गृहिणी भाग चार

Story Of A Housewife
रमा आणि माधवराव त्यांच्या लग्नाच्या दिवसांच्या आठवणींमध्ये रमले होते. रमा आपल्या मनाचा एक एक दुखरा कोपरा माधवरावांना हळुवारपणे उलगडून दाखवत होती. माधवरावही मोठ्या संयमाने तिचं म्हणणं अगदी शांतपणे नाही, पण धीराने ऐकून घेत होते. तेवढ्यात दारावरची बेल वाजली आणि रमा दार उघडायला गेली.

मीनाताई - "बाई, बाई, बाई काय ही गरमी ! रमे किती तो वेळ दरवाजा उघडायला ? केव्हाची दरवाज्याची बेल वाजवते आहे मी. संध्याकाळची झोपली होतीस की काय?"

रमाला काय उत्तर द्यावे ते क्षणभर सुचेना. शेवटी तिने 'या ना! आत या," असं म्हणत मीनाताईंना आत बोलावले.

मीनाताई -" बाई, बाई, बाई काय ते ऊन? आणि केवढा हा उकाडा ? अर्धा जून उलटला पण पावसाचं नाव नाही."

मीनाताईंना दरवाज्यात पाऊल ठेवल्याबरोबर घरात पसरलेल्या हिंगाच्या फोडणीचा सुगंध आला आणि परत त्यांची बडबड सुरू झाली.

मीनाताई -" घरभर हिंगाचा सुगंध काय पसरलाय ? रमे काय बनवलं आहेस ग माधवासाठी ? कैरीच्या लोणच्याचा बेत दिसतो आहे! अगं माधवला बीपी चा त्रास आहे ना ? मग हे असले मसाल्याचे आणि तेलाचे पदार्थ काय करून खाऊ घालतेस ग त्याला ? किती वेळा सांगितलं तुला पण तू काही सुधारणार नाहीस."

रमा -" ताई तुम्ही आधी बसून घ्या ना. मी तुमच्यासाठी कैरीचं पन्हं आणते. आज सकाळीच बनवलं आहे."

मीनाताई -" रमे समोरच्याचं मन कसं राखायचं हे तुझ्याकडून शिकून घ्यायला हवं बाई."

रमाने तिघांसाठीही पन्ह्याचे ग्लास आणले.

मीनाताई -" छान झालं आहे हो पन्हं. रमा तुला जर वाटत असेल की केवळ या पन्ह्यावर तू माझी बोळवण करशील तर तसं अजिबात होणार नाही. आज काल मी तुझं बघते आहे, सून आल्यापासून, आपल्याला इतरही नातेवाईक आहेत याकडे तुझं अजिबातच लक्ष नाही. अशी काय जादू केली आहे ग तुझ्या सूनेने तुझ्यावर?"

रमाला तिच्या नंणदेचा फटकळ पण प्रेमळ स्वभाव माहिती होता. मीनाताई तोंडावर जरी स्पष्ट बोलत असली तरीही तिच्या मनात मात्र काहीच राहत नसे. आपल्या भावजयीने आपली विचारपूस करावी आणि माहेराशी असलेले आपलं नातं टिकून राहावं, एवढीच त्यांची इच्छा असे आणि ते रमाला अगदी चांगलं माहिती होतं.

त्यामुळेचं लग्न झाल्यानंतर मीनाताई आपल्याला सुनेवरून फटकारणार असा अंदाज रमाने आधीच बांधलेला होता.

रमा -" तसंच काही नाही ताई. आजकालच्या या नवीन पोरी. त्यातल्या त्यात मीतच्या लग्नाच्या वेळी आपल्या घरात कसं वातावरण होतं तुम्हाला माहिती आहे ना?"

मीनाताई -" काही बाजू घेऊ नको तुझ्या सूनेची. म्हणे आजकालच्या आधुनिक मुली. त्यांना काय दोन शिंगे जास्त असतात का डोक्यावर ? आपण नाही का केलं सारं? उगीच तिची पाठराखण करू नकोस."

रमा -" तुमचं अगदी बरोबर आहे ताई. पण लग्नाच्या वेळी राधाच्या जातीवरून मीतच्या बाबांनी, म्हणजेच तुमच्या भावाने किती गदारोळ केला होता ? त्यांना हे लग्न अजिबात मान्य नव्हतं. त्यांची समजूत काढता काढता माझ्या नाकी नऊ आले होते."

मीनाताई -" राधा जरी परजातीतली असली तरीही तू माधवाला लग्नाला संमती देण्याकरिता तयार केलंसचं ना? तू कुठे हार मानणारी होतीस?"

रमा -" मीतच्या इच्छेखातर मी घरातल्या सगळ्यांची मन राखून राधाला सून करून आणली. त्यामुळे आपल्या घराण्याच्या परंपरा, रितीरिवाज, सणवार तिला सगळं समजावून सांगणं माझं कर्तव्यच होतं आणि जबाबदारीही. त्यात जर कसूर झाली असती तर…….. ह्या सगळ्या धामधुमीत, सणावाराला तुम्हाला बोलावणं झालं नाही. पूर्वीसारखा तुमचा मानपानही करता आला नाही. त्याकरिता मी तुमची क्षमा मागते."

मीनाताई -" रमे नुसतं क्षमा मागून काही होणार नाही. तुला काय वाटलं? दिवाळं सणाला तू बोलावणार नाहीस आणि आता आंब्याच्या रसाचे आमंत्रण देणार नाहीस तर मी माझं माहेर विसरले होय? सुनेला शिकवण्याच्या सबबीखाली तू तुझी जबाबदारी झटकू शकत नाहीस."

रमा -" तुमचं म्हणणं अगदी बरोबर आहे ताई. माझ्या नेहाच्या आधी हे घर तुमचं माहेर होतं आणि नेहमीच राहील. या घरावर तुमचा पहिला हक्क, मी कधी नाकारला आहे का तो?"

मीनाताई -" अशी बरी नाकारशील ? बरं ते जाऊ दे संध्याकाळी काय करणार आहेस जेवायला ? छान भरल्या वांग्याची भाजी कर. आंब्याचा रस, सोबत कुरडई पापड…."

रमा -" आणि तुमची आवडीची लसूण खोबऱ्याची चटणी! हो ना?"

मीनाताईंनी केवळ स्मित करत मान डोलावली.

रात्री तिघांची जेवण झाली. माधवराव वाचनासाठी म्हणून खोलीत गेले. हॉलमध्ये मीनाताई टीव्ही बघत होत्या, थोड्यावेळाने रमाही स्वयंपाक घरातली आवराआवरी करून मीनाताईंच्या बाजूला घेऊन बसली.

दोघी नणंद-भावजया मग जुन्या आठवणींना उजाळा देऊ लागल्या.


क्रमशः

©® राखी भावसार भांडेकर.


🎭 Series Post

View all