जगण्याची आशा ( भाग 1 ) (आशेचा किरण )

About Life And Hope


जगण्याची आशा ( भाग 1 )


"शुभमं करोती कल्याणम्..." सांजवेळी देवासमोर बसून आजी आपल्या नातीला सान्वीला म्हणून दाखवित होत्या आणि तिलाही म्हणायला सांगत होत्या.छोटी सान्वीही आजी जशी म्हणत होती तशी ती आजीच्या मागे म्हणत होती.आजी व नातीचा हा रोजचा नित्यक्रम होता. आजी सान्वीला छान छान गोष्टी सांगायची, गाणे म्हणायची. सान्वीला आजीच्या गोष्टी, गाणे आवडायचे. सान्वी म्हणजे आजी-आजोबांचा प्राणचं होती. सान्वीलाही आजी-आजोबांचा फार लळा होता.
सान्वीचे वडील कामानिमित्त दिवसभर बाहेर असायचे आणि आई घरकामात व्यस्त असायची. त्यामुळे सान्वीला आजी-आजोबाच जास्त वेळ देत होते, तिला सांभाळत होते आणि ते हे सर्व जबाबदारी म्हणून नाही तर आवडीने करत होते. सान्वीशी बोलताना, तिच्या बरोबर खेळताना ते ही लहान होऊन जात व वय विसरून आनंद घेत होते. तिघांचे छान बॉंडिंग जमले होते.
दिवसभर आई व वडील सान्वीला वेळ देवू शकत नव्हते पण रात्रीचे जेवण व गप्पागोष्टी याचा आनंद सर्व परिवार एकत्र घेत होते. सान्वीच्या गोड गोड बोलण्याने व सर्वांच्या मनसोक्त हसण्याने घरात चैतन्य यायचे.

असेचं छान आनंदात ,मजेत दिवस जात होते.

आणि एके दिवशी, दिपक (सान्वीचे वडील) कामावरून घरी आला पण रोजपेक्षा त्याचा चेहरा आज जास्तच उतरलेला होता.

"काही झाले आहे का ? बरं नाही वाटत का? "ज्योतीने ( सान्वीची आई) त्याला विचारले.

"डोकं दुखत आहे आणि तापाचीही कणकण वाटते आहे. कोरोनाची टेस्ट करून घ्यावी. असे मला वाटते. " दीपक ज्योतीला म्हणाला.
दीपकच्या बोलण्याने ज्योतीचाही चेहरा दुःखी झाला.
कोरोनाविषयी मनात अगोदरच खूप भीती होती. खूप काही ऐकलेले होते. त्यामुळे आपल्या घरापर्यत तो येऊ नये असे ज्योतीला व दीपकला मनातून वाटत होते.
पण मनात कुठेतरी शंका, भीती होतीचं.

दीपकच्या मनातील भीती खरी ठरली होती. त्याला कोरोना झाला होता. पण त्याचे रिपोर्टस पाहून,त्याला ऍडमिट करण्याची गरज नव्हती म्हणून डॉक्टरांनी त्याला घरीच क्वारंनटाइन राहण्यास सांगितले व तशी औषधेही दिली .
घरात आपले वयस्कर आईवडील व छोटी मुलगी यांना आपल्यामुळे कोरोनाची लागण होऊ नये म्हणून दीपक आपल्यापेक्षा त्यांच्या जीवाच्या काळजीने सर्व प्रकारची काळजी घेत होता. घरातील इतर सर्वांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले होते व काही त्यांना काही त्रासही नव्हता. एवढे तरी बरे. असे सर्वाना वाटत होते.
कुटुंबातील सर्वच सदस्यांना कोरोना झाल्यानंतर काय परिस्थिती ओढवते हे त्यांनी पाहिलेले होते,ऐकलेले होते.
देवाची आपल्यावर काहीतरी कृपा म्हणावी. असे त्यांना वाटत होते.

कोरोनातून बरा झाल्यानंतर दीपक आपल्या कुटुंबासह पुन्हा सर्व आनंद घेऊ लागला, जो त्याने काही दिवसात आजारपणामुळे गमावला होता. तो कामावरही जाऊ लागला .
आपल्यावरील खूप मोठे संकट गेले असे,दीपकसह सर्वांना वाटत होते आणि त्यामुळे ते आनंदात होते.

आयुष्य हे असे पुस्तक असते की,ज्याच्या पुढच्या पानावर काय लिहीले आहे ,हे आपण वाचू शकत नाही.

आयुष्यात पुढे काय होणार? हे कोणालाच माहित नसते.
तसेच दीपकच्याही आयुष्यात पुढे काय होणार होते ..हे त्यालाही माहित नव्हते.
दीपकच्या सुखी कुटुंबात कोरोनाने पुन्हा शिरकाव केला होता.
सर्व प्रकारची काळजी घेऊनही , त्याच्या आईवडिलांना कोरोना झाला . वय व त्यांचे इतर आजार यामुळे काही रिस्क नको म्हणून डॉक्टरांनी त्यांना हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केले .


क्रमशः


नलिनी बहाळकर

🎭 Series Post

View all