होय,मी किंवडी आहे ( आत्मचरित्र)

Story Of
होय, मी किवडी आहे.


वाऱ्याची झोत आली, की पालापाचोळा त्या वाऱ्या सरशी उडून जातो आणि अवतीभवती उडणाऱ्या पालापाचोळ्याचे कॅमेऱ्यात टिपून घ्यावे असे मनमोहक दृश्य तयार होते. तसेच माझ्या आयुष्यात घडलेल्या अनेक सुख दुःखद घटनांचा माझा एक अविस्मरणीय प्रवास म्हणजे माझे हे आत्मचरित्र!

          मी लग्नाच्या आधीची सविता पाटील आणि आताची सविता रेडेकर. मूळ माहेर आजरा तालुक्यातील कोळींद्रे आणि सध्या राहणार माझे आजोळ गाव नेसरी. सासर महागाव. माझा जन्म 22 मार्च 1988 साली नेसरी मध्ये झाला. घरात दुसरी अपत्य मी, मोठा भाऊ महेश. तो सध्या स्वतः चा बिझनेस सांभाळतो आहे. वडील एकुलते एक असल्याने वडिलोपार्जित नऊ एक्कर जमिनीचे मालक होते. भरपूर जमीन आणि एकुलत्या असलेल्या माझ्या वडिलांना दारूच व्यसन लागलं आणि त्यांनी सर्व जमीन त्या दारूच्या व्यसनात विकून टाकली. नवरा दारुडा असतानाही माझी आई कमल पाटील (आधीची कमलताई महादेव भोसले) एक जिद्दी कर्तुत्वान स्त्री जिने नवऱ्याने दिलेल्या असंख्य वेदना सोसूनही नवऱ्याची साथ सोडली नाही, की पोटच्या लेकरांना आजपर्यंत एक हात लावला नाही. आईच्या डोळ्यातल्या धाकाने आमचं आयुष्य घडवलं. शेतात मोलमजुरी करत करत तिने आम्हा बहीण भावाला शिकवलं. आईच्या दिवसाच्या 30 रुपये मजुरीत आम्हा बहीण भावाचे शिक्षण झाले आहे. सर्व जमीन दारूच्या नशेत घालवल्यावर माझ्या वडिलांचे डोळे उघडले आणि त्यांनी पोटापाण्यासाठी गारेगार विकायला सुरुवात केली. दारूच्या व्यसनामुळे कंगाल झालेले माझे वडील जरी दारूच्या व्यसनात पूर्णपणे बुडाले असले तरी आम्हा मुलावर त्याचं जीवापाड प्रेम आहे.

    
माझं बालपण

माझे बालपण सोपे नव्हते. माझा जन्म झाल्यावर काही दिवसातच माझ्या आईने शेती काम करायला सुरुवात केली. मोठ्या भावाला माझ्याजवळ बसवून ती शेतात काम करायची. मी रडायला लागली, की दूध पाजून गप्प करायची अन् पुन्हा काम सुरू करायची. बांधावर मुलांना झोपवून आई जेंव्हा काम करत असे तेंव्हा तिच्या काळजाला होणाऱ्या वेदना शब्दात सांगणे कठीण आहे. आजूबाजूच्या बायका आईला म्हणायच्या,"कंबा अजुन ओली बाळंतीण आहेस तू आणि दोन चिमुकल्या लेकरांना बांधावर झोपवून काम करत राहते. अग बाळंतीणीने तीन महिने घराबाहेर पडायचं नसतं."
यावर आई बोलायची
"मावशी दोन पोरांची पोट आहेत, त्यात नवरा असा... मी नाही राबली तर खायचं काय आम्ही?"
 

केवळ आणि केवळ मुलाच्या पोटासाठी माझी आई दिवसभर घाम गाळत राहिली. बापाची जरी आईला सोबत असली, तरी कमावत्या धंद्यातील अर्धा हिस्सा दारुसाठी असायचा. माझी आई कोणत्याही गोष्टीचं कधीच दुःख करत बसली नाही. नेटाने ती आजपर्यंत कष्ट करत राहिलीय.

    
मी तीन वर्षाची झाली तरी माझ्या चालण्याचे चिन्ह दिसेनात. असच मी सरकत सरकत पुढे जायचे, पण चालणे काही मला जमेना. आधीच नशीबाची दोरी फुसकी त्यात माझ्या अश्या चालता न येण्याने आईला शेजारच्या बायका टोमणे मारायच्या आणि माझी आई दुःखी होऊन जायची. खुद्द माझी आजीही खूप बोलायची, पण आई एका शब्दाने उलट बोलत नसे. अखेर चौथं वर्ष लागलं आणि न चालणारी मी दुडूदुडु धावू लागले आणि कधी नव्हे ते माझ्या आईच्या चेहऱ्यावर स्मित हास्य झळकले.

शाळेच्या आठवणी


आजूबाजूची मुलं शाळेला जायची आणि मी शाळेला जायचा हट्ट करायचे, पण माझी चालण्याची चिन्ह दिसत नसल्याने आईने मला लवकर शाळेला पाठवलं नाही. अखेर पाचव्या वर्षापासून माझ्या शिक्षणाचा श्री गणेशा झाला अन् मी शाळेत जाऊ लागले. माझ्या सोबत आमच्या शेजारी राहणारी जयश्री नावलगी ही सुद्धा त्याच शाळेत यायची. दोघींना शाळेत पाठवण्यासाठी आमचे बाबा यायचे. कधी चालत जायचो तर कधी बाबांच्या सायकल वरून जायचो. अकरा ते दोन बालवाडी असायची. त्यावेळी शाळेत शिकवण्यापेक्षा कधी एकदा शाळा सुटते आणि बाबा येतोय याकडे माझं लक्ष असायचं. बालवाडीत असतानाची एक आठवण सांगावी वाटते. आम्ही आजरा रोड येथे नवीन घर बांधलेलं, त्याच्या पाठीमागे काजूची भलीमोठी बाग होती आणि आमच्या बालवाडी वर्गाचं वनभोजन त्या बागेत आखले जायचे. असच एकदिवस दुपारी आमचं वनभोजन आमच्या घरच्या पाठीमागे दाखल झाले. सर्वजण जेवणाचा आस्वाद घेण्यात मग्न झालेले. आम्हा दोघींना मात्र घराची ओढ लागलेली. कधी एकदा घरी पळतो अस होऊन गेलेलं. आताशी बारा वाजलेले. आमच्या बाईचं लक्ष नसल्याचं बघून आम्ही दोघींनी आमच्या घरी पलायन केलं. आई घरातच होती. आम्ही आल्याची विचारपूस केली. आम्ही आमच्या बाईच्या सोबत आलो आहोत म्हटल्यावर ती सुद्धा गप्प राहिली आणि तिकडे आमच्या बाई आम्हा दोघींची शोधाशोध करू लागल्या. कारण दोन मुली कमी असल्याचं निदर्शनास आल्याबरोबर बाईंनी पुन्हा सगळ्यांची हजेरी घेतली होती. तिकडे बाई चिंतेत असताना इकडे आम्ही आमच्या आईने दिलेल्या भाजलेल्या शेंगा खाण्यात इतक्या मग्न होतो, की बाई कधी आमच्या मागे उभ्या राहिल्या आमच्या लक्षात आलेच नाही आणि चांगलाच ओरडा बसला. बाई ओरडताच दोघींचा मोठ्यानं भोंगा सुरू झाला. बाई मारतील म्हणून जरा जास्तच म्हणा. रडणे थांबत असूनही ते मुद्दाम थांबवत नव्हतो, कारण सगळ्या मुलांना शाळेत पुन्हा घेऊन जाणार होते आणि दोन वाजता सोडणार होते म्हणून. आम्हाला पुन्हा शाळेत जायचं नव्हते आणि यासाठी हा सगळा रडण्याचा खटाटोप.

       अशीच रडत रडत माझी बालवाडी संपली आणि कन्या विद्या मंदिर या शाळेत मी प्रवेश घेतला. आमचं घर ते शाळा खूप लांबचा पल्ला. तरीही आवडीने आम्ही शाळेत जायचो. पावसाळ्यात छत्री नसायची पोत्याची घोळ करायची बाजारच्या पिशवीत एक पुस्तक , पाटी, पेन्सिल, पट्टी आणि जेवणाचा डबा सावरत आम्ही शाळेला जायचो. माझी गुणवत्ता चौथीपर्यंत अव्वल होती. मला ऐकायला येत नसतानाही मी चार वर्गात गुणांनी सगळ्यात पुढे असायची ही माझी बढाई नाही तर वास्तविक सत्य आहे.

   
  माझ्या आयुष्यात देवाने खुप संकटे दिली आहेत. ऐकायला येत नसताना देखील शिकण्याची माझी जिद्द प्रेरणादायी म्हणावी लागेल. कारण आजपर्यंत मी सगळे छंद जोपासले आहेत. विणकाम, भरतकाम, पेंटिंग, मेक्रॉमी, कुकीज, शिवणकाम आणि आता लेखन हे माझे सगळ्यात आवडते छंद आहेत. हे मी नेहमी जोपासत राहते. नवनवीन शिकायला खूप आवडतं, पण सध्या वेळ भेटत नाही; त्यामुळे जास्त काही शिकण्याच्या मी भानगडीत पडत नाही.
   
हा माझा पाचवीचा किस्सा आहे. त्या वर्षी मी इयत्ता पाचवीमध्ये शिकत होते. शिकण्याची माझी धडपड मला स्वस्थ बसू देत नसे. असेच एक दिवस माझे मधले मामा घरी आले होते. बोलता बोलता त्यांनी आम्हा बहीण भावाची शाळेची प्रगती तपासण्यासाठी एक गणित दिलं. 9×9=? हे गणित आम्हा दोघांना सोडवायचे होते. माझा भाऊ त्या वेळी आठवी मध्ये होता, पण त्याच अस होत की त्याच सगळ लक्ष म्हशी आणि क्रिकेट याकडेच जास्त असायचं. पण तो कविता मस्त करायचा आणि त्याला शाळेतून बक्षिसे देखील मिळाली आहेत. मला एक लेखिका म्हणून घडविण्यात सगळ्यात मोठा वाटा माझ्या भावाचा आहे. मामांनी दिलेलं गणित मी चुटकीसरशी सोडवले 9×9=81 हे माझं उत्तर बघून मामानाही आश्चर्य वाटलं. कारण त्यावेळी माझा भाऊ नऊचा पाढा म्हणत बसला होता आणि मी उत्तर तयार करून मामाला दाखवल आणि मामांनी मला बॉल पेन बक्षीस म्हणून दिला. मामांनी दिलेला पेन माझ्या आयुष्यातील माझं पाहिलं बक्षीस होत. तेही मी माझ्या हुशारीवर मिळवलं होतं. तोच पेन मी इयत्ता नववीपर्यंत वापरला. त्या एका पेनमध्ये रिफील बदलून मी वापरत असलेला पेन बघून माझा वर्ग हसायचा. मी त्याकडे साफ दुर्लक्ष करायचे. त्यात ऐकायला येत नसल्यानं मी कोणाशी जास्त बोलायची नाही. अश्याने वर्ग मला किवडी म्हणून चिडवायचा. खूप दुःख व्हायचं. सर काय शिकवतात तेच मला ऐकायला यायचं नाही आणि समजायचंही नाही. तरीदेखील मी हार मानली नाही. माझी प्रगती मी अव्वल ठेवत राहिले.
   

वाचन हा माझा आवडता छंद. रस्त्यावर पडलेला कागद ही मी आवडीने वाचायचे. माझ्या मोठ्या भावाला लिखाणाची खूप आवड. तो कविता करायचा, एका डायरीत लिहून ती डायरी माझ्यापासून लपवून ठेवायचा. यामागे त्याचा दूष्ट हेतू नव्हता तर मी फाडेल म्हणून तो दडवून ठेवत असे. असेच एकदा भावाने शाळेत असलेल्या काव्य स्पर्धेसाठी कविता लिहीली होती आणि ती कविता लिहिलेली डायरी त्याने भाताच्या पोत्याच्या पाठीमागे लपवून ठेवली होती. माझ्यासारख्या वाचनवेडीला ही वही सापडणार नाही अस होईल का? अजिबात नाही. दादा शाळेला गेल्यावर ती वही बाहेर काढून वाचण्यासाठी पान पालटत असताना नेमक्या स्पर्धेसाठी लिहीलेली कविता फाटली. गुन्हा झाला तो झालाच. ती वही गुपचुप तशीच आहे त्या ठिकाणी ठेऊन दिली. पुढे चार दिवस दादू ती वही बघू नये म्हणून खूप कष्ट घेतले.

खेळण्याचे, रडण्याचे, फिरण्याचे सारे काही माझ्याकडून बहाणे करुन झाले आणि मला नको होत ते एक दिवस घडलच. दादूने ती वही अखेर बाहेर काढलीच. ती वही घेऊन तो स्पर्धेसाठी लिहिली होती ती कविता माझ्यासमोर बसून शोधत होता आणि जेंव्हा त्या कवितेचा पान फाटलेल त्याने बघितलं तेंव्हा मात्र त्याच्या चेहऱ्यावरचा राग पाहून वाघाला ही न घाबरणारी मी आता मात्र लटपटू लागली. रागाने तो ओरडला माझ्यावर तेही पहिल्यांदाच.
 
ती वही तो घेऊन तो शाळेला गेला पण जाता जाता
"ताई माझे लेखन चोरून वाचण्यापेक्षा तू लिहिती हो. असा एक दिवस येईल की तुझे लेखन हे सारे जग वाचेल."
हाच तो संदेश ज्याने माझं आयुष्य पालटून गेलं आणि मी लेखनाकडे वळली, पण लेखन करण्याची आवड अजिबात नसल्याने माझे हात खूप दुखायचे अन् लिहायला कंटाळा करायचे, पण दादाचं वाक्य लिहिण्यासाठी प्रेरणा द्यायचं. असाच माझ्या लेखनाचा चालू झालेला प्रवास आजतागायत सुरूच आहे.

भावाचा अनमोल संदेश


माझ्या मोठ्या भावाने जरी लेखनाची गोडी माझ्या मनात रुजवली असली तरी माझ्या आयुष्यात आलेलं बहिरेपण दूर होणार नव्हत. शाळेत रोज मुलाच्या टीकेला मी तोंड द्यायचे. शाळेत पाय ठेवताच अनेक पोर माझ्याकडे पाहून माझी टिगल करायचे."आर आली बघा ती किवडी वाजवा दवंडी." असा ताल धरून गाणं म्हणायचे आणि सगळ्यांना हसताना बघून मला खूप रडू यायचं. खूप वाईट वाटायचं अन् त्या पोराचा राग ही यायचा. कधी कधी मी घरी रडतच यायची. रात्रभर ते आठवून आठवून रडायची. माझी उशी भिजायची अन् सकाळी मला माझी आई विचारायची,"रात्री रडलीस नव्हं?" आईच्या बोलण्याने तिला मी घट्ट मिठी मारून रडायचे आणि आई चार शब्द सूनवून मला शाळेला पाठवायची. कधी कधी चिडवणे अती व्हायचं अन् शाळेच्या पाठीमागे असलेल्या नारळाच्या झाडाखाली जाऊन मी मुसमुसून रडायचे. असच एक दिवस रडत असताना माझ्या खांद्यावर माझ्या भावाचा प्रेमळ हात पडला अन् मी त्याच्या मिठीत शिरून रडू लागली. माझ्या डोक्यावर हात ठेवून माझा भाऊ मला बोलला.

"नशिबात आलेल्या दु:खाशी दोन हात आपल्या हिमतीनं करावं बाळा. समोरच्याला प्रतिउत्तर देण्यापेक्षा तू असा पराक्रम करून दाखव, की ज्यांनी ज्यांनी तुला आज किवडी म्हणून चिडवले ते उद्या तुला मानाचा मुजरा करतील." हेच भावाचं वाक्य मी परमेश्वराच्या आशिर्वादासमान मानलं आणि आजपर्यंत त्या वाक्याला हृदयात पुजत आली.
आयुष्यातला दुःखाचा खेळ थांबता थांबेना.

 
वयाच अठरा वर्षे ओलांडली अन् आता लग्नाची तयारी घरी सुरू झाली. खूप मोठी मोठी स्थळ आली अन् किवडी मुलगी म्हणून नाक मुरडून निघून गेली. त्या दरम्यान माझ्या बरोबरीच्या सर्व मुलीची लग्न झाली होती, पणं माझच जमता जमत नव्हतं आणि त्याला कारण होत माझं बहिरेपण!
      
ते स्थळ होत महागावचे. तसे गाव जवळच आणि मुलगाही दिसायला थोडा चांगला होता. दोघांच्या वयात एक वर्षाचा फरक. लग्न जमलं अन् मी सौभाग्यवती झाले. अभिमान वाटला मला. आई वडील माझं सुख पाहून कृतज्ञ झाले. गरीब घर जरी असले तरी पहिले नव्याचे नऊ दिवस भुर्रकन उडून गेले. वर्षभरातच दिवस गेले अन् सासरचे एक एक रंग दिसू लागले. एक जीव पोटात वाढत होता अन् इकडे सासरची मंडळी त्रास देत होती. कारण एकच होत, ते म्हणजे मी किवडी होते. लग्न जमवताना सगळ खरं सांगितल असतानाही आणि त्याच्याकडून या गोष्टीचा त्रास केला जाणार नाही अस लिहून घेऊन ही सासरची माणसे छळू लागली होती. भोळ्या भाबड्या मनाची मी आयुष्यातल्या दुःखानी ग्रासलेली असतानाही सासरचा छळ मुकाट्याने सहन करत होते. मारहाण होऊ लागली. शिळे अन्न मला रोज मिळू लागलं. चार चार दिवसाच्या उरलेल्या शिळ्या भाकरी सासू मला खायला देत होती. अन् म्हणत होती यामुळे बाळ सदृढ होत. मी देखील मनात नसतानाही मुकाट्याने खात राहिली. जेंव्हा हाच त्रास माझ्या माहेरी समजला तेंव्हा क्षणाचाही विलंब न करता माझ्या भावाने मला सासरहून माहेरी आणले. पोलिस कंप्लेंट करायला जाणाऱ्या भावाला मीच अडवल, कारण आई बापाने पै पै कष्ट करून माझ्यासाठी ओतला होता. अजूनही माझ्या भावाला नोकरी नव्हती. खाजगी काम करायचा, त्यात मिळणाऱ्या चार पैशात घर सांभाळायचा; त्यामुळे कोर्ट कचेरी आमच्याच्याने परवडणारी नव्हती. त्यातच पोटात वाढणारं बाळ मला काढून टाकायचं नव्हत. या सगळ्या गदारोळात आई आजारी पडू लागली. बीपी वाढू लागला कारण माझ्या सुखाची स्वप्ने पाहिलेल्या माझ्या आईला लेकीचे दुःख सहन होत नव्हते.


        मुलगी झाली काही दिवसांनी. पुन्हा समझोता घडवून मला सासरी पाठवलं, तरीही माझा छळ सुरूच राहिला. त्रास आधीपेक्षाही जास्त होऊ लागला. पुन्हा दिवस गेले अन् पुन्हा शिळ्या भाकरीची शिधा माझ्यासाठी मिळू लागली. स्वयंपाक मीच करायचे पणं कदाचित नशिबात शिळं अन्न लिहिलं असेल; म्हणून मला रोज ते अमृतावानी लागायचं. कुणीतरी माझ्या माहेरी माझी अवस्था सांगितली अन् आता मात्र माझ्या घरच्यांनी सावध पवित्रा घेतला. मला माहेरी आणले. मुलाच्या जन्मानंतर पुन्हा सासरी पाठवण्यासाठी माहेरच्यांनी नकार दिला. आज मुलगी चौदा वर्षांची आणि मुलगा बारा वर्षाचा आहे, पण बाप म्हणून मुलांना बघायला ही तो येत नाही. अनेकांनी घटस्फोट घे असा सल्ला दिला, पण तो आजपर्यंत मी मनावर घेतलेला नाही. यासाठी मला सगळी दोष देतात. एक म्हण आहे,"शहाण्या माणसाने कोर्टाची पायरी चढू नये." ह्याच म्हणीला मी आजपर्यंत मानलं. दुःख तर आयुष्यात खूप आहे. शेजारी पाजारी यांची टीका आजपर्यंत सहन करत आलीय, पण परत कधी कोणाला नाही बोलले. आपले असणारे सर्व नातेगोते अश्या वेळी आपल्यासोबत नाहीत. याचं प्रचंड दुःख होत.


आयुष्यात आतापर्यंत तब्बल तीन वेळा आत्महत्या करायचा प्रयत्न केला. तीन वेळा माझा शंभूराया माझ्यासाठी धाऊन आला. तीन वेळा मरणाच्या दारातून सहिसलामत परत आली. दर सोमवारी माझा कडकडीत उपवास असतो. आजपर्यंत खूप संकटे आली या सगळ्या संकटात माझा महादेव नेहमी माझ्या पाठीशी राहिला.


माझं आयुष्य माझ्या दोन मैत्रिणी


माझ्या आयुष्यात माझी बाल मैत्रीण जयश्री लस्करे. ही माझ्या खाजगी आयुष्यातील सर्वात प्रेमळ सखी. कुणाला माझं मन, माझं दुःख समजल नसेल ते या माझ्या मैत्रिणीला मी न सांगताही कळतं. आजही रोज मेसेज करून मला लिखाणाची प्रेरणा जयश्री न चुकता देत असते. माझी दुसरी शालेय मैत्रीण जयश्री नावलगी ही तर अगदी बालवाडीपासून माझ्या सोबत राहिली आहे अन् आज न चुकता मला साथ देत आहे. अनेक वेळा शाळेतील अन्य मुलींशी माझ्यासाठी ही खूपदा भांडली आहे. माझ्या मनातल सगळ काही फक्त जया सोबतच मी शेअर करते. शाळेत असताना ही माझ्या शेजारीच बसायची. म्हणजे मला ऐकायला येत नव्हत; त्यामुळे सर तोंडाने जे काही सांगतील ते मला समजायचं नाही अशा वेळी जया स्वतः आपण लिहून मला लिहायला सांगत असे आणि तिच्या अशा मदतीनेच मी दहावी केली. खूप खूप उपकार आहेत या दोघींचे माझ्यावर. या दोघींशिवाय मी आज अपूर्ण आहे.


माझा साहित्यातला प्रवास


छंद- रांगोळी, पेंटिंग, विणकाम, भरतकाम, शिवणकाम, फोटोग्राफी, वेगवेगळे खाद्यपदार्थ बनवणे, फिरणे.

माझी आवड- लिखाण करणे, वाचन करणे,वेगवेगळे पदार्थ बनवून त्यावर ताव मारणे.

माझे साहित्य- दोन कादंबऱ्या, दोन नाटके, 200पेक्षा अधिक कविता, 500चारोळ्या (सोशल मीडिया वरच्या सोडून) पाच कथासंग्रह. सध्या एक काव्यसंग्रह, आत्मचरित्र, भावना कादंबरीचं लेखन चालू आहे.

प्रकाशित साहित्य- सध्या तरी नाही(दोन पुस्तके लवकरच प्रकाशित होतील)


माझ्या लेखनाविषयी थोडक्यात

मी पहिल्यांदा शुभमंगल सावधान हे 90 पानी नाटक लिहिले. हे नाटक इतके रोमहर्षक होते, की कितीतरी अवॉर्ड याला मिळाली असती, पणं आईच्या एका चुकीने ती नाटक लिहिलेली वही रद्दीवाल्याकडे गेली. ज्या वेळी मी ती वही शोधत होते तेंव्हा समजलं, की ती वही रद्दितून गेली. त्यावेळी इतका राग आला होता सगळ्यांचा, की ती वही मिळाल्याशिवाय मी जेवणार नाही हा जणू विडाच उचलला. नाईलाजाने पप्पांनी त्या रद्दीवाल्याला शोधले आणि त्याच्याजवळ असलेल्या रद्दीतून माझी वही शोधली, पणं वही जेंव्हा हाती आली तेंव्हा त्यातील 25 पाने फाटलेली दिसली. डोळ्यातून गंगा वाहू लागली पहिल्यांदाच लिहिलेली ही लेखनसंपदा अशी कचऱ्यात गेलेली पाहून खूप दुःख झाले. तब्बल एक महिना मी कोणाशीच बोलली नव्हती. ही माझी लेखनावर असलेली निष्ठा मी कायम राखली.

दुसरे नाटक लिहिले, बिन कामाचं पोर. पहिले नाटक यशस्वी लिहिल्यानंतर दुसरे नाटक 40 पानावर आटोपते घेतले.

तिसरी लेखनसंपदा- हजारातली एक "मधुमती" ही कादंबरी 230 पानी असून एक सुंदर चित्रण मी मांडले आहे.

चौथी लेखनसंपदा- स्री म्हणून जगण्याचा "अभिमान"हा प्रत्येक स्रीचा आभिमान व्यक्त करणारा माझा कथासंग्रह.

पाचवी लेखनसंपदा- "बळीराजाची व्यथा " कर्जबाजारी झालेल्या आणि आत्महत्येला बळी पडलेल्या शेतकऱ्यांची व्यथा मी कथासंग्रहातून समाजासमोर मांडली आहे.

सहावी लेखनसंपदा - तिच्या मनाची चकाकणारी "वीज"अन्यायाला फाटा फोडून ताठ मानेने उभ्या राहिलेल्या महिलांच्या जिद्दीचा वेध अगदी लयबध्दपणे यात मांडला आहे.

सातवी लेखन संपदा- "यातना" पोरकेपण अनुभवत असताना अनेक दुःखी संकटांनी घेरलेल्या एका मुलीची व्यथा आहे.

आठवी लेखन संपदा- "कोळसा " ही कादंबरी अती लाडाने बिघडलेल्या आणि आयुष्याला मुकलेल्या मुलावर आणि त्याच्यावर जीवापाड प्रेम करणाऱ्या माय बापावर आधारित आहे.

माझ्या सर्व वाचक मित्रांना एक गोष्ट मी आज खरोखर सांगत आहे. जी तुमच्यापुढे ही लेखिका, कवयित्री उभी आहे ती एक अपंग आहे. तिला ऐकायला येत नाही. स्व:तच्या जिद्दिवर ती इथपर्यंत पोहचली आहे. शाळेत असताना सर्वजण कीवडी म्हणून मला हाक मारायचे. कधी कधी चिडवायचे, खूप दुःख व्हायचं. अश्यावेळी माझा भाऊ मला म्हणायचा "कोणाशी हुज्जत घालण्यापेक्षा असा पराक्रम करून दाखव की उद्या सगळी जण तुझ्याकडे आदराने पाहतील."
   
आज सर्वजण माझ्या लेखनाच्या प्रतिभेने माझ्याकडे आदराने पाहतात अनेक कार्यक्रमांना आमंत्रित केलं जातं. सन्मान मिळतात अन् माझ्या भावाने दिलेला शब्द खरा ठरल्याचं समाधान वाटतं.

करणारच जग नेहमी
आपली कायमच चेष्टा,
जिद्दीच्या जोरावर दाखवेन
लेखणावरची अतूट निष्ठा!

ईरा व्यासपीठाने खूप खूप प्रेम देऊ केलं आहे. त्याचबरोबर माझ्या वाचक बंधू भगिनींनी माझ्या लेखनाला चांगला प्रतिसाद देऊ केला आहे त्याबद्दल मी सर्वाची मनपूर्वक आभारी आहे.

(सर्वांना एक विनंती आहे. आपल्या देशात माझ्यासारखे अपंग असलेले लोक खूप आहेत त्यांच्यावर न हसता त्याच्या कलेला वाव द्या. जसा आज ईराने मला देऊ केला. अशी मंडळी खूप कमजोर असतात, पण तितकीच जिद्दी असतात. शारीरिक व्यंग असल्याने सतत त्याच्यावर समाजाकडून टीका होत असते. अशा मंडळीच्या पोटापाण्याची अवस्था बिकट असते. त्यांना साथ द्या, त्यांना आधार द्या बस् बाकी काही नको.) आता इथेच थांबते.

©®सविता पाटील रेडेकर
आजरा रोड नेसरी
तालुका - गडहिंग्लज
जिल्हा - कोल्हापूर

🎭 Series Post

View all