ह्रदयी प्रीत जागते

Story Of Two Friends And their Love


हृदयी प्रीत जागते
पांढरा सदरा,धोतर,वरती लाल फेटा आणि पायात कोल्हापुरी पायताण .. मोठी मिशी असा सुभानरावांचा मोठा रुबाब होता .. हे सुभानराव म्हणजे शंतनूचे मामा .. सुभानरावांची १०० एकर जमीन .. भरपूर शेती .. आणि बक्खळ पैसा .. सुभानरावांच्या पत्नीचे नावं सरस्वती ..
देवाने सर्व ऐश्वर्य दिले पण वंशाला दिवा दिला नाही .. सुभानरावांनी शंतनू म्हणजे त्यांच्या बहिणीचा मुलगा जो कि शहरात राहतो त्याच्या नावावर सगळी प्रॉपर्टी करून टाकली आणि त्याला जणू दत्तकच घेतले होते .. शंतनूची मज्जाच मज्जा होती त्यामुळे .. दोन दोन आई वडील .. त्याचे वडील म्हणजे एकदम साधारण बँकेत क्लार्कचे काम करत होते .. त्यामुळे शंतनूला काही हवे असले कि मामा कडे यायचा . मामा आणि मामी हाताने खाऊ तर घालायचेच पण बोट ठेवेल ती वस्तू त्याला घेऊन द्यायचे ..
शंतनूला कधी गावी मामाकडे तर कधी स्वतःच्या घरी त्याला मनाला वाटेल तिकडे रहायचा .. त्याचे म्हणजे असे झाले होते"मैं चाहे ये करू .. मैं चाहे वो करू .. मेरी मर्जी .. मेरी मर्जी "
पण बाबा म्हणजे खरे बाबा जाम वैतागले पोराला .. वाटेल ते मिळतंय म्हणून त्याला कशाचीच कदर राहिली नव्हती .. कधी कधी तर रात्री घरातून हाकलून द्यायचे
अँपलचा फोन, ब्रँडेड शूज, ब्रँडेड कपडे .. ब्रँडेड वॉच, आणि बुलेट घेऊन कॉलेजला तर जायचा पण अभ्यासा पेक्षा बाकीच्या सगळ्या दंगा मस्तीतच जास्त रमायचा ..
शंतनूचा जिगरी दोस्त मंथन .. मंथन तर दि बिझनेस टायकून मोहन याचा मुलगा .. मंथन एक स्पोर्ट्स पर्सन होता .. कॉलेजच्या फुटबॉल टीमचा कॅप्टन .. दिसायलाहि हिरो सारखा आणि स्पोर्ट्स मध्ये असल्यामुळे ऍब्सची काही कमी नव्हती .. एकदा त्याला जो बघेल तो पुन्हा वळून बघेलच असा बंबाळ होता .. मुलींना तर त्याने आपल्याकडे बघून स्माईल दिली म्हणजे आपल्या जन्मांचे सार्थक झाले असेच वाटायचं.
शंतनु पण डॅशिंग ड्युड होता .. तर हे असे दोघे मित्र दिवसातले १२ तास एकत्र असायचे .
दोघे दिवसभर कॉलेजला पडीक असायचे .. नेहमी कॉलेज च इलेकशन्स,स्पोर्ट्स चॅम्पियन शिप, सिंगिंग कॉम्पिटिशन हि असली भरगोस बक्षीस कॉलेजला या दोघांनी मिळवून दिली होती .. त्यामुळे कॉलेजमध्ये एक त्याचे नाव आणि इज्जत होती . पण ह्या इज्जतीला घरी कोण विचारतं ?
शंतनूला तर बाबा घरातून कधी कधी रागाने हाकलून लावायचे मग हा मामाकडे जायचा .. मामी त्याला हाताने भरवून मांडीवर झोपवायची .. इतके लाड करायची .. आणि मामा म्हणजे" काय रे !! बापानं हाकललं का ? " असे म्हणायचा आणि खिशातून २००० रुपयांचं बंडल काढून त्याच्या खिशात कोंबायचा.
मामा "अरे मर्दा !! असा मामीच्या मांडीवर झोपतोस कसला? मस्त पिळदार बॉडी कमवायची .. आणि हे काय तुला कितीदा सांगितलंय ..मिशी वाढव .. अस भुंड थोबाड कसे दिसतंय? .. मर्द कसा पैलवाना सारखा पाहिजे .. तू येडा .. बापानं हाकललं कि रडत येतो इकडं ."
शंतनू " मामा .. मला नाही आवडत ते मिशी बिशी .. चेहरा कसा चमकदार असला पाहिजे .. नाहीतर पोरी बघत नाही .. मिशी ठेवलं कि अमोल पालेकर असल्या सारखं वाटतं मला.
तसा मामा गडगंज हसला
शंतनु " मामा .. येऊ का ? निघतो आता .. नाहीतर उशीर होईल मला कॉलेजला."
मामी " परत कधी येशील लेकरा .. " बोले पर्यंत मामीने त्याला दह्याचा घास भरवला
मामा "आता बापानं हाकललं कि येईल .. त्याशिवाय माझी आठवण येतेय का त्याला?"
शंतनु " असे काही नाही मामा .. मला तिकडे कॉलेज असत ना .. मग रोज नाही जमत .. नाहीतर रोज आलो असतो "
मामा " बरं .. बरं .. जा .. सावकाश जा "
शंतनु निघाला दोघांना टाटा करून ..
बुलेट वर मोठ्या शान मध्ये बसून निघाला होता .. मागून बकरीचा आवाज येत होता .. गायीच्या गळ्यातल्या घंटी वाजत होत्या .. सकाळी सकाळी गार वार सुटला होता .. तितकाच सूर्य डोक्यावर चढत होता .. रस्त्याच्या दुतर्फा शेत होता .. मधेच ओढ्याच्या पाण्याचा खळ खळ आवाज येत होता .. कोणी कोणी शेतात पाणी सोडत होते .. कोणी कोणी पेंढ्याचा ढीग लावून ठेवत होते .. बाया परकर पोलकी,नउवारी साड्या आणि डोईवर पदर घेऊन डोईवर पाण्याचे हंडे घेऊन चालत होत्या .. हे सगळे शंतनूला बघायला खूप आवडायचं .. गावातले वातावरणच त्याला खूप आवडायचं .. गावकऱ्यांची बोली भाषा,सतत काम करणारी लोक .. तरी पण हसतमुख दिसणारी माणसे .. शेणाचा वास.. त्याला मनाला आनंद द्यायचा ..
असा खुशीत नेहमीच्या रस्त्यावरून गाडी पळवत होता .. तर अचानक एक पांढरे शुभ्र बकरीचे पिल्लू म्हणजेच कोकरु हो मध्ये आले आणि ह्याचा बॅलन्स गेला .. शंतनूची गाडी सरकली आणि शंतनु खाली पडला .. रस्ता सगळा मातीचा होता ..तर सगळीकडे धूळ उडाली .. आणि त्यात तो पडला तर जरा लागले होते त्याला तर डोळ्यांसमोर एक सेकंद अंधारी आली होती
तेवढयात एक सुंदर मुलगी परकर पोलका आणि त्यावर मॅचिंग दुपट्टा घेतला होता .. मस्त लांब वेणी .. घातली होती .. तिने त्या पांढऱ्या बकरीच्या पिल्लाला हातात उचलून घेतल होते .. आणि ह्यच्याकडे बघून .. " थँक यु " असे बोलली आणि निघून पण गेली .
आता आपल्या सोबत नक्की काय झाले हे शंतनूला कळलंच नाही .. थोडेसे हाताला खरचटले होते .. तो उठला .. हात आणि पाय झाडले .. कपडे झटकले.. गाडीला उचलली आणि साईड स्टॅन्डला लावली .. इकडे तिकडे पाहू लागला .. तर जवळच पाण्याचा ओढा होता .. तो हातपाय धुण्यासाठी ओढ्याकडे गेला .. हाताला कोपरा जवळ जरा जास्तच खरचटले होते .. लागलेली जखम त्या पाण्याने धुवू लागला .. पाणी लागल्यावर त्याला जरासे झोंबलं.. चुरचुरलं .. मनात " च्यायला ..सकाळ सकाळी वैतागवाडी असे मनातच बोलत होता तर तिकडून ते कोकरू मे ... मे .. करून बारीक आवाजात ओरडत होते .. आवाजाच्या दिशेने तो गेला तर तीच सुंदर मुलगी त्या पांढऱ्या शुभ्र कोकराला पाण्यात अंघोळ घालत होती .. आणि ते व्रात्य कोकरू पाण्याच्या बाहेर उडी मारायला बघत होते .. आणि ती एकटीच हसत त्याच्याशी बोलत होती " थांब रे .. किती घाई करतोय .. जरा स्वच्छ करू दे ना "
सूर्याची कोवळी किरण पाण्यात पडल्या मुळे पाणी चमचम चमकत होते ..एक अदभुद प्रेमाचा आणि सौदर्याचा नजारा समोर बघून शंतनू बघण्यात हरवून गेला .. त्याचे लक्ष तिच्या आधी केसांवर .. मग गोऱ्या गोऱ्या पाठीवर गेले .. मागूनच ती अशी सुंदर दिसत होती .. मगाशी धुळीत तीचा चेहरा पुसटच दिसला होता पण मोहिनी बसल्या सारखा तिच्या मागे मागे चालू लागला .. त्या सुंदर ललनाने ते कोकरू तिच्या स्वतःच्या दुपट्ट्याने पुसले .. त्याला हातात पकडून थोडेसे वरती पकडलं .. आणि त्याच्या नाकावर नाक लावलं .. तर ते कोकरू पुन्हा " में ... मे .. करून ओरडलं " त्या सुंदर मुलीला जणू त्या कोकराचे म्हणणे कळले होते तिने हसतच त्याला बोलले " आईकडे जायचंय तुला ?" आणि त्याला घेऊन गेली आणि बाकीच्या बकऱ्यांमध्ये त्याला सोडले .. तसें ते व्रात्य कोकरू पळत पळत उड्या मारत त्याच्या आई जवळ गेल.
मग त्या मुलीने शेतातला एक ऊस तोडला .. हँडपंपचे पाणी काढले आणि तो ऊस धुतला आणि दाताने खाऊ लागली .. शंतनू जणू मंत्रमुग्ध झाला होता .. तिच्या मागे मागे जात राहिला आणि अडून अडून तिला बघत होता ..
तेवढ्यात लांबूनच कोणी तरी तिला हाक मारतय असा आवाज आला .. नक्की काय नावाने हाक मारतायत ते ऐकू येईना " नव्या ... नव्या ... का दिव्या...बहुदा असेच असावे
तेवढयात शंतनूचा मोबाईल खणखणला म्हणून तो जरा मागे झाला आणि बोलू लागला .. फोन अर्थातच त्याचा मित्र मंथनचा होता
शंतनू " हॅलो मंथन . आय एम इन लव्ह "
मंथन " हॅलो .. अरे काय बोलतोय ?"
शंतनू " अरे आज ना असली सुंदर मुलगी मला दिसलीय .. अजूनही माझ्या समोर आहे ती .. "
मंथन " अरे वाह !! मग कधी भेटवतोय तिला "
शंतनू " ए .. वहिनीला बोलायचं रे "
मंथन " ए गाववाल्या .. जरा स्वप्नांतून बाहेर ये .. अशी मुलगी दिसली कि लगेच प्रेम होते काय रे ?"
शंतनू " अरे लगेच नाय काय ? गेले २ तास मी तिच्या मागावर आहे "
मंथन " यु आर टू मच .. येतोय ना .. विसरलास का आज माझी मॅच आहे ?"
शंतनू " अरे नाही ना .. आज नाही जमत आहे .. आज ना पडलो च्यायला त्या गाडीवरून .. हात सोलपटलाय .. आता आज जरा इथेच थांबतो . उद्याच येतो सकाळी "
मंथन " बस काय भावा .. पोरगी दिसल्यावर मित्राला विसरलास काय ?"
शंतनू " अरे .. नाही रे .. मैत्रीत पोरगीला मध्ये आणायची नाही .. "
मंथन " दयाटस राईट .. यु सेड इट करेक्ट "
शंतनू " करेक्ट .. चल बाय ऑल द बेस्ट .. आय नो यु विल रॉक इन द मॅच."
मंथन " थँक यु .. तरी पण रे तू नसलास तर मज्जा येत नाही मला. "
शंतनु " हो रे .. पण आता आजच्या दिवस मॅनेज कर .. मला खरंच लागलंय."
मंथन " ठीक आहे ..चल भेटू उद्या."
शंतनू " बाय .. आणि एक त्या टोनीच्या टीमला त्यांची लायकी दाखवून दे. "
मंथन " हो .." आणि त्याने फोन ठेवून दिला ..
शंतनूने मागे वळून पाहिले तर ती सुंदरी गायब झाली होती.

🎭 Series Post

View all