घर असावे घरासारखे... भाग ६ (अंतिम)

आणि आमचं का? तुम्ही माफी मागून आमचं बालपण परत येणार आहे का? जेव्हा जेव्हा आम्हाला तुमची गरज होती

मागील भागात आपण बघितले…



"माधव भाऊ. थांबा असे जाऊ नका. दुरावलेल्या नात्यात संवाद साधायचा असेल, तर आधी संवाद साधला पाहिजे. प्रत्येकाची एक बाजू असते सगळ्यांनी ती ऐकली पाहिजे तेव्हाच समज गैरसमज दूर होतील आणि समस्येवर तोडगा निघेल. आज तुम्ही इथून गेलात तर परत अशी संधी भविष्यात मिळेलच असं नाही." राधा माधवला बोलली. तिच्या बोलण्याने माधव थांबला आणि परत येऊन बसला.



"मुकुंद देखील हवा होता आज इथे. तुम्हा तिघांचा गुन्हेगार आहे मी." प्रकाशराव दोघांसमोर हात जोडत बोलले.


आता पुढे…



"म्हणायला आमचा वाडा मोठा पण त्यात प्रेम कमीच होते. माझे वडील प्रत्येक गोष्ट पैशात तोलत. खरा तर वर नुसता दिखावा आणि आतून पोकळ वासा अशी परिस्थिती होती वडिलांची. म्हणून भावांची जबाबदारी माझ्यावर सोपवून मोकळे झाले.
आलेल्या अनुभवातून पैसा कमावण्याची इतकी माझी हाव वाढली होती की, त्यासाठी मी मीनाक्षीवर देखील दबाव टाकत होतो. मला वाटायचं की, जर दोघांनी नोकरी केली तर, अजून जास्त कमाई होईल. मीनाक्षी मात्र ह्यासाठी तयार नव्हती. मुलांचे हाल होतील, म्हणून तिने नोकरी करण्यास स्पष्ट नकार दिला. ह्या गोष्टीचा त्रास मला होत होता. कारण मला अजून पैसे हवे होते ते पण कमी वेळात. मीनाक्षी नोकरी करत नाही म्हणून मी तिचा राग राग करू लागलो. घरात मुलांना देखील मी वेळ देत नव्हतो. मला दिवस रात्र फक्त पैसा आणि उन्नती दिसत होती. मला माझ्या भावांपेक्षा जास्तं श्रीमंत व्हायचं होतं. त्यात नादात मी माझ्या बायको मुलांना दुखावत होतो. त्यांच्यापासून दुरावत होतो. मीनाक्षीसाठी आधी कधी मी बोललो नाही आणि आता तिला दोष देत, तिच्यातील कमतरता मोजण्यात मी स्वतः ला हुशार समजत होतो." प्रकाशराव डोळ्यात पाणी आणून बोलत होते. त्यांच्या चुकीचे पडसाद त्यांच्या भविष्यावर उमटणार होते ह्याची जरा देखील कल्पना त्यांना आधी नव्हती. पण आता मात्र तर पस्तावत होते. प्रकाशराव बोलत होते. इतक्यात मागून आवाज आला…



"तुमचे हेच वर्तन बघत मोठे झालो आम्ही दोघे, आईला किती तरी रात्री चोरून रडताना बघितले आहे आम्ही. तुम्ही पैसे खूप कमावले, पण आम्हाला तुमचा वेळ, तुमचं प्रेम कधीच मिळाले नाही. आम्ही आजारी पडलो कधी तर, तुम्ही कधीच आमच्या बाजूला नव्हते. आमच्या आईला तुमच्या पत्नीचा दर्जा कधी दिलाच नाही तुम्ही. ती तुमच्यासाठी फक्त काम करणारी बिन पगारी नोकर होती. नोकरीसाठी आईला तुम्ही जितकं बोललात ना, त्याच्या एक टक्का जरी आजी आजोबांना बोलला असतात तर माझ्या आईचे इतके हाल झाले नसते. जिने तुम्हाला क्षणो क्षणी साथ दिली तिची किंमत तुम्ही कधीच केली नाही.

आणि आमचं का? तुम्ही माफी मागून आमचं बालपण परत येणार आहे का? जेव्हा जेव्हा आम्हाला तुमची गरज होती तुम्ही कधीच नव्हता. तुम्हाला नेहमी पैसाच दिसत होता. पैशाने तुम्ही आम्हाला सुविधा दिल्या पण, सुखाच काय? वडील म्हणून काय प्रेम दिलं तुम्ही आम्हाला? किती वेळ दिला? कधी प्रेमाने विचारपूस केली आमची? शिक्षणाचे निर्णय आम्ही आमचे घेतले. त्यात देखील आम्हाला तुमचे मार्गदर्शन मिळाले नाही." मुकुंद रागात बोलला.


मुकुंदच्या कोणत्याच प्रश्नाचे उत्तर प्रकाश रावांकडे नव्हते.
इतक्यात मुकुंदच्या आवाजाने अनघा उठली. मुलं लहान असली तरी त्यांना बरच समजत असतं. मुकुंदचे बोलणे अनघा ने ऐकले होते. ती तिच्या आईकडे म्हणजे राधाकडे गेली.



"आई, बाबा आजोबांशी बोलत नाहीत कारण, आजोबा त्यांच्या सोबत खेळत नव्हते म्हणून ना?" अनघाने निरागसपणे विचारले.


"हो बेटा." राधा काही बोलणार तोच मुकुंदने उत्तर दिले.


"मग आई, मी पण अशीच वागणार मोठी झाली की, करणं बाबा तरी कुठे खेळतात माझ्याशी? सतत काम असतं त्यांना." अनघा एकदम बोलली आणि सगळ्यांच्या पाया खालची जमीनच सरकली. काय बोलावे कोणाला सुचत नव्हते.


आपण जे वागतो तेच लहान मुलं बघत असतात आणि तसच ते अनुसरण करतात ह्याचा प्रत्यय सगळ्यांना आला होता. आता तिला समजावून सांगण्यापेक्षा कृतीत बदल करणे गरजेचे होते. हे सगळ्यांनी जाणले.


अर्थातच बदल एका रात्रीतून होत नसतो. पण रोज थोडा थोडा बदल करून एका सुखी घरच्या भिंती नक्कीच उभारता येतात आणि झाले देखील तसेच.


मुकुंद आणि माधवला त्यांच्या चुका लक्षात आल्या. त्यांच्या ही नकळत ते घरात दुसरे मुकुंद आणि माधव घडवत होते हे त्यांच्या लक्षात आले. त्या नंतर सुरू झाला एक खुशहाल कुटुंब निर्माण करण्याची वाटचाल. थोड्याच दिवसात चित्र पालटले. आता सगळे एकमेकांशी प्रेमाने, आदराने वागत होते. तसेच आता सोबत जेवणं होत होती, गप्पा होत होत्या. प्रकाशराव आणि मुकुंद, माधव मधील दुरावा नाहीसा झाला होता. आता घराच्या नुसत्या भिंती नव्हत्या. त्यात प्रेमाचा ओलावा होता.

एक दिवस,
"राधा तू बोलली होतीस ना! प्रत्येकाचं एक स्वप्न असतं. घर कसं असावं? ह्याचं. माझं पण अगदी तुझ्याच सारखं स्वप्नं होतं. ते आज पूर्ण झालं आहे.
अगदी \" विमल लिमये \" ह्यांच्या त्या कविते सारखं.


घर असावे घरासारखे
नकोत नुसत्या भिंती
इथे असावा प्रेम-जिव्हाळा
नकोत नुसती नाती

त्या शब्दांना अर्थ असावा
नकोच नुसती वाणी
सूर जुळावे परस्परांचे
नकोत नुसती गाणी

मीनाक्षी सूरात कविता म्हणत होती, तिच्या सूरात सूर मिसळत गेले आणि घरातील सगळे ती कविता खूप आनंदाने म्हणत होते.



समाप्त…


© वर्षाराज


प्रिय वाचक,

ह्या कथेतून नात्यात संवाद साधा, दुसऱ्याच्या चुका बघताना आपणही चुकतो आहे का हे बघा. त्याचे परिणाम घरातील चिमुकल्यांवर होतो ह्याचा नक्कीच विचार करा असा संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे. माझी कथा आवडली तर सांगायला विसरु नका

धन्यवाद..
 

🎭 Series Post

View all