घर असावे घरासारखे... भाग ५

त्यांना बघून सगळे जरा घाबरले. मीनाक्षी आणि राधा उठून उभ्या राहिल्या. माधव घाबरला नसला तरी त्या??

मागील भागात आपण बघितले…


काही दिवस अजून निघाले. खूप प्रयत्न करून देखील चांगली नोकरी मिळत नव्हती. छोट्या छोट्या नोकऱ्या करून काम भागवणे सुरू होते.



मला वाटतं होते की भावांमध्ये इतके प्रेम आहे, आम्ही तर मदत मागितली नसती पण ते स्वतःहुन काहीतरी मदत नक्की करतील वेळ आली तर." मीनाक्षी बोलली.


"केली का मग मदत त्यानी?" राधाने विचारले.


आता पुढे..


"गरज सरो अन् वैद्य मरो असं असतं बघ राधा.
एक दिवस सासू साऱ्यांनी आम्हाला आशिर्वाद दिला आणि सांगितले की, सगळ्यांचा खर्च आमच्याकडून झेपत नाही. तुम्ही तुमचं बघा.
ज्या भावांच्या शिक्षणासाठी आम्ही आमची सगळी स्वप्न बाजूला ठेवली त्यानी देखील हात वर केले. अर्थात आम्ही कधी मदत मागितली नव्हतीच. पण मदत मागू नये, ह्या हेतूने त्यांनी आधीच त्यांच्या अडचणींचा पाढा वाचून दाखवला.


तुझे सासरे फार स्वाभिमानी आहेत. त्यांनी लगेच मला आवाज दिला आणि आम्ही दोघे आणि मुलं अंगाच्या कपड्यानिशी घरा बाहेर पडलो, ते कायमचे.


घरातून निघालो खरं पण कुठे जावं? काय करावं? काही सुचत नव्हते. दोन दिवस आणि दोन रात्री आम्ही मंदिरात काढल्या. पण असं कितीदिवस बिना छताचे राहणार होतो. म्हणून मग मीच आग्रहाने ह्यांना माझ्या माहेरी घेऊन गेले. माझ्या ही सगळ्या बहिणींची लग्नं झाली होती. आई बाबा दोघेच होते त्या घरात. तिथे गेल्यावर सगळ्या परिस्थितीची कल्पना त्यांना दिली. चार दिवस रहुद्या तोपर्यंत काहीतरी सोय करतो आम्ही असे मी बोलले." मीनाक्षीच्या डोळ्यातून पटकन एक थेंब ओघळला. तो पुसत तिने पुढे बोलायला सुरुवात केली.

"घर लहान होतं माझ्या आई बाबांचं पण, मन मात्र खूप मोठं.


\"जावई बापू काही काळजी करू नका. सगळे दिवस सारखे राहत नसतात. तुम्हाला वाटेल तितके दिवस रहा इथे. आमच्यातली चटणी भाकरी देऊ तुम्हाला. मुलं उपाशी झोपणार नाही ह्याची जबाबदारी आमची. आम्हाला माहीत आहे, आमचा जावई काही शांत बसून राहणाऱ्यातला नाही. आम्ही आहोत तुमच्या सोबत. फक्त एक विनंती आहे. जो तुमची गाडी नीट मार्गाला लागत नाही, तोपर्यंत इथून जाण्याचा आग्रह धरू नका. हे देखील तुमचेच घर आहे. लहान आहे पण, तुम्हाला आम्ही कसली अडचण येऊ देणार नाही. मुलांच्या डोक्यावर दुसरं छत येत नाही तोपर्यंत इथेच रहा. आम्हाला काही अडचण नाही तुमची.\" माझ्या वडिलांचे हे शब्द होते.



त्याच दरम्यान माझी धाकटी बहीण आमच्या भेटीला आईंकडे आली. तिला देखील सगळे समजले. तिच्या नवऱ्याने त्यांच्या ऑफिस मध्येच ह्यांना नोकरी लावून दिली. घर सोडल्यावर थोड्याच दिवसात नोकरी सुरू झाली. पहिला पगार झाला आणि मग आम्ही आईकडून निरोप घेऊन आमच्या घरात आलो." मीनाक्षी चे डोळे दाटून येत होते.


"हे मात्र मनातून खूप दुखावले गेले होते. ज्यांच्या साठी आयुष्याची महत्त्वाची वर्ष दिली त्यानी पाठ फिरवली. सगळ्यांना शेवटी त्यांचा स्वार्थच दिसला. म्हणून जिद्दीने कामाला सुरुवात केली." मीनाक्षी सांगत होती.


"कामाची जिद्द तर होतीच पण हळू हळू पैसा वाढू लागला तशी अजून पैसे कमावण्याची नशा चढत गेली माझ्यावर." प्रकाश राव घरात येत म्हणाले.


त्यांना बघून सगळे जरा घाबरले. मीनाक्षी आणि राधा उठून उभ्या राहिल्या. माधव घाबरला नसला तरी त्याच्या मनातल्या रागाने त्याला तिथून जाण्यास सांगितले, तसा तो देखील आत जाण्यास निघाला.



"राधा, मीनाक्षी बसा. आज बोलावं वाटतं आहे. मनात साचलेले ढग आज रीते करावे वाटतं आहेत. आज पर्यंत बोललो नाही. आज बोलायचं आहे तर ऐकायला कोणीतरी हवं ना?" प्रकाश राव खुर्चीत बसत दोघींना बसण्याचा इशारा करत बोलले.


दोघी परत खुर्चीत बसल्या. माधव मात्र परत आत जायला निघाला. प्रकाश राव त्याला जाताना बघत नाराज झाले.


"माधव भाऊ. थांबा असे जाऊ नका. दुरावलेल्या नात्यात संवाद साधायचा असेल, तर आधी संवाद साधला संधी दिली पाहिजे. प्रत्येकाची एक बाजू असते सगळ्यांनी ती ऐकली पाहिजे तेव्हाच समज गैरसमज दूर होतील आणि समस्येवर तोडगा निघेल. आज तुम्ही इथून गेलात तर परत अशी संधी भविष्यात मिळेलच असं नाही." राधा माधवला बोलली. तिच्या बोलण्याने माधव थांबला आणि परत येऊन बसला.



"मुकुंद देखील हवा होता आज इथे. तुम्हा तिघांचा गुन्हेगार आहे मी." प्रकाशराव दोघांसमोर हात जोडत बोलले.



काय सांगतील अजून प्रकाशराव? गवसतील का हरवलेली नाती नव्याने?
वाचत रहा घर असावे घरासारखे



क्रमशः

©वर्षाराज

 

🎭 Series Post

View all