Login

एक त्रस्त गृहिणी भाग एक

House Wife
काय बाई एक एक बायकांचे नशीब असतं! घर झाडण्यापासून ते लादी पुसण्यापर्यंत आणि मुलांच्या शाळेच्या तयाऱ्या करून देण्यापासून ते बाहेर जाताना बायकोने कितीही उशीर केला ना तरी अगदी हसतमुखाने तिची वाट पाहण्यापर्यंत काही काही पुरुषांमध्ये संयम असतो हो! पण आमचं मेलं नशीबच खोटं!

माझी मैत्रीण माझ्याकडे येऊन मला सांगत होती. तिचे आणि तिच्या नवऱ्याचे आजकाल सतत खटके उडतात, म्हणून ती आणि तिचा नवरा स्टॅच्यू स्टॅच्यू खेळतात. म्हणजे हिने तोंडाचा पट्टा चालवण्यासाठी आ-केला की त्याने स्टॅच्यू म्हटलंच पाहिजे आणि त्यांने घरातल्या स्वच्छतेसाठी कुरकुर करायला सुरुवात केली की हिने त्याच्यावर डोळे उगारलेच पाहिजे!

पण मला नवल वाटतं बाई असल्या नवऱ्यांचं आणि बायकांचं काय, ती एकमेकांना साथ देता हो! मला प्रश्न पडतो असा चांगला पुरुष मलाच का मिळाला नाही? तर माझी मैत्रीण म्हणते, ‘तेव्हा तू गच्चीवर मटार सोलत बसली होती!’

हिवाळ्याच्या दिवसात गच्चीवर बसून मेथीची भाजी तोडणे, किंवा सांबार,ओल्या कांद्याची किंवा हिरव्या लसणाची पात सुकवणे, नाही काही तर वाटाण्याचे दाणे काढने अशी अजिबात न आवडणारी काम मी हिवाळ्यात करते.

म्हणजे बघा इकडे उन्हात बसून ऊन खाल्ल्याने शरीरात विटामिन डी तयार होतं, तेवढाच एखाद-दीड तास किचनच्या कंटाळवाण्या कामांपासून सुटका मिळण्याचा मनाला ‘फील गुड’ मिळतं, आणि काम करता करता सहजच मोबाईलही चाळता येतो, आणि टोपलीत तोडलेली भाजी आणि कटोरा भरून सोललेले वाटाण्याचे दाणे बघून सासूच्या डोळ्यात आपल्यासाठी कौतुकाची चमक दिसते ती वेगळीच.

स्वतःसाठी अशा अत्यंत सोयीच्या कामांची निवड मी नेहमीच आधीपासून करत आली आहे. म्हणजे मीनं खूप कामसू गृहिणी आहे बरं का! कपडे धुण्याचा कंटाळा म्हणून वॉशिंग मशीन घेतली तर आता ते वॉशिंग मशीन मधले धुतलेले कपडे वाळत घालण्याचाही मला कंटाळा येतो. ते म्हणतात ना, ‘कामाची कमळ जा आणि घरात सगळा…….’

दिवसभर भांडी तर काय निघतच राहतात, म्हणून जीवाला जरा विसावा याकरिता भांड्यांकरिता माझ्या घरी बाई आहे, पण तुम्हाला सांगते बाई भांडे घासून गेल्यानंतर ती टोपल्यातली भांडी दिवस रात्र माझ्याकडे बघतात आणि मी त्यांच्याकडे, कुणी जर ती धुतलेली भांडी मला ट्रॉल्यांमध्ये लावून दिली ना तर त्याला मी दहा रुपयाची नोट बक्षीस म्हणून देईल, पण माझ्याकडून घरातलं कुणीच दहा रुपयाची नोट घ्यायला तयार नाही आणि ती टोपल्यातली भांडी लावायला तयार नाही. नशीबच फुटकं मेलं त्याला कोणीतरी काय करणार!

आणि सगळ्यात जास्त कंटाळा सांगू का मला कशाचा आहे तो घरभर पसरलेला पसारा आवरण्याचा! त्यापेक्षाही जास्त मुलांच्या शाळेचे गणवेश असतात ना ते प्रेस करताना माझ्या नाकी नऊ येतात. ‘शिंग्रुमेलं हेलपाट्यानं’ अशीच अवस्था झाली आहे माझी.

पण तरीही ‘आलिया भोगासी असावे सादर’ ह्या उक्तीला सतत मनात घोळवत घोळवत मी दोरीवरचे कपडे खुर्च्यांवर नेऊन ठेवते आणि मग खुर्चीवरून ते कपडे सरळ घरातल्या प्रत्येकाच्या अंगावर जातात, पण रोजच्या कपड्यांसाठी ही युक्ती ठीक असली तरी बाहेरच्या कपड्यांसाठी मात्र प्रेस करताना माझा जीव खूपच मेटाकुटीला येतो. ‘रोज मरे त्याला कोण रडे?’

माझ्यासारख्या बाईकडून तुम्ही किलो दोन किलोच्या पोळ्या करून घ्या हो! तोंडातून चक्कार शब्द काढणार नाही, पण मागवून जर कोणी तो गॅसचा ओटा आवरायला सांगितला ना तर तळपायाची आग मस्तकात जाते माझ्या.

असू द्या अशा पुष्कळ गोष्टी आणि पुष्कळ काम आहेत ज्यामुळे माझा जीव अगदी नको नको झाला आहे त्याबद्दल पुन्हा कधीतरी.

एक त्रस्त गृहिणी.

©® राखी भावसार भांडेकर. नागपूर

🎭 Series Post

View all