Login

जगण्याची आशा ( भाग 2 )

About Life And Hope


जगण्याची आशा ( भाग 2 )

"आई-बाबा लवकर चांगले होऊन घरी सुखरूप येऊ दे ."
अशी प्रार्थना दीपक रोज देवाला करत होता. छोटी सान्वीही देवासमोर बसून देवाला प्रार्थना करायची. तिला आपल्या आजी-आजोबांची खूप आठवण यायची.

"आजी-आजोबा घरी कधी येणार? " तिच्या या प्रश्नाला उत्तर देताना दीपक व ज्योती तिला सांगायचे,
"लवकर येतील हं आजी-आजोबा घरी आणि ते ही चांगले होऊन . "

तिला समजवून सांगताना ते स्वतःच्या मनालाही समजवत होते.

पण त्यांच्या मनातील ही इच्छा देवाने काही पूर्ण केली नाही.

आई व बाबा कोरोनातून चांगले होऊन घरी काही आले नाही. डॉक्टरांच्या प्रयत्नांना यश आले नाही व त्यांच्या तब्येतीनेही त्यांना साथ दिली नाही. दोघेही कोरोनाचे बळी ठरले.

रोज टिव्हीवर कोरोनाने मृत्यू होणाऱ्या लोकांची संख्या पाहताना दीपकला वाईट वाटायचे.
आणि आज आपल्या घरातील व्यक्तीही इतरांसाठी, सरकारसाठी संख्या असली तरी,आपल्यासाठी ती फक्त एक संख्या नसून आपले एक विश्व होते,आपले सर्व काही होते.
कोरोनाने आपले हसते-खेळते घर उध्वस्त केले.मी जसा कोरोनातून बरा झाला तसे आई-बाबा का बरे झाले नाही?
बाबांनी काबाडकष्ट करून आपल्याला वाढविले,शिक्षण दिले.आईनेही खूप कष्टाने संसार केला होता. माझ्या कडून त्यांच्या खूप अपेक्षा होत्या. आणि मी त्या पूर्ण करण्याचा प्रयत्न ही करत होतो.
शिक्षण करून नोकरी करू लागलो, माझे लग्न झाले व ज्योतीसारखी चांगली सून त्यांना मिळाली. या सर्व सुखाच्या गोष्टींमुळे ते सुखावले होते.
सान्वीच्या येण्याने त्यांच्या आयुष्यात तर आनंदच आनंद आला होता.तिच्या सहवासात ते आपले कष्टाचे दिवस विसरून सुखाचे दिवस अनुभवत होते. त्यांना खूप खूप सुख द्यायचे होते. आता तर कुठे त्यांच्या सुखी आयुष्याला सुरुवात झाली होती. पण त्यांच्या आयुष्यात सुख कधी लिहीलेलचं नव्हते का?

या सर्व विचारांनी दीपक दुःखी राहू लागला. ज्योतीलाही खूप दुःख झाले होते. आपल्यावर आईवडीलांसारखे प्रेम करणारे सासू सासरे तिने गमावले होते.
सान्वी ही आजी-आजोबांच्या आठवणीने रडत होती.
ज्योती आपले दुःख दूर करत दीपकला व सान्वीला सांभाळीत होती.

दीपकच्या आयुष्यात एवढा मोठा ,कधीही न भरून निघणारा आघात झाला होता. त्यातून तो कसातरी बाहेर निघण्याचा प्रयत्न करीतचं होता ..तेवढ्यात त्याच्या आयुष्यात अजून एक संकट येऊन उभे राहिले.
त्याला नोकरीवरून काढून टाकण्यात आले होते. कोरोनामुळे जीवनावश्यक गोष्टी सोडल्या तर सर्व व्यवहार बंद पडले होते. दीपक ज्या कंपनीत नोकरीला होता, त्या कंपनीला आर्थिक फटका बसत असल्याने अनेक लोकांना घरी पाठविण्यात आले होते आणि दीपकचे दुर्दैव की, त्यात तोही होता.

अगोदरच आई-वडिलांच्या जाण्याने खचून गेलेला दीपक नोकरी गेल्याने अजूनच दुःखी झाला. त्याला जीवन नकोसे वाटायला लागले. जीवाचे काहीतरी बरेवाईट करावे आणि जीवाची होणारी तगमग शांत करावी. असेही विचार त्याच्या मनात येऊ लागले.
आतापर्यंत केलेली थोडीफार बचत होती ,ती आई-वडीलांच्या उपचारासाठी खर्च झाली होती. पैसा गेला त्याचे काही वाईट वाटत नव्हते , आईबाबा सुखरूप घरी आले असते तरी सर्व भरून पावले असते. त्यांच्या आशिर्वादाने पुन्हा सर्व कमविता आले असते. पण आईबाबा चांगले होऊन घरी आलेच नाही.
आता आई-बाबा नाही, पैसाही नाही व नोकरीही नाही.