला झालीच पाहिजे. मग त्यासाठी अर्पिता झाली माझी पहिली शिकार. प्लॅन नुसार ती ह्या विशालच्या प्रेमात वेडा होती त्याचेच मुलं तिच्या पोटात वाढत होते. ती विशालच्या मागेच लागली होती की लग्नं कर आणि ॲबोर्शन पण करणार नाही म्हणत होती. त्यामुळे तिला मारणे गरजेचे झाले.
विशाल खरं तर माझा बॉयफ्रेंड आहे. माझ्यासाठी तो माझ्या प्लॅनमध्ये सामील झाला. माझं टारगेट तर तू होतास. त्यासाठी मी तुझ्याशी आणि विशालने अर्पिताशी प्रेमाचे नाटक केले.
त्यामुळे तिच्याशी लग्नं करण्याचा प्रश्नच नव्हता. तिच्या ह्या वागण्याने आम्हाला तुला अडकवण्याची संधीच मिळाली. मग तिला मारून तिच्या खूनाचा आळ तुझ्यावर घातला" प्रज्ञा एक एक गुपित सांगत होती.
"नाहक बिचाऱ्या अर्पिताचा बळी घेतला तू, किती जीव होता तिचा तुझ्यावर." कबिर चिडला होता.
"ह्यात तुझ्या आई बाबांची काय चूक होती? त्यांचा का बळी घेतला? आणि ते तुला धमकी? जीवे मारण्याचा प्रयत्न हे सगळं काय होतं?" कबिर
"तो सगळा माझाच प्लॅन होता. मी रचलेले षडयंत्र, ज्याने माझ्यावर कोणाचा संशय गेला नाही. सगळे मलाच शिकार समजत राहिले, पण कोणाला माहित नव्हते की, शिकारी मीच आहे. मला येणाऱ्या धमक्या, ये पत्र, तो माणूस मागे लागलेला हे सगळं मीच केलं होतं.
त्या दिवशी तू मी ऑफिसमधून एकटी निघाले नव्हते. विशाल होता माझ्या सोबत. त्याच्याच माणसांनी अर्पिताला गोळी घातली. तिच्या खूनात तुझा हात आहे, असे पुरावे आम्हीच बनवले. परिणामी तू इतके दिवस तुरुंगात सडतो आहेस.
आज तू इथे आहेस हा सुद्धा आमच्याच प्लॅनचा एक भाग आहे. विशाल नेच तुझ्यावर हल्ला करवला. जेणे करून तुझा तिथे मृत्यू होईल. पण तुझं नशीब चांगलं त्यातून वाचला. म्हणून आम्हाला इथे यावं लागलं.
तुला मारायचा प्लॅन केलाच होता तर त्यामधे आम्ही अजून एक भर घातली. माहितीये कोणती?" प्रज्ञा कबिरच्या अगदी जवळ जाऊन बोलली.
कबिर तिच्याकडे बघत होता. काय बोलावे त्याला समजत नव्हते. तो चकित होऊन बघत होता.
"माझे ग्रेट, आदरणीय, पूजनीय आईबाबा मला त्यांच्या मालमत्तेतून काहीच देणार नव्हते. तुला तर माहितीच आहे की, मी राजस्थानच्या एका मोठ्या उद्योगपतीची मुलगी आहे. मी आणि प्रीती, प्रीती तर आधीच गेली. त्यामुळे आता त्यांच्या सगळ्या मालमत्तेवर फक्त आणि फक्त माझाच अधिकार होता. पण त्यांनी मला त्यातून वजा केले. का ? तर मी विशालशी लग्नं करण्याचा हट्ट धरला त्यात त्यांना माझा असा स्वभाव देखील आवडत नव्हता म्हणून त्यांनी मला घरातून हाकलून दिले.
अप्रिताच्या मृत्यू नंतर मी माझी मानसिक स्थिती खराब असल्याचे नाटक करून त्यांना बोलावून घेतले. घरा बाहेर काढले तरी आई वडील ते, त्यामुळे मुलगी त्रासात असल्याचे कळताच आले तळमळीने आणि त्याच बिघडलेल्या मानसिक स्थितीत मी त्यांना यमसदनी पाठवले." प्रज्ञा सगळं अगदी मन लावून सांगत होती. तिच्या डोळ्यात केलेल्या कृत्या बद्दल जरा देखील लाज नव्हती.
"ह्या सगळ्यात विशाल ने मला खूप मदत केली. आता अर्पिता गेली त्यामुळे विशाल फक्त माझा आहे, आई बाबा गेले त्यामुळे त्यांची संपत्ती माझ्या एकटीचीच आहे. आता तुझा नंबर म्हणजे प्रीतीचा बदला पूर्ण होईल आणि मग मी आणि विशाल राजस्थानला जाऊन नवीन आयुष्य सुरु करू." बोलता बोलता प्रज्ञा विशालच्या मिठीत शिरली. त्याने तिला कमारेतून घट्ट पकडले. दोघे एकमेकांच्या डोळ्यात हरवले होते.
"बेबी, चल वेळ कमी आहे." म्हणत प्रज्ञा त्याच्या मिठीतुन बाजूला झाली आणि कबिर जवळ गेली. हलकेच तिने त्याच्या गालावर ओठ टेकवले तसा कबिर एकदम दचकला.
"आह." कबिर च्या तोंडून पुसटसे शब्द निघाले. त्याच्या हाताला काहीतरी टोचल्यासारखे झाले.
"कबिर गुड बाय, तुझ्या हाताला टोचलेली सुई आता तिचे काम सुरू करेल. त्यामुळे तुझा मृत्यू हार्ट अटॅकमुळे झाला हे सिद्ध होईल. आता पुढील पाच मिनिटांनी विशाल ओरडुन डॉक्टरांना आवाज देईल, डॉक्टर येतील तुला वाचवण्याचा प्रयत्न करतील पण तू हा हा हा हा." प्रज्ञा परत क्रूर हसली. बाजूला असलेल्या विशालला तिने कबिरकडे बघत किस केले आणि तिथून निघून गेली.
कबिरला टोचलेल्या सुईने तिचे काम करायला सुरुवात केली होती. कबिरला घाम फुटून निघत होता. विशाल हे सगळं तिथे उभा राहून बघत होता. कबिरची स्थिती अजून खराब झाल्यावर त्याने डॉक्टरांना आवाज दिला. काही क्षणात डॉक्टर आले पण त्याच्या प्रयत्नांना यश आले नाही. विशालच्या समोर कबिरने शेवटचा श्वास घेतला. ते सुद्धा नैसर्गिक कारण होते हे सगळ्यांना वाटले, त्यामुळे विशालवर संशय आलाच नाही.
मनोरुग्णालयात असलेल्या रेकॉर्ड नुसार प्रज्ञाला कबिरच्या मृत्यू नंतर पाच दिवसांनी डिस्चार्ज मिळणार होता. त्यामुळे रेकॉर्ड नुसार ती ह्या क्षणी मनोरुग्णालयात होती..
प्रज्ञा आणि विशालने असा प्लॅन केला की, प्रज्ञा ही शिकार वाटतं होती, पण खरं तर शिकारी होती.
सहा महिन्यांनी प्रज्ञा आणि विशाल विवाह बध्ध झाले. राजस्थानला गेले आणि तिथेच राहिले. गुन्हा कोणी केला? कसा केला? का केला? ह्याचा मागमूसही कोणाला लागला नाही. त्यांच्या बदल्याच्या आगीत, आणि स्वार्थाने एक नाही तर चार बळी घेतले.
कोण आहे तिथे?
भीती वाटते मला.
शिकार माझी होणार
कोणा न माहिती
सत्य काय आहे?
शिकार आहे की,
शिकारच शिकारी आहे.
भीती वाटते मला.
शिकार माझी होणार
कोणा न माहिती
सत्य काय आहे?
शिकार आहे की,
शिकारच शिकारी आहे.
तुम्हाला माझी कथा कशी वाटली नक्की सांगा.
धन्यवाद
©वर्षाराज
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा