Login

होते कुरूप वेडे भाग-1

सामान्य मुलीची कथा
जलद लेखन स्पर्धा जून 2025

होते कुरूप वेडे
भाग -1

" तुमची लहान मुलगी अंकिता आम्हाला पसंत आहे. आजच बोलणी करू हवं तर."

संवेग चे वडील,अंकिताच्या वडीलाना म्हणाले.
अंकिता चे वडील अजय त्यांच्या या शब्दाने खूप उद्विग्न झाले. त्रागा त्रागा झाला त्यांचा.

दुसऱ्या कुणी हे म्हटले असते तर त्यांना एवढे वाटले नसते. पण त्यांच्याच सख्ख्या सुनेचे दीपाचे वडील असं म्हणतायेत याचे त्यांना वैषम्य वाटले. अरे ज्या घरात त्याची पोरगी नांदतेय त्या पोरीचा बापच तिच्या सासर्‍याला असं बोलतोय. आणि बोलताना मागचा पुढचा जराही विचार केला नाही की याच घरात आपली पोरगी नांदतेय आपण असं कसं बोलावं.

ज्याच्या घरात लग्नाची पोरगी असते तो कोणताही बाप चार ठिकाणी खडे टाकूनच बघतोच.

त्याला वाटले सुनेचा भाऊच लग्नाचा आहे विचारून बघावं. म्हणून निरोप दिलेला मोठी मुलगी उज्वलासाठी.जबरदस्ती थोडी न होती. पसंत नव्हती, करायची नव्हती तर बघायलाच यायचं नव्हतं.

आणि बघायला येण्याचा औचित्य तरी काय होतं. खरे तर त्यांनी उज्वलाला कितीदा तरी बघितलेले. कारण त्यांची मुलगी याच घरात नांदत होती या ना त्या कारणाने त्यांचे अजय कडे म्हणजेच व्याह्याकडे येणे जाणे व्हायचेच.

हा उगाच बघण्याचा फार्स होता. पण कमीत कमी शांत राहिले असते काही बोलले नसते तर काहीच वाटले नसते पण जणू त्यांनी आगीतच तेल ओतले होते.
त्यांचे बोलणे अजयला अजिबातच रुचले नव्हते त्यावरून घरात संबंध खराब होतील हे त्यांनी ताडले होते.

त्यांच्या या बोलण्याचा उज्वलाच्या मनावर मात्र फार खोलवर परिणाम झाला. ती वडिलांना म्हणाली,

" बाबा,त्यांना अंकिता पसंत आहे ना करून टाका अंकिताचे लग्न. मी माझ्या पायावर उभी राहील. माझ्यासाठी तिचे नुकसान करू नका."

"घरात मोठी मुलगी लग्नाची असताना लहान मुलीला मागणी घालणं त्यांना शोभते का?

बेटा उज्वला,असे विचार तू मनातही आणू नकोस हा बाप जिवंत आहे तोवर अशी चुकीची कृती करणार नाही."

अंकिता रूपाने देखणी होती तिला तर यापेक्षा कितीतरी चांगली स्थळ येतील हे अजय जाणून होता.

पण उज्वला मात्र अजयची खूप लाडकी. अत्यंत हुशार, सालस, शांत.

उज्वला अगदी सहा महिन्याची होती तेव्हा तिला काजण्या झाल्या आणि सगळ्या अंगावर त्याचे डाग उमटले. वास्तविक ती सुद्धा खूप सुंदर होती पण या काजण्याच्या डागांनी तिच्या सौंदर्याला डाग लावला होता.
या लग्नाच्या बाजारात फक्त रूप बघितलं जातं गुण नाही हे उज्वलाने ओळखलं होतं.

क्रमश:
बाकी पुढील भागात
भाग -2 नक्की वाचा.
उज्वलाचे लग्न होते का बघुयात पुढील भागात
©®शरयू महाजन

🎭 Series Post

View all