गृहिणी भाग 3

Story Of A Housewife
माधवराव - " ह्या सगळ्या जुन्या गोष्टींचा आता काही उपयोग होणार आहे का? अजून किती दिवस ही जुनी उणी-दुणी तू मनात धरून ठेवशील ?"

रमा -" अगदी खरं बोललात तुम्ही. या जुन्या गोष्टींचा आता काही एक उपयोग नाही. पण त्यावेळी माझ्या मनातले नव्या उमेदीचे, नवसृजनाचे, नव्या संसाराचे सगळे लसलसते कोंब मात्र या सगळ्या गोष्टींनी पार करपून गेले.

तुम्हाला आठवतं ? मला पहिल्यांदा मीतच्या वेळी फारच कडक डोहाळे लागले होते. तेव्हा उलट्यांचा खूप त्रास व्हायचा. अगदी पाणीही पोटात राहत नव्हतं आणि फोडणीच्या वासाने तर मला खूप मळमळायचं. त्यावेळी तुमची आई मला खूप घालून पाडून बोलली होती."


तेव्हा मला सासूबाई म्हणायच्या,"बाई बाई बाई काय ती नाटकं? म्हणे पाणीही पचत नाही. कामाचा कंटाळा आहे म्हणून सगळे बहाणे आहेत हो हे सगळे. स्वयंपाकाचा उरक नाही, हाताला चवही नाही. एकही पदार्थ धड जमत नाही आणि काय तर म्हणे उलट्यांचा त्रास होतो."

रमा -"त्यावेळी तुम्ही अगदी मूग गिळून गप्प बसले होते, पण एका शब्दांने तुम्ही माझी बाजू घेतली नाहीत. त्यावेळी तुम्ही माझी बाजू घेतली नाही त्याचं काही नाही हो, पण कमीत कमी माझी तब्येत नाजूक आहे, रक्तातलं लोह कमी झालं आहे असं तरी तुम्ही तुमच्या आईला समजावून सांगायला हवं होतं. पण तुम्ही काहीच केलं नाही. केवळ बघ्याची भूमिका घेतली. आपलं नशीब बलवत्तर म्हणून मीतची शारीरिक आणि बौद्धिक वाढ चांगली झाली. नाही तर काय झालं असतं कुणास ठाऊक ?"

माधवराव -" पण नेहाच्या वेळी मी तुझी काळजी घेतलीच ना? मीतच्या वेळी जी चूक झाली ती नेहाच्या वेळी दुरुस्त करण्याचा प्रयत्न केला ना?"

रमा -" हो केला, खरंच केला. पण त्यासाठीही मी घरी सगळ्यांची बोलणी खात होती. सासूबाई माझी गाऱ्हाणी फोनवर नणंद बाईंना-मीनाताईंना ऐकवायच्या."

सासुबाई मीनाताईंना माझ्याबद्दल सांगायच्या, " नवऱ्याला अगदी बैल करून ठेवला आहे. साधं डॉक्टर कडे तपासायला जायचं असतं तरी हीला नवरा लागतो. दर महिन्यातच काय सोनोग्राफी करायची असते? गरोदरपणाचे निमित्त करून नवऱ्याकडून सगळे लाड पूर्ण करून घेते आहे." असे टोमणे तुमची आई मला मारतच राहायच्या.

रमा -"एवढेच नव्हे, तर लग्नाच्या चार-पाच वर्षानंतरही तुमची आई, आपल्या लग्नातल्या मानपानावरून, आहेरावरून, लग्नात टीव्ही, फ्रिज, वॉशिंग मशीन दिली नाही म्हणून मला सारखी टोमणे मारत असत आणि काही ना काही सुनावत राहत असत."

"तुमच्या मावसभावाला लग्नात खूप सारं आंधण आणि हुंडा मिळाला होता. तेव्हा तर तुमच्या आईला कारणचं मिळालं मला खरे खोटे ऐकवण्याचं."

सासूबाई म्हणायच्या, " माझा एवढा कर्तबगार मुलगा पण काही हौस-मौज केली नाही हो लग्नात. हुंडा तर दूरची गोष्ट आहे, साधा टीव्ही, फ्रिजही दिला नाही, तुला सांगते मीना, माझ्या मामेभावाच्या सूनेने खूप आंधण आणलं, माझ्या चुलत बहिणीने तिच्या मुलीला खूप आंधण दिलं" असं सासूबाईंचं सततचं बोलणं आणि भुणभुण सुरू असायची.

त्यावर मीनाताई म्हणायच्या,"पण लग्न जमवताना तुम्ही तरी का हो म्हटलं आई ? तेव्हाचं मानपानाचं सगळं ठरवून घ्यायचं होतं ना ?"

त्यावर सासूबाई म्हणायच्या,"आता आम्हाला तरी काय माहिती ग हे लोकं म्हणाले, साधेपणाने लग्न करू तर ते इतके साधेपणाने लग्न करतील ?"

माझ्या दिसण्यावरून, माहेरच्या जेमतेम आर्थिक परिस्थितीवरून त्यांनी खूप बोलून घेतलं मला. पण तुम्हाला हे सगळं माहिती होतं. माझ्या दिसण्याबद्दल तुम्हाला काही तक्रार नव्हती. माहेरच्या सर्वसाधारण परिस्थितीशी तुम्हाला काही घेणं देणं नव्हतं. पण त्यानंतर कित्येक वर्ष आपल्या लग्नाच्या त्या जुन्या गोष्टी सासूबाई उकरून काढतच राहिल्या आणि तुमचे कान भरतच राहिल्या. त्यामुळे आपल्या दोघांमध्ये एक अदृश्य भिंत निर्माण झाली. मी कितीही त्या भिंतीपलीकडे येण्याचा प्रयत्न केला तरी तुम्ही मला तुमच्यापर्यंत येऊ दिलं नाही आणि स्वतःही माझ्यापर्यंत आला नाहीत."

क्रमशः


©® राखी भावसार भांडेकर.


🎭 Series Post

View all