तीन
काल परवा मुलांचा अभ्यास घ्यायला मी बसली. माझ्या मुलाला म्हटलं, “बाबा रे हा तीन आणि चारचा पाढा पाठ कर. अभ्यासाच्या बाबतीत तुझा सतत नन्नाचाच पाढा असतो.” तर माझा मुलगा मला म्हणतो, “मम्मी तू आधी मला पेढा खायला दे, मग मी त्या पाढ्यांचं काय करायचं ते बघतो. आणि आजी, तुला कालपासून काढा करून मागते आहे, तो तर तू तिला करूनच देत नाहीये, सारखं आमच्या अभ्यासाचं कारण सांगून, आमच्याच बाजूला बसून मोबाईल मध्ये काय काय शोधत आणि बघत असतेस.”
बघा, बघा ही आजकालची मुलं! आपल्याला कशी फटकळपणे बोलतात, आपली हिंमत होती का आपल्या आई समोर तोंडातून चक्कर शब्द काढण्याची? आणि सासूच्या काढ्या बद्दल तुम्ही अजिबात काळजी करू नका. मुलांच्या परीक्षा तोंडावर आल्या, की तेव्हाच माझ्या सासूला आजारपण आठवतं. म्हणजे यांच्या आजारपणा करिता नातेवाईक म्हणू नका, ओळखीचे म्हणू नका, सोसायटीतले म्हणू नका, महिला मंडळातल्या बायका म्हणू नका, अहो अख्खा गावच यायचा बाकी राहतो. आणि काम करून माझा जीव मेटाकुटीला येतो. म्हणून मुलांचा अभ्यास घ्यायचा बहाणा करून बघीतला जरा मोबाईल तर बिघडलं कुठे?
माझी मुलगी तर आणखीनच वरताण आहे. मला म्हणते, “मम्मी आमच्या अभ्यासासाठी तू जितकी डोके फोड करते ना, तेवढीच स्वतःसाठी केली असती तर आज एखादी ऑफिसर असतीस ऑफिसर!”
घ्या म्हणजे मुलांचं करावं भलं आणि मुलं म्हणतात आमचंच…….. आजकालच्या मुलांना काही म्हणायला बोलायची सोय राहिली नाही हो!
माझ्या लेकीने माझ्यावर अशी मुक्ताफळ उधळली, की माझ्या नवऱ्याला इतका असुरी आनंद होतो की तो मजेत एखादं गाणं गुणगुणू लागतो आणि इच्छा असूनही त्याच्या चेहऱ्यावरचा तो आनंद लपवू शकत नाही, सासूबाईंच्या चेहऱ्यावर समाधानचं आणि असीम आनंदाचं स्मित विलसत असतं हे माझ्या चाणाक्ष नजरेतून सुटत नाही. आपण घरादारासाठी इतकं झटा आणि आपल्या घरचे लोक बघा आपल्याविषयी काय विचार करतात ते.
मी दोन दिवसांपूर्वी मुलांच्या शाळेत गेली होती प्रजासत्ताक दिनाकरिता. तिथे खूप मुलांना बक्षीस मिळाली. कुणाला खेळामध्ये, कुणाला अभ्यासामध्ये, कुणाला शंभर टक्के हजेरी करिता, कुणाला चांगल्या स्वभावाकरिता. अहो एका मुलाला ऑलिंपिकची चार-चार पदकं मिळाली. घरी आल्यावर मी माझ्या दोन्ही मुलांची शाळा घेतली म्हटलं, “त्या एका मुलाला ऑलिंपिकची चार-चार पदकं मिळाली तर तुम्हाला का मिळत नाही रे?”
माझं बोलणं ऐकून मुलगा आणि मुलगी तोंडावर हात ठेवून, फिदी फिदी हसत होते. माझी लेक मला म्हणाली, “मम्मी ते ऑलम्पिक नाही तर ओलंपियाड आहे!”
मी म्हटलं, “असू दे, असू दे, काही का असेना पण तूम्हाला पदकं मिळायलाच हवीत. तुम्ही शाळेत काय फक्त टिफिन खाण्यासाठी आणि व्हॅनमध्ये बसून चक्कर मारायसाठी जाता का रे? रोज सकाळी सहा वाजता उठून तुमच्यासाठी मी डबा बनवते, कुठलीही वस्तू तुम्ही जोपर्यंत दहा वेळा मागत नाही तोपर्यंत मी घेऊन देत नाही मग अकराव्यांदा मन मोठं करून घेऊन देते, तुमच्या शाळेची पप्पा एवढी भरमसाठ फी भरता त्याचं तरी काही वाटू द्या!” मी एवढं बोलेपर्यंत, मुलीने मोबाईल मध्ये नाक खुपसले आणि मुलगा वहीवर कार्टून काढत होता.
मला तर बाई आश्चर्यच वाटतं! काय एक-एक मुलं असतात हो! भाषण विचारू नका, गायन विचारू नका, खेळ विचारू नका, अभ्यासातही हुशार! माझीच मुलं अशी का निघाली कुणास ठाऊक? म्हणजे कोणी डब्यात एखादा वेगळा पदार्थ आणला, की माझ्या लेकीला तो लगेच करून हवा असतो. मी मोठ्या कष्टाने इकडून तिकडून रेसिपी मिळवावी आणि तो पदार्थ करून तिला द्यावा तर म्हणते कशी, “मम्मी तू ना असले काही प्रयोग करूच नकोस. तू आपली भाजी पोळी वालीच बरी आहेस!”
माझा लेक तर असा आहे ना, एखाद्या मुलाचा सुपरमॅन, स्पायडरमॅन, लिटिल सिंघम, छोटा भीम, बोबो बॉय, वीर द रोबोट असा कुठलाही कंपास बघितला की तो माझ्या मुलाला हवा असतो.
जाऊद्या आपलेच दात आणि आपलेच ओठ. तक्रार तरी कोणाकडे करावी? आपला तो बाब्या आणि दुसऱ्याचे ते कार्टे असे म्हणून मला मुग गीळून गप्प बसावं लागतं हो!
एक त्रस्त गृहिणी.
सदर लिखाण हे संपूर्णतः काल्पनिक असून त्याचा वास्तवात कोणाशीही कुठलाही संबंध नाही तसा तो दिसून आल्यास निव्वळ योगायोग समजावा.
©® राखी भावसार भांडेकर नागपूर.