Dec 01, 2023
जलद लेखन

जगण्याची आशा ( भाग 3 )

Read Later
जगण्याची आशा ( भाग 3 )


जगण्याची आशा ( भाग 3 )

कोरोनाने सर्वत्र हाहाःकार माजवलेला होता. प्रत्येकानेच काही तरी गमावले होते.पैसा,नोकरी, जवळचे व्यक्ती ,आयुष्यातले सुख हे सर्व कोरोनाने हिरावून घेतले होते.
कोरोना झालेल्या व्यक्तीला तो बरा होऊन पुन्हा जीवन जगेल का ? याची भीती होती तर आपल्याला ही कधीतरी कोरोना होईल असे प्रत्येकाच्या मनात येऊन जायचेच. सर्व देवावर विश्वास ठेवून जगत होते. उद्या आयुष्यात काय होईल ,हे कोणालाच माहित नव्हते.

आपल्याला अशा मंदीच्या परिस्थितीत नोकरी कुठे मिळणार? व्यवसाय तरी कोणता करणार? आणि भांडवल तरी कोण देणार ? अशा अनेक प्रश्नांनी तो उद्विग्न व्हायचा.
हसणे व छान छान गप्पागोष्टींचे स्वर निघणाऱ्या घरात रडणे व दुःखाचे स्वर येऊ लागले होते.

आता आपल्या आयुष्यात दुःखाचा काळोखचं आहे,आपल्या आयुष्यात सुखाचा प्रकाश काही येणार नाही. असेच दीपकच्या मनात येत होते. तो अशाच विचारात
बसलेला असायचा.
असेच एके दिवशी तो खिडकीजवळ उभा होता आणि आपल्याच विचारात बाहेर पाहत होता. तेव्हा त्याचे लक्ष एका मोठ्या दगडाकडे गेले, त्या दगडातून एक छोटेसे रोप वर येऊन डोकावत होते. तिथे माती वगैरे काही नव्हती. त्या छोट्याशा रोपाला पाहून दीपकच्या मनात विचार आला ,परिस्थिती अनुकूल नसली तरी ज्याला जगण्याची इच्छा असते तो आपले जीवन जगतोचं . फक्त मनात प्रबळ इच्छा व कष्ट करण्याची हिंमत हवी.
एखाद्या अंधाऱ्या खोलीत,प्रकाशाचा एक किरणही थोडासातरी अंधार दूर करतो . व प्रकाशाचे अस्तित्व निर्माण करतो.तसेच, दीपकच्या दुःखाने भरलेल्या काळोखरुपी आयुष्यात त्या इवल्याशा रोपट्याला पाहून आलेला विचार ,त्याच्या साठी सुखाचा प्रकाश देणारा एक आशेचा किरण ठरला होता.

ज्योतीने केलेल्या पदार्थांना खूप छान चव असते. आणि तिला स्वयंपाकात गोडीही होती. त्यामुळे तिच्या सुगरणपणाचा त्याने योग्य उपयोग करायचे ठरविले. ज्योतीही लगेच तयार झाली. स्वयंपाकात तर तिला आवड होती आणि आपल्या नवऱ्याचा आनंदी चेहरा पाहून तर ती लगेच कामाला तयार झाली. दीपकने आपल्या जवळच्या मित्राकडून भांडवलासाठी पैसे उसनवार आणले आणि सुरुवातीला लागेल तितका किराणा आणला.
आईबाबा हॉस्पिटलमध्ये होते,तेव्हा दीपकला अनेक लोक जेवणाची कुठे सोय होईल का? टिफिन कोणी देते का?असे विचारायचे .
असे अनेक लोक होते की, त्यांना जेवण हवे होते. कारण हॉटेल्स वगैरे सर्व बंद होते.
हॉस्पिटलमध्ये ऍडमिट असलेल्या व्यक्तींना, त्यांच्या नातेवाईकांना, कोरोनाने घरात क्वारंनटाइन असलेल्या व असे अनेक गरजू लोक होते की, त्यांना जेवणाच्या सोयीची गरज होती.
दीपकने सुरुवातीला आपल्या ओळखीत होते तेवढ्या लोकांना टिफिन द्यायला सुरुवात केली. आणि दरही अगदी माफक होते. कोणाच्या मजबूरीचा गैरफायदा घेऊन त्याला पैसे कमवायचे नव्हते. आपल्याला जगायचे होते आणि म्हणून आपण हा व्यवसाय करत आहोत, आपण श्रीमंत होण्यासाठी हा व्यवसाय करत नाही. याची त्याला जाणीव होती. लोकांची फसवणूक, लुबाडणूक करून त्याला पैसे मिळवायचे नव्हते.तो प्रामाणिकपणे आपला व्यवसाय करत होता. लोकांची गरजही भागत होती. आणि दीपकला जगण्यासाठी पैसेही मिळत होते. ज्योतीने बनविलेले पदार्थ लोकांना आवडत होते. पैसेही जास्त नव्हते आणि दीपकचा प्रामाणिकपणा,त्याचा मनमिळाऊ स्वभाव यामुळे त्याचे काम वाढू लागले होते.

क्रमशः

नलिनी बहाळकर
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
//