शिकारी... भाग ७

"बरं कदम तुम्ही जा आता आणि हो बदली वगैरे काही होणार नाही. तुम्ही तिथेच ड्युटी कराल. समजलं?" विशाल जबर आवाजात बोलला.


मागील भागात आपण बघितले ..


"कदम बसा गाडीत जरा बोलायचे आहे." विशाल गंभीर होत बोलला.

हवलदार कदम आदेशाचे पालन करत हातातील बाजाराच्या पिशव्या गाडीत ठेवत गाडीत जाऊन बसला.


"काय झालं साहेब? काही गंभीर?" साहेबांना बोलायचे आहे म्हणजे कदम जरा टेन्शनमध्ये होता. विशालच्या चेहेऱ्यावरचे गंभीर भाग टिपत तो बोलला.


आता पुढे…


"कदम त्या प्रज्ञाच्या घरी कोणी येतं का? काही संशयास्पद?" विशाल विचारपूस करत होता.


"नाही साहेब गेल्या आठवड्या पासून मी तिथे आहे. पण असं काही संशयास्पद नाही वाटलं." कदम


"मग बाहेर ती व्हाईट सिडान कार कधी दिसली?"

"नाही साहेब असं काहीच झालं नाही अजून. कदाचित पोलिसांना बघून कोणी फिरकत नसेल तिथे." कदम


"बरं आजूबाजूला बारीक नजर ठेवा. काहीही चूक होता कामा नये." विशाल डोळ्यांवर गॉगल लावत म्हणाला.


"आता काय सांगणार तिथे त्रास वेगळाच आहे." कदम हळू आवाजात पुटपुटला.


"काय म्हणालात कदम?" त्याचे बोलणे ऐकू नसले आले तरी कदम काही बोलला हे विशालच्या तीक्ष्ण कानांना कळले होते.

"साहेब एक बोलू?" कदम जरा घाबरत बोलला.


"बोला." विशाल जबर आवाजात बोलला.


"साहेब माझी ड्युटी तिथे नको मला. कृपा करून माझी ड्युटी परत पोलिस स्टेशनवर लावा." कदम


"का काही अडचण आहे? की घाबरलात?" विशाल करा चिडून.


"घाबरलो नाही साहेब. गुंडांना मी घाबरत नाही. पण त्या घरात भूत आहे." कदम जरा चाचरत बोलला.


"काहीतरी काय कदम. पोलिसांना असं बोलणं शोभत नाही." विशाल रागात एकदम मागे वळून कदमला बघून बोलला. तसा कदम घाबरला.


"साहेब खरंच हो. त्या घरातून रात्री बे रात्री विचित्र आवाज येतात. ती प्रज्ञा मध्येच हसते काय? रडते काय? मध्येच अर्पिता, अर्पिता म्हणून ओरडते. कधी कधी मोठ्याने गाणी वाजतात. साहेब तिथे खरंच काहीतरी आहे." कदम घाम पुसत बोलला.


"शटआप कदम." विशाल वैतागून बोलला.


"साहेब ऐका माझं. तिचे आई वडील देखील काल भेटले, तर बोलत होते की, \" प्रज्ञा एकटीच कोणाशीतरी बोलत असते. त्या अर्पिताचा खून झाला आहे. तिचा अतृप्त आत्मा तिथे भटकतो. मध्येच पडदे हलतात, भांडी पडतात.\" साहेब बाहेरील गुंडांचे माहीत नाही, पण तिथे नक्कीच त्या अर्पिताचे भूत आहे." कदम विशालला समजावण्याचा प्रयत्न करत होता.


"कदम सांगितलं ना भूत वगैरे काही नसतं आणि काय बोललात तुम्ही? आई वडील? पण ती तर तिथे एकटीच राहते ना?" विशाल


"हो साहेब. आधी एकटीच राहत होती. पण तीन दिवसांपूर्वी तिने तिच्या आई वडिलांना बोलावून घेतलं. असं तिचे आई वडील सांगत होते." कदम बोलला.


"बरं कदम तुम्ही जा आता आणि हो बदली वगैरे काही होणार नाही. तुम्ही तिथेच ड्युटी कराल. समजलं?" विशाल जबर आवाजात बोलला.


कदम गाडीतून उतरणार तितक्यात विशालला एक फोन आला. त्याने हातानेच कदमला थांबण्याचा इशारा केला.


"हॅलो, माने काय झालं?" विशाल बोलला.


"साहेब तुम्ही, तुम्ही इथे लवकर या." माने घाबरत बोलला.


"माने काय झालं सांगा?" विशाल


"साहेब तुम्ही या. कळेलच तुम्हाला. लवकर या साहेब. इथे खूप मोठा प्रोब्लेम झाला आहे." माने प्रज्ञाच्या घरून बोलत होता.


त्याच्या आवाजाची गंभीरता लक्षात घेत विशालने गाडी प्रज्ञाच्या घराकडे वळवली.


काय झालं असेल? प्रज्ञा ठिक असेल ना? बघूया पुढील भागात.


क्रमशः

© वर्षाराज

🎭 Series Post

View all