होऊ कशी उतराई...भाग 4
काही दिवसांनी प्रोसेसला सुरुवात झाली.
आणि तब्बल दोन महिन्यानंतर कुसुमच्या गर्भात गर्भ टाकला गेला. आता रेवाने नोकरी सोडली, ती चोवीस तास कुसुम सोबत असायची. कुसुमचं खाणं-पिणं, औषध, मेडिकल टेस्ट, मंथली चेकअप सगळं रेवा करायची.
सकाळच्या चहापासून ते रात्रीच्या जेवणापर्यंत सतत सोबत असायची. दुपारी छान छान कथा ऐकवायची, गर्भसंस्कारचं पुस्तक वाचून सांगायची.
बघता बघता पाच महिने पूर्ण झाले, पोट वाढल्यामुळे कुसुमला उठायला बसायला थोडा त्रास जाणवायचा त्यातही रेवा सगळं करायची.
“ रेवा, बाळा किती करतेस माझ्यासाठी? तू हो थोडा आराम करत जा. दिवसभर माझ्या मागे मागे करत असतेस, तुला पण स्ट्रॉंग राहायला हवं की नाही, बाळ आल्यानंतर सगळं तुलाच करायचं आहे.”
कुसुमच्या बोलण्यावर रेवा फक्त असायची.
“खर सांगू का रेवा, आता माझाच मला हेवा वाटतोय. मिलिंदच्या वेळी असे भरभर दिवस गेले ना की मला काही कळलंच नव्हतं. पण आता मी एक एक क्षण अनुभवते आहे. थँक्स रेवा बाळा, आता असं वाटतंय तू माझी आई आहेस आणि मी तुझी मुलगी.”
दोघीही खळखळून हसल्या.
असेच आनंदाने दिवस सरकत गेले.
थोडा शरीराला व्यायाम म्हणून रेवा आणि कुसुम संध्याकाळी पार्क मध्ये फिरायला गेल्या. रस्त्याने जाताना सगळ्यांच्या नजरा कुसुमच्या पोटावर होत्या. कुसुमला खूप ओक्वॉर्ड फिल होत होतं, पण रेवाकडे बघून ती सगळं विसरायची.
पार्क मध्ये बाकावर बसल्या, बाजूला बायांचा घोळका जमलेला होता. त्या सगळ्या कुसूमकडे बघत होत्या.
त्यातली एक
“काय बाई, कश्या कश्या बाया असतात, त्यांना काही लाज शरम नाही, या वयात हे सगळं शोभतं का?”
“हो ना आपलं वय काय? आपण करतोय काय? कुठलं काही भानच नाही.” त्यातली दुसरी बाई
हे ऐकून कुसुमच्या डोळ्यात पाणी तरळलं.
रेवाने कुसुमकडे बघितलं, तिला डोळ्याने इशारा करत दिलासा दिला. आणि उठून त्या बायांकडे गेली.
“झाल्या तुमच्या चर्चा करून? जोपर्यंत तुमच्या सारख्या बाया या समाजात राहतील ना तोपर्यंत आपला समाज सुशिक्षित होऊच शकत नाही. किती बुरसटलेल्या विचारांचे आहात तुम्ही, एक बाई असून दुसऱ्या बाईचा प्रॉब्लेम तुम्हाला कळू शकत नाही.” रेवा
“ये कोण ग तू? आणि आम्हाला काय शहाणपण शिकवतेस?” त्यातली तिसरी बाई
“ज्या बाईला तुम्ही बोलताय ना. त्याच बाईची मी सून आहे. एक सासू म्हणून त्यांनी माझ्यासाठी जे केलंय ना ते तुमच्या विचाराच्या पलीकडे आहे. कारण तिथपर्यंत पोहोचण्याची तुमची कुवतच नाही. त्यांच्या जागी दुसरी सासू असती ना तर माझी सून मला नातवंड देऊ शकत नाही म्हणून मुलाचं दुसरं लग्न लावलं असतं. पण माझ्या सासूने तस नाही केलं, उलट त्या माझ्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहिल्या. त्यांच्या पोटात जे बाळ वाढतंय ना ,ते माझं बाळ आहे. मी तुम्हाला हे का सांगतीय, तुमच्यात तर माणुसकीच नाही आहे.”
रेवाच्या बोलण्यावर सगळ्या बायांनी माना खाली घातल्या. आणि जमा झालेल्या सगळ्यांनी रेवासाठी टाळ्या वाजवल्या.
नातेवाईकही असेच बोलायचे, रेवा त्यांनाही असंच बोलून गप्प करायची
सहा महिने पूर्ण झाले. कुसुमला बाळाची हालचाल जाणवायची, बाळ कधी किक मारतं याची दोघ्या वाट बघत बसायच्या. रेवा कुसुमच्या पोटाला हात लावून अनुभूती घेण्याचा प्रयत्न करायची.
हसत हसत नऊ महिने पूर्ण झाले आणि डॉक्टरने डिलिव्हरी तारीख ठरवली.
डिलिव्हरीच्या दिवशी रेवा सकाळी लवकर तयार झाली आणि पूजा पाठ करून कुसुमच्या खोलीत गेली.
“आई आरती आणलीय, प्रसाद घ्या. तयार झालात ना? आपल्याला निघायचंय.” रेवा
“सगळं नीट होईल ना ग, मला भीती वाटातीय.”
“आई सगळं ठीक होईल.” तिघेही हॉस्पिटलला पोहोचले.”
.................
रेवाच्या खांद्यावर कुणीतरी हात ठेवला आणि रेवा भानावर आली.
बाजूला मिलिंद उभा होता.
चार दिवसानंतर हॉस्पिटलमधून सुट्टी झाली. रेवाने बाळाच्या आणि बाळाच्या आईच्या स्वागताची जय्यत तयारी केली.
मिलिंद आईला घेऊन घरी आला.
रेवाने दोघींना ओवाळलं.
रेवा कुसुमच्या पाया पडली आणि
“आई मी याची परतफेड कधीच करू शकणार नाही आहे. आई कशी होऊ उतराई.”
दोघीही एकमेकींना बिलगल्या..
समाप्त:
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा