भाग दोन
तुम्हाला म्हणून सांगते, आजकाल कुठेच काही म्हणाय बोलायची, नाही नाही लिहायची उजागरी राहिली नाही. माझ्या ओळखीची एक लेखिका-रसिका, सुनवादी कथा लिहिते तर सुकृत आणि पाखीने तिच्या घरावर मोर्चा काढला. त्यादिवशी मी लिहिलं की मी एक आदर्श गृहिणी आहे, दुपारचा वेळ वाया न घालवता मेथी, सांबार, पालक, या भाज्या दुपारी तोडून ठेवते आणि वाटण्याचे दाणे काढून ठेवते, तर लगेच माझी मैत्रीण मला म्हणाली, “अगं एक किलो वाटाण्याचे कटोरा भर दाणे तू स्वतः तरी उभ्या आयुष्यात कधी बघितले आहेस का? वाटाण्याचे दाणे कटोऱ्यात कमी आणि तुझ्या पोटातच जास्त जातात. मेथीच्या भाजीचं तर तू नावच घेऊ नकोस, मेथीची भाजी टोपलीत कमी आणि तोडलेल्या काड्यांबरोबर जास्त असते. तुझी सासू जी नेहमी तुझ्यावर वैतागलेली असते, आणि डोळे वटारून, वटारुन तुझ्याकडे बघते, तिने कधी ग तुझ्याकडे कौतुक भरल्या नजरेने बघितले सांग बरं जरा मला? आणि घरातली भांडी लावायला तू दहा रुपये देशील तर खरच कोणी तुझं काम ऐकणार आहे का? कमीत कमी पन्नास रुपयाची नोट तरी दे!”
मी म्हटलं, “बाई ग रोजच्या रोज नुसती दोन वेळेला भांडी लावायची पन्नास रुपयाची नोट मी खर्च करायला लागली ना तर लवकरच माझा अनिल अंबानी व्हायचा.”
माझ्या या वाक्यावर तिने उजवीकडचा ओठ डावीकडच्या गालात दाबला आणि तीन बोटांचा मोर नाचवत तिच्या डोळ्यात असे भाव होते, ‘आली मोठी काटकसर करणारी.’
म्हणजे बघा, आपण तासंतास बसून, पाठ मोडून कामं करायची आणि ही आपली-आपली म्हणवणारी माणसंच आपलेच दात आपल्याच घशात घालतात. जाऊद्या म्हणायचं आणि काना-डोळा करायचा.
आणखीन एक दुसरी मजा सांगते, माझी दुसरी एक मैत्रीण आहे ना! हो हो आलं माझ्या लक्षात पुष्कळ मैत्रिणी आहेत मला! हां तर मी काय सांगत होते माझी दुसरी मैत्रीण आहे ना ती म्हणाली, की तिचे आणि तिच्या नवऱ्याचे आजकाल सतत खटके उडतात.
नवऱ्याशी खटके उडवणे हा स्त्रियांचा, त्यातल्या त्यात बायकोचा जन्म सिद्ध हक्क असतो. म्हणजे बघा लग्न मंडपात सप्तपदीच्या वेळी ज्या क्षणी नवरा बायकोच्या गळ्यात मंगळसूत्र बांधतो त्या क्षणी बायकोला तो हक्क आणि अधिकार (नवऱ्याशी भांडण्याचा) प्राप्त होतो.
काही काही बायकांचे नुसते खटके उडत नाही तर ठिणग्या सुद्धा पडतात. आणि काही काही तर अशा स्वामिनी सारख्या असतात, म्हणजे गृहस्वामिनी सारख्या, की नवऱ्याशी खटका उडाला की धूर आणि जाळ सोबतच!
तर मी काय सांगत होते? हां, मैत्रिणीचे आणि तिच्या नवऱ्याचे सतत वाद होत असल्यामुळे यावर्षीपासून माझी मैत्रीण एक नवीनच उपाययोजना करणार आहे.
ती मला सांगत होती, की मैत्रिणीच्या घरा शेजारच्या बाईचा नवरा, ती बाई कामावर जायला निघाली, की तिची गाडी पुसून देतो, तिला घरी यायला वेळ झाला तर शाळेतून आलेला मुलांना खाऊ पिऊ घालतो, कामवाली बाई आली नाही तर सगळी कामं स्वतः करतो आणि इतकं करूनही तो आपल्या बायकोशी अगदी सौजन्याने वागतो. म्हणून मैत्रिणीची शेजारीण जो वड पुजायला दरवर्षी जाते, तोच वड माझी मैत्रीणही यावर्षी पुजणार आहे.
आणि शेजारणीचा वड पुजूनही मनासारखा बदल नवऱ्यात झाला नाही, तर माझी मैत्रीण इतके वर्ष जो वड पुजत होती, त्याला उलट्या फेऱ्या मारून दुसरे अजून सातवड पुजणार आहे.
मी तीला म्हटलं, “जुन्या वडाला उलट्या फेऱ्या मारते ते ठीक आहे, पण नवीन सातवड का पुजायचे?” तर ती म्हणे, “एका वडाने काम झाले नाही तर दुसरा, दुसऱ्याने काम झाले नाही तर तिसरा, आणि तिसऱ्याने काम झाले नाही तर…….”
मला काय समजायचे ते मी समजून गेली आणि तुम्हाला काय समजायचे ते तुम्ही समजून घ्या. म्हणजे बघा जर तुमच्यापैकी कोणी नवरे मंडळी माझा हा लेख वाचत असतील तर आत्ताच स्वतःच्या वागण्या बोलण्यात योग्य ते बदल करा नाहीतर तुमचं काही खरं नाही.
एक त्रस्त गृहिणी काय करू शकते याचा अंदाज आता वाचकांना आलाच असेल.
सदर लिखाण हे संपूर्णतः काल्पनिक असून वास्तवात त्याचा कुणाशीही कुठलाही संबंध नाही तसा तो आढळून आल्यास निव्वळ योगायोग.
©® राखी भावसार भांडेकर नागपूर.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा