होळी रे होळी, पुरणाची पोळी

सामाजिक भान जमतही सण साजरा करता येतो..

'रंग बरसे भिगी चुनरवाली रंग बरसे'

' आज ना छोडेंगे बस हमजोली'

'नीला ना पिला ना लाल गुलाबी'

'आला होळीचा सण लय भारी चल नाचूया'

        आज वीरच्या खोलीतून जोरजोरात होळीच्या गाण्यांचा आवाज येत होता.. त्या आवाजाने आजोबांची झोपमोड झाली होती..

" अरे, वीर काय म्हातार्‍याला भरदुपारी गाणी ऐकवून मारायचा विचार आहे कि काय तुझा?" आजोबांची झोपमोड झाल्याने चिडचिड होत होती..

" सॉरी आजोबा.. ते काय आहे होळी आली आहे ना.. मग गाणी निवडून ठेवत होतो वाजवायला.. मागच्या वेळेस शेजारच्या अभयला काम दिले होते.. तर त्या मुर्खाने 'दीपावली मनाये सुहानी, गोविंदा आला रे आला' अशी गाणी लावली होती.. सगळे चिडले होते.. म्हणून यावेळेस हि जबाबदारी मी घेतली आहे.. तीच गाणी शोधत होतो.." वीरने गाण्यांचा खुलासा केला.


" हि काय गाणी आहेत? गाणी आमच्या वेळेस होती..' सख्या चला बागामंदी रंग खेळू चला '

' अग नाच नाच राधे, उडवूया रंग',

   'आज गोकुळात रंग खेळतो हरी',

' खेळताना रंग बाई होळीचा, फाटला ग कोना माझ्या चोळीचा..' " शेवटचे गाणे गाताना हळूहळू आजोबा त्यानुसार हातवारे करून नाचायला लागले.. "आजोबा तुम्ही सुद्धा?" वीरने हसत विचारले..

" हे आपलं उगाच.." आजोबा सावरत म्हणाले.." मला सांग होळीला हि गाणी कधी लावणार तुम्ही?"

" त्याचे काय आहे आजोबा," वीरने उत्साहाने सुरूवात केली. " होळीच्या दिवशी संध्याकाळपासून म्हणजे तयारी करताना लावणार.. ते रात्रीपर्यंत.. आणि मग धुलीवंदनाच्या दिवशी फूल डिजे वगैरे.. धमाल प्लॅन आहे.."

" धुलीवंदन??.. धुळवड म्हणा धुळवड.. आम्ही कसे होळीला गावी जायचो.. रंगपंचमीला रंग खेळायचो.. काही राहिले नाही हो आता.."

" बस काय आजोबा.. पुरणपोळी तर तीच आहे ना.. होळीरे होळी, पुरणाची पोळी.."

" बस.. बस.." आजोबा त्याला गप्प करत म्हणाले..

   अरेच्चा पात्रांची ओळख करून द्यायचीच राहिली.. पण गरज आहे का आता? तरिही.. हे आहे आपले जुनेच कुटुंब.. समीरा, सुदीप बँकेत नोकरी करणारे मध्यमवयीन दांपत्य.. त्यांचा कॉलेजला जाणारा मुलगा वीर आणि निवृत्त आजोबा असे चौघांचे सुखी कुटुंब.. आता बघूया आजोबांच्या मनात काय चालू आहे होळीसाठी..


" काय चालले आहे तुमच्या दोघांचे गुफ्तगू?" समीराने विचारले..

" आई , तू कधी आलीस? "

" तुझी पुरणाची पोळी चालू होती तेव्हा.. आणि काय रे खालच्या काकू ओरडत होत्या, दुपारी जोरात गाणी लावली होतीस म्हणून.." 

"अग,काही नाही. होळीची तयारी सुरू होती. गाणी सिलेक्ट करत होतो."

" मग समीरा, तुझा काय प्लॅन आहे होळीचा?"

" काही नाही. नैवेद्यासाठी तरी पुरणपोळ्या करायला लागणारच ना?"

" आई, यावेळेस होळीला नैवेद्य आणि नारळ मी वाहणार.." 

" चालेल.. त्यात काय एवढे ? तू दाखव नैवेद्य.."

" दाखवायचा नाही.. होळीत टाकायचा असतो ना?"

" टाकायचा नाही म्हणायचे.. अर्पण करणार म्हणावे.." समीराने वीरला दटावले.

" काय झाले बाबा? कसला विचार करताय?" सुदीपने विचारले..

" आज मजा आहे माझी.. तुम्ही दोघेही बेल न वाजवता आलात.. माझा उठायचा त्रास वाचला.." वीर बोलला..

" काही नाही त्रास वाचणार.. उठ आणि पाणी दे मला." सुदीप म्हणाला. 

" बाबा , काय? काहीच बोलत नाही." आजोबांना विचारमग्न बघून सुदीपने परत विचारले..

" काही नाही रे थोडा विचार करत होतो.. मला सांग समीरा, तू पूर्ण नैवेद्य होळीत अर्पण करतेस ना?"

" हो बाबा, आपण दरवर्षी तेच तर करतो.. आज असे का विचारताय?"

" काही नाही.. सोसायटीत चार बिल्डिंग्ज.. एका बिल्डिंग मध्ये 20 कुटुंब.. म्हणजे एकूण ऐंशी झाले.." आजोबा स्वतःशीच पुटपुटत खोलीत गेले.. 

"आता यांना अचानक काय झाले?" सुदीपने वीरला विचारले..

" मला काही विचारू नका.. मगाशी चांगले होते.. होळीची गाणी वगैरे म्हणत होते.." वीरने स्वतःला सेफ करून घेतले..

" होतील थोड्या वेळात नॉर्मल.. चला मला स्वयंपाकाची तयारी करायची आहे.." समीरा म्हणाली..

" आता तुम्ही आला आहात तर मी पण होळीचे रंग आणायला जातो.." वीरपण तिथून सटकला..


" काय झाले बाबा? खूप दमलेले दिसताय? पाय दुखतात का?" समीराने विचारले..

" दुखणार नाहीत तर काय? आज दोन बिल्डिंगचा पायी दौरा केला आहे. आणि मगाचपासून पायाला बाम लावून दे, शेकायला गरम पाणी दे.. असा माझा जीव काढला आहे.." वीर वैतागला होता..

" बाबा काय झाले? कशासाठी वरखाली केलेत एवढे जमत नसताना?" समीराने काळजीने विचारले.

"कळेल होळीच्या दिवशी.. मला सांग तुला होळीच्या दिवशी एका माणसाचे जास्तीचे जेवण करायला जमेल का? मीच केले असते.. पण झाले असे आहे कि आज दोन बिल्डिंग केल्या, उद्या दोन. माझ्यात पूर्ण स्वयंपाक करायची ताकद राहणार नाही मग. माझेपण वय झाले आता.."

" हो बाबा, करीन कि त्यात काय एवढे. सांगा मग होळीच्या दिवशी.."


होळीच्या दिवशी अख्खी सोसायटी खालच्या मोकळ्या जागेत होळीसाठी जमली होती. प्रत्येकाच्या हातात पूजेचे ताट आणि प्लॅस्टिकचा डबा होता. सर्व मुलांनी मिळून होळी उभारली होती.. पाण्याचे फुगे भरून ठेवले होते.. प्रतिक्षा होती ती फक्त होलिकादहनाची.. अध्यक्षांनी पूजा केली.. ते होलिकादहन करणार इतक्यात आजोबा पुढे झाले.. 

"दोनच मिनिटे द्या मला. मी आपल्या सोसायटीतील सगळ्या महिलांशी बोललो आहे. ते फक्त आता सगळ्यांना सांगतो.. दरवर्षी आपण सगळेच जण होळीत नैवेद्य अर्पण करतो.. यावर्षी थोडे वेगळे.. आपण आपल्या नैवेद्याचा फक्त एकच घास अर्पण करूया.. बाकीचा नैवेद्य आपण आपल्या समोर जी उपाशी माणसे आहेत त्यांना देऊया.. कोणावरही जबरदस्ती नाही.. पटले तर बघा. नाहीतर तुमची इच्छा.." असे बोलून आजोबा पाठी झाले.. यावर कोणीच काही बोलले नाही.. पूजा झाली.. होलिकादहन झाले.. आणि एकेक डबे आजोबांच्याजवळ जमा होऊ लागले.. वीरने आणि त्याच्या मित्रांनी ते डबे मोजले.. बरोबर ऐंशी होते..

"आता या डब्यांचे काय करायचे?" अभयने विचारले..

" आता तुमच्या गाड्या काढायच्या. डबे घ्यायचे आणि जे उपाशीतापाशी दिसतात त्यांना द्यायचे.." आजोबा सद्गदित होऊन म्हणाले..

मुलांनी गाड्या काढल्या. डबे वाटून घेतले आणि निघाले मोहिमेवर.. सगळे सभासद मुलांची वाट बघत होळीजवळ थांबले होते. पण अक्षरशः पंधरा मिनिटातच ते सगळे परत आले. सगळ्यांनी आजोबांना घेराव घातला...

" thank you so much आजोबा.. आज तुम्ही आम्हाला जाणीव करून दिली कि अन्न नैवेद्य म्हणून अर्पण केल्यावर जेवढे पुण्य लागते त्याच्यापेक्षाही जास्त पुण्य एखाद्या उपाशी व्यक्तीच्या मुखात पडल्यावर लागत असावे.." अख्ख्या सोसायटीच्या डोळ्यात पाणी होते..


धुळवडीला आजोबांना मुलांच्या ग्रुपमध्ये खास निमंत्रण होते , हे काय वेगळे सांगायला हवे?


कथा कशी वाटली सांगायला विसरू नका..

सारिका कंदलगांवकर 

दादर मुंबई