Feb 26, 2024
वैचारिक

घर असावे घरासारखे

Read Later
घर असावे घरासारखे
घर असावे घरासारखे
नकोत नुसत्या भिंती
तिथे असावा प्रेम जिव्हाळा
नकोत नुसती नाती
त्या शब्दांना अर्थ असावा
नकोच नुसती वाणी
सुर जुळावे परस्परांचे
नकोत नुसती गाणी
त्या अर्थाला अर्थ असावा
नकोत नुसती नाणी
अश्रुतुनही प्रीत झरावी
नकोच नुसते पाणी
या घरट्यातून पिलु उडावे
दिव्य घेऊनी शक्ती
आकांक्षांचे पंख असावे
उंबरठ्यावर भक्ती


खरचं किती छान कविता लिहिली आहे कवयित्री विमल लिमये यांनी \"घर कसे असावे \" यावर.
अगदी प्रत्येकाच्या मनातील घराविषयी चे विचार त्यांनी योग्य शब्दांत मांडले आहे.
घर हे फक्त भिंती, दरवाजे, खिडक्या, छत यांनी बनत नाही, या सर्व वस्तूंनी बनते ती फक्त एक वास्तू ...
पण जेव्हा या वास्तूत माणसे आनंदाने राहतात तेव्हा ते घर बनते...
माणसाच्या मूलभूत गरजा अन्न, वस्त्र आणि निवारा होत.
म्हणजे अन्न आणि वस्त्र याबरोबरच निवारा ही महत्त्वाचा!
ऊन,पाऊस, थंडी,वादळ या पासून रक्षण करण्यासाठी प्रत्येक प्राणीमात्राला निवाऱ्याची गरज असते.
पक्षी घरटे बांधतात, प्राणी गुहेत,जंगलात वास्तव करतात ,पशुपक्षी आपल्या निवाऱ्याची जागा शोधतात.
मगं मनुष्य हा तर सर्व प्राणीमात्रांमध्ये बुद्धीवान आहे ,तो तर आपल्या निवाऱ्याची सोय चांगल्या प्रकारे करेलचं ना ?
सुरूवातीला मनुष्य गुहेत राहत होता कारण तेव्हा घर बनवण्याच ज्ञान त्याला नव्हतं.
हळूहळू मग दगड,माती,झाडांची पाने वगैरे साहित्य वापरून आश्रयाची स्थाने बनवू लागला .
आता तर मानवाने एवढी प्रगती केली आहे की घर म्हणजे सर्व सुखसोयींनी युक्त स्थान!
आता तर घर फक्त निवारा,सुरक्षितता याचे स्थान राहिले नाही तर आकर्षणाचे स्थान बनले आहे...
इतरांपेक्षा आपले घर किती चांगले दिसेल याची चढाओढ चालू असते.नुसते घर असून चालत नाही तर घरात चांगले फर्निचर, टेलिव्हिजन, सोफा,अनेक शोभेच्या महागड्या वस्तू इ. अशा सर्व वस्तू असल्या तर घरपण येते अशी घराची व्याख्या बनत चालली आहे.
भारतात आर्थिक विषमता असल्याने अनेक लोक अजूनही झोपड्यांमध्ये ,मोडकळीच्या घरात राहतात, काही लोक तर पुलाखाली, फूटपाथवर मिळेल तिथे आपले आश्रयाचे स्थान शोधतात.
पूर,भूकंप, आग अशा अनेक कारणांनी घरांचे नुकसान होते.लोक बेघर होतात आणि निवाऱ्याच्या सोयीसाठी वाट पाहत असतात, वाट शोधत असतात.
झोपडी,छपराचे घर,मातीचे घर,पत्र्याचे घर ,सिमेंटचे पक्के घर .
घर कशाचेही आणि कसेही असो प्रत्येकाला आपले घर नक्कीच आवडत असते.
घरासोबत अनेक आठवणी जडलेल्या असतात.
कष्टाने कमवलेल्या पैशातून घर बांधणे,
प्रत्येक व्यक्ती घर बांधण्यास सुरुवात केल्यापासून घराची अनेक स्वप्ने पाहत असतो.
घर बांधून पूर्ण होताच आपल्या आवडीच्या वस्तूंनी घरास सजवतो. प्रेमाने,आनंदाने घरात राहण्याचे स्वप्न पूर्ण होणे म्हणजे एक अलौकिक आनंद !
आर्थिक प्रगती झाली की मनुष्याचे घराचे स्वरूप ही बदलत जाते,झोपडीत राहणारा दगडमाती,पत्र्याच्या घरात जातो, हळूहळू चाळ,अर्पाटमेंट,ब्लॉक,बंगला,टोलेजंग इमारती अशी अनेक घरांची स्वप्ने रंगवत जातो...
गावाकडची घरे म्हणजे दगडमातीची,छपरांची,कौलांची,पत्र्यांची घरे.
घराभोवती मोकळी जागा ,तिथे गुरांसाठी गोठा,कोंबड्या साठी खुराडा अशी पाळीव प्राण्यांची पण राहण्याची सोय केलेली असते.
घरासमोर तुळशीवृदांवन ,आजुबाजूला विविध झाडे.अशी गावाकडची घरांची व्यवस्था .
आता गावातही लोक सिमेंटची पक्की घरे बांधत आहे.गावातील घरांचेही स्वरूप पालटत आहे.उद्योग, नोकरी या निमित्ताने गाव सोडून लोक शहरात स्थलांतर करतात त्यामुळे गावाकडची अनेक घरे ओस पडलेली असतात.
शहरात रोजगाराच्या संधी जास्त असल्याने अनेक लोक शहराकडे येतात आणि तिथेच वास्तव्य करतात .शहरातील वाढणाऱ्या लोकसंख्येमुळे गावाकडील ऐसपैस घराची सवय असणारे लोक छोट्या छोट्या घरात राहू लागतात.
शहरांमध्ये जागेअभावी आणि लोकांना राहण्याची सोय व्हावी या दृष्टीने टोलेजंग इमारती बांधल्या जातात.
घरांच्या वाढत्या किंमती यामुळे अनेकांना स्वतः चे घर घेणे शक्य नसते,अनेक कुटुंब भाड्याच्या घरातचं वर्षानुवर्षे राहत असतात.
स्वतःचं,हक्काचं आपलं एक तरी घर असावं यासाठी प्रत्येक जण झटत असतो,कर्ज काढतो,पण स्वतः च्या घरात राहण्याचा आनंद अनुभवतो...
घरात सुखशांती रहावी म्हणून वास्तुशास्त्रानुसार लोक घर बांधतात. पूजा,यज्ञ,होमहवन करतात.
हौशी लोक आर्किटेक्ट च्या साहाय्याने घरातील जागेचा योग्य वापर करून आपल्याला घरात हव्या असणाऱ्या सर्व सुखसुविधा पूर्ण करून घेतात.
पूर्वी एकत्र कुटुंब पद्धती होती.घर मोठे असो वा छोटे ,सर्व गुण्यागोविंदाने राहत होते.
आता प्रायवसी च्या निमित्ताने विभक्त कुटुंब पद्धती सुरू झाली .
आता घरात कुत्र्यामांजरांना जागा केलेली असते पण आईवडिलांची जागा वृद्धाश्रमात असते.
वृद्धाश्रम, अनाथाश्रम, धर्मशाळा ही ठिकाणं म्हणजेचं अनेक बेघर लोकांसाठी घरचं!
घर चांगले असावे,सुंदर असावे,स्वच्छ असावे,सर्व सुखसोयींनी युक्त असावे पण त्याबरोबर घरातील व्यक्ती ही चांगल्या असतील,सर्वांचे एकमेकांवर प्रेम,विश्वास असेल,येणाऱ्या-जाणाऱ्या व्यक्तींबद्दल आदरभाव असेल तर घरात नेहमी सुखशांती नांदेल नाही तर घर हे घर राहत नाही राहते ते फक्त आश्रयाचे स्थान.....


निवाऱ्याची सोय म्हणून असावे घर
संरक्षण, सुरक्षितता यासाठी असावे घर
थकलेल्या शरीराला आराम मिळावा म्हणून असावे घर
मरगळलेल्या जीवाला शांतता मिळावी यासाठी असावे घर
आपल्या प्रियजनांसोबत रहावे म्हणून असावे घर
प्रेमाने, आनंदाने जीवन जगावे यासाठी असावे घर.....
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
//