हृदयात आहे प्रीत भाग- 1

Gosht premachi

'शाम' झाडाखाली उभा राहून सारिका घरातून निघण्याची वाट पाहत होता. त्याने आपल्या विचारात सिगारेट शिलगावली. पण काही क्षणातच त्याच्या लक्षात आले, आपण घराच्या दारासमोर उभे आहोत. आप्पांना म्हणजेच त्याच्या वडिलांना सिगारेट या शब्दाशीही सख्त नफरत होती. त्याने सिगरेट पायाच्या बुटाखाली चिरडून विझवून टाकली आणि ते सिगारेटचे थोटुक त्याने लांब शेतात फेकून दिले.

इतक्यात सारिका म्हणजेच, त्याची बायको आपली बॅग घेऊन बाहेर आली आणि शामच्या आईने त्याला दारातूनच ओरडून सांगितले, "सारिकाला बस स्टँडवर सोडून ये" म्हणून. तसा मान हलवत शाम सारिका सोबत निघाला. घरापासून बस स्टॅन्ड केवळ दहा मिनिटांच्या अंतरावर होतं.
सारिकाने काहीही न बोलता आपली बॅग शामच्या हातात दिली आणि ती त्याच्या मागे मागे चालू लागली. स्टँड वर येताच गावची बस उभी असल्याने सारिका आपली बॅग घेऊन गडबडीने बसमध्ये चढली आणि शाम काही बोलतो का, हे पाहण्यासाठी खिडकीतून त्याच्याकडे पाहू लागली. पण शामच्या चेहऱ्यावरची एक रेषही हलली नाही. तो स्टॅन्डवरची वर्दळ पाहत तसाच उभा होता. गाडी सुटली आणि शाम दिसेनासा होईपर्यंत सारिका त्याच्याकडे पाहून हात हलवत राहिली. ती जाताच शामने सुटकेचा नि:श्वास सोडला.

आज सुट्टीचा दिवस, लवकर घरी जाऊन काय करायचे? म्हणून शाम लांबची वाट धरून घरी जाऊ लागला. जाताना त्याची पावले कावेरीच्या घरासमोर थबकली. "कावेरी.." त्याच्या चेहऱ्यावर क्षणभर हसू पसरलं. कॉलेजमध्ये असताना कावेरीशी झालेली नजरा नजर, ओळख, मग मैत्री आणि नंतर झालेलं प्रेम.
तिचा रंग किंचित सावळेपणाकडे झुकणारा, लांब सडक केस, पाणीदार डोळे, चाफेकळी नाक आणि कायम चेहऱ्यावर असणारे अस्पष्ट हसू.. अशी माझी कावेरी.

कॉलेज समोरच्या चिंचेच्या झाडाखाली उभारून आसपास कोणी नाही हे पाहत, पहिल्यांदाच तिचा हातात घेतलेला हात, मग हृदयाची उगीचच वाढलेली धडधड, तिचं लाजणं आणि होकार देणं. किती वेगळे होते ते क्षण, मनापासून जगलेले!
मग कॉलेज संपल्यानंतर मी तिला दिलेलं वचन, "लग्न करेन तर फक्त तुझ्याशीच."
माझा निर्धार पाहून ती किती आनंदली होती. क्षणभर तिने माझ्या नजरेला नजर भिडवली आणि म्हणाली, "तुला चांगली नोकरी मिळेपर्यंत मी वाट पाहीन. मग माझ्या आण्णांकडे माझा हात मागायला ये. ते काही हरकत घेणार नाहीत."

पण आण्णांकडे कावेरीचा हात मागायची वेळ आलीच नाही. चार एक महिन्यांनी आप्पांनी आम्हा दोघांना गणपतीच्या देवळात एकत्र पाहिले अन् त्यांची तळपायाची आग मस्तकात गेली. खरंतर मी नोकरी मिळाल्याच्या आनंदात गणपती समोर पेढे ठेवायला गेलो होतो. अचानक कावेरी भेटली म्हणून एकत्र दर्शन घेतले आम्ही. पण नेमके आप्पांनी पाहिले आणि सगळंच संपल.
मला घरात ओढत नेत आप्पा तणतणत होते. अक्षरशः घर डोक्यावर घेतले त्यांनी. तेवढ्याच शांतपणे मी त्यांना 'माझं कावेरीवर प्रेम असल्याचे सांगितले आणि आम्हाला एकमेकांसोबत लग्न करायचे आहे ' असे सांगितले.
'परस्पर लग्न जमवायला आम्ही काय मेले होतो काय? त्यांचा आवाज घरभर घुमत होता आणि आप्पांनी तेवढ्याच रागात नकार दिला.
आता सगळ संपल्यात जमा होतं. मला नोकरी मिळाल्याची बातमी मी गिळून टाकली आणि पुरुष असूनही आईच्या कुशीत शिरून अश्रूंना वाट मोकळी करून दिली.

मला नोकरी मिळाल्याचा आनंद आईला झाला होता. पण लग्नाला आप्पांनी नकार दिल्याने ती ही दुखावली होती. कावेरी आईच्या, बहिणीच्या, मैत्रिणीची मुलगी, तिच्या चांगल्या माहितीतली होती. पण आप्पांच्या समोर बोलायला आई घाबरायची. त्यामुळे हा विषय संपल्यातच जमा होता.
शेवटचा एक प्रयत्न म्हणून कावेरीचे वडील, आण्णा शामच्या घरी आले. पण त्यांना आप्पांनी जवळ -जवळ हाकलूनच लावले.

काही दिवसांनी आप्पांनी शाम आणि कावेरीला भेटायला ,बोलायला बंदी घातली. केवळ कचेरी ते घर आणि घर ते कचेरी, एवढाच काय तो यायचा आणि जायचा मार्ग शामला आखून दिला.

मग एक दिवस आपल्या मित्राकडून शामने कावेरीला पत्र पाठवले. 'पळून जाऊन लग्न करूया का?' म्हणून विचारणा केली.
पण कावेरीने स्पष्ट नकार दिला. ' पळून गेलो तर आप्पांचे मन दुखावले जाईल', असे तिला काहीही करायचे नव्हते. शामला त्या ही परिस्थितीत तिचा अभिमान वाटला. 'कावेरी सून म्हणून अप्पांना तोडीस तोड होती.' पण आप्पांचे मन वळवणे ही जगातली सर्वात अवघड गोष्ट होती.

आता त्याने पुन्हा खिशातून सिगारेटचे पाकीट काढले. "ए माझ्या अण्णांना आवडणार नाही हं, सिगारेट ओढणारा जावई..त्यांना कळलं ना तर ते वाऱ्यालाही उभे रहायचे नाहीत तुझ्या!" अगदी दुसऱ्याच भेटीतले हे कावेरीचे उद्गार त्याला आठवले. त्या क्षणी त्याने जशी सिगारेट फेकून दिली होती, तशीच आताही फेकून दिली आणि मंद पावलं टाकत तो घरी आला.

"जेवणाचे ताट वाढू का रे?" आईच्या हाकेने तो भानावर आला. सारिका न जेवताच गेली बघ. म्हणाली, "हे जेवले नाहीत न अजून मग मी ही माहेरी जाऊनच जेवते." ताट वाढता वाढता आईची बडबड सुरू होती.

सारिका, आप्पांच्या कुठल्याश्या मित्राची मुलगी. कावेरीला नकार दिल्यानंतर सहा महिन्यांनी शाम चे कावेरीशी लग्न झाले, तेही आप्पांच्या मर्जीनेच. सारिका चांगली मुलगी होती. वडीलधाऱ्यांचा मान राखणारी, समंजस, कुटुंब वत्सल, प्रेमळ होती. पण शाम तिच्यापासून अजूनही अंतर राखून होता. मोजकेच बोलत होता.
त्याच वागणं तिला कळत होत, 'त्याच्या मनात काहीतरी आहे' हे ही कळत होतं. पण तिच्यात सहन करण्याची क्षमता अधिक असल्याने ती आपल्या तोंडून काहीच बोलत नव्हती.

अचानक तिची आठवण आल्याने शाम का बैचेन झाला, त्याचे त्यालाच कळले नाही.
"सारिका नीट पोहोचली असेल का गावी? ती काय विचार करत असेल आपल्याबाबत? तिच्यासाठी मी नवरा असूनही नसल्या सारखाच आहे. या साऱ्यात तिचा काय दोष? आणि माझा तरी दोष काय? तरीही मी भोगतोच आहे ना..."

जेवता -जेवता त्याला ठसका लागला. इतक्यात शेजारची छोटी सुमी निरोप घेऊन आली. "वहिनी गावी नीट पोहोचल्या बरं का!"

शाम जेवुन आडवा होणार, इतक्यात सुमी पुन्हा आली आणि एक पत्र देऊन गेली. कुणाचे पत्र असेल म्हणून शामने घाईघाईने पत्र उघडले.

"कावेरीचे पत्र?" आणि आश्चर्याने त्याने पत्र उघडले.

नक्की काय असेल त्या पत्रात? ते पाहू पुढच्या भागात.

🎭 Series Post

View all