घर असावे घरासारखे... भाग ४

सासूबाई मात्र ते घरी आले की, माझ्या चुकांचा पाढा वाचून दाखवत. त्यामुळे आमच्यात कधी नीट बोलणे झालेच नाही.


मागील भागात आपण बघितले…


माझी गरिबी माझी लाचारी ठरली, मला हे जमत नाही, ते जमणार नाही असं बोलून मला चालणार नव्हते. आई वडिलांची परिस्थिती आधीच नाजूक. माझ्या मागे अजून चार बहिणी लग्नाच्या होत्या. वर्ष भरातच पदरात मुकुंद देखील होता. आता अशा स्थितीत मी माहेरी परत गेले असते तर, त्यांची लग्न झाली नसती. मग माझ्या आई वडिलांकडे आत्महत्या करण्या वाचून गत्यंतर नव्हते हे मी जाणून होते. म्हणून मग सहन करणे हाच एक मार्ग होता माझ्या समोर." मीनाक्षी सांगत होती पण तिच्या समोर त्या घटना तिला परत दिसत होत्या.


"पण बाबा तर बोलू शकत होते ना?" माधव रागात बोलला


आता पुढे…


"त्यांना कुठे सगळं काही माहीत होतं? काम निमित्त जास्तं करून घरा बाहेर असतं आणि त्याकाळी हल्लीच्या नवरा बायको सारखा संवाद होत नसे. आधीच कमी वेळ घरी असायचे त्यात मी अजून काही सांगून वाद होतील. म्हणून मी कधी काही बोलले नाही.


सासूबाई मात्र ते घरी आले की, माझ्या चुकांचा पाढा वाचून दाखवत. त्यामुळे आमच्यात कधी नीट बोलणे झालेच नाही.


काही वर्षांनी माझ्या दिरांची लग्नं झाली. त्यांनतर मुकुंदच्या बाबांचे डोळे उघडले. आपली आई चुकते आहे, हे त्यांना दिसत होते, पण वर्तनात बदल मात्र नव्हता त्यांच्या." मीनाक्षी भूतकाळात हरवली होती.


"काय झालं होतं आई?" राधा बोलली.


"ह्या मोठ्या दोन भावांमध्ये म्हणजे तुझे सासरे आणि प्रभाकर काका ह्यांच्यात खूप काही अंतर नव्हते. दोनच वर्षांचे अंतर मात्र प्रभाकर आणि लहान दोघांमध्ये चार वर्षांचे अंतर होते. लहान दोन भाऊ म्हणजे विलास आणि विकास हे दोघे भाऊ जुळे आहेत. पुढील दहा वर्षात सगळ्यांचे शिक्षण होऊन नोकरी लागली आणि लग्नं झाले. तो पर्यंत माझा मुकुंद बारा वर्षांचा आणि माधव आठ वर्षांचा झाला होता." मीनाक्षी सगळे आठवून बोलत होती.


"मग लागलं का त्या सूंनाना वळण? घरची शिस्त?" राधा उत्सुकतेने बोलली.


मीनाक्षी गालातच हसली. तिच्या हसण्यात एक वेगळेच गूढ होते.


"कसलं काय गं! प्रभाकरला शहरात नोकरी लागली, लग्नं झालं, नवी नवरी घरात आली, तेव्हाच प्रभाकरने सगळ्यांना बजावलं, स्मिता काही दिवस राहिली वाड्यावर, घराची व्यवस्था बघतो तोपर्यंत. तशी चांगली आहे स्मिता. पण कामाची सवय नाही. मोठ्या घरची शिकलेली मुलगी. त्यामुळे घरात कामात हातभार लाव म्हणण्याची हिम्मत नव्हती कोणाची. तरी जमेल तसं करत होती ती. तिला फार कीव यायची माझी. \" ताई इतकं सहन का करता म्हणायची?\" ती होती तोपर्यंत जरा मदत झाली मला. मग ती निघून गेली. सुट्टीला चार दिवस यायची. नंतर विलास आणि विकासचे लग्नं झाले. ते देखील शहरात नोकरीला होते. त्यांच्या बायका म्हणजे लता आणि सुधा ह्या तर वाड्यात आल्याचं नाहीत. लग्नं होऊन लगेच त्यांच्या शहरातील घरी गेल्या. त्या दोघी नोकरी करत होत्या. त्यात विलास आणि विकासने आधीच सांगितलं की, लता आणि सुधा सुट्टीत आल्या तरी एकाही कामाला हात लावणार नाहीत. त्यांना सवय नाही. शिवाय अंघोळीला त्यांना गरम पाणीच लागतं. त्यामुळे वहिनी तू बघ कसं करता येईल ते." मीनाक्षी भूतकाळात हरवली होती.


"तू होतीसच सगळ्यांच करायला." माधव रागात बोलला.


मीनाक्षी ताईंनी माधवकडे नुसतेच बघितले. त्याचा राग अगदी साहजिक होता.


"धाकट्या विकासच लग्नं झालं आणि ह्यांची नोकरी गेली. सुरुवातीला काही महीने कसे तरी काढले पण नंतर घरात खर्चाचे पैसे द्यायला जमतं नव्हते. त्यात मुलं देखील मोठी होत होती.

काही दिवस अजून निघाले. खूप प्रयत्न करून देखील चांगली नोकरी मिळत नव्हती. छोट्या छोट्या नोकऱ्या करून काम भागवणे सुरू होते.


मला वाटतं होते की भावांमध्ये इतके प्रेम आहे, आम्ही तर मदत मागितली नसती पण ते स्वतःहुन काहीतरी मदत नक्की करतील वेळ आली तर." मीनाक्षी बोलली.


"केली का मग मदत त्यानी?" राधाने विचारले.


केली असेल का मदत प्रकाश रावांच्या भावांनी?
वाचत रहा घर असावे घरासारखे


क्रमशः


© वर्षाराज

🎭 Series Post

View all