हिस्सा...

Story Of A Son Asking For Share In Property
" बाबा, आज पिक्चरचे नक्की ना? माझे सगळे फ्रेंड्स जाउन आले आहेत. " यश आणि सोनिया त्यांच्या बाबांना विचारत होते.
" हो..बुकिंग झाले आहे. आईला नका सांगू. आपण सरप्राईज देऊ.."
" डन"... दोघे खुश होऊन म्हणाले.
यश आणि सोनिया एक कॉलेज मध्ये बारावीला दुसरी दहावीला.. अजूनपर्यंत तरी आईबाबांसोबतच फिरणारे. सानिका आणि सुयश त्यांचे आईबाबा.. आई शाळेत शिक्षिका तर वडिल एका इंटरनॅशनल कंपनीत कामाला.. अजून एक कुटुंबातील प्रमुख व्यक्ती , ती म्हणजे सुयशची आई , वृंदाताई...
करोनानंतर पहिल्यांदाच मुलांनी पिक्चरचा प्लॅन केला होता. वृंदाताई इंग्लिश पिक्चर पहात नसल्यामुळे आधीच त्यांना कल्पनाही दिली होती आणि संध्याकाळच्या खाण्याची सोयही मुलांनी करून ठेवली होती..
दुपारी वृंदाताईंनी सुयशला हाक मारली, " सुयश बघरे माझ्या अंगाला मुंग्या येत आहेत.."
"आई एक काम करू, आपण पटकन दवाखान्यात जाऊ या... "
सुयश आणि यश लगेचच वृंदाताईंना घेऊन दवाखान्यात गेले. त्यांचे बी.पी. जास्त वाढल्यामुळे त्यांना तिथेच ॲडमिट केले. थोड्याशा घाबरलेल्या सोनियाने आईला आपल्या पिक्चरच्या प्लॅन बद्दल सांगितले.
" एक काम करा, तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणींना कोणाला तरी विचारा. कारण काही झाले तरी मला आणि बाबांना इथेच थांबावे लागेल. "
थोड्या वेळाने सोनिया, "आई मी माझ्या आणि दादाच्या सगळ्याच फ्रेंड्सला विचारले, पण काही जणांचा आधीच दुसरा प्लॅन ठरला आहे आणि काही जणांना ते थिएटर लांब वाटतंय."
" मग एक काम करा, तू आणि दादाच जा."
"आई, बाबांनी खूप महागाची तिकिटे काढली आहेत ग..."
" बाळा , काय करायचे मग? आपण आजीला असेच सोडून तर नाही ना जाऊ शकत? नाहीतर आपण थोडा वेळ थांबू. बाबा किंवा यशला घरी येऊ दे मग ठरवू."
इथे दवाखान्यात वृंदाताईंचे बाकीचे रिपोर्ट्स ओके होते. फक्त दोन,तीन दिवस हॉस्पिटलमध्ये रहावे लागणार होते. डॉक्टरांशी बोलणे झाल्यानंतर सुयशने परदेशी असलेल्या आपल्या भावाला नीलला आईला ॲडमिट केल्याचा मॅसेज करून ठेवला.
सगळे स्थिरस्थावर झाल्यावर यशचा उतरलेला चेहरा पाहून वृंदाताईंना त्यांच्या पिक्चरचा प्लॅन आठवला." सुयश मी बरी आहे. तू एक काम कर, मुलांना घेऊन जा पिक्चरला."
हे ऐकून यशचा चेहरा उजळला.
"आई तुला असे सोडून कसे जाऊ मी? मुले जातील सानिकासोबत.मी थांबतो इथे."
" हे बघ, दोन तीन तासांचा प्रश्न आहे. मी आता बरी आहे. त्यातून काही लागलेच तर इथे डॉक्टर, नर्स आहेतच..आणि माझ्याकडे मोबाईल आहे. मी तुला फोन करीन."
हो, नाही करता करता सुयश घरी जायला तयार झाला. घरी फोन करून त्याने तसे सांगितले. सानिकाने तयार ठेवलेला डब्बा देऊन पुढे जायचे ठरवले..त्याप्रमाणे ते निघाले. खूप दिवसांनी एकत्र बाहेर पडल्यामुळे मुले खुश होती. तेवढ्यात नीलचा फोन आला," दादा काय झाले आईला? बरी आहे ना? फोन दे जरा तिला.."
" नील, आई बरी आहे. फक्त बीपी वाढले होते म्हणून ॲडमिट केले आहे. आणि मी जरा बाहेर आहे." सुयश अपराधी स्वरात म्हणाला..
" ओह्ह, मला वाटले तू बसला असशील आईजवळ."
"अरे मागच्या आठवड्यात पिक्चरची तिकिटे काढली होती , मुलांचे खूप दिवस चालले होते. त्यांनी त्यांच्या फ्रेंड्सना पण विचारले, पण कोणीच तयार होईना, आईही बरी आहे, म्हणून आम्ही निघालो."
" ओके, तुम्ही तुमचा मूव्ही एन्जॉय करा. आईकडे तिचा मोबाईल असेल ना, मी बोलतो तिच्याशी, " नील थोडासा कुजकटपणे बोलला.
मुलांचा मूडऑफ होऊ नये म्हणून सुयश काही बोलला नाही तरी सानिकाला थोडा अंदाज आलाच..पण तिने शांत रहाणे पसंत केले.
दुसर्‍या दिवशी सकाळी सुयश सकाळचा नाश्ता घेऊन हॉस्पिटलमध्ये जायला निघतो न निघतो तोच नीलचा फोन, " काय दादा, कोणत्या हॉस्पिटल मध्ये ठेवले आहेस आईला? रात्रभर तिथे एक डास चावत होता तिला. आत्ताच बोललो मी तिच्याशी. जाताना जरा ओडोमॉस वगैरे घेऊन जा."
" पहिली गोष्ट नील, मला जे हॉस्पिटल जवळ आहे मी तिथेच ठेवले आहे कारण सकाळ, संध्याकाळचा नाश्ता, दुपारचे, रात्रीचे जेवण , डॉक्टर येण्याची वेळ या सगळ्यासाठी मला किंवा मुलांना ये जा करावी लागते. त्यामुळे मला सोयीस्कर असे हॉस्पिटल मी निवडले. आणि कुठे आहे म्हणशील तर आता डबा घेऊन हॉस्पिटल मध्येच निघालो आहे. अजून काही सांगू का? नीलच्या वागण्याने वैतागलेला सुयश चिडून बोलला..
" काही नाही दादा, मी बोलतो नंतर," नीलने फोन ठेवून दिला.
यथावकाश वृंदाताई हॉस्पिटल मधून बर्‍या होऊन घरी आल्या. काही दिवसांनी नीलने दिवाळीसाठी आपण भारतात येत असल्याचे आईला सांगितले. हॉस्पिटलच्या घटनेनंतर दोघाही भावांचे एकमेकांशी बोलणे कमी झाले होते. त्यांनी सुयशला तसे सांगितले.. नील आणि त्याच्या कुटुंबाची भारत फेरी म्हणजे त्यांच्या कामासाठीच असे. एक दिवस फक्त वृंदाताईंची भेट, तिथून आणलेल्या वस्तू द्यायच्या आणि इकडच्या वस्तू घेऊन जायच्या.बाकी सगळे दिवस नीलच्या बायकोच्या दिव्याच्या माहेरी राहायचे..नंतर फक्त फोनवर बोलणे. त्यामुळे मुलांची सुद्धा कधी नाती जुळली नाहीत.
यावर्षी ते दिवाळीत येणार आहेत म्हणून वृंदाताई उत्साहात होत्या. त्यांनी आणि सानिकाने मिळून दिवाळीचे बरेचसे पदार्थ तयार केले. त्यांच्यासाठी भेटवस्तू आणून ठेवल्या.
मुले हे सगळे पहात होती. यशने आईला विचारले, " आई, गेले काही महिने आजीला बरे नसते म्हणून आपण कुठेच गेलो नाही. यावर्षी काका येत आहेत तर आपण चार दिवस कोकणात जाउ या का? तो घेईल आजीची काळजी."
सानिका काही बोलायच्या आधीच वृंदाताईने हे ऐकले आणि त्या म्हणाल्या, "नको काळजी करू यश, मीच सांगते नीलला.. तुम्ही करा बुकिंग. नंतर बुकिंग पण मिळणार नाहीत आणि तुमच्या परिक्षा लागल्या कि कोणालाच हलता येणार नाही."
" थॅंक यू आजी." यश आणि सोनिया खुश होऊन म्हणाले.
नील दिवाळीच्या आठ दिवस आधीच भारतात आला. नेहमीप्रमाणे आल्यावर दोन तीन दिवसांनी आईला भेटायला आला.. सगळ्यांची भेट झाली. वस्तूंची देवाणघेवाण झाली.सगळे खुश होते. बोलता बोलता सुयश म्हणाला," यावेळेस लक्ष्मीपूजनाला कितीतरी वर्षांनी सगळे एकत्र असू हो ना?"
दिव्याने चमकून नीलकडे पाहिले. तसे नील पटकन म्हणाला, " दादा दिवाळीत दिव्याच्या आईने एक मोठा कार्यक्रम ठेवला आहे त्यामुळे आम्ही चारही दिवस तिथेच असू."
हे ऐकून वृंदाताईंचा चेहरा पडला. पण सावरून घेत त्या म्हणाल्या," बरे ते चार दिवस तिथे रहा. नंतर हे चौघे बाहेर जाणार आहेत तेव्हा चार दिवस इथे राहा. त्यात काय एवढे?"
"आई, अग माझी खूप कामे आहेत. मला नाही जमणार परत यायला." नील म्हणाला.
"अरे...मला तर वाटत होते कि आई आजारी आहे म्हणून तू तिच्यासाठी आलास. तुला तर तिची किती काळजी वाटत होती," सुयश बोललाच.
"दादा, खरे सांगायचे तर माझे ममी पपा त्यांच्या इस्टेटीची वाटणी करणार आहेत. त्याचसाठी त्यांनी आम्हा बहिण भावंडांना इथे बोलावले आहे. इन फॅक्ट मी तर आईंना सांगीन कि त्यांनी सुद्धा विल करूनच टाकावे, म्हणजे कोणालाच काही प्राॅब्लेम नको," दिव्या म्हणाली.
सगळ्यांनाच धक्का बसला कारण हा विचारच कोणी कधी केला नव्हता.सगळ्यात आधी भानावर आल्या वृंदाताई. " अगदी बरोबर बोललीस दिव्या. हिस्से तर करायलाच हवेत. पण मग ते सगळ्याचेच करायचे ना?"
आपल्याला ओरडा बसण्या ऐवजी आपले ऐकून घेतले जात आहे हे बघून दिव्याला बरे वाटले, " हो ना आई. नील पण तुमचाच मुलगा आहे ना. मग त्याला पण तुमचे जे आहे ते मिळालेच पाहिजे. तसे आम्हाला तिथे काही कमी नाही. पण एक हक्क असतो ना?"
" अगदी बरोबर. जसा पैशावर, जागेवर, दागिन्यांवर वारसा हक्क असतो ना तसाच हक्क वेळेचा, जबाबदारीचा सुद्धा असतो असे नाही वाटत तुला. म्हणजे बघ दवाखान्यात असताना हे कर ते कर , सांगणे सोपे असते पण स्वतःचे कामधंदे सांभाळून आजारी माणसाच्या वेळा सांभाळणे अवघड असते. आता मी बरी असताना तुम्ही इथे माझ्यासोबत राहू शकत नाहीत. मग हे चौघे ज्या जबाबदारीने माझी काळजी घेतात, त्याचा हिस्सा कसा करायचा?"

यावर सगळेच अबोल होते, सानिका आणि सुयश आपली बाजू समजून घेतली म्हणून , मीत , सोनिया आपण कसे वागले नाही पाहिजे ह्याचा विचार करत तर नील आणि दिव्या आपले खरच काही चुकले का याचा विचार करत..


कथा कशी वाटली सांगायला विसरू नका..
सारिका कंदलगांवकर
दादर मुंबई