व्यक्त होणं महत्त्वाचं!

How To Increase Communication Skill
व्यक्त होणं महत्त्वाचं!

हरवत चाललेला संवाद......

आई! आजी कुठे आहे? मला तिला शाळेतली गंमत सांगायची आहे. ए आजी बस ना! ओविने आजीला तिच्या जवळ बसवलं. आणि शाळेत घडलेली गंमत ऐकविली. दोघी खूप खळखळून हसायला लागल्या. आई सुद्धा त्यांच्यात सामील झाली. तिघी हीमजेत हसायला लागल्या.
असं आनंदी घर, मुलांसाठी किती पोषक आहे बरं!

पण दुर्दैवाने या मोबाईल, टीव्हीमुळे म्हणा, किंवा छोट्या कुटुंब पद्धतीमुळे सर्वांच्या घरात संवाद हरवत चाललेला आहे...

परवा एका कौटुंबिक कार्यक्रमात गेलेले असताना सर्व मोठी मंडळी गप्पागोष्टी करीत होती. परंतु जवळच बसलेला छोटू मात्र मोबाईल मध्ये व्यस्त होता. मोठी मंडळी मुलांच्याच गमती जमती सांगत असताना, हा मुलगा मात्र मोबाईल मध्ये डोके खुपसून गेम खेळत होता.
असं चित्र आजकाल सगळीकडे पाहायला मिळतं. संवादात रुक्ष पणा आल्यामुळे मुले आक्रमक होत आहेत.

पूर्वी आजी आजोबा, काका काकू, अशा संयुक्त कुटुंबात संवादाची देवाण-घेवाण मुक्तपणे व्हायची. त्यामुळे समोरची पिढी मनाने सशक्त व सुदृढ बनायची. कोणत्याही संकटांना सामोरे जाण्या साठीची मनाची तयारी यामुळे होत असे.
परंतु छोट्या कुटुंबाचा परीघ खूप छोटा होत आहे. त्यामुळे संवादाची त्रिज्या सुद्धा आकुंचन पावत आहे.

आजकाल मध्यमवर्गीयांपासून तर श्रीमंतांपर्यंत सर्वांच्या घरातील वस्तूंना सुखाचा पूर आलेला आढळतो. परंतु त्याच घरात राहणारी माणसे मात्र संवादाच्या अभावाने दुःखी होत आहेत

शेजारच्या काकू काल म्हणाल्या, अगं! मुलं, सुना घरी नसल्यामुळे घर कसं खायला उठतं. आम्ही दोघेच असल्यामुळे एकमेकांशी काय आणि किती बोलणार!!
म्हणजे इथेही संवादाचा अभाव.....

बरं, शेजारी शेजारी सुद्धा एकमेकांशी बोलत नाहीत. शेजारच्या घरी काय चालले आहे, कुणाची तब्येत ठीक नाही, काही कळायला मार्ग नसतो. कारण संवादच हरवत चाललेला असतो.

पूर्वी खेड्यात पारावर बसून माणसे गप्पा मारत असत. आणि बायका सुद्धा एका ठिकाणी गोळा होऊन आपली सुखदुःखे एकमेकींना सांगून आपली मने हलकी करत असत.
परंतु तिथेही आता टीव्ही संस्कृतीने आक्रमण केलेले आढळते. कामावरून घरी परतल्यानंतर, घरच्यांना कामावरच्या गोष्टींमध्ये सहभागी करून घेण्यापेक्षा लोक टीव्ही पाहण्यात मग्न असतात.

कुटुंबात राहणारी प्रत्येक व्यक्ती स्वतःच्या कोशात जगु पाहत आहे. त्यामुळे नाती जीर्ण होऊन फाटतील की काय असं वाटायला लागतं.

आजकाल ऑनलाईन खरेदी जास्त वाढलेली दिसून येते. त्यामुळे दुकानात जाऊन खरेदी करताना तेथील माणसांशी होणारा संवाद, वस्तूंच्या भावातील फरक, वस्तूचा टिकाऊपणा सांगताना दुकानदारां ने वस्तू विकताना ची केलेली धडपड, त्याचं संवाद कौशल्य.... हे सर्व पुढच्या पिढीला न समजल्यामुळे पुढच्या पिढीत व्यवहार चातुर्य कसं येईल हाही एक यक्ष प्रश्नच आहे.

या सर्वांतून जर मुक्त व्हायचं असेल, तर प्रत्येक पालकांनी आपलं कुटुंबाचं सर्वदृष्टीने सामर्थ्य वाढविणे गरजेचे आहे.

त्यातूनच सुचलेल्या या कवितेच्या ओळी........

व्यक्त होणं महत्त्वाचं......

गेले आता दिवस मौन राहण्याचे!
आले क्षण आता व्यक्त होण्याचे!!
म्हणत होतो आधी मौनात आहे शक्ती,
पण दिसते सगळीकडे आता खचलेली व्यक्ती!!
व्यक्तीला आता व्यक्त होता आलं पाहिजे,
मनातलं दाटलेलं मळभ, सांगता आलं पाहिजे!
नको आता slogan, silence is Golden! म्हणूया आता talking is well done!!
प्रत्येक गोष्टीत काळ कसा बदलतो आहे,
मनाचा आजार तसाही बळावतो आहे!
मनाच्या वेगाची तुलना प्रकाशाच्या वेगाशी, होईल का....
मनातलं बोलण्यासाठी व्यक्ती आता व्यक्त होतील का!!


छाया राऊत (बर्वे)