गृहिणी अंतिम भाग

Story Of A Housewife
रात्री मीनाताई आणि रमाच्या गप्पा अगदी रंगात आल्या होत्या. मीनाताई माधवरावांच्या बालपणीच्या आठवणी सांगत होत्या.

मीनाताई -" रमा, माधव लहानपणापासूनचं लाडात वाढलेला होता. माझ्या जन्माच्या जवळपास आठ दहा वर्षानंतर माधवचा जन्म झाला. त्यातही मुलगा म्हणून मग बघायलाच नको. पण तरीही तो बाबांच्या कडक शिस्तीत आणि तालमीत तयार झाला. पण आई मात्र त्याचे सगळे हट्ट पुरवायची. त्यामुळे एकीकडे वक्तशीरपणा, काटेकोरपणा तर दुसरीकडे अगदी मनमौजीसारखं वागणं असं त्याचं झालं होतं.

कॉलेजला असताना तो एका मुलीच्या प्रेमात पडला होता. पण बाबांच्या आडमुठेपणामुळे त्याचं ते प्रेम काही बहरू शकलं नाही आणि त्या प्रेमाला माधव विवाहाच्या नात्यात बांधू शकला नाही. त्यावेळी त्या नात्यातून बाहेर यायला बाबांनी माधवला थोडा वेळ द्यायला हवा होता पण त्यांनी तडका-फडकी त्याचं तुझ्याशी लग्नचं लावून दिलं. माधव मनाने या नात्यासाठी तयार नव्हता, त्यामुळेचं कदाचित तुमचं नातं पाहिजे तसं उमलू शकलं नाही.

आणि आईच्या वागणुकीबद्दल म्हणशील तर, तिने तिच्या सासूचा वारसा पुढे चालवला. माझी आजी म्हणजे तुझी आज्जे सासूबाई, फारचं कडक शिस्तीची होती. माझी आई तिच्याच तालमीत तयार झाली आणि तोच नियम तिने तुला लावला.

सुरुवातीला तुमच्या दोघांच्या नात्याबद्दल बाबांना जरा धाकधूक होतीच, पण मीतचा जन्म झाला आणि ते निवांत झाले. त्यावेळी तसंच असायचं ना लग्न होऊन मूल झालं की, यांचं नातं सुरळीत आहे असाचं सगळ्यांचा समज व्हायचा. बाबांचंही अगदी तेच झालं.

पण बाबांच्या अखेरच्या काळात तू केलेली त्यांची सेवा, महामारीच्या वेळी माधवला कोरोना सेंटरला पाठवून, माझी आई आणि तुझ्या मुलांचा खंबीरपणे तू केलेला सांभाळ, यामुळे आम्ही सारेचजण अगदी भारावून गेलो होतो, आणि तुझं कौतुकही वाटतं होतं.

चला आता बरीच रात्र झाली आहे उद्या परत जाईन म्हणते."

रमा -" ताई आजच संध्याकाळी आल्यात आणि उद्या सकाळी जाणार ?"

मीनाताई -"अगं एका वयानंतर माहेरीही बाईला करमत नाही. आपलं घर बरं वाटतं. खूप दिवस झाले होते, माधव आणि तुझी भेट नव्हती, म्हणून माधव आणि तुला भेटायला आले. भेट झाली, मनमोकळ्या गप्पा झाल्या, अजून काय हवं ?"

रमाला मीनाताईंचा स्वभाव माहिती होता. आता तिने कितीही आग्रह केला तरी मीनाताई थांबणार नव्हत्या.

दुसऱ्या दिवशी सकाळी चहा नाश्ता घेऊन मीनाताई त्यांच्या घराकडे परतल्या. गावातच असल्याने 'पुन्हा लवकरच भेटायला येईन', असे आश्वासन त्यांनी जाताना रमा आणि माधवला दिलं.

रमा तिच्या रोजच्या दैनंदिन कामामध्ये व्यस्त होती, पण माधवराव मात्र अस्वस्थ होते. त्यांना मनातून काही तरी रमाशी बोलायचं होतं. त्यांची अस्वस्थ चाळवाचाळव बघून रमानेच त्यांना विचारलं-

रमा -" काय झालं आहे काय बोलायचं आहे ?"


माधवराव -" रमा मागचं सारं विसरू शकत नाहीस का तू ?"

रमा -" आजपर्यंत, एवढ्या वर्षात मी कधीतरी, कुठल्याही गोष्टीची साधी तक्रार केली आहे का तुमच्याकडे? काल सहजच मनातली वेदना ओठावर आली एवढेच."

माधव -" तू मला कधीच माफ करणार नाहीस का ?"

रमा -" असं नका ना बोलू पण ते नवेपणाचे, अलवार प्रेमाचे, अनावर ओढीचे दिवस हातातून सुटून गेले जशी मुठीतून वाळू निसटून जाते अगदी तसेच, म्हणून जरा रुखरुख वाटली एवढेचं. बाकी काही नाही."


माधव -" पण मग आता आपण परत नव्यानं नवी सुरुवात करूया ना."

रमाने केवळ गोड स्मित केलं आणि ती स्वयंपाक घराकडे वळली.

माधवराव -" रमा मी एक गोष्ट विचारु?"

रमा -" हो अगदी निर्धास्तपणे विचारा."

माधव -" तू म्हणालीस की मी सूनबाई वर राधावरही अन्याय केला?"

रमा -" नाही केला का?"

माधव -" मला नाही तसं वाटत."

रमा -" राधा आपल्या जातीची नाही या गोष्टीचा सुरुवातीला तुम्ही किती बाऊ केला होता? तिला घरात घ्यायला तयार नव्हता, मग तिच्या हातचं काही खाणं पिणं तर दूरच. सतत तुम्ही मला टोमणे मारत होता, नशिबाला दोष देत होतात, सतत तुमचं एकचं पालुपद होतं की, मी मुलांवर योग्य असे संस्कार केले नाहीत."

माधव -" अग पण तुला माझे संस्कार, सनातनी विचार माहिती आहेत ना?"

रमा -" पण त्यामुळे मितचं आयुष्य उध्वस्त झालं असतं. आपल्या दोघांच्या सहजीवनावरून मला एक चांगलाच धडा मिळाला होता. प्रेयसी वरचा हक्क संपला की पत्नी म्हणून कोणतीही मुलगी योग्यचं असते. घराचं राज्य कोणीही चालवू शकतं पण मनाच्या राजधानीसाठी प्रेयसीचं हवी असते.' या गोष्टीचा मी उभ्या आयुष्यात पुरेपूर अनुभव घेतला होता म्हणूनच मग…

माधव -" वपुंच ते प्रसिद्ध वाक्य तू अगदी तुझ्या आयुष्यात उतरवलं वाटतं? म्हणूनच कदाचित, कधी नव्हे ते मीतच्या विवाह करिता राधेसाठी हटून बसली होतीस. माझी मनधरणी केली, गयावयाही केली आणि प्रसंगी मला अगदी सोडून जाण्याचा निर्धारही व्यक्त केलास. पण राधाला या घरची सून केल्यानंतरचं तुझ्या जीवात जीव आला आणि नंतर तिला आपल्या घराण्याचं वळणही छान लावलेस. आपल्या चालीरीती, सणवार, परंपरा तिला छान समजून सांगितल्या आणि प्रत्येक गोष्ट तिच्याकडून करूनही घेतलीस."

रमा -" अहो राधा काय किंवा मी काय ? जोशींच्या घरच्या सूनाचं ना ? जोशांचा वारसा आम्हीचं पुढे नेणार ना?"

माधव -" तेही बरोबरचं आहे म्हणा, पण नेहाच्या लग्नाच्या वेळी मात्र तू अगदी अलिप्त होतीस."

रमा -" नेहा तुमचीच लेक. समोरच्याला आपलंस करण्यात पटाईत. शिवाय जावई बापूंना पाहूनचं वाटलं होतं, हा माणूस माझ्या फुलाला अगदी फुलासारखं जपेल."

माधव -" रमा, माझ्या संसारात तू चंदनाचा सुगंध पेरलास, दुधात साखर विरघळावी तशी तू विरघळलीस. तुझ्यामुळे आज मला जीवनाचा अर्थ नव्याने कळतो आहे."

रमा -" पण आता जरा उशीर झालाय. पूर्वीसारखं करणं होत नाही माझ्याच्याने. गात्र थकलीत. मनंही आता पैलतीरी लागले आहे. तीस-पस्तीस वर्षाच्या सहजीवनाचे कदाचित हेच फलित असावं."

माधवराव -"असं म्हणतात आयुष्यात नवीन सुरुवात करायला कधीच उशीर झालेला नसतो. आतापर्यंत जशी माझी साथ दिलीस तशीच पुढेही दे. जे क्षण त्या वेळी आपल्या हातून निसटून गेले ते आपण पुन्हा एकदा जगण्याचा प्रयत्न तर नक्कीच करू शकतो ना ?"

रमाने केवळ संमतीदर्शक मंद स्मित करून मान डोलावली आणि ती स्वयंपाकाच्या तयारीला लागली.

समाप्त


©® राखी भावसार भांडेकर.


🎭 Series Post

View all