हो....मी ढं आहे!

स्पर्धात्मक आयुष्याकडे पाहण्याचा नाविन्यपूर्ण दृष्टिकोन.

हो.... मी ढं आहे!


हसताय का असे? खरंच मनापासून सांगते, "मी ढं आहे!" म्हणजे मला शाळेत कमी मार्क वगैरे नाही पडले कधी...तेव्हा म्हणतंच नव्हतं कोणी मला ढं... काय करणार? पण आता? आता मात्र परिस्थिती बदलली आहे बरं का! म्हणजे काही वर्षांपूर्वी बघा, मला कोणी "हे येत नाही, ते येत नाही" म्हटलं की वाटायचं, "अरेच्या! सगळ्यांना येतं, आपल्याला कसं बुवा येत नाही? यायलाच पाहिजे!" नि मग सुरू व्हायचा तो प्रवास...हट्टाने, कष्टाने, प्रयत्नाने, भरपूर वेळ देऊन एखादी नवी गोष्ट शिकण्याचा अट्टाहास...मग ते बऱ्यापैकी जमणे, न जमणे, अजिबातच न जमणे, चांगलं , छान, अत्त्युत्तम जमणे हे टप्पे ओघानेच आले. वाटलंच मला , हे वाचून लगेच पदार्थच आले असतील डोळ्यासमोर...पण नाही हो...अगदी कोणतीही गोष्ट असली तरी "मला कशी येत नाही? आलीच पाहिजे" या हट्टाने माझी खूप वर्षं खाल्ली...खाल्ली कसली? गिळंकृत केली! अगदी वायाच घालवली म्हणा ना! पण आता मात्र मला खरं खरं समाधान लाभलंय...अगदी सुखी माणसाचा सदरा म्हणतात ना, तोच मिळालाय मला! खरंच... मला कळलंय की मी अगदी ढं आहे. काही गोष्टी मला अज्जिबात म्हणजे अज्जिबात म्हणजे अज्जिबातच येत नाहीत...कसलं समाधान लाभतं माहितेय असं वाक्य म्हटल्यावर...अगदी सुख- सागरात डुंबत असल्याचा भास होतो! असे काय बघता? अहो काही वेड बीड नाही लागलं मला, उलट खूssप शहाणी झालेय मी! कारण मला कळलंय की मी ढं आहे....थांबा, लगेच फोन नका करू त्या सायकीऍट्रीस्टला. सांगते ना मी आधी सगळं नीट..
आम्ही मैत्रिणी की नै अशाच गप्पा मारत होतो हो...एक मैत्रीण म्हणाली, अगं सुमे, ती मिता आहे ना, मस्त पुरणपोळ्या करते, मऊ लुसलुशीत.....जाऊया का तिच्याकडे शिकायला? मग आठवले माझ्या पुरणपोळ्या पाहून नवऱ्याच्या नि मुलाच्या चेहऱ्यावरचे भाव....आणि मग तर घेतलाच निर्णय नि गेलोच की हो लगेच दोघी आणि मितानेही मनावरच घेतलं फार...मग पीठ, पुरण,लाटणं, शिवजणं ,घोटा,वाटा, लाटा..... हाय रे दैवा... पसाराच पसारा आणि मिताने आमच्या प्रयत्नांपुढे पसरलेली शरणागती... अहो तिच्या स्वयंपाक घराचा नकाशाच बदलला होता ना आम्ही...पुन्हा कध्धीच येऊ नका म्हणाली....त्यावर मी पण म्हटलं असं कसं, असं कसं? तुला शिकवताच येत नाही...एखादी गोष्ट करता येणं वेगळं नि इतरांना शिकवता येणं वेगळं....नि मग मिताही चिडलीच की..म्हणते कशी...होss माहितेयss....लागून गेली मोठी पुरस्कार प्राप्त शिक्षिका!!आणि तेव्हा डोक्यात प्रकाश पडला की अरे हो... हो...आहेच मी एक शिक्षिका...शिकतात मुलं आवडीने, खूप आवडतं मला शिकवायला, मुलांमध्ये रमायला, लिहायला, वाचायला...खूप खूप आवडतं नि करतेच मी माझं काम मनापासून...प्रेमच आहे म्हणा ना माझं माझ्या पेशावर! आणि मग माझा मुद्दा मी मिताच्या गळी उतरवलाच...उगीच नाही नावाची शिक्षिका.. म्हटलं अगंss... भांडण सोडून दे! मी आहे की नाही तुझ्या मुलांची लाडकी शिक्षिका, तशी तू माझ्या मुलांची लाडकी मावशी...पुरणपोळी क्वीनच गं! तुला शिकवता येत नाही, मला पुरणपोळी येत नाही. मी तुझ्या मुलांना शिकवते, तू माझ्या मुलांना पुरणपोळी करून देतेस...तू पुरणपोळीत हुशार, मी शिकवण्यात हुशार....तू शिकवण्यात ढं, मी पुरणपोळी करण्यात ढं.... आणि काय गम्मते पहा... करुन टाकलं की आम्ही दोघींनी मान्य... की आम्ही दोघी एका गोष्टीत हुशार असू पण दुसऱ्या गोष्टीत ढं गोळेच आहोत....आणि मग की नै स्पर्धाच लागली आमच्यात......माझं पुरणपोळीचं काम वाचलं, तिचं शिकवण्याचं आणि मग "आपण अजून कश्शा कश्शात ढं आहोत आणि दुसरी कोणती मैत्रीण त्या त्या गोष्टीत हुश्शार" हे शोधायची मोहीमच घेतली आम्ही हाती...यादीच करून टाकली "मी स्वतः जाहीर करते की मी........या या सर्व गोष्टीत ढं आहे. नि ते मला मान्य आहे...ज्यांना ज्यांना या गोष्टी छान येतात, जे जे यात तरबेज आहेत त्यांनी नावे सांगा," त्या त्या ठिकाणी त्यांची नावे लिहिली आणि काय सांगू...? झाली ना सगळी कामं मॅनेज फटाफट!! आता इतका मस्त रिकामा वेळ मिळतो, हव्वा तस्सा घालवता येतो...स्वतःला आवडेल ते, हवं ते करता येतं, मला कोणी नावं ठेवेल का याची भीती तर मुळीच वाटत नाही आणि ठेवली नावं तर बरंच आहे ना, करा म्हणावं ज्याला येतं त्याने..मी आपली निवांत! अहो अहो, निर्लज्ज आणि आळशी नाहीये काही मी....मलाही येतंच की बरंच काही! आणि ज्या गोष्टी मला मनापासून करायला आवडतात त्या मी अगदी जीव ओतून करते, त्यासाठी भरपूर वेळ देते, त्यावर सखोल विचार करते, मला आवडणारं काम चांगलंच कसं होईल, त्याचा इतरांनाही फायदा कसा होईल, त्यात अजून नवीन मी काय करू शकते याचाही अगदी सतत विचार आणि तशी कृती करतेच ना मी! फक्त त्या पेक्षा मी ढं असलेल्या गोष्टींची यादी जरा थोडी जास्तच मोठी आहे इतकंच...पण समाधान म्हणाल ना तर ज्याचं नाव ते...मनशांती हवी असेल ना तर उगीच हे नाही, ते नाही, मला हे आलं पाहिजे, ते जमलं पाहिजे या फुकाच्या चिंता सोडून द्याव्यात आणि मान्यच करून टाकावं की मला या नि अशा अनेक गोष्टी येत नाहीत! गिल्टी नको हं वाटायला, आपण काय देव थोडीच आहोत सगळं काही आपल्यालाच यायला...काही गोष्टी इतरांना आपल्यापेक्षा छानच जमतात हे मान्य करावं, त्यांना मोकळेपणाने त्याची पोचपावतीही द्यावी . स्वतःला आहे तस्सं स्वीकारावं नि मज्जेत जगावं...आणि बिनधास्त म्हणावं...हो , हो आहे मी ढं!!
( स्वतःचं ढं असणं मिरवू इच्छिणाऱ्या सर्व मैत्रिणींना समर्पित)

शर्वरी ताथवडेकर

22/01/22