हृदयीचा राजकुमार तू...

वेगवेगळ्या मार्गांचे वाटसरू ते... एक कधी होतील का...??
मी मेघा…

"आई अगं नको गडबड करुस, घेतलं आहे मी सगळं…"

"हो ग, पण काही राहायला नको म्हणून जरा बघत होते… आणि हा चैतन्य कुठे गेला… जायच्या वेळी बघ अस कुठेतरी जातो…"

"झालं ओरडुन, आहे मी इथेच… फोन आलेला म्हणून बाहेर गेलेलो!"

"कोणाचे एवढे फोन येतात देव जाणे…", आई पुटपुटत आत गेली आणि मला जोरात हसू आलं.

"कोणाचे फोन येतात हा दादा तुला एवढे… सांग आईला!", मी हसत म्हणाले.

"गप ग… नको तिथे डोकं चालवते..",माझ्या डोक्यात टपली मारून दादा बॅग गाडीत ठेवायला निघाला.

कोरोनामुळे आम्ही सर्व गावी निघालो होतो. बाबा तेवढे इथेच राहणार होते… मी, आई आणि दादा आम्ही निघालेलो. माझे आणि दादाचे वर्क फ्रॉम होम चालू होते. वाटेत मामा मामींना पीकअप करायचे होते. आवश्यक असणारे सर्व सामान घेऊन आम्ही निघालो.

"आई अगं किती काय काय घेतलं आहेस खायला…"

"तुला नाही घेतलं, या माझ्या बोक्याला भूक लागते म्हणून घेतलय."

"काय ग आई अजून बोक्या म्हणतेस… मोठा झालो ना मी आता…"

"हो ना आई, मोठा झालाय ना दादा आता… सांगतेय मी वहिनी आण मला तर ऐकतच नाही माझं कोणी…", मी नाटकी आवाजात हसून म्हणाले.

"आई हिला सांग हा… खूप बोलते ही…"

"ए मेघा गप ग… कशाला बोलते त्याला, पण मी काय म्हणते चैतू, बघुया ना लग्नाचं तुझ्या… हा कोरोना झाल्यावर बघुया… तोपर्यंत मुलगी तरी ठरवूया ना… गावी गेल्यावर मीच बघते आता…"

"आई आई आई, होल्ड ऑन… ती नाहीतर तू, दोघींना हाच विषय मिळतो का बोलायला… बाबा एकटे आहेत ज्यांना ऐकता तुम्ही… आता ते नाहीत तर त्रास देऊ नका मला…"

"दादा दादा दादा…"

"काय ग काय झालं… घशात स्पीकर बसवला आहे हिच्या तर…"

"आई सांग ना ग ह्याला… मी फक्त एवढंच बोलत होते की अंशू आणि इशूला खाऊ घेऊयात…"

"बाळा दुकान आता एवढ्या रात्री उघडी असणारेत का… आणि लोकडाऊनचा अर्थ कळतो?? बाहेर बघ जरा सगळ बंद आहे… आई मामाला सांग सगळं खाली आणून ठेवायला, जास्त वेळ थांबता नाही येणार…"

"हो हो, आलेत ते खाली… ते बघ…"

"मामीssss…", मी चेकाळून खाली उतरले. मामी म्हणजे जगात भरी व्यक्ती!

"कशा आहात… शीट… ही दोघं झोपले…", माझा हलका मुड ऑफ झाला…

"मी छान आहे, तुम्ही कशा आहात… अहो झोपले ते मगाशीच… उठतील बघा थोड्या वेळात…"

"हो हो चालेल… द्या मी अंशूला घेते.", मी अंशूला घेऊन गाडीत बसले. गोबऱ्या गोबऱ्या गालांचा अंशू माझा खूप लाडका होता. इशू मात्र दादा सोडून कोणाकडे यायची नाही.

आमचा प्रवास चालू झाला. दादा आणि मी सोडून सर्व शांत झोपले होते. उन्हाळ्यातली ती थंड हवा खोलवर काहीतरी रुजवत होती. केसांच्या बटा जबरदस्ती गालावर रेंगाळत होत्या. अंशू मला घट्ट बिलगुन झोपला होता. ब्लूटूथ लावून गाणी ऐकत होते मी… आणि अचानक माझ्या आवडत्या ओळी वाजू लागल्या… गाणं लूपमोडवर टाकून मी डोळे मिटून बसले… गाणं चालू होतं…

कभी गर्दिशों का मारा…
कभी ख्वाहिशों से हारा…
रूठे चाँद का है चकोर…
ज़रा से भी समझौते से…
ये परहेज रखता है क्यूँ…
माने ना कभी कोई ज़ोर…
दुनिया जहां कि बंदिशों की…
ये कहाँ परवाह करे…
जब खींचे तेरी डोर…
खींचे तेरी डोर…


मी चैतन्य…

आज सारं काही वेगळं वाटत होत… शांत शांत…
मेघा गाणी ऐकत मागे डोळे मिटून बसली होती, कुशीत अंशू शांत झोपला होता… मुलींमध्ये आईपण खरंच उपजतच असतं… लहान आहे तशी, पण अगदी आईसारखी आहे…
चेहऱ्यावर चंद्राच्या कोरीसारख हसू घेऊन शांत बसली होती… आवडते गाणे असावे… माझी छोटीशी परी खरंच खूप मोठी झाली होती आता…

इशुला मात्र गाडी चालवत असल्यामुळे घेता आल नाही. फार गोड आहे तीसुद्धा, पण मी सोडून कोणाजवळ जात मात्र नाही. लगेच रडून देते.

माहीत नाही पण या वेळी काहीतरी वेगळं जाणवतंय… कसलीतरी हुरहूर… काहीतरी असं वेगळंच… असं वाटतंय एवढे वर्ष ज्याची वाट बघतोय, ते मिळणार आहे…

काय म्हणावं ह्याला… काहीच समजत नाहीये… सारं काही स्तब्ध…

राहून राहून नजर पुन्हा मेघावर जात होती… कधीकधी तिच्याकडे बघुन भीती वाटते. एवढी निरागस आहे… कधी ही निरागसता विरून जाऊ नये असं वाटतं… आजवर तिला कधी भानावर आणायची गरज वाटली नाही… पण भीती मात्र सतत मनात आहे… माझी गोड परी कायमच हसरी असावी… कधीकधी थोडा स्वार्थी विचार येतो मनात की तिचा राजकुमार कधी भेटायलाच नको तिला… कायम माझ्या मागे मागे दादा दादा करत फिरावी… हल्ली जरा वहिनीचे वेड डोक्यात घेतलय, पण गोड वाटते चिडवताना…

कोण असेल ती… जी कोणी असेल, बस एवढीच इच्छा आहे की तिच्यामुळे आई आणि परी कधी दुरावू नयेत माझ्यापासून… माझ्या घराला नीट बांधून ठेवावं एवढीच इच्छा आहे… बाकी तिचा विचार म्हणजे सकाळी सकाळी कामावर जाताना चुकून दिसणारी एखादी मोग्ऱ्याची कळी… जिच्याकडे बघुन मनाचा एक ठोका अलगद चुकावा… सारं जग शुभ्र वाटावं आणि नकळत एक हसू मनावर उमटाव… बस एवढंच!!!

माझी कळी… कुठे आहेस ग तू…

माझं मलाच खूप गोड हसू आलं…


मी मेघा…

मी डोळे उघडले आणि समोर बघितलं तर दादा खूप गोड हसत होता… नक्कीच वहिनीच्या विचारात असावा… खरंच ती जी कोणी असेल ना, कायम माझ्या दादाला असच सांभाळावं आणि हसत ठेवावं हीच इच्छा आहे…

माझं गाणं अजून चालू होत… का आज एवढं आवडतय हे गाणं… कोणाकडे चाललाय माझं मन… काहीही हा… उगाच मी आणि माझे विचार…

पण खरंच कोण असेल तो… कसा असेल… शी बाई! नकोच तो विचार… नुसते शहारे येतात अंगावर…

मी पुन्हा डोळे मिटून घेतले… आणि झोप लागली…


सकाळी आम्ही पोहोचलो. आजी बाबा वाटच बघत होते.
मी दरवाजा उघडून बाहेर आले, अंशूला नीट खांद्यावर घेऊन कपडे नीट केले. केस विस्कटलेली ती नीट करायला क्लिप सोडली आणि पुन्हा अंशूला गाडीत ठेवले. मागे वळून केस नीट पकडत होते आणि एकदम हवेची झुळूक येऊन पुन्हा तोंडावर आली… वैतागून मी मागे सारली आणि हलकेच समोर बघितलं….

सूर्योदयाच्या त्या कोवळ्या उन्हात झरझर श्रावणसरी बरसव्यात तसे भासले… हृदयाचे ठोके अचानक वाढतायत जाणवलं… अंगावर शहारे भरभर येऊ लागले… त्याच्या हसण्यात जणू मी क्षणभरासाठी चिंब चिंब झाले… त्या सरींचा भार सहन न होऊन मी डोळे मिटून घेतले…




🎭 Series Post

View all