घर असावे घरासारखे... भाग १

बायकोच्या समोर आईने आपल्या कानाखाली वाजवली त्यामुळे मुकुंद अजूनच रागावला. झालेल्या अपमानामु?

"काय केलं तुम्ही आमच्यासाठी? तुम्हाला काहीही अधिकार नाही आमच्या आयुष्यात बोलण्याचा." मुकुंद तावा तावात बोलत होता.

त्याचा एक एक शब्द कानात शिसे ओतावे असे प्रकाशरवांना भासत होते. प्रकाशराव आणि मुकुंद बाप लेक. पण वडील आणि मुलगा ह्यांच्यात जे नातं असावं, ते त्या दोघांमध्ये कधी निर्माण झालेच नाही. मुकुंदला समजायला लागले तेव्हा पासून मुकुंद प्रकाशरावांशी कधीच चांगला बोलला नाही. प्रकाशराव आणि मुकुंदचे वाद नेहमीच होत असे. पण आज मात्र \" काय केलं तुम्ही आमच्या साठी?\" ह्या त्याच्या टोकाच्या प्रश्नाने प्रकाशराव आतून पुरते खचले.



"अहो शांत व्हा. ते तुमचे वडील आहेत. त्यांना असं बोलणं शोभत नाही तुम्हाला." राधा म्हणजे मुकुंदची बायको त्याला शांत करत बोलली.


"वाह. माझं बोलणं शोभत नाही आणि ते जे वागले ते शोभल का त्यांना?" मुकुंद अजूनच चिडला.


"मुकुंद पुरे झालं आता. तुझे वडील आहेत ते." मीनाक्षी ताई म्हणजे मुकुंदची आई बोलली."


"आई तू तर खरंच धन्य आहेस. ह्या माणसाने कधी तुझी किंमत केली नाही. तरी तू त्याचीच बाजू घे." मुकुंद चिडून मीनाक्षी समोर हात जोडत बोलला.
तोच त्याच्या कानाखाली एक सणसणीत जाळ निघाला.

"मुकुंद. वडिलांना एकेरी नावाने बोलतोस. लाज वाटते का तुला? माझ्या नवऱ्याशी अशा भाषेत बोललेलं मी खपवून घेणार नाही." मीनाक्षीताई, मुकुंदवर चिडत बोलला.

बायकोच्या समोर आईने आपल्या कानाखाली वाजवली त्यामुळे मुकुंद अजूनच रागावला. झालेल्या अपमानामुळे मुकुंद रागात तिथून निघून गेला. प्रकाशरवांशी त्याचे पटत असले तरी, मीनाक्षीवर मात्र त्याचे खूप प्रेम होते.


"माफ कर राधा. पण ह्यांचा अपमान नाही सहन करू शकत मी. मुलगा आहे ह्याचं अर्थ असा होत नाही ना की, त्याने सगळ्या मान मर्यादा सोडून वागावं." मुकुंद जाताच मीनाक्षीताई त्यांच्या सूनेला म्हणजे राधाला बोलल्या.



"नाही आई. माफी मागू नका. तुम्ही आई आहात आणि आई आपल्या मुलांना चुकीची शिक्षा देऊच शकते. मग मुलं कितीही मोठी असली तरी."


"मीनाक्षी, ते काहीही असलं तरी तू त्याच्यावर हात उचलायला नको होता. तो काही चुकीचे बोलत नव्हता. तो जे बोलला त्यामागे करणं ही तर तसेच आहे ना?" प्रकाश राव खिन्न स्वरात बोलले.


"अहो तुम्ही नका मनाला लावून घेऊ त्याचं बोलणं. रागात तो काय बोलतो त्याचं त्याला देखील कळतं नाही." मीनाक्षी.


प्रकाशराव काही न बोलताच तिथून निघून गेले.


"आई, एक विचारू?" राधा जरा अडखळत बोलली.


"हो विचार." मीनाक्षी.


"हे असे का वागतात? म्हणजे आमच्या लग्नाला पाच वर्ष झालीत पण मी बाबा आणि ह्यांना कधीच नीट बोलताना बघितलं नाही. ह्यांना विचारायची सोय नाही. म्हणून तुम्हाला विचारलं आज." राधा एका दमात बोलली.




तुम्हाला देखील हाच प्रश्न पडला असेल ना? बघूया पुढील भागात. मुकुंद च्या वागण्या मागचे करणं काय असेल? मीनाक्षी सांगेल का राधाला?
वाचत रहा घर असावे घरासारखे.



क्रमशः
© वर्षाराज



 

🎭 Series Post

View all