गृहिणी भाग एक

Story Of A Housewife
आज रमाच्या स्वयंपाक घरातून हिंगाच्या फोडणीचा, भाजलेल्या सोपेचा, त्याबरोबरचं इतर मसाल्यांचा सुगंध घरभर पसरलेला होता.

रमा अगदी निगुतीने, हलक्या हाताने लोणच्यासाठी लागणारा एक, एक मसाल्याचा पदार्थ कढईत मंद आचेवर, हलक्या हाताने हळुवार भाजून घेत होती. भाजलेल्या लवंगा, मिरे, तेलात तडतडणारी मोहरी, मेथी दाणे, हिंग यांच्या त्या चटकदार सुगंधाने एखाद्याच्या जिभेला पाणी सुटले नसते तरच नवल!

रमा कैरीचं लोणचं बनवण्यात अगदी तल्लीन झाली होती. कढईत एक, एक जिन्नस टाकताना तिला मीत आणि नेहाची प्रकर्षाने आठवण येत होती.

मीत आणि नेहा लहानपणी अगदी एप्रिल महिन्यातच रमाला कैरीचं लोणचं घालण्यासाठी तगादा लावत. मितला भाजी खाण्याचा फार कंटाळा यायचा. त्याला कुठलीच भाजी आवडत नसे.

मीत -" मम्मा मला तू रोज रोज भाजी पोळी का देते ? मला ग्रीन व्हेजीज नाही आवडत."

रमा -" मीत आपल्याला ग्रीन व्हेजीजने शक्ती मिळते, त्यात विटामिन्स असतात त्यामुळे रोज ग्रीन व्हेजीज खायलाच हव्यात."

मग रमा भाजी पोळीच्या प्रत्येक घासाबरोबर मितला एक बोट कैरीच्या लोणच्याचे चाटवी आणि मग भेंडी, चवळी शेंग, पालकाची डाळ भाजी, लाल माठाची भाजी आणि इतर सगळ्या भाज्या मीत कैरीच्या लोणच्याबरोबर अगदी मिटक्या मारत खाई.


त्या विरुद्ध नेहा. नेहा बाबांची लाडकी म्हणूनच तिचे सगळे हट्ट बाबा अगदी मनापासून पूर्ण करत पण जेवणाच्या बाबतीत नाही. घरी सगळ्या भाज्या न कुरकुरता खाणाऱ्या नेहाला शाळेच्या डब्यात मात्र कैरीचं लोणचं आणि पोळीचं लागे.

नेहा -" मम्मा ! मी रोज घरी सगळ्या भाज्या खाते ना! मग मला स्कूलच्या टिफिनमध्ये तू लोणचं पोळीचं देत जा. मला नाही आवडत स्कूलमध्ये भाजी पोळी न्यायला." तोंडाचा चंबू करून नेहा रमाला गळ घाली.

कढईतल्या गरम तेलात मोहरी दाणे, हिंग, मीठ, हळद घालताना रमा तिच्या मुलांच्या मीत आणि नेहाच्या बालपणीच्या आठवणीत अगदी रंगून गेली होती. मोहरी तडतडली, हिंगाचा जिभेला पाणी आणणारा सुवास घरभर पसरला, सोप, मीठ, मेथी दाणे यांनी तेलात आपापली जागा घेतली. तेल थोडं निवल्यावर रमाने त्यात लाल चुटूक तिखट घातलं, मोहरीची डाळ तीही तेलात विसावायला आसुसली होती. एकंदरीतच कैरीच्या लोणच्याचा सगळा जमानिमा तयार झाला. रमाने कैरीच्या फोडी आधीच हळद लावून सुकायला ठेवल्या होत्या. तिनं मनाशी विचार केला की, 'तेल थोडं थंड झालं की कैरीच्या फोडी, तयार केलेल्या मसाल्यात घोळवून, त्यात वरून तेल टाकलं की लोणचं तयार !' तेवढ्यात माधवरामांचा आवाज आला.

माधवराव -" आज काय विशेष बनतय ? हिंगाचा सुगंध घरभर पसरला आहे. लोणच्याची तयारी वाटतं ?"

रमा -" हो आता जून संपत आला आहे ना ? लोणचं तर घातलचं पाहिजे. वर्षभराचा जिन्नस तो न करून कसा चालेल ?"

माधव -" अग पण आजकाल सगळं बाजारात विकत मिळतं,मग सगळं घरी करण्याचा तुझा अट्टाहास का ?"

रमा -" मान्य सर्व मिळतं विकत पण घरच्या, आईच्या हाताची चव मिळते का हो विकत? आणि आपल्या मुला-बाळांसाठी, लेकी-सुनांसाठी करण्यातला आनंद तो तर कशातच मोजला जाऊ शकत नाही."

माधव -" तेही आहेच म्हणा. आजकालच्या जगात सासू-सूनांचं अजिबात पटत नसताना, तुझी सून आणि तू म्हणजे दुधात विरघळलेली साखरचं जणू."

रमा -" तर तर, जावईबापूंचं आणि तुमचे प्रत्येक गोष्टीत एकमत असतं त्याचं काय?"

माधवराव -" रमा स्वतःची लेक अशी परक्याला देताना मनाला किती त्रास होतो? स्वतःची स्वतःला समजूत घालावी लागते. आपला हृदयाचा एखादा तुकडा जणू समोरच्याला आपण तोडून देत असतो. मनाला हजार वेळा समजावून सांगावं लागतं, बाबा रे इतकी वर्ष जे फुल तू तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलं ते आता दुसऱ्याच्या दारात जाणार आहे. मनाच्या वेदना, असाह्यता आम्ही पुरुष शब्दांत नाही ग मांडू शकत."

रमा -"अगदी खरं आहे हो तुमचं पण एक प्रश्न विचारू ? म्हणजे तुम्हाला राग येणार नसेल तर."

माधवराव -" रमा आताशा मला तुझ्या कुठल्याचं गोष्टीचा राग म्हणून येत नाही. विचार काय विचारायचे ते, बिनधास्त विचार."

रमा -" आपल्या नेहाचं लग्न ठरलं तेव्हा तुम्ही फार हळवे झाला होता ना ?"

माधवने केवळ होकारार्थी मान हलवली.

रमा -" मग माझ्यावर आणि राधावर -मितच्या बायकोवर एवढा अन्याय का केलात?"

माधवराव -" म्हणजे? मी समजलो नाही."

रमा -" त्यात न समजण्यासारखं काय आहे?"

माधवराव -" अग आता किती कोड्यात बोलशील? सांग ना तुला काय टोचतंय? एवढ्या वर्षाच्या आपल्या सहजीवनात कधीच मनमोकळे तू बोलली नाहीस. आज तरी बोलून टाक सांगून टाक, तुला काय वाटतंय ते."

क्रमशः

©® राखी भावसार भांडेकर.🎭 Series Post

View all