हनिमून ट्रॅव्हल्स प्रायव्हेट लिमिटेड अंतिम भाग

कथा एका रहस्यमय बंगल्याची

हनिमून ट्रॅव्हल्स प्रायव्हेट लिमिटेड भाग ३



" मला संपवणार? मला? वेदना काय असतात आता समजेल तुला.." ती आकृती मीतच्या जवळ जायचा प्रयत्न करत होती. पण त्याला जमत नव्हते. 

" तू याच्याकडे काय आहे ते बघ.. मग मी तिच्याकडे बघून घेतो.." शांताराम पुढे सरकला.. आता सगळे संपले असा विचार करून अक्षता आणि मीतने डोळे मिटले.. तोच शांताराम कशाला तरी अडखळून पडला.. सगळ्यांचे लक्ष विचलित झाले.. त्या संधीचा फायदा घेऊन अक्षताने शांताला पुढे ढकलले.. खिशातले भस्म काढून भस्मरेखा काढणार तोच तो आकार गायब झाला.. पण शांता आणि शांताराम मात्र बाहेर येऊ शकत नव्हते.. मीतने त्याच्या खिशातून अभिमंत्रित तांदूळ काढले.. अक्षताने लगेच बॅगेतली रूद्रांक्षाची अंगठी काढली आणि मीतकडे दिली.. तिने स्वतःच्या गळ्यात चेन घातली.. दोघांनी मंत्रोच्चार करत ते तांदूळ दोघांवर टाकायला सुरुवात केली.. ते दोघेही किंचाळत होते. रडत भेकत होते..  

" आम्हाला माफ करा.. आम्हाला जाऊ दे.."

" कसे जाऊ देऊ तुम्हाला? तुम्ही दोघेच खोली सजवून जोडप्यांना ते जे कोण होते त्यांच्या हवाली करत होता ना?" मीतने चिडून विचारले..

" मग काय आतापर्यंत अशा किती जोडप्यांचा बळी इथे दिला असेल कोणास ठाऊक?" अक्षता म्हणाली.

" माफ करा आम्हाला.." ते दोघेही मान खाली घालून म्हणाले..

" एका अटीवर.. हे सगळे काय चालू आहे ते तुम्ही आम्हाला सांगायचे.." मीत म्हणाला.. ते दोघे विचार करत होते तोच बाहेर जोरात वाहणाऱ्या वारा आत आला.. त्या वार्‍याने खुर्ची पडली आणि भस्माची रेषा पुसट झाली.. अचानक कुठूनतरी ती आकृती परत प्रकट झाली आणि तिने शांता व शांतारामवर हातातले द्रव्य फेकले.. ते पडताच ते दोघेही तडफडू लागले.. मीत आणि अक्षता त्यांच्या जवळ जाण्याआधीच ते दोघेही आक्रसून नष्ट झाले.. त्या दोघांनी त्या आकृतीकडे पाहताच विकट हसत ती नाहिशी झाली.. शेवटी सगळे शांत झाले. अक्षता आणि मीत थकून बसले..

"आता याचा पुढचा छडा कसा लावायचा?" मीतने विचारले.

" लागेल. लागेल.. अजून एक मुख्य सूत्रधार तर बाकी आहे.."

" कोण?" 

" त्या जोडप्यांना इथे पाठवणारा.."

"तो इथे येईल?"

" जर शांता आणि शांतारामचा निरोप त्याला मिळाला नसेल तर त्याला इथे यावेच लागेल.. चल त्याची वाट पाहू.."

मीत आणि अक्षता दोघेही बंगल्याच्या आवारात बसले होते.. आजूबाजूला भरपूर कसले कसले आवाज येत होते. वस्तू पडत होत्या.. पण या दोघांच्या अंगावरील रूद्राक्षांमुळे त्यांना ती आकृती इजा पोहचवू शकत नव्हती.. त्या दोघांनाही आठवत होते, या प्रकरणाची सुरूवात कशी झाली ते.. नेहमीची मठातली आरती झाली होती. मठ बंद व्हायची वेळ झाली होती. तोच एक तरूण अक्षरशः रडत तिथे आला होता..

"महाराज, मला मदत करा.." महाराजांनी त्याला उठवले..

" काय झाले? कसली मदत करू तुला?"

" माझी बहिण आणि भाऊजी.." दुःखाने त्याला बोलताही येईना.. अक्षता आणि मीतने त्याला पाणी दिले. तो थोडा शांत झाला..

"आता बोल.."

" माझ्या ताईचे नुकतेच लग्न झाले. दोघेही हनिमूनला गेले. पंधरा दिवस झाले. ना त्यांचा फोन आला ना आमचा फोन लागतो आहे. फक्त चार दिवसांसाठी जाणार होते ते.. पण त्यांचा पत्ताच लागत नाही.."

" तू ते जिथे गेले आहेत तिकडे चौकशी केलीस का?" महाराजांनी विचारले..

"तिथे, पोलीस स्टेशन सगळीकडे चकरा मारल्या.. पण काहीच होत नाहीये.. माझे आईबाबा आणि ताईचे सासूसासरे तर नुसते रडत आहेत.. काहीच सुचेना.. आता तुम्हीच मदत करा मला.." 

" तुझ्याकडे त्यांची एखादी वस्तू आहे?" त्याने दोघांचा लग्नातला फोटो काढून दिला.. महाराज तो फोटो समोर ठेवून ध्यानाला बसले.. थोड्या वेळाने त्यांनी डोळे उघडले.

" मन घट्ट करून ऐक.. त्या दोघांसोबतही काहीतरी वाईट झाले आहे.." हे ऐकून तो अजूनच रडायला लागला.. मीत आणि अक्षताला सुद्धा ते पाहून खूप वाईट वाटले. मीत त्याच्या पाठीवरून हात फिरवत होता.

थोड्या वेळाने तो शांत झाला..

" मला त्या दोषींना शिक्षा करायची आहे. त्याशिवाय मला चैन पडणार नाही.."

" त्यांना शिक्षा तर व्हायलाच हवी. पण ती तुला देता येणार नाही.. कारण इथे समोर घातक अमानवी शक्ती आहे.. ते काम मीत आणि अक्षता करतील.. बरोबर ना?"

" हो महाराज.. " मीत आणि अक्षता एकदम बोलले.. मग झाली नाटकाला सुरुवात.. त्या माणसाची ट्रॅव्हल कंपनी शोधून त्याचा पत्ता लावणे.. मग त्याला जाळ्यात अडकवणे ते आता इथे गाडीत बसून त्याची वाट पाहणे..

    रात्रभर पाऊस आणि ती आकृती धिंगाणा घालत होती.. सकाळ झाल्याबरोबर दोघेही शांत झाले.. रात्रभर तसेच बसून मीत आणि अक्षता दोघांचेही अंग आंबून गेले होते.. ते उठणार तोच दिव्याचा एक झोत आला.. एक गाडी येत होती. दोघेही सावध झाले.. ती व्यक्ती गाडीतून उतरली.. तिने इथेतिथे पाहिले.. त्या व्यक्तीला अक्षता आणि मीतची गाडी दिसली.. तिला हायसे वाटले.. ती पुढे जाणार तोच मीतने त्याच्यावर हल्ला केला..

" तू?? तुम्ही दोघेही??" तो घाबरून म्हणाला..

" हो.. आम्ही दोघेही जिवंत आहोत.. आणि सुखरूप आहोत.. पण तुझे शांताराम आणि शांता मात्र नाही.."

" त्यांना काय झाले?"

" ज्याला तू बळी देत होतास.. त्यानेच त्यांचा बळी घेतला." अक्षता म्हणाली.

" आणि आता जर तुझा प्राण प्रिय असेल तर ते काय आहे आणि त्याचा तुझ्याशी काय संबंध ते सगळे खरेखरे सांग.. नाहीतर.." मीत म्हणाला..

" सांगतो.. सगळे सांगतो.. हा जो बंगला आहे तो इकडच्या राजांचा होता.. लग्नानंतर नवीन जोडप्याने त्यांच्या नवीन आयुष्याची सुरुवात या बंगल्यात करायची अशी त्यांची पद्धत होती. साधारण शंभर वर्षांपूर्वी तेव्हाचे महाराज इथे आपल्या नववधूला घेऊन आले होते. भाऊबंदकी म्हणा कि अजून काही.. कोणीतरी त्याच रात्री बंगल्यावर हल्ला केला आणि त्यात नवीन जोडप्याचा मृत्यु झाला.. ज्याने हे केले त्याने त्या मृतदेहांचे काय केले कळले नाही.. दोन दिवस झाले तरी त्यांचा पत्ता नाही म्हणून आम्ही बघायला आलो तर इथे फक्त झटापट झाल्याच्या खुणा होत्या.. खूप शोधूनही त्यांचे मृतदेह सापडले नाहीत.. तेव्हापासून त्यांचे आत्मे इथे भटकत आहेत."

" पण हे सगळे तुला कसे माहित?"

" माझे पूर्वज राजांचे दिवाण होते.. कितीतरी पिढ्या आम्ही त्यांच्याकडे काम करतो आहोत.. तेच काम मी पुढे चालवतो आहे.."

" पण याचा आणि त्या नवीन बिचार्‍या जोडप्यांचा काय संबंध?"

" हा प्रकार झाल्यानंतर बाकीच्या राजपरिवाराने इथे येणेच सोडून दिले. पण आम्ही सेवकवर्ग कधीतरी यायचो.. त्याचवेळेस त्यांनी पहिल्यांदा एका जोडप्याचा बळी घेतला. आणि नंतर हि प्रथाच पडून गेली.."

" आणि जर कोणी बळी नाही सापडला तर?"अक्षताने विचारले..

" तर.. मग आमच्या कुटुंबाचे वाईट हाल होतात.. ते आम्हाला मरूही देत नाहीत जगूही देत नाहीत.. आता मी हे सगळे तुमच्याशी बोलू कसा शकतो आहे तेच मला कळत नाही.."

" कारण आमच्याकडे सुद्धा काही शक्ती आहेत ज्या आम्ही दुष्ट आत्म्यांच्या विरूद्ध वापरतो.. त्यामुळेच तो आत्मा आता तुला इजा पोहचवू शकत नाही.. आम्हाला त्याच्या कचाट्यातून लोकांना सोडवायचे आहे म्हणजे परत कोणाचाच बळी जायला नको.."

" तुम्ही खरेच सोडवू शकाल, या सगळ्यातून आम्हाला?" त्याने आशेने विचारले..

" हो.." मीत म्हणाला..

"मग मी तयार आहे तुम्हाला सगळी मदत करायला.. कारण मला पण नको वाटते हे सगळे.."

" मला सांग, तुम्ही या बंगल्याचा शोध घेतला होता का?"

" हो.. आधी खूपवेळा घेतला.. पण काहीच सापडले नाही.."

" हा जुना बंगला आहे.. मग याला एखादे तळघर वगैरे आहे?"

" असेल.. नंतर त्या आत्म्याचा त्रास एवढा वाढला कि आम्ही इथे येणेच सोडले.. "

"पण मग तुम्ही तीच खोली का वापरायचात?" 

" कारण अशी त्यांचीच सूचना होती.."

" अक्षता मला असे वाटते मग त्या खोलीतच काहितरी असावे.. चल बघूया.."

" पण मग याचे काय करायचे? याला एकटे सोडले तर जगेल का हा?"

" तुझ्याकडे रुमाल आहे?"

" हो.. पण कशासाठी?"

" दे तर.." मीतने अक्षताचा रुमाल गंगाजलात भिजवला.. त्यात थोडे भस्म टाकले आणि तो रुमाल त्या माणसाच्या हातात बांधला.. 

" याने नक्कीच तुझे रक्षण होईल.." ते सगळे आत निघाले.. बंगल्यामध्ये अजूनही वस्तू फेकाफेकीचा आवाज येत होता.. ते तिघेही आतल्या खोलीत गेले.. बाहेर जोरजोरात खिडक्या, दरवाजे आपटत होते.. त्यांच्या सोबतचा माणूस प्रदीप खूप घाबरला होता.. अक्षता आणि मीतने खोलीची तपासणी सुरू केली.. वेळ कमी होता म्हणून त्यांनी आणलेले महाराजांनी बनवलेले खास द्रव्य काढले.. ते थोडे थोडे शिंपडले.. एका ठिकाणी ते खूप गडद झाले..

" मीत.. इथे.." बाहेरचे वादळ फार वाढले होते.. तिथे भिंतीत एक कळ होती.. ती दाबल्यावर तिकडचा दरवाजा उघडला.. आतून खूप कुबट वास आला..  

"हे नक्कीच कोणातरी माहितगाराचे काम असावे.." मीत बोलला.. 

" हो.. त्याशिवाय हे तळघर इथे आहे हे समजणे मुश्किल होते.."

"आत जायचे?"

" जायला तर हवेच.."

" चला प्रदीप.. आत चला.."

" मी??"

" हो.. तुम्हीपण.. कारण तुम्ही जर तुमच्या राजांना परत एकनिष्ठ झालात तर आमची वाट लागेल.." सगळे आत गेले.. जाताना मीतने दरवाजाची कडी काढून टाकली.. खाली उतरल्यावर त्यांना दिसले. अनेक मृतदेह कुजलेल्या अवस्थेत पडले होते.. ती आकृती दूर कोपर्‍यात दिसत होती. मीत आणि अक्षताला गलबलून आले.. त्यांनी हातातले गंगाजल त्यावर टाकायला सुरुवात केली.. त्यांना मिळालेले एक अस्त्र, एक बी त्यांनी तिथे टाकली.. मीतने माचिसची काडी पेटवली.. सगळे मृतदेह जळायला लागले.. दुसरीकडे मीत आणि अक्षता मंत्रोच्चार करत होते.. बाहेरचे वादळ कमी होत होत अचानक थांबले. अनेक शुभ्र आकृत्या एकामागोमाग एक वर जाताना दिसत होत्या.. ते तिघे बाहेर आले.. आल्यावर प्रदीपने अक्षताचे आणि मीतचे पाय धरले. "तुमच्यामुळे हे सगळे संपले.. मला माफ करा.."

" माफ करणारे आम्ही कोण? तो वर बसला आहे तोच सगळे बघेल.. चला आता आम्ही निघतो.." अक्षता म्हणाली..

   सगळे आभाळ मोकळे झाल्यासारखे वाटत होते.. अक्षता आणि मीत निघाले होते परत आपल्या घरी.. परत आपल्या अशाच कोणा अडचणीत सापडलेल्या व्यक्तींना मदत करण्यासाठी सज्ज व्हायला..



अक्षता आणि मीत माझ्या समर्थांची लेक कथेतील नायक नायिका आहेत.. जे आत्म्यांना मुक्ती देत असतात.. तुम्हाला जर माझ्या कथा वाचायला आवडत असतील, त्या कथा चुकू नये असे वाटत असेल तर ईराच्या पेजवर मला नक्की फॉलो करा.. 


हि कथा कशी वाटली ते सांगायला विसरू नका..

सारिका कंदलगांवकर 

दादर मुंबई

🎭 Series Post

View all