गृहिणी भाग 2

Story Of A Housewife
तर ही कथा आहे रमा नावाच्या एका सर्वसामान्य घरातल्या गृहिणीची. नवऱ्याकडून माफक अपेक्षा असणारी, मुलाबाळांचे करण्यात रमणारी, सासू-सासर्‍यांची मनापासून सेवा करणारी रमा…….पण तिला कशाची तरी खंत आहे. तिच्या मनात काहीतरी बोचतंय बघूया काय आहे ते.

रमा -" एक मुलगी, एक स्त्री जेव्हा लग्न करून आपल्या पतीच्या घरी येते तेव्हा किती स्वप्न, किती आशा, किती उमेदी तिच्या मनात असतात. तिच्या आयुष्याचा सगळ्यात सुंदर क्षण असतो तो म्हणजे लग्न. आपल्या जोडीदाराविषयी अनेक कल्पना, स्वप्ने उराशी कवटाळून ती माहेरचा उंबरा ओलांडून सासरी येते. पण मी ज्यावेळी तुमच्या आयुष्यात, तुमच्या घरात आले, तेव्हा अगदी पहिल्याचं रात्री तुम्ही मला अगदी निक्षुन सांगितलं होतं-

" हे बघ रमा मला माझ्या नोकरीत अनेक ताण असतात, टेन्शन्स असतात. त्यामुळे घरात तुझं आणि इतर कोणाचंही काहीही बिनसलं तरी मला गऱ्हाणी सांगायची नाहीत. माझ्या घरातल्या कुणाविषयी कुठलीही तक्रार मी कधीही ऐकून घेणार नाही."

नवीनचं लग्न झालेली, माझ्यासारखी मध्यमवर्गीय घरातून आलेली नववधू. सासरी रुळताना, सासरचे रीतीरीवाज, परंपरा समजावून घेताना, कधीतरी तिची दमछाक होणारच. त्यात नवेपणाची नवलाई, सहचरची अनामिक ओढ, एकत्र कुटुंबात सगळ्यांचं करताना होणारी ओढाताण, त्यातून तिच्यासाठी हक्काचा विसावा ह्यातआपलं म्हणणारी एकचं व्यक्ती असते तो म्हणजे 'पती'. पण जर त्यानेचं असं सुरक्षित अंतर राखून नात्याची सुरुवात केली तर माझ्यासारखीनं काय करायचं हो ?"

माधवराव -" आणि ते सुरक्षित अंतर आजही आपल्यात आहेचं असं तुला म्हणायचं आहे हो ना?"

रमा -" असंच काही नाही, पण मी ज्या वेगाने, ओढीने तुमच्यावर जीव ओवाळून टाकला, ती ओढ, ते प्रेम, ते आकर्षण ती तगमग मला कधी तुमच्याकडून प्रतिसादासाठी मिळालीच नाही."

माधवराव -" अगं कसं सांगू तुला? म्हणजे माझं प्रेम आहे तुझ्यावर पण…"

रमा -" पण काय? मी तुमचं पहिलं प्रेम कधीच नव्हते असंच ना?"

माधवराव -"रमाss!" माधवच्या आवाजात राग आणि चीड होती.

रमा -" मला वाटलंच होतं मी असं म्हटल्यावर तुम्ही चिडणार. पण हेचं खरं आहे ना?" रमा शक्य तेवढा आपला आवाज सौम्य ठेवत म्हणाली.

माधवराव -" म्हणजे कदाचित…."

रमा -" एक सांगू का? आम्हा स्त्रियांना एक उपजत देणगी असते. आम्हाला लगेच कळतं समोरचा आमच्याकडे कुठल्या उद्देशाने येतो आहे ते. समोरच्याच्या स्पर्शातून, जोडीदाराच्या चेहऱ्यावरील हाव-भावातून ह्या गोष्टी आम्ही स्त्रिया अगदी पटापटा टिपत असतो की जोडीदाराला आमच्याबद्दल किती ओढ आहे ते. तुमच्या सहवासात मोहरणारी मी, पण तुम्ही?...... तुम्ही मात्र विवाहाचा सोपस्कार किंवा गरज म्हणूनचं माझ्या जवळ आलात. प्रेम म्हणून नाही. किती बोचायची ती गोष्ट मला! पण आता मात्र काही वाटत नाही.

नव्या कोऱ्या साडीचा कडकपणा ती वापरून वापरून मऊ होते ना तसं माझं झालंय. खूप खूप प्रेम केलं तुमच्यावर म्हणूनचं कधी साथ नाही सोडली तुमची.

माधवराव -" रमा तू म्हणतेस ते कदाचित काही अंशी बरोबर असेलही पण तू माझ्या आयुष्यात आल्यावर मी इतर कोणाचाही कधी विचार सुद्धा केला नाही."

रमा -" आणि मला कधी मनापासून स्वीकारलंही नाही."

माधवराव -" तुला नक्की काय म्हणायचं आहे रमा? सिनेमा नाटक यासारखं सगळे काम धाम सोडून मी तुझ्याभोवती गोंडा गोळायला हवा होता का ? की तुझ्यासाठी आकाशातले चंद्र तारे तोडून आणायला हवे होते ? किंवा तू माझी पत्नी आहेस म्हणून मी माझे कर्तव्य आणि आई-वडिलांना विसरून जायला हवं होतं?"


रमा -" नाही अजिबात नाही मला असलं माझ्या आयुष्यात काहीही नको होतं. अपेक्षा फक्त एवढीच होती की दिवसभर घरात काम करून दमल्यावर रात्री तुमच्याकडून आपुलकीचे दोन शब्द यावेत, तू दमलीस का फार करते माझ्या घरासाठी आणि घरातल्या लोकांसाठी एवढ्या तुमच्या दोन वाक्याने मला जगण्याची नवी उभारी मिळाली असती. पण तुमच्यासाठी आणि तुमच्या आई-वडिलांसाठी मी बिन पैशाची हक्काची मोलकरीण होते. कारण मी पैसा कमवत नव्हते, आई-वडिलांकडून हुंडा ही घेऊन आले नव्हते. त्यामुळे दोन वेळेला खाऊ घालण्याचा पुरेपूर परतावा तुम्हाला माझ्याकडून हवा होता."

माधवराव -" रमा तू माझ्यावर हे भलते असेल ते आरोप करू शकत नाहीस."

रमा -"भलते सलते आरोप नाही हो! वास्तव होतं ते माझ्या आयुष्याचं. तुम्ही सांगा तुमचे मामा-मामी, मावशी-काका, आत्या, चुलते-चुलत्या यायच्या तेव्हा कुणीही मला काडीचीही मदत करत नसे. सकाळी पाचला उठलेली मी रात्री अकरा वाजता अंथरुणात गेली तरी कोणी साधं मला पाण्यालाही विचारत नसे. वरून आईंचे टोमणे असत, 'स्वतःच्याच घरात कशाला हवं हीला जेवणाचं आमंत्रण?'

दुपारी सगळ्यात शेवटी जेवताना, माझ्यासाठी भाजी कधीच नसे. मग मी आपली तिखट-तेल पोळी किंवा वरण पोळीत खाई किंवा दोन ग्लास पाणी पिऊन निमूटपणे पुढच्या कामाला लागे."


पुढच्या भागात बघूया माधवरावांना त्यांच्या चुकीची जाणीव होते की नाही तोपर्यंत हा भाग कसा वाटला नक्की कमेंट करा.


©® राखी भावसार भांडेकर.


🎭 Series Post

View all