होऊ कशी उतराई... – लघुकथा
ओ टी मध्ये बाळाच्या रडण्याचा आवाज आला आणि सगळ्यांना अश्रू अनावर झाले.
रेवा आणि मिलिंद एकमेकांना बिलगून ढसाढसा रडले.
काही वेळात नर्स बाळाला घेऊन बाहेर आली.
“अभिनंदन, लक्ष्मी आली तुमच्या घरी. तुम्ही आई झालात.”
नर्सने बाळाला रेवाच्या हातात दिल. रेवा त्या गोंडस बाळाकडे बघतच राहिली.
“मिलिंद मी आई झाले आणि तू बाबा. मिलिंद मला इतका आनंद झालाय ना की मी शब्दात व्यक्त करू शकत नाही आहे. मी आई झाले..मी आई झाले.”
“सिस्टर आई कशी आहे.” मिलिंदने विचारलं.
“त्या बऱ्या आहेत. औषधीमुळे थोडी गुंगी आहे, पण थोड्याचवेळात त्या शुद्धीत येतील.”
काही वेळाने कुसुमकाकूंना ओ टी मधून नॉर्मल वॉर्ड मध्ये शिफ्ट केलं.
रेवा आणि मिलिंद दोघेही बाळाला घेऊन वॉर्ड रूम मध्ये गेले.
मिलिंद अगदी डोळे टक लावून आईकडे बघत होता, कधी आई शुद्धीवर येते आणि मी तिच्याशी बोलतो असं झालं होतं त्याला.
“रेवाचा आनंद तर गगनात मावेना झाला होता. ज्या दिवसाची ती आतुरतेने वाट बघत होती तो दिवस उजाडला होता.
“एखाद तासानंतर कुसुमला शुद्ध आली, त्यांनी डोळे उघडले तर मिलिंद आणि रेवा बाजूलाच बसलेले होते. त्यांनी चेहऱ्यावर हलकं स्मितहास्य आणलं आणि इकडे तिकडे बघू लागल्या.
रेवाच्या लक्षात आलं ती उठली, बाजूच्या पाळण्यात बाळाला ठेवलेलं होतं, रेवाने बाळाला घेतलं आणि आई जवळ येऊन बसली.
“आई लक्ष्मी आलीय.”
रेवाने बाळाला आई जवळ ठेवलं.
त्या बाळाला बघून अगदी खुश झाल्या.
.............................
रेवा वेल एज्युकेटेड , सुंदर, सुशील आणि खूप बोलणारी अशी मुलगी. एम कॉम झाल्यानंतर नोकरी सुरू असताना रीतसर कांदेपोह्याचा कार्यक्रम आयोजित करून लग्न ठरलं.
मिलिंद आय आय टी झालेला नामांकित कंपनीत उच्च पदावर नोकरीला होता.
रेवा खूप बळबळी ,तर मिलिंद अगदी विरुद्ध मितभाषी होता.
पारंपरिक पद्धतीने लग्न झालं, दोघांचा जॉब एकाच शहरात असल्यामुळे कुठेही शिफ्ट होण्याची गरज पडली नव्हती.
सुरुवातीचे दिवस खूप मस्त गेले. दोघांनीही लग्नासाठी सुट्या टाकलेल्या होत्या, त्यामुळे ते दोघे बाहेर फिरायला गेले. आठ ते दहा दिवसांचा टूर संपल्यानंतर दोघांनीही ऑफिस जॉईंट केलं. दिवस छान जात होते. सुरुवातीला आताच मुलं नको म्हणून दोघांनीही प्लॅनिंग केलं. सगळं त्यांच्या मनासारखं होत होतं. कुसुम ( रेवाची सासू ) त्यांना थोडं खटकायचं, कधी कधी दोघींमध्ये वाद व्ह्यायचा.
कामावरून दोघींची कुरबुर सुरू असायची. या दोघींच्या भांडणामुळे कधी कधी मिलिंद वैतागायचा.
आईची बाजू घेतली तर बायको चिडेल आणि बायकोची बाजू घेतली तर आई रागावेल या द्विधामनस्थितीत असायचा आणि मग दोघींशी पण अबोला धरायचा.
बघता बघता वर्ष उलटलं.
एकदा बाजूच्या शेजारच्या कुलकर्णी काकू आल्या.
“काय हो कुसुम ताई, तुमच्या मुलाच्या लग्नाला एक वर्ष झालं ना तरी अजून काही गोड बातमी मिळालेली नाही.”
“अहो कुलकर्णी ताई, ही आजकालची तरुण पिढी, यांना कुठल्याच गोष्टीची घाई नसते. त्यांचं सगळं ठरलेलं असतं. मला कधी कधी राग येतो पण आपण काही बोललं तर घरात वाद होतील. म्हणून मी आपली गप्प. आपण बोललं की आपलंच दिसतं त्यापेक्षा न बोललेलं बर.”
दोघींच बोलणं झालं आणि कुलकर्णी काकू निघून गेल्या.
रेवाच्या मैत्रिणीला मुलगा झाला, तीच बाळ बघताना किंवा तिला इतकं आनंदी बघताना रेवाच्या मनातही कुठेतरी चलबिचल सुरू होती. ती मिलिंद जवळ बोलली.
“मिलिंद आपण बाळाचा विचार करायचा का?” रेवा
“थांबूया ना काही महिने, एवढी काय घाई आहे.” मिलिंद
“तसं नाही, आता आपण नको नको म्हणतोय आणि समोर जेव्हा आपल्याला हवं असेल आणि....” रेवा
मिलिंदने तिच्या ओठावर बोटं ठेवले.
“असं काहीही होणार नाही. आपण करू विचार.”
रेवा खूप आनंदी झाली.
क्रमशः
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा