गृहिणी

About Importance Of House Wife

" अगं अनिता, हातपाय धुऊन घे. मी पटकन तुला जेवायला वाढते."

कॉलेजातून घरी आलेल्या अनिताला तिच्या आईने सांगितले.

अनिता - "आई, मी घेते गं माझ्या हाताने. तू आराम कर ,किती काम करत असते दिवसभर.. आणि काळजी ही घेते सर्वांची.."

अनिताची आई - " अगं कितीही काम केले .. कितीही थकले तरी आईला आपल्या मुलांची काळजी असतेचं. मुलांच्या सुखात आनंदात ती आपले सर्व कष्ट, दुःख विसरून जाते... तुला आता हे कळायचे नाही.. तुझे जेव्हा लग्न होईल ,संसाराची जबाबदारी येईल आणि तु आई झाली की तेव्हा तू पण इतकीच काळजी करशील आपल्या मुलांची."


अनिता - " आई,मी माझ्या हाताने घेते ना जेवण. तुला त्रास द्यायला मला नाही आवडत. तू सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत सारखी कामच करीत असते.

सकाळी सर्वांच्या लवकर उठते. सर्वांसाठी चहा,नाश्ता तयार करते. बाबांचा,माझा व दादाचा टिफिन बनवते. बाबा ऑफिसला जाताना आणि दादा कॉलेजला जाताना त्यांच्या सर्व वस्तू व्यवस्थित तयार ठेवते. आजी- आजोबांची सेवा करते.
किराणा, भाजीपाला, दळण अशी सर्व कामे करते.
आजीला घरात कामाला बाई आवडत नाही म्हणून घरातील सर्व कामे ही तू करते.

सकाळचा नाश्ता,दुपारचे आणि रात्रीचे जेवण आणि त्यात ही प्रत्येकाच्या आवडी निवडी सांभाळून करत असते.
आजी आजोबांचे आजारपण आणि वयानुसार पथ्यपाणी असते म्हणून त्यांच्यासाठी वेगळे पदार्थ.

घरातील साफसफाई, घरात काय संपले आणि काय आणायचे याकडे लक्ष ठेवणे, कुठे जायचे असले तर तयारी करण्यापासून आणि आल्यानंतरचा पसारा आवरणे.
कोणी आजारी पडले तर त्यांची सेवा.
आणि स्वतः आजारी पडली तर स्वतः च्या तब्येतीपेक्षा तुला सर्वांची चिंता असते.

घरात येणाऱ्या,जाणाऱ्या पाहुण्यांचा पाहुणचार!
केवढे काम करते गं तू ?
मी तर एवढे काम करणारच नाही बाई....मुळात मला लग्नच करायचे नाही. लग्न करून गृहिणी नाही बनायचे ...तुझ्यासारखे..
मी मस्त नोकरी करणार. घरात सर्व कामांना बाई लावणार आणि माझे आयुष्य छान एन्जॉय करणार. "

अनिताचे हे सर्व बोलणे तिच्या आजी ऐकत होत्या.
आणि आई, मुलीच्या बोलण्यात सहभागी होतात.

आजी - " अनिता,तुझी आई किती काम करते हे तु पाहते ,तुला आईबद्दल कळवळ वाटते.पण तुझ्या आईला तर माझ्या सारखे काही काम नाही आता.
मी तर खुप काम केले आहे गं..

आमचे घर सिमेंट चे नव्हते. मातीचे होते.त्यामुळे लिंपण,सारवण करावं लागायचं . स्वयंपाकाचा गॅस वगैरे नव्हता. चुलीवर किंवा स्टोव्हवर स्वयंपाक करायचे. आतासारखे घरातच नळाचे पाणी नव्हते. बाहेर जाऊन विहीरीचे पाणी आणावे लागायचे.मिक्सर आणि आतासारख्या सर्व गोष्टींसाठी गिरणी नव्हती. मसाला,तिखट हळद अशा गोष्टी घरीच करीत होते.
या सर्व गोष्टी करण्यासाठी वेळही खुप जायचा आणि कष्टही खूप पडायचे.

तुझ्या आजोबांची शेती होती. आजोबा शेताचे कामे करायचे. मलाही घरची सर्व कामे करून शेतावर जावे लागायचे.
घरातील व्यक्तिंबरोबर गुराढोरांचीही काळजी घ्यावी लागायची.

दिवस कोठे उगवायचा आणि कोठे मावळायचा हे समजायचे नाही.

कष्ट करता करता कधी लहानाची मोठी झाली आणि कधी आयुष्य संपत चालले हे सुद्धा कळाले नाही.

स्त्रीचा जन्म काम करण्यासाठीच असतो आणि काम करता करताच संपतो.

आणि तू काय म्हणाली तुला लग्न करायचे नाही.
पण तुला सांगते लग्न हे करावंच लागतं आणि तू ही करशील बघं.."

अनिता - "आजी,तू असो की आई किंवा अजून कोणी.
प्रत्येक स्त्री ही आपल्या घरासाठी, संसारासाठी राबत असते. कुठलीही अपेक्षा न ठेवता.
तिच्या मनाचा,भावनांचा कोणीही विचार करीत नाही. ती काही यंत्र नसते फक्त काम करणारे. ती ही एक जिंवत प्राणीच असते. तिलाही मन असते,भावना असतात. तिलाही स्वतः साठी आनंदाने जगावेसे वाटते पण कामाच्या ताणतणावात आणि इतरांच्या सुखाचा विचार करण्यात ती स्वतः साठी जगणंच विसरून जाते. याचेच मला खूप वाईट वाटते.


आजी,तु म्हणते ते बरोबर आहे. पूर्वी आतासारख्या सुखसोयी नव्हत्या. पण स्त्रीच्या जबाबदाऱ्या कमी न होता अधिक वाढल्या आहेत. आता प्रत्येक कामांसाठी मशीन आहेत पण तरीही गृहिणीची धावपळ सुरूच आहे ना?
जबाबदाऱ्या पूर्वीही होत्या,परंतु त्यांचा आवाका मर्यादित होता. पण आज जबाबदारींचा आवाका वाढतच चालला आहे. आज स्त्रिया घरातील जबाबदाऱ्यांबरोबर बाहेरच्या जबाबदाऱ्या सांभाळत आहे.
मुलांचा अभ्यास असो,नवऱ्याचा व्यवसाय असो ती आपल्या परीने मदत करीत असते आणि आपले कामही करीतच असते.

आजी,आई तुमच्याशी या विषयावर बोलून बरे वाटले.आता मी थोडा आराम करते आणि आराम झाल्यानंतर मला अभ्यास करायचा आहे."

असे बोलून अनिता आराम करायला तिच्या रूममध्ये गेली.

आजी व आई तिचे गृहिणीबद्दलचे विचार ऐकून त्या विचार करू लागल्या आणि आपआपल्या कामात गुंतून गेल्या.



अनिताचे कॉलेजचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर घरात तिच्या लग्नाची तयारी सुरू झाली. अनिता लग्नासाठी तयारच नव्हती. तिला चांगली नोकरीही मिळालेली होती.त्यामुळे नोकरी करून तिला तिचे लाईफ एन्जॉय करायचे होते.

पण आई- बाबा तिला सांगतात की फक्त मुलगा पाहून घे. नाही आवडला तर नाही करायचे लगेच लग्न...

मग अनिता आईबाबांच्या सांगितल्याप्रमाणे बघण्याच्या कार्यक्रमाला तयार झाली. लग्नाला तयार नसलेली अनिता विनय ला पाहताच त्याच्या प्रेमातच पडते. विनय दिसायला तर चांगलाच असतो पण त्याचा मनमोकळा स्वभाव आणि त्याचे विचार अनिताला जास्त आवडले आणि ती त्याच्या बरोबर लग्न करण्यास तयार झाली.



ठरल्याप्रमाणे लग्नसोहळा छान पार पडला.माहेरी जावयाचे कौतुक तर सासरी नव्या सूनेचे कौतुक. लग्नानंतरचे सर्व विधी,पूजा व्यवस्थित झाल्यावर नवीन जोडपे हनिमूनचा आनंद घेऊन परतले.

नव्या नवलाईचे दिवस संपले आणि रोजचे रूटीन सुरु झाले.

विनयचे वडील गावातील शाळेत शिक्षक होते. अजून काही वर्षे नोकरी होती. विनय नोकरीसाठी शहरात राहत होता.
लग्नासाठी काढलेली रजा संपताच तो आणि अनिता त्याने शहरात घेऊन ठेवलेल्या घरात राहायला गेले.

अनितानेही अगोदरची नोकरी सोडली आणि नवी नोकरी शोधली.

अनिता आणि विनयचा नवा संसार सुरू झाला. संसार,नवी नोकरी यात अनिता रमून गेली . घरातील कामे करून तिला नोकरी करणे जमायला लागले. विनयचीही तिला मदत होत होती.
अनिता आपल्या घराला आवडीच्या वस्तू आणून सजवू लागली.

तिला अगोदरपासूनच खाण्याची आवड होती त्यामुळे आईच्या हाताखाली तिने बरेचसे पदार्थ शिकून घेतले होते .
आता ती ते सर्व पदार्थ आणि अजून नवनवीन पदार्थ आवडीने बनवून विनयला खाऊ घालू लागली.विनयलाही तिने बनविलेला पदार्थ आवडत होता आणि तो आनंदाने खात होता.

सुट्टीच्या दिवशी बाहेर फिरायला जाणे,बाहेरच खाणेपिणे ,मौजमजा असे छान सुरू होते.


लग्नाला नको म्हणणारी अनिता तिच्या संसारात,विनयच्या सहवासात छान गुंतली होती. आता तिची जबाबदारी अजून वाढणार होती. तिला आई होण्याची चाहूल लागली होती.


शक्य होईल तितके दिवस तिने कामावर जाण्याचे ठरविले आणि नंतर रजा घेण्याचे ठरविले. हे सर्व सांभाळताना तिला त्रास होत होता. पण ती आनंदाने सर्व करीत होती.

आणि एके दिवशी ती अन्वीची आई झाली. गरोदरपणातील आणि बाळाला जन्म देताना होणारा त्रास सहन करताना तिला आपल्या आईची क्षणोक्षणी आठवण येत होती.
अन्वीचे कौतुक करण्यात ,काळजी घेण्यात दिवस किती पटकन निघून गेले हे अनिताला समजले ही नाही. तिची रजा संपली होती. नोकरीवर जायचे होते .
पण अन्वीला सांभाळायला घरी कोणीतरी हवे होते तरच ती नोकरी करणार होती.
विनयच्या बाबांच्या नोकरीमुळे सासूबाई येऊ शकत नव्हत्या. तिकडे माहेरी दादाच्या लग्नाची तयारी सुरु होती . त्यामुळे आईला ही येणे शक्य नव्हते. पाळणाघरात अन्वीला ठेवायला सासूबाई तयार नव्हत्या.
शेवटी अनिताने नोकरी सोडली आणि पूर्ण वेळ अन्वीसाठी,विनयसाठी,आपल्या संसारासाठी देवू लागली.
घरात जरी काही कामांना बाई होती तरी बाकीचे इतर सर्व कामे, अन्वीची काळजी घेणे,विनयची ऑफिसला जाण्याच्या तयारीपासून ते संध्याकाळी तो येण्याची वाट बघणे,त्याच्या आवडीचे जेवण बनविणे हे सर्व कामे न थकता ,न कंटाळता आवडीने,आनंदाने करु लागली.

तिच्या आईचा फोन आल्यावर आईने विचारले की ,अनिता कशी आहेस? काय करते आहेस ?
अनिताचे उत्तर असायचे - छान आहे,काही नाही आपली रोजची कामे...

तिचे हे उत्तर ऐकून आईला हसू यायचे. 'लग्नाच्या अगोदरची अनिता किती बदलली होती. तिचे विचार, तिचा स्वभाव, तिचे जगणे. सर्वच काही बदलले होते.

आपल्या आईची काळजी करणारी अनिता आता अन्वीची आई झाली आहे आणि आपल्या सारखीच एक गृहिणी झाली आहे.'

असे अनिताच्या आईला वाटायचे.


काही वर्षांनी विनयचे बाबा नोकरीतून निवृत्त झाल्यानंतर आई -बाबा,विनय,अनिता,
अन्वी हे सर्व एकत्र राहू लागले.

अन्वीला सांभाळायला सासूबाई, बाबा आहेत त्यामुळे आपण पुन्हा नोकरी करावी असे अनिताला वाटू लागले. तिने हा विचार घरात बोलून दाखविला आणि सर्वांची संमती मिळताच नवीन नोकरीला सुरुवात ही केली.

सासू म्हणजे सारख्या सूचना अशा सासूबाई ही नव्हत्या आणि सून म्हणजे सूचना नको अशी सूनबाई ही नव्हती. त्यामुळे दोघांचे छान जमत होते.

सासूबाई शक्य होईल तेवढे घरातील काम करून घेत होत्या. आणि अनिताही घरातील सर्व जबाबदारी पूर्ण करून नोकरी करत होती.विनयचे बाबा, विनय हे ही थोडा हातभार लावत होते.

अनिता जेव्हा कामावरून थकून आल्यावर घरातील कामे करायची. थकून जायची तेव्हा तिची अन्वी तिला म्हणायची ,' आई,किती काम करतेस गं ...आमची सर्वांची किती काळजी करते तू..."


तिचे हे बोलणे ऐकून तिला आपले लग्नाअगोदरचे दिवस आठवायचे. आपण ही आईला असेच म्हणायचो..

आणि आपणही आज आपल्या आईप्रमाणे एक गृहिणी झालो आहोत या विचाराने तिचे मन विचार करू लागले.


'आपल्या इच्छा- आकांक्षा बाजूला सारुन कुटुंबातील व्यक्तींच्या इच्छांना जास्त महत्त्व देणारी स्त्री म्हणजेच गृहिणी!
गृहिणी हे स्त्रीचं कधीही न बदलणार रूप आहे.


दिवसभर काम करून विश्रांतीसाठी रात्र होते. पण रात्री झोपताना ही घरातील सर्वांची काळजी,उद्याच्या कामांची यादी डोक्यात असतेच.

तिलाही वाटते सकाळी मॉर्निंग वॉकला जावे,योगासने करावे. मस्त पैंकी चहा पिता पिता पेपर वाचावा. पण सकाळी तर तिला क्षणाचीही उसंत नसते. लवकर उठून आंघोळ, देवपूजा करुन नाश्ता, चहा,सर्वांचे टिफिन यातच इतका वेळ जातो की स्वतः साठी वेळच मिळत नाही. सकाळची कामे झाली की दुपारचे जेवण आणि इतर कामे. दुपारी सर्व कामे झाल्यानंतर थोडा वेळ मिळाला तर ...
कोणीतरी पाहुणा नाही तर कोणीतरी ओळखीचे येणार. कोणाचा फोन तरी येणार. स्वतःच्या आवडीचे काही करायला कधी दुपारचा वेळ मिळाला तरी ते करायला जमत नाही.
काही ना काही काम आठवतेच आणि ते काम पूर्ण केल्याशिवाय शांतता मिळत नाही.

रम्य संध्याकाळी कोठेतरी मैत्रीणीबरोबर किंवा नवऱ्याबरोबर फिरायला गेली तरी नुसते फिरणे नसतेच. कधी भाजी तर कधी घरातले काही संपलेले असते ते आणणे होते. कुठे काही चांगले दिसले तर स्वतः साठी न घेता घरातील कोणाला तरी आवडते म्हणून घेतले जाते.

म्हणजे तिच्या मनात स्वतः पेक्षा घराचे,घरातील प्रियजनांचेच विचार जास्त असतात.

स्त्री शिकलेली असो वा अशिक्षित, खेड्यात राहणारी असो की शहरात राहणारी ,नोकरी करणारी असो की पुर्ण वेळ घरची जबाबदारी सांभाळणारी ...
स्त्री ही एक गृहिणी म्हणून काम करीत असते.'


या विचाराने अनिताने तिच्यातील आणि सर्व गृहिणींना मनापासून सलाम केला.

आणि आपणही एक गृहिणी आहोत याचा अभिमान वाटू लागला.


इतरांच्या सुखातच
आपले सुख मानी
घराला घरपण
आणते तू गृहिणी
तुझा सन्मान होतो
फक्त महिला दिनी
तुझ्या गुणांचे व्हावे
कौतुक क्षणोक्षणी


समाप्त
नलिनी बहाळकर