Login

एक त्रस्त गृहिणी भाग चार

व्हॅलेंटाईनच्या दिवशी अपेक्षाभंग झालेल्या गृहिणीची व्यथा था
एक त्रस्त गृहिणी भाग चार

मागल्या आठवड्यात, आठवडाभर ‘हा डे तो डे’ साजरा झाला. माझ्या नवऱ्याला मात्र या ‘डेंशी’ काहीही घेणं देणं नाही. सकाळी कोंबडा आरवला की नवरा ही कोकलायला लागतो.

‘चहा दे, नाश्ता दे, डब्बा दे, रुमाल दे, चावी दे, पाकीट दे,’ नवऱ्याला हे दे ते दे करता करता माझा जीव अगदी मेटाकुटीला येतो. शेवटी मीच त्याला ओरडून म्हणते, “जा बाबा लवकर ऑफिसमध्ये आणि हातात मोबाईल घेऊन मला जरा दहा मिनिटे निवांत जगू दे.”

मागल्या आठवड्यात साऱ्या जग भर साजऱ्या झालेल्या ‘प्रेम आठवड्याच्या’ कहाण्या पण इतक्या जबरदस्त आहेत ना, की आमच्यासारख्या मध्यमवर्गीय, मध्यमवयीन गृहिणींना हसावं का रडावं तेच कळत नाही.

माझी एक मैत्रीण म्हणत होती “माझा नवरा फार हुशार आहे बाई! रोज डे, टेडी डे, चॉकलेट डे, असले खर्चाचे, खिशाला न परवडणारे, महागडे डे असले ना, की तो अगदी साळसूदपणाचा आव आणून, मग प्रॉमिस डे, किस डे, हग डे ह्या दिवसांची मला आवर्जून आठवण करून देतो. मग मीही त्याला म्हणते, ‘इतकी वर्षे झाली तुझ्यासोबत राहून, मला काय तू मूर्ख समजलास का? आला मोठा किस डे, हग डे, आणि प्रॉमिस डे ची आठवण करून देणारा! जा ऑफिसला, जा.”

मी तिला म्हटलं, “तुझा नवरा हुशार नाही, तर पुरता बनेल आणि लबाड आहे.” ती म्हणाली, “हो ग! तू म्हणते ते खरंच आहे.”

दुसऱ्या एका मैत्रिणीचा नवरा अतिशय रोमँटिक आहे. म्हणून मग ‘रोज डे’ च्या दिवशी मैत्रिणीने त्याला फोन करून सांगितलं की “आज ना तुम्ही फ्लावर घेऊन या.” तर तिचा नवरा म्हणतो कसा, “अग पावभाजी वगैरे काही करू नको, माझं पोट खराब आहे, आणि फ्लावरही महाग आहे. मी एक काम करतो भेंडी घेऊन येतो. भेंडी तब्येती करिता फार चांगली असते.” त्यावर ती मैत्रीण माझ्याजवळ स्वतःच मन मोकळ करत म्हणाली, “अगं माझ्या नशिबातच भेंडी आहे, तर मला गुलाब कुठून मिळणार? भेंडीच मिळणार ना!”

लग्नाच्या आधी आमच्या सौंदर्यावर जीव ओवाळून टाकणारे, सतत आमच्या मागे पुढे फिरणारे, आमचा प्रत्येक शब्द झेलणारे, रोज काही ना काही गिफ्ट, निदान चॉकलेट किंवा गुलाब देणारे, हे नवरे, लग्नानंतर असे कसे काय बदलतात कुणास ठाऊक?

मागल्या आठवड्यात जो प्रेम सप्ताह साजरा झाला ना त्यावर माझ्या प्रत्येक मैत्रिणीची एक कहाणी आहे. एकीचा नवरा तर 14 फेब्रुवारीच्या आदल्या दिवशीच आजारी पडला, म्हणजे ‘आधीच उल्हास आणि त्यात फाल्गुन मास,’ ‘एकादशीच्या घरी महाशिवरात्र,’ ‘दुष्काळात तेरावा महिना’ असले काही बाही विचार बिचारीच्या मनात येऊन गेले. दुसरीने तिच्या विद्यार्थ्यांनी, तिला दिलेल्या सगळ्या गिफ्टस चे फोटो नवऱ्याला व्हाट्सअप केले आणि या आशेवर बसली, की निदान आता तरी तो तिला काही गिफ्ट देईल. आज 17 फेब्रुवारी उजाडला पण माझ्या मैत्रिणीचं वाट पाहणं काही संपलेलं नाही.

तिसरीने आडून आडून नवऱ्याला प्रेम दिनाच्या दिवशी, जगातील बायकोवर प्रेम करणारे समस्त नवरे, प्रेमाने बायकोला गुलाब देतात असं सुचवलं, तर त्याने सोसायटीच्या आवारातूनच एक गुलाबाचे फुल आणून तिच्या पुढ्यात ठेवलं. आणि वरुन तिच्या वाढलेल्या आकारावर तूच माझं गुलाबाचे फुल असा शेराही दिला.

चौथीची तर तऱ्हाच न्यारी, ती सांगत होती लग्नाच्या आधी नवरा मला रोज सुकामेवा मराठीत काय म्हणतात ते ‘ड्रायफ्रूटवालं’ डेअरी मिल्क द्यायचा, पण मुळात मला ड्रायफ्रूट्सच आवडत नाही, त्यामुळे मी ते चॉकलेट कधी खालच नाही, आणि आता लग्न झाल्यावर नवऱ्याने माझ्या हाती ‘प्रेम’ नावाचं फक्त गाजर दिलं आहे.

पाचवीच्या नवऱ्याने तर सरळ म्हटले, की ‘हे व्हॅलेंटाईन डे वगैरे पाश्चिमात्य संस्कृतीचे अंधानूकरण आहे. माझं, तुझ्यावर हृदयाच्या तळापासून प्रेम आहे ते व्यक्त करण्याकरिता मला कुठल्याही दिवसाची गरज नाही.”

“आणि वर्षभरातल्या 365 दिवसांपैकी एकाही दिवशी तू तुझं प्रेम माझ्याजवळ व्यक्त करत नाही. माझा वाढदिवस आणि आपल्या लग्नाचा वाढदिवस तुझ्या कधीच लक्षात नसतो, मी केलेली शाही बिर्याणी आणि भरल्या वांग्याची भाजी तू पातेलं तळातून चाटून पुसून खातोस, तू काय माझ्यावर हृदयाच्या तळातून प्रेम करणार? आणि तुझं माझ्यावर एवढेच प्रेम असेल ना तर तुझ्या हृदयाच्या तळाच्या चिखलात रुतलेलं ते गुलाबाचं फुल मला प्रेम भेट म्हणून हवं आहे.” वैतागलेली मैत्रीण तिच्या नवऱ्याला फणकार्‍याने म्हणाली, तर त्याने तिच्या म्हणण्याकडे साफ काना डोळा केला आणि स्वतःच्या ऑफिसचा रस्ता धरला.

सगळ्या मैत्रिणींच्या तऱ्हा सांगून झाल्यावर मीच का मागे राहू? तर वाचक हो, माझ्या नवऱ्याला ‘प्रेम सप्ताह’ आणि ‘प्रेमदिन’ हे किस चिडिया का नाम आहे हे माहीत नाही. 7 फेब्रुवारी ते 14 फेब्रुवारी या दरम्यान माझा नवरा, प्रेम सप्ताह म्हणजे कीस झाड की पत्ती? आणि किस खेत की मुली? या अविर्भावात वावरत असतो. व्हॅलेंटाईन डे वगैरे हे, श्रीमंत लोकांचे, लग्नाआधीचे चोचले आहेत. आपल्यासारख्या गृहस्थाश्रम स्वीकारलेल्या लोकांनी गप गुमान रोज सकाळी डबा घेऊन ऑफिसमध्ये जावं आणि संध्याकाळी घरी येऊन दुनिया भराचा पसारा पसरलेल्या सोफ्यावर अंग पसरून लोळावं असं त्याचं जगावेगळं तत्त्वज्ञान आहे.

म्हणून म्हणते माझ्या मैत्रिणींनो आणि वाचक महिलांनो मध्यमवर्गीय नवरे जमातीच्या पुरुषांकडून, प्रेमदिनी किंवा प्रेम सप्ताहात कुठल्याही प्रेम भेटीची अपेक्षा करू नका. उगाच अपेक्षाभंगाचं दुःख पदरी घेऊन रडण्यात काय हाशील?

प्रेम भेटीच्या आशेत आपल्या डोक्यावर कधी चांदी आली आणि आपण कधी म्हाताऱ्या झालो हे आपल्याला कळणारही नाही आणि आपलं वाट पाहणं कधी संपणार नाही.

लग्न झाल्यावर नवऱ्याच्या पाकिटावर, त्याच्या नकळत डल्ला मारून तो आमचा जन्मसिद्ध हक्क आहे या तोऱ्यात वावरणाऱ्या, मध्ये मध्ये त्याला हाडतुड करणाऱ्या, नवरा आपल्या चुका दाखवत असताना, पदोपदी तोच कसा वेंधळा आणि गबाळा आहे, हे सतत त्याच्या कानी कपाळी ओरडणाऱ्या माझ्यासारख्या समस्त त्रस्त गृहिणींच्या नशिबात नवरा नावाच्या गरीब जमातीकडून केवळ उपेक्षाच पदरी पडते, आणि कधीही प्रेम दिनाच्या शुभेच्छा किंवा भेटवस्तू मिळत नाहीत हे त्रिकाला बाधित सत्य आहे.

एक त्रस्त गृहिणी.


सदर लिखाण हे संपूर्णतः काल्पनिक असून त्याचा वास्तवात कोणाशीही कुठलाही संबंध नाही तसा तो दिसून आल्यास निव्वळ योगायोग समजावा.

©® राखी भावसार भांडेकर नागपूर.


🎭 Series Post

View all