Login

होऊ कशी उतराई भाग 2

Hou kashi utrai

होऊ कशी उतराई.. भाग 2

आता रेवाला आई होण्याची आस लागली होती. प्रत्येक महिन्यात वाट बघायची आणि पाळी आली की नर्व्हस व्ह्यायची.

पुन्हा वर्ष उलटला.
पाळी थांबत नाही म्हणून ती खूप रडायची.

“मिलिंद या ही महिन्यात पाळी नाही थांबली. मिलिंद मला आई व्हायचंय. तुला कळतंय का मी काय बोलतीय.” रेवा
“रेवा शांत हो,आपण डॉक्टरशी कन्सल्ट करू.
मिलिंदने डॉक्टरची अपॉईंमेंट घेऊन त्या तारखेला रेवाला घेऊन गेला.

मिलिंदने डॉक्टरला सगळं सांगितलं.

डॉक्टरने रेवाला तपासलं काही टेस्ट करायला दिल्या.
टेस्ट रिपोर्ट आल्यानंतर रेवाच्या रिपोर्ट मध्ये काहीच गडबड नव्हती. ती खूप आनंदात होती.

पुन्हा सहा महिने झाले, गर्भधारणा झाली नाही. आता कुसूम टचटच बोलायला लागली.

“जेव्हा वेळ असते तेव्हा प्लॅनिंग करत बसायचं आणि वेळ गेल्यावर रडत बसायचं.”

“आई हा माझा एकटीचाचं निर्णय नव्हता, मिलिंद आणि मी दोघांनी मिळून हे ठरवलं होतं. मग तुम्ही मला एकटीलाच का बोलता. मिलिंदला ऑफिसला जाऊ देता आणि मग मलाच बोलता.”

संध्याकाळी मिलिंद घरी आला तेव्हा रेवाने विषय काढला,
“मिलिंद बाळ न ठेवण्याचा आपला दोघांचा निर्णय होता ना मग आई मलाच का बोलतात.” रेवा बोलताना भावुक झाली.

“रेवा जाऊ दे ग, तिला आजी होण्याची आस लागली असणार म्हणून बोलली. तिचं काय मनावर घेतेस?” मिलिंद हसून बोलला.

“हसण्यावारी नेऊ नकोस, मला टेन्शन येत.”
मिलिंद तिला प्रेमाने समजावतो. आणि आईला सगळं सांगून तिलाही समजावतो.

पण तरी अधामधात सासू सुनेमध्ये खटके उडायचे. दोघींमध्ये वाद व्हायचे.

काही दिवसानंतर रेवा आणि मिलिंद पुन्हा डॉक्टरकडे गेले.. आता मिलिंदच्या सगळ्या टेस्ट झाल्या. त्याही सगळ्या नॉर्मल होत्या.

बघता बघता तीन वर्षे झालीत. आता रेवाला खूप ओक्वॉर्ड व्हायचं. शेजारी, नातेवाईक, ऑफिस कलीग सगळे विचारायचे,
“काय कधी गोड बातमी देणार.?”

रेवाच्या डोळ्यात टचकन पाणी यायचं.
काही महिन्यानंतर डॉक्टरांकडून कळलं की रेवाला गर्भाशयाचा कॅन्सर आहे.
हे ऐकून रेवा अगदी हादरून गेली. मिलिंद तिच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिला. बरेच  दिवस गेले, रेवाला असं बघून मिलिंदही खचू लागला. दोघांच्याही चेहऱ्यावर काळजी दिसायची.

कुसुमच्या सगळं लक्षात आलं. सगळी परिस्थिती बघता तिने एक पाऊल पुढे टाकला.
रेवा खोलीत बसलेली असताना कुसुम ट्रे घेऊन खोलीत आली.
“आई तुम्ही, काही हवं होतं का? आवाज द्यायचा मी आली असती.” बोलता बोलता रेवाचा कंठ दाटून आला.कुसुमने हातातला ट्रे ठेवला, तिच्या बाजूला बसली.

“रेवा खचून जाऊ नकोस, सगळं नीट होईल. देव एक दरवाजा बंद करतो तर दहा दरवाजे उघडतो. तोच यातून मार्ग दाखवेल. पण तू संयम ठेव, थोडा धीर धर सगळं ठीक होईल.”
कुसुमने रेवाच्या डोक्यावरून मायेने हात फिरवला, रेवा कुसुमकडे बघतच राहिली.

‘जी बाई आतापर्यंत मला टोचू टोचू बोलायची आता ती माझं सांत्वन करतेय, देवा स्वप्न तर नाही ना’ रेवाचे मनातल्या मनात विचार सुरू होते.
कुसुमने तीच डोकं स्वतःच्या मांडीवर घेतलं, रेवाने सगळं दुःख बाहेर काढलं

मिलिंद आणि रेवा चांगल्या कॅन्सर स्पेशालिस्ट ला भेटले. त्यांनी तपासून काही टेस्ट करायला सांगितल्या. काही दिवस गेले. आणि निदान आलं की गर्भाशयाच्या मुखाला कॅन्सरची लागण झालेली आहे. त्यामुळे ऑपरेशन करून गर्भाशय काढून टाकावं लागेल.

रेवा आणि मिलिंद घरी आले. मिलिंदने कुसुमला सगळं सांगितलं. आणि खोलीत गेला.

“मिलिंद मी ऑपरेशन करणार नाही.  मिलिंद मला बाळ हवंय, मी ऑपरेशन केलं तर माझं स्त्रीत्व संपेल. मी कधीच आई होऊ शकणार नाही. मिलिंद तू डॉक्टरला सांग दुसरा काहीतरी उपाय करा, मी हे करणार नाही.” रेवा खूप रडली.
“रेवा शांत हो, आपल्याकडे दुसरा पर्याय नाही आहे. डॉक्टर सांगतील तसं आपल्याला करावं लागेल. रेवा आता ही फर्स्ट स्टेज आहे, सगळं आपल्या हातात आहे, उशीर व्हायला नको ग.” मिलिंदने रेवाला जवळ केलं.

क्रमशः

काय होईल पुढे यासाठी पुढील भाग नक्की वाचा आणि अभिप्राय कळवा.
धन्यवाद

🎭 Series Post

View all