त्याचा निर्णय..... तेंव्हा आणि आता....

नाते, घटस्फोट


             शेवटची हिअरिंग होती आज त्यांची, फॅमिली कोर्टात. गेले वर्षभर केस चालू होती घटस्फोटाची. नेहमी प्रमाणेच सकाळचे आठ वाजले होते. नेहमी प्रमाणेच साऱ्यांची नित्यकर्मे चालू होती. नेहमी प्रमाणेच घड्याळाचे काटे आपल्या गतीने पुढे सरकत होते. 



               पण गौरीची मात्र आज खूप चिडचिड होत होती. डोळे सारखे भरून येत होते. सकाळची कामे आवरत होती ती किचन मध्ये. पण त्यात लक्ष नव्हते अजिबात. त्यामुळे चुका होत होत्या सारख्या.



                  आवरता आवरता दहा वाजले आणि तिची चलबिचल सुरू झाली. निघावे लागेल आता, नाहीतर उशीर होईल. नको असतांनाही घड्याळाचे काटे पुढेच धावत होते. गौरीला मात्र वेळ पुढे सरकूच नये असे वाटत होते. पण काय करणार काळा पुढे कोणाचे चालले आहे?



             गौरीने आवरले स्वतःचे आणि हॉल मध्ये आली. आई बाबा दोघेही खाली मान घालून बसले होते... दोघांच्याही डोळ्यातली अगतिकता अश्रुंवाटे वाहत होती. आपल्या एकुलत्या एक लाडक्या लेकीचा संसार मोडत असतांना कुठले आई वडील शांत राहू शकतील?



             गौरी आलेली पाहून आई,बाबा उठले. आणि तिघेही दरवाज्या बाहेर पडले. स्टॉप वर आले आणि रिक्षात बसून कोर्टात निघाले...



                 रिक्षाच्या वेगापेक्षाही गौरीच्या मनातले विचार वेगात धावत होते. गेले वर्षभर काय चुकले आपले हाच विचार ती करत होती.



               गौरी वीस वर्षाची झाली आणि आईबाबांनी तिच्यासाठी स्थळ बघायला सुरूवात केली. देखणे रूप,पदवी पर्यंतचे शिक्षण, आणि सुसंस्कारित वागणे बोलणे यामुळे, सुशांतच्या आलेल्या पहिल्याच स्थळाकडून होकार आला...



             सुशांत ही दिसायला चांगला, मोठ्या कंपनीत चांगल्या पदाची नोकरी, आईवडील खेड्यात राहत असले तरी सुशिक्षित, शहरात स्वतःचा फ्लॅट, नकार देण्यासारखे काही नव्हतेच. त्यामुळे दोन महिन्यात लग्न करून गौरी सासरी आली.



                   लग्नानंतर एक महिना सुशांत ने सुट्टी घेतली होती. देवदर्शन करून आल्यावर लगेच दोघेजण गोव्याला जाऊन आले. काही दिवस गावी आईबाबांजवळ राहून नव्या नवलाईचे दिवस दोघेही छान एन्जॉय करत होते.



                 सुट्टी संपली आणि दोघेही शहरात आले. सुशांतचा स्वभाव मनमोकळा होता तर गौरी अबोल पण प्रेमळ. काही दिवस गेले आणि सुशांतने गौरीजवळ तिच्या जॉब करण्या बाबत विषय काढला.



              सुशांत ला आपल्या महिला सहकाऱ्यां प्रमाणेच गौरीनेही जॉब करावा, मॉडर्न राहावे, सगळ्यांमध्ये मिसळावे असे वाटे. त्याने तसे तिला सांगितले.



                   पण गौरी ला मात्र नोकरीत अजिबात इंटरेस्ट नव्हता. छान घर सांभाळावे, नवऱ्याला काय हवे नको ते पाहावे, छान छान पदार्थ करून खाऊ घालावेत.. आणि नवऱ्याच्या कौतुकात न्हाऊन निघावे. अशा साध्या इच्छा होत्या तिच्या.



            त्यामुळे सुशांत ने नोकरीचा विषय काढला की ती एकदम शांत होई. सुशांत सारखा मागेच लागला तेंव्हा तिने भीतभीतच सांगितले की, मला नोकरी करायला आवडत नाही म्हणून...



           तिच्या अशा सांगण्याने तो नाराज झाला. त्याने तिला समजवण्याचा प्रयत्न केला. पण गौरी मात्र नोकरी करायला तयार नव्हती.



              काही दिवस गेले आणि त्याच्या छोट्या मोठ्या कुरबुरी सुरू झाल्या. तिला बाहेर सगळ्यांसोबत मिक्स होता येत नाही.. पार्टीला काकूबाई सारखी येते, साडी किंवा पंजाबी ड्रेस घालून... इतरांसारखे वन पीस घालत नाही. . तिला इंग्रजी बोलता येत नाही.. तिच्या मॉडर्न नसण्याच्या त्याच्या अपेक्षे पुढे तिचे सुगरण असणे, सगळ्यांना सांभाळून घेणे, घर नीटनेटके ठेवणे.. इतर कला जोपासणे, हे गुण त्याला दिसतच नव्हते... त्याच्या मते ती कामे मेड ही करू शकते...

लग्नाला वर्ष होत नाही तर त्याने तिला माहेरी आणून सोडले व घटस्फोट मागितला.. गौरी आणि तिचे आईबाबा तर कोलमडूनच गेले. आईबाबांनी हातापाया पडून पोरीच्या संसाराची भीक मागितली त्याच्यापुढे... पण त्याला पाझर फुटला नाही..

आणि त्याने कोर्टाची नोटीस पाठवली तिला घटस्फोटाची.. त्याच्या आईबाबांनी ही समजावले खूप.. गौरी लाडकी सून होती त्यांची.. पण तो कोणाचेही ऐकत नव्हता.. शेवटी आईबाबांनी जास्त संपर्क ठेवण सोडून दिलं त्याच्याशी..



              वर्षभराच्या आरोप प्रत्यारोपानंतर आज घटस्फोट होणार होता त्यांचा... गौरीचे सारे प्रयत्न, विनंत्या,, डोळ्यात पाणी आणून केलेली आर्जवे, सारे सारे निष्फळ ठरले होते... गेले दोन तीन महिने तर तो सुनावणीलाही आला नव्हता.. वकिलांनीच पुढची तारीख घेतली होती दरवेळेस...



            शेवटी गौरीनेच परस्पर संमतीने घटस्फोट देऊन त्याच्या मनासारखे करण्याचे ठरविले.. कारण तिचे खूप प्रेम होते त्याच्यावर.. पण प्रेम असे जबरदस्तीने बांधून तर नाही ना ठेवता येत?



           रिक्षा थांबली तशी विचारांची गतीही थांबली.. तिघेही रिक्षाचे पैसे देऊन कोर्ट रूम कडे निघाले.. अजून अर्धा तास होता सुनावणीला... ते बाहेर बाकड्यावर बसून बोलावण्याची वाट पाहू लागले...



           थोड्या वेळाने वकीलसहेब आले आणि त्यांना घेऊन आत गेले... अजून सुशांत आणि त्याचे वकील दोन्हीही आले नव्हते...



             काहीवेळाने सुशांत आपल्या वकीलांसोबत आत आला... तसे गौरीने त्याच्या कडे पाहिले... तो खूप अस्वस्थ दिसत होता... डोळे खोल गेले होते... बारीक झाला होता.. खूप दिवस आजारी असल्यासारखा वाटत होता.



           त्याला पाहून तिला गलबलून आले... डोळ्यातले पाणी लपवत ती पुढे पाहू लागली..



            न्यायाधीश साहेब आले आणि सर्व उभे राहिले.. मधून मधून तिरकस नजरेने सुशांत गौरीकडे पाहत होता. पूर्वीचा तो त्याच्या डोळ्यात दिसणारा राग, तिरस्कार जाऊन केवळ अगतिकता दिसत होती आज...



        न्यायाधीश साहेबांनी जसे निकाल वाचत असल्याचे जाहीर केले, तसे सुशांतचे वकील उभे राहिले, आणि त्यांनी निकाल देण्याआधी सुशांतला गौरीशी एकांतात काही बोलायचे आहे व ते बोलू देण्याची परवानगी देण्यात यावी अशी विनंती केली...



             न्यायाधीश साहेबांनी गौरी व तिच्या आईबाबांकडे पाहिले... आणि त्यांना बोलण्यासाठी केबिन मध्ये जाण्याची परवानगी दिली... सुशांत उठला व केबिनकडे निघाला.. त्याच्या पाठोपाठ गौरी ही निघाली...



            दोघेही आत आले.. सुशांत ने तिला खुर्चीवर बसण्याची खूण केली. आणि तो तिच्यासमोरच्या खुर्चीवर बसला.. क्षण दोन क्षण कोणीच बोललं नाही... फक्त बघत होते एकमेकांकडे ते...



     "तब्येत बरी नाहीये का तुमची?"... गौरीनेच सुरुवात केली...

       "तुला कसे कळले?"त्याला आश्चर्य वाटले.

      "बघून कळतय तुमच्याकडे.... कशी अवस्था करून घेतलीय स्वतःची...... काय बोलायचं होत तुम्हाला?... निकाल झाल्यावर ही बोलू शकला असतात ना... असेही तुमच्या मनाप्रमाणेच होणार आहे ना आज...."आवंढा गिळत म्हणाली ती...

      " तेच नको आहे मला आता...."तिच्याकडे बघत म्हणाला तो..

     "म्हणजे मला कळले नाही?"... तीने असमंजसपणे विचारले..

          त्याने खुर्ची अजूनच जवळ घेतली तिच्या... आणि हळूच तिचा हात हातात घेत बोलला...

         "म्हणजे मला नकोय आता घटस्फोट.... या काही महिन्यात तुला घटस्फोट देऊन मी काय गमावणार होतो हे मला चांगलेच कळले आहे... तुला घटस्फोट देण्याचा निर्णय माझा होता पण आता मला माझे पुढचे संपूर्ण आयुष्य तुझ्यासोबत जगायचे आहे .. देशील मला साथ.?.. करशील माफ?... मला माहितीय.. मी खूप दुखावलय तुला... पण माझी चूक मला कळलीय ग... वाहवत गेलो होतो मी त्या झगमगाटी दिखाव्याला.... त्याच्या मागे असलेली कौटुंबिक वादळे दिसलीच नाहीत मला... करशील का मला खरंच माफ... येशील माझ्या आयुष्यात परत...."



          पश्चातापाने दग्ध होऊन रडत असलेला तो.... बघवलाच गेला नाही तीला....



          तीने पटकन त्याला जवळ घेतले... दोघेही एकमेकांच्या मिठीत रडत होते.... तो पश्र्चातापाने आणि ती, त्याचे प्रेम, तो, तिला परत मिळाल्याने ... अबोल अश्रू दोघांच्या भावना व्यक्त करत होते... दाटून आलेले नात्यावरचे मळभ जणू अश्रूंच्या रूपाने आज विरून गेले होते....



          आणि तिथे दरवाज्यात अजून आले नाहीत म्हणून पाहायला आलेले आईबाबाही लेकीचा संसार परत मिळाला म्हणून आनंदाश्रु ढाळत होते...



          अनपेक्षितपणे घेतलेल्या त्याच्या एका निर्णयाने आज पुन्हा दोघांचे आयुष्य सुखाच्या उंबरठ्यावर उभे होते....




अर्चू पाटील....