शिकारी... भाग १

प्रज्ञा आणि अर्पिता दोघी रूम मेट्स. दोघी देखील सॉफ्टवेअर इंजिनिअर. पण नोकरीला मात्र भिन्न कंपन

"हॅलो, अर्पिता" प्रज्ञाने तिच्या रूम मेटला फोन केला तेव्हा रात्रीचे नऊ वाजले होते.

"हं, प्रज्ञा बोल गं. कुठे आहेस? मी केव्हाची वाट बघते आहे." अर्पिता घड्याळाकडे बघून बोलली.


"अगं आज ऑफिस मधून निघायला जरा उशीर झाला गं. शेवटची बस पण गेली आणि रस्त्यावर देखील कोणीच नाहीये. रिक्षा शोधावी लागेल. त्यासाठी मेन रोडकडे आता चालत निघाले आहे. पुढे दहा मिनिटांवर एक नाका आहे तिथून मिळेल रिक्षा." प्रज्ञा चालताना बोलत होती.


"कोण आहे तुझ्या सोबत?" प्रज्ञा काळजीने बोलली.


"तोच प्रॉब्लेम आहे की, आज मी एकटीच आहे. टीम मधले सगळे आधीच गेलेत. दुसऱ्या टीमचे लोक अजून काम करत आहेत."


"तू वेडी आहेस का? एकटी का निघाली? ऑफिस मध्येच थांबली असतीस. कोणासोबत आली असती मग. असं एकट्याने येणं बरं नाही. आधीच तुझं ऑफिस असं निर्जन ठिकाणी आहे की, जिथून ना लवकर बस मिळते ना रिक्षा." अर्पिता रागावली.


"जाऊदे आता निघाले मी. असही अजून नऊच वाजले. आता तरी मिळेल रिक्षा नंतर मिळणार नाही म्हणून निघाले. पण ऐक ना. तू रिक्षा मिळेपर्यंत बोलत रहा ना माझ्याशी!" प्रज्ञा आजूबाजूला बघत बोलली.


"हो बोलते मी. तू काळजी करू नकोस." अर्पिताने फोन एका कानाला लावून, फोन कान आणि खांदयामध्ये पकडला आणि मग लॅपटॉपवर काम करत होती.


साधारण पाच मिनिटांनी प्रज्ञाच्या फोनची बॅटरी संपली म्हणून तिचा फोन बंद पडला आणि दोघींचा संपर्क तुटला.


"शीट, फोन चार्ज करायला विसरले." म्हणत प्रज्ञा तशीच पुढे पावले टाकत होती.



"हॅलो, हॅलो प्रज्ञा आवाज येत नाहीये गं. हॅलो." म्हणत अर्पिताने काम करता-करता फोन बघितला, तर प्रज्ञाचा फोन कट झाला होता.


तिने परत प्रज्ञाला फोन लावला, पण फोन स्विच ऑफची कॅसेट वाजली.

"अरे यार, ही मुलगी पण ना फोन चार्ज करायचं विसरली पुन्हा. घरी येऊदे बघतेच तिला." म्हणत देवाला हात जोडत पुन्हा कामात गुंतली.


दुसरीकडे…

किर्र काळोखात प्रज्ञा एकटीच चालली होती. आज ऑफिस मधून निघताना तिला उशीर झाला होताच. शेवटची बस देखील कधीच निघून गेली होती. त्यात ऑफिस जवळून रिक्षा मिळणे देखील कठीण होते कारण तिचे ऑफिस ज्या भागात होते, तो भाग अजून तितका विकसित झालेला नव्हता. त्यात अजून भर म्हणून फोन देखील बंद पडला होता.
फोन बंद पडताच तिने इकडे-तिकडे एक नजर फिरवली. आजूबाजूला कोणीच नव्हते. मनात एक अनामिक भीती होती.

तर,
प्रज्ञा आणि अर्पिता दोघी रूम मेट्स. दोघी देखील सॉफ्टवेअर इंजिनिअर. पण नोकरीला मात्र भिन्न कंपनीत.
दोघी दुसऱ्या शहरातून पुण्याला नोकरीसाठी आल्या होत्या. तेव्हा रूम मेट्स म्हणून त्यांची ओळख झाली आणि आता त्या चांगल्या मैत्रिणी झाल्या होत्या.


कॉटनचा ड्रेस घातलेली, बारीक सडपातळ बांध्याची, केसांचा स्टेपकट केलेला. सुंदरतेची मूर्तीच ती. पाठीवरच्या सॅकच्या खिश्यातून तिने एक हेअर बँड काढून केसांची पोनी बांधली आणि तीच सॅक छातीशी कवटाळून ती चालत होती. तितक्यात कोणी तरी तिच्या मागे चालत असल्याचे तिला जाणवले. तिने एकदम मागे वळून बघितले, तर मागे कोणीच नव्हते.

"मला भास झाला असेल." प्रज्ञा मनात बोलली.


पण परत मागून येणाऱ्या पावलांचा आवाज येत होता. आता तिने मागे न बघता, तिच्या चालण्याची गती वाढवली. तशी मागून येणाऱ्या पावलांची देखील गती वाढली.

समोर एका मिनिटाच्या अंतरावर तिला मुख्य रस्त्याचा लाईट दिसत होता. ती पळतच त्या दिशेने गेली. मुख्य रस्त्यावर गेल्यावर तिने परत मागे वळून बघतले. मागे कोणीच नव्हते. पण त्या रस्त्यावर देखील कोणीच नव्हते. ती घाबरून रस्त्याच्या कडेला असलेल्या टपरीच्या आडोश्याला उभी राहिली. घामाने चिंब भिजलेली ती जोर जोरात श्वास घेत होती.




पुढील भागात बघू, मिळेल का प्रज्ञाला रिक्षा? तिच्यामागे येणाऱ्या पावलांचा आवाज हा तिचा भास होता की, खरंच कोणी तिच्या मागे होते? वाचत रहा शिकारी



क्रमशः

©वर्षाराज

 

🎭 Series Post

View all