हृदयात तूच रे पर्व दुसरे भाग 1

पुन्हा नव्याने हृदयात तूच रे
हृदयात तूच रे पर्व 2

नमस्कार वाचक मित्र मंडळी तुमच्या सर्वांच्या प्रेमाने लोकप्रिय झालेली माझी हृदयात तूच रे ही कथा घाईगडबडीत शेवट करून अर्ध्यावर ठेवली होती.आणि ही गोष्ट तुमच्या चाणाक्ष नजरेतून सुटली नाही.हे बघून मला खरतर आश्चर्य वाटलं.आणि आनंदही झाला.ही कथा जलद कथेसाठी मी लिहिली होती.पाच भागात ही कथा संपवणे भाग होते.त्यामुळे मला पूर्ण कथेची भावस्पर्शी मांडणी करता आली नाही.आणि वाचक वर्गाला ही कथा अपूर्ण आहे अस वाटून गेलं.
तुम्हा सर्वांना पडलेल्या सर्व प्रश्नाची उत्तरे देण्यासाठी मी घेऊन आलीय हृदयात तूच रे पर्व 2 हे पर्व तुम्हा सर्वांना नक्कीच आवडेल.आणि तुमच्या प्रश्नांची उकल ही होईल.माझ्या वाचकाना नम्र विनंती आहे की,कथा वाचून फक्त सोडू नका एखादी कॉमेंट ही आठवणीने करत जा.आमच्यासारख्या लेखकांना तुमची एक कमेंट म्हणजे आनंदाची पर्वणी असते .तुमच्या एका प्रतिक्रियेने आम्हाला लिहिण्यासाठी प्रेरणा मिळते.

कथा…..


सकाळची सूर्यकिरणे तिच्या चेहऱ्यावर झोकळली.त्या सोनेरी किरणांनी तिचा चेहरा कमालीचा तेजस्वी दिसत होता.सकाळची साखर झोप किती सुंदर असते नाही.मस्त गुबगुबीत स्वप्नाच्या दुनियेची सफर करणाऱ्या आपल्या मनाला कोणाचं तरी ग्रहण लागतं आणि सुंदर स्वप्नाच्या दुनियेत फिरता फिरता मनाविरुद्ध जमिनीवर यावं लागतं.कोणाचा तरी पाठीत धपाटा पडतो,नाहीतर तोंडावर पाणी जणू काही पाऊस आपल्याला अंथरुणात येऊन भिजवतो.
तिच्या चेहऱ्यावर ही असच पाणी पडलं आणि स्वप्नाच्या दुनियेत हरवलेली ती अलगद भेदरून उठून बसली.

"क्षमे आठ वाजून गेले, उठते का नाही?की ओतू आणखीन तांब्याभर पाणी."

"आई आज रविवार आहे ना ग, का उगाच हात धुवून मागे लागलीस माझ्या."

"हात धुवून मागे लागली आहे का?थांब दावते कार्टी आज काय आहे लक्षात आहे का नाही तुझ्या?"

"आज काय आहे?"

" काय आहे म्हणजे?मामाच्या बाळाचं बारस आहे एवढं तरी आहे का नाही लक्षात?"

"ईईई अशी कशी विसरली मी काय आई तू पण, उठवायचे ना लवकर मला."आपले काही चुकलेच नाही या अविर्तभावात क्षमा अंघोळीला पळाली.तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहत आई पुटपुटली.

"देवा , उद्या कसं व्हायचं या पोरीचं?"

"देव सगळ काही चांगलं करणार तथास्तु"! बाथरुम मधुन क्षमा ओरडली.आणि तिच्या आईने डोक्यावर हात मारून घेतला.

दहावीत शिकत असलेली आपली क्षमा दिसायला सुंदर होती. अभ्यासातही हुशार,सगळ्यांना आपलंसं करणारी,लहानपणापासून आपल्या मामाची लाडकी,आपल्या बाबाचा तर जीव की प्राण एकुलती एक लेक,शाळेत दरवर्षी हीचा नंबर ठरलेला.रोज सकाळी पहाटे उठून अभ्यासाला बसणारी,घरात आईला मदत करून बरोबर वेळेवर शाळेला जाणारी. गावातलं कोण आजारी असेल तर आपल्या माणसासारखं जाऊन विचारपूस करणारी,गावात कोणाची भांडणे होत असतील तर, मध्यस्थी करून चार गोड शब्द बोलुन भांडणे सोडवणारी, भावी सरपंच हा शिक्का लहानपणीच बसलेली,ही सरपंचाची पोर.

क्षमाच्या चेहऱ्यावर नेहमी गोड हसू असायचं.गावात लाडाची लेक कोण असेल तर हीच बया! कधी कधी घरापर्यंत भांडणे घेऊन येण्याचा पराक्रम गाजवून, आपल्या दारात आलेल्या विरोधकाला कानाखाली वाजवून आपण चुकलोच नाही. हे सगळ्यांसमोर दाखवून देणारी क्षमा नेहमीच चर्चेत असायची.

बापाला लेकीच्या अशा वागण्याचा खूप मोठा गर्व वाटायचा. तर आईला खूप काळजी वाटायची.कधी कधी बायका तिला टोमणे मारायच्या.लेकीला धाकात ठेवा म्हणून सूनवायच्या.याचं बिचारीला खूप दुःख व्हायचं.ती क्षमाच्या बाबांना बोलून दाखवायची.पोरीला आवरा म्हणून विणवत असायची. पण बाबा म्हणून तिचा त्यांना नेहमी अभिमान वाटायचा.आपली मुलगी निर्भिड आहे याशिवाय आपल्याला दुसरं काय हवं? अस म्हणून ते क्षमाच्या आईचे बोलणे धुडकावून लावत.आणि बाबांचे बोलणे ऐकणारी ही पोर मनोमन आपल्या बाबांना शंभर तोफांची सलामी द्यायची.

आज क्षमाच्या आजोळी जायचं होत.तिच्या लाडक्या मामालां मुलगा झाला होता.त्याचच आज बारसं होत.रात्री आईने बजावून ठेवलं होत उद्या लवकर उठ. पण ही पोर ऐकेल तर शपथ म्हणूनच तिच्या आईचा रागराग सुरू होता.तीच एक ठरलेलं असायचं दर रविवारी शाळेला सुट्टी म्हणून ही मस्त ताणून द्यायची आणि सकाळी नऊ पर्यंत मस्त स्वप्नात रंगायची.(ती नेमकी स्वप्ने कसली पहायची समजेल पुढे) आज देखील तिची सवय काही सुटली नाही. दर रविवारी पाठीत धपाटा नाहीतर पाणी हमखास पडायचं.अन् मॅडम भेदरून स्वप्नाच्या दुनियेतून जमिनीवर यायच्या.

"आई, चहा बिस्कीट दे." फ्रेश होवून मॅडमनी फर्मान सोडलं.

"मॅडम,अजुन काय खातरदारी करावी आम्ही.?"रागाने कमरेवर हात ठेवून आईने विचारलं.

"ओहह, आज सूर्य पूर्वेकडे की पश्चिमेकडे उगवला आहे ओ बाबा?"

"मला नाही माहित क्षमे." बायकोचा राग बघून त्यांनी पुढे न बोलणेच पसंत केलं.

"मुकाट्याने केलेला उपमा गिळ अन् आवर उशीर होतोय आपल्याला."

"काय हे मदर इंडिया माहेरी जायची किती घाई तुम्हाला?जरा धीर धर ना ग संध्याकाळी परत यायचं आहे आठवणीत असू द्या." जवळ जवळ या पोरीने टोला लगावला.

या मायलेकीची बाचाबाची क्षमाचे बाबा पेपराआडून हसत एन्जॉय करत होते.

"आहो,या मुलीला सांगताय ना आता. इतकही मुलीच्या जातीने उलट बोलू नये."

"अग पंधरा मिनिटात येतो मी तोवर तुम्ही आवरून घ्या मग निघू आपण."बायकोच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत क्षमाच्या वडिलांनी कल्टी मारली.
इकडे तू तू मी मी करत एकदाची या दोघींची तयारी झाली.आणि यांची गाडी क्षमाच्या मामाच्या गावाला निघाली.

क्रमशः…





🎭 Series Post

View all